भारतीय दिव्यास्त्र

14 Mar 2024 15:19:10
@काशीनाथ देवधर  9881253425
नुकतीच 11 मार्च 2024 या दिवशी भारताच्या दिव्यास्त्राची पहिलीच चाचणी यशस्वी झाली. या दिव्यास्त्र मिशनद्वारा अग्नी-5 या ICBM चे MIRV असे युद्धशीर्ष म्हणजे भारताच्या भात्यातील आणखी एक उत्तम शस्त्र दक्षिण आशियामध्ये शक्तिसंतुलन राखण्यास आणि भारताचा जागतिक दबदबा वाढवण्यास मदतच करेल, हे विश्वगुरुपदाकडे टाकलेले आणखी एक भक्कम पाऊल असेल.
divyastra mission
 
नुकतीच 11 मार्च 2024 या दिवशी भारताच्या दिव्यास्त्राची पहिलीच चाचणी यशस्वी झाली, त्याबद्दल सर्व देशवासीयांच्या वतीने पंतप्रधान मोदीजींनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या, तंत्रज्ञांच्या गटाचे अभिनंदन व कौतुक केल्याचे समाजमाध्यमांवर पाहिले.
  
 
हे दिव्यास्त्र काय आहे? तर डीआरडीओने विकसित केलेली ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे. याचे दोन महत्त्वाचे भाग आहेत - पहिला भाग म्हणजे ICBM अग्नी-5 हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र, ज्याचा पल्ला कमीत कमी 5500 कि.मी.चा आहे. अग्नी-5 क्षेपणास्त्र भारतीय सेनेच्या स्पेशल फोर्समध्ये - म्हणजेच Strategic Forces Commandकडे आहे. त्याच्या विशेष भागाची - युद्धशीर्षाची म्हणजेच बाँबची प्रथमच चाचणी घेतली. या युद्धशीर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच युद्धशीर्षामध्ये एकाच वेळी तीन ते सात स्वतंत्र बाँब घेऊन जाता येते आणि वर विशिष्ट अंतरावर असताना पृथ्वीकडे परत येण्याच्या मार्गावर वातावरण कक्षेबाहेरच ते बाँब वेगळे होतात व खाली शत्रूच्या विविध ठिकाणी असलेल्या शत्रुलक्ष्याचा वेध घेऊन त्यावर अचूकतेने बाँबहल्ला करता येतो. 1200 कि.मी. अंतरापर्यंत वेगवेगळी लक्ष्ये नष्ट करता येतात. या प्रणालीला MIRV (Multiple Independantly Targettable Re-entry Vehicle) म्हणतात. पहिल्याच चाचणीच्या वेळी सर्व प्रकारे काळजी घेऊन भारतीय स्वदेशी उड्डाण प्रणाली आणि खूप अचूक अशी सेन्सर यंत्रणा यांचा उपयोग करून बाँबचा अगदी अचूक मारा (Precision hit) करून लक्ष्य नष्ट करण्यायोग्य प्रणाली बनवली आणि पहिलीच चाचणी संपूर्ण यशस्वी झाली.
 
 
‘दिव्यास्त्र’ चाचणीद्वारा MIRVसह ICBM अथवा SLBM (Submarine Launch Ballistic Missile) असे तंत्रज्ञान असणार्‍या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन यांच्या गटात भारताला स्थान प्राप्त झाले आहे.
 
 
‘अग्नी-5’ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्राची प्रथम 29 एप्रिल 2012 या दिवशी यशस्वी चाचणी करून किमान पल्ला 5500 कि.मी.चा गाठून ICBM असणार्‍या देशांमध्ये आपण संमीलित झालो होतो. तसेच 11 मे 1998ला पोखरण येथे तीन अणुबाँब चाचण्या आणि 13 मे 1998ला आणखी दोन अणुबाँब चाचण्या यशस्वी करून भारत अण्वस्त्रधारी देशांच्या गटात संमीलित झाला होता आणि अणुबाँब-हायड्रोजन बाँबबरोबरच कमी क्षमतेचे (सब किलो टन यील्डचे) बाँब - जे तोफांमधून रॉकेट/अग्निबाणाद्वारा अथवा क्षेपणास्त्राद्वाराही डागण्यात येतील, असे बनवले व त्याच्याही यशस्वी चाचण्या घेतल्या.
 
