पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा का हवे आहेत?

विवेक मराठी    14-Mar-2024
Total Views |
@रवींद्र मुळे  9422221570
 
 
modi
लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजत असतानाच मतदारराजा सावध हो, असा सुप्त संदेश मिळत आहे. तो म्हणजे लोकशाहीच्या या उत्सवासाठी योग्य मतदान करण्याचा. हे मतदान पाच वर्षांसाठी असले, तरी, त्याचा परिणाम पुढील काही शतकांवर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गेल्या दहा वर्षांत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व लाभले आहे. हे नेतृत्व भारताला तिचे गतवैभव पुन्हा मिळवून देणारे ठरले आहे, यात शंका नाही. भारत विश्वगुरुपद नक्कीच प्राप्त करू शकतो, त्यासाठी आवश्यक आहे तो भारताच्या आत्म्याचा विचार करणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाचा.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची सर्वत्र चर्चा आहे. मतामतांची रणधुमाळी दिसत आहे. दोन्ही बाजूंनी निवडणूक ’मोदी’केंद्रित झाली आहे. कारण विरोधी पक्षांना बोलायला एकमेव विषय मोदी आहे आणि भाजपाचीसुद्धा मोदींवरच पूर्ण भिस्त आहे.
 
 
अशा वेळी खरेच देशाला, लोकांना मोदी पुन्हा का हवे आहेत? याचा शोध घेण्याची गरज आहे.
 
 
2014 साली निवडणुका होऊन मोदी यांचा शपथविधी झाला आणि ते पंतप्रधानपदी आरूढ झाले. त्या वेळी वि.हिं.प.चे मा. अशोकजी सिंघल यांनी थेट “पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर प्रथमच हिंदू व्यक्ती दिल्लीत सत्तेवर आली आहे” असे विधान केले होते. ‘चक्रवर्ती राजा’ असा ही त्यांनी त्यांचा उल्लेख केला होता आणि त्यावर नेहमीप्रमाणे जोरदार टीकाही झाली होती. पण स्व. अशोकजी यांचे विधान किती अचूक होते, हे गेल्या 10 वर्षांत वेळोवेळी सिद्ध होत गेले आहे.
 
 
अगदी अलीकडे दोन दिवसांपूर्वी CAA कायद्याची अधिसूचना निघाल्यावर मतुआ या हिंदू समाजाच्या समूहाने दिलेल्या प्रतिक्रिया बघण्यासारख्या आहेत. बांगला देशातून अत्याचारग्रस्त होऊन ज्यांच्यावर निर्वासित होऊन भारतात येण्याची वेळ आली, तो हा मतुआ समाज! हिंदू समाजावर कुठेही अत्याचार झाले, तर त्याने विस्थापित झाल्यावर जायचे कुठे? गेली अनेक वर्षे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगला देश या देशांतून विस्थापित झालेला हिंदू नागरिकत्व मिळण्यापासून वंचित होता. त्यांना न्याय मिळाला तो मोदी यांच्या निर्णयाने, म्हणून मोदी पुन्हा पंतप्रधान हवे आहेत.
 
 
मागील आठवड्यात श्रीनगर येथे मोदीजी यांची सभा झाली. 35000 क्षमतेच्या मैदानाबाहेर 25000 खुर्च्या टाकाव्या लागल्या, एवढी प्रचंड गर्दी जमली. प्रशासन आणि पोलीस यांचा अंदाज तर चुकलाच, तसाच भाजपा कार्यकर्त्यांनाही असा अंदाज नव्हता. सुमारे 40 वर्षांपूर्वी मोदी 40 दिवस काश्मीरमध्ये होते, त्या वेळी जोडलेल्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क होता, त्या आधारावर त्यांनी ही किमया घडवून आणली. त्या सर्वांसमोर 370 आणि 35अ कायदा रद्द करताना घेतलेली भूमिका त्यांनी ठामपणे तर मांडलीच आणि स्वर्गीय श्यामाप्रसादजींना विनम्र श्रद्धांजली वाहताना त्यांनी कुठलाही न्यूनगंड मनात ठेवला नाही. आज बदल झालेला जम्मू आणि काश्मीर आणि उद्याचा मिळवायचा पाकव्याप्त काश्मीर यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवेत.
 

divyastra mission 
 
अलिकडेच DRDOने ‘मिशन ब्रह्मास्त्र’अंतर्गत संपूर्ण स्वदेशी अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यापाठोपाठ पोखरणमध्ये तिन्ही भारतीय संरक्षण दलांनी आपली प्रात्यक्षिके सादर केली. एका अर्थाने भारताच्या संरक्षणसिद्धतेचे ते शक्तिप्रदर्शन होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमची संरक्षणसिद्धता परावलंबीच होती. त्यातील दलाली आणि त्या दलालीवर पोसलेले एजंट हीच आमची संरक्षणसिद्धतेची उपलब्धी होती. बोफोर्स प्रकरण तर शरमेने मान खाली घालावी असेच होते. आज त्यातून या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होत चालला आहे. 40पेक्षा जास्त देशांत आम्ही क्षेपणास्त्रे निर्यात करत आहोत. पूर्वीचीच प्रयोगशाळा, तेच शास्त्रज्ञ, पण त्या सर्वांना प्रोत्साहित करणारे मोदी यांचे नेतृत्व.. परिणाम आपल्यासमोर आहे. संरक्षण ते अंतराळ ही भरारी चंद्रयान ते आदित्य एल 1 ही मोहीम आणि पुढील वर्षी अंतराळवीरांचा सुमारे 50 वर्षांनंतर होऊ घातलेला प्रवास यांच्या यशासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत.
 
 


vivek 
 
नुकतेच अयोध्या येथे जाणे झाले. 1992 साली असलेली परिस्थिती आणि आता झालेले बदल अनुभवत होतो. शरयूचे घाट, लता मंगेशकर चौक आणि प्रत्यक्ष रामलल्ला मंदिर.. सर्व मर्यादा सोडून डोळ्यातून आनंदाश्रूंचे बांध अखंड वाहत होते. येणार्‍या प्रत्येक भाविकांची हीच भावविभोर अवस्था होती. जणू भारतमातेच्या आमच्या या विस्तीर्ण घरातील देवघराचा कोपरा 500 वर्षांनी पुन्हा पवित्र होऊन संपूर्ण भारतीयांना एक आध्यात्मिक प्रेरणा देत मातृभूमीच्या दिग्विजयी वाटचालीसाठी सज्ज होत आहे. काशी विश्वेश्वर कॉरिडॉर, उज्जैन येथील निर्माण होत असलेले भव्य कॉरिडॉर, सर्वत्र हिंदू मंदिरांची होत असलेली भरभराट जणू भारताच्या आत्म्याचा नव्याने शोध होऊ घातल्याची साक्ष देत आहे. या शोधाला अंतिम टप्प्यात नेण्यासाठी पंतप्रधान म्हणून आम्हाला पुन्हा मोदी हवे आहेत.
 
 
समस्त हिंदू समाजाची मागणी आहे ती अयोध्या-काशी-मथुरेची. हिंदूंची आराध्य दैवत असलेल्या या मंदिरांची उद्ध्वस्त अवस्था पाहून स्वत: छत्रपती शिवराय खंत व्यक्त करायचे आणि या मंदिरांची मुक्ती, जीर्णोद्धार हा त्यांच्या स्वराज्याच्या मूलभूत धोरणाचा भाग होता. पुण्यश्लोक अहल्यादेवी यांनी त्यांच्या काळात ही खंत कमी करण्याचा प्रयत्न केला. पण अयोध्याव्यतिरिक्त उर्वरित दोन मंदिरांची मुक्ती अजून बाकी आहे. या लढ्याला राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचा पाठिंबा गरजेचा आहे. हिंदू धर्मस्थळांच्या मुक्तीसाठी मोदी पुन्हा पंतप्रधान हवे आहेत.
 