 
अणुबाँब हा देशाची सशक्त व समर्थ अशी ओळख करून देते आणि MIRV या ‘दिव्यास्त्र’ चाचणीने एकाच वेळी अगदी दोन ते दहा अणुबाँब अथवा पारंपरिक बाँब, डीकॉय असे एकाच अग्नी-5द्वारे उड्डाण घेऊन वातावरण कक्षेबाहेर योग्य वेळी योग्य पद्धतीने व क्रमाने ते विलगीकरण करून वेगवेगळ्या शत्रुलक्ष्यांवर अचूकतेने डागले जातात, असे गुंतागुंतीचे व क्लिष्ट असूनही सुरक्षित व विश्वसनीय स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून भारतमातेला अधिक सक्षम बनवले आहे आणि चीनबरोबर असणारे शक्तिसंतुलन साधण्यात महत्त्वाचे योगदान आहे.
 
 
युद्धशीर्षामधून पृथ्वीकडे येताना हे सर्व बाँब वातावरण कक्षेत स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेळी घुसत असताना त्यांचा वेग किमान सहा कि.मी. प्रतिसेकंद एवढा प्रचंड असल्याने बाँबच्या बाह्य पृष्ठभागावर 3000 ते 4000े उ इतके प्रचंड तापमान असते. मात्र आतील बाँब सामान्यत: 50े उ आसपास ठेवणारे उष्णतारोधी कवच प्रत्येकास असते व त्यासाठी कार्बन-कार्बन कंपोझिटचा कोन (शंक्वाकृती) जणू काही ‘अग्निगोल’ दिसतो, म्हणून ‘अग्नी’ हे या प्रकारच्या क्षेपणास्त्राचे नाव शोभते.
 
 
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना 1980च्या दशकात इस्रोकडून डीआरडीओकडे आणून त्यांच्या नेतृत्वामध्ये IGMDPअंतर्गत जागतिक दर्जाची पहिली पाच क्षेपणास्त्रे विकसित केली, त्या कामाचा भक्कम पाया भारताला स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वाचा ठरला. त्यांच्या अथक कामामुळे भारत हा ‘सशक्त भारत समर्थ भारत’ गणला जातो. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग व अग्नी या पाचही यशस्वी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामुळे भारत आता सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात अग्रेसर झाला. पहिली क्षेपणास्त्रे आता कालबाह्य झाली व पृथ्वी-2, पृथ्वी-3, आकाश प्राइम, आकाश नेक्स्टजनरेशन, SRSAM, MRSAM, QRSAM, LRSAM, ब्रह्मोस, अस्त्र, रुद्रम, स्मार्ट अशा क्षेपणास्त्रांची मालिकाच्या मालिका आज भारतीय सैन्यदलांच्या भात्यांमध्ये असल्यामुळे भारताची स्वयंपूर्णता देशाला बळकटी देऊन जाते. अग्नी क्षेपणास्त्र मालिकेवर नजर टाकली, तरी आपल्या लक्षात येईल की ICBM अग्नी-5पर्यंतचा आपला प्रवास कसा झाला.
 
 
भारताकडे A-SAT हे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानही विकसित असून 27 मार्च 2019ला विशेष चाचणीद्वारे भारताने अवकाश शक्ती दाखवून दिलीच आहे आणि अवकाश क्षेत्रातही चंद्रावर आपला झेंडा रोवला आहे.
 
K-Series ही डॉ. कलामांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव दिलेली क्षेपणास्त्र शृंखला पाणबुडीवरून डागता येते व पाच हजार कि.मी. पल्ला असणारे अणुबाँब क्षमता असलेले क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित केले असून K-4साठी MIRVचा उपयोग करता येतो.
 
 
म्हणून आताच यशस्वी चाचण्या घेतलेले दिव्यास्त्र मिशनद्वारा अग्नी-5 या ICBMचे MIRV असे युद्धशीर्ष म्हणजे भारताच्या भात्यातील आणखी एक उत्तम शस्त्र दक्षिण आशियामध्ये शक्तिसंतुलन राखण्यास आणि भारताचा जागतिक दबदबा वाढवण्यास मदतच करेल, हे विश्वगुरुपदाकडे टाकलेले आणखी एक भक्कम पाऊल असेल.
Powered By Sangraha 9.0