 
vivek
 
गेल्या 10 वर्षांत अकबर रोड राजपथ बनला. नेताजी सुभाष बाबू दिल्लीतील प्रमुख हुतात्मा स्मारकात स्थापित झाले. नाविक दलाच्या चिन्हात छत्रपती शिवरायांची मुद्रा स्थापित झाली. 26 जानेवारीनंतर सैन्याच्या होणार्‍या retreat परेडमध्ये असणारे ख्रिश्चन संगीत जाऊन ‘ए मेरे वतन के लोगो’ आणि ‘जयोस्तुते’ कानावर येऊ लागले. ल्युटियन्सने बांधलेले संसद भवन जाऊन वैदिक शास्त्रार्थ भवनाच्या धर्तीवर संसद भवन बनले. Walking Stick म्हणून खितपत पडलेला राजदंड विधिवत स्थापित झाला. मानसिक गुलामगिरीतून भारतीय जनमानस मुक्त करण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान हवे आहेत.
 
 
या देशावर दीर्घ काळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी इंग्रजांनी एक शैक्षणिक धोरण आणले. मेकॉले त्याचा सूत्रधार. हेच धोरण दुर्दैवाने भारताच्या स्वातंत्र्यानंतर चालू राहिले, किंबहुना अधिक विकृत होत गेले. इतिहास चुकीचा शिकवला गेला. भारतीय संस्कृतीशी पूर्ण फारकत घेणारे हे धोरण नव्या पिढीला देशासाठी जगण्याची प्रेरणा देण्यात सपशेल अपयशी ठरले होते. ते शैक्षणिक धोरण बदलण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवले, ज्याचे परिणाम पुढील 25 वर्षांत आम्ही बघणार आहोत. त्यासाठी पुन्हा मोदी भारताचे पंतप्रधान झाले पाहिजेत!
 
 

vivek 
 
गेली 10 वर्षे पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज आपले नेमलेले खाते योग्य दिशेने पुढे नेत आहेत. भारतीय रस्ते वाहतूक रोज निर्माण होत असलेल्या रस्त्यांनी सुखद अनुभूती देत आहे ते गडकरी यांच्यासारख्या मंत्र्यामुळे. रेल्वे आपली कात टाकून आंतरराष्ट्रीय दर्जाची होत आहे ती पियूष गोयल आणि अश्विन वैष्णव या मंत्र्यांच्या मेहनतीने. संपूर्ण जगात मंदी भासत असताना आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानाकडून तिसर्‍या क्रमांकावर झेप घेत आहे. जीडीपीच्या पूर्वकल्पना आणि अंदाज खोटे ठरवत भारत वेगाने पुढे चालला आहे. राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा पोलादी पकड घेत आहे ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या आक्रमक, धाडसी भूमिकेमुळे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाची आठवण यावी असे मंत्रिमंडळ आम्हाला पुन्हा हवे आहे, ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कुणी लावू शकलेले नाही. यासाठी मोदीजी पुन्हा पंतप्रधान म्हणून आम्हाला हवे आहेत.
 
 
जगभर चालू असणार्‍या अशांत वातावरणात, युद्धजन्य परिस्थितीत आणि प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत जग भारताकडे खूप आशेने बघत आहे. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवताना लढलेला लढा तर जगाने बघितला, पण भारत मानसिक स्वातंत्र्य मिळवताना जे गतवैभव प्राप्त करू पाहत आहे आणि त्याद्वारे स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेली जी भविष्यवाणी खरी ठरू पाहत आहे, याचे साक्षीदार होण्याचे भाग्य सगळ्या भारतीयांना अनुभवायचे आहे. युद्धकाळात ‘वंदे भारत’ मोहिमेद्वारे भारतीय विद्यार्थी सुरक्षित परत येतात, कतार येथून निष्पाप भारतीय सुटतात आणि परत येतात. रशिया, युक्रेन हे दोन्ही देश भारताच्या मध्यस्थीची वाट बघतात हे सर्व भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढल्याचे द्योतक आहे. याच भारताच्या विश्वगुरुत्वाच्या पाऊलखुणा आहेत. म्हणून मोदीजी आम्हाला पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत.
 

vivek 
 
गेल्या वर्षी जी20 देशांचे प्रतिनिधी भारतात एकत्र आले. भारताच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवताना किंचितही न्यून न बाळगणारे मोदी आम्ही बघितले. चीनला एकटे पाडून वाहतूक कॉरिडॉरसाठी इतर देशांबरोबर सामंजस्य करार करताना आम्ही मोदींमधला राजकीय मुत्सद्दी बघितला आहे. युक्रेन-रशिया युद्धात दोघांना जवळचे वाटणारे राष्ट्रप्रमुख मोदी आहेत. भू-राजकारणामध्ये (जिओपॉलिटिक्समध्ये) भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढवताना जयशंकर यांच्यासारखा खंबीर साथीदार त्यांनी शोधला आहे. जिकडेतिकडे भारताकडे आदराने बघितले जात आहे. म्हणून मोदीजी आम्हाला पुन्हा पंतप्रधान मोदी हवे आहेत.
रुपयात व्यापार सुरू झाला आहे. Modinomics नावाचे एक नवे अर्थशास्त्र विकसित होत आहे. बळीराजा नवी क्षितिजे शोधत आहे. श्रीधान्यांची (मिलेट्सची) मागणी वाढत आहे. योगदिन हा सर्व देशांनी आता स्वीकारला आहे. मोदीजी भारतीय आहार, भारतीय विहार आणि भारतीय विचार याचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनले आहेत आणि म्हणून मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून हवे आहेत.
 
 
स्वावलंबी समाज, त्यातून होऊ घातलेला विकसित भारत आणि या विकसित भारताचा ‘सर्वे भवंतु सुखिन:’ या मंत्राचा उद्घोष जगभर आम्हाला करायचा आहे. ’कृण्वंतो विश्वंम् आर्यम्’ हा संकल्प आम्हाला कृतिशील करायचा आहे. ’जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात’ ही पसायदानातील धारणा ’वसुधैव कुटुंबकम्’ या मार्गाने सत्यात उतरवण्यासाठी देशाचे नेतृत्व पुन्हा मोदीजी यांच्याकडे सुपुर्द करायचे आहे.
 
 
गेल्या 75 वर्षांत लोकशाहीचा बुरखा पांघरून परिवारवादी पक्षांनी ठरावीक लोकांना वारसा परंपरेने सत्तेचा उपभोग घेताना बघितले. मोदी यांना कुठलाही वारसा नाही आणि त्यांचा कुठला व्यक्तिगत परिवार नाही. ना त्यांचे कुणी नातेवाईक पंतप्रधान निवासाकडे फिरकत असतात, ना कुणी राजकीय लाभार्थी आहेत. राजकीय व्यवस्थेतून मिळणारे पद हे विश्वस्त पद असते, लाभाचे नव्हे, हे स्वत:च्या व्यवहारातून दाखवणारे मोदी आहेत. अशी विश्वस्त परंपरा पुढे नेण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे.
 
 
अजमेर येथे जाऊन चादर वाहणारे, पंतप्रधान निवासात गोल टोप्या घालून इफ्तार पार्ट्या देणारे, या देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लीम समाजाचा आहे असे सांगणारे पंतप्रधान आम्ही पाहिले. पण अनुष्ठान करणारे, नवरात्रात उपवास करताना फक्त लिंबूपाणी पिणारे, पंतप्रधान निवासात गायींचे संवर्धन करणारे आणि देशभरात मंदिरात दर्शन घेताना हिंदू असल्याचा सार्थ अभिमान बाळगणारे पंतप्रधान मोदींच्या रूपाने आम्ही प्रथमच पाहत आहोत. म्हणून मोदीजी आम्हाला पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत.
 
 
 
वेळेच्या नियोजनासाठी विमानतळावरसुद्धा मीटिंग घेणारे, प्रसंगी विमानतळावरच स्नान आदी उरकून घेणारे, हॉटेलचे बिल वाढू न देण्यासाठी टॅक्सीतून सामानासहित मीटिंगसाठी जाणारे, प्रवासात घरून निघताना दोन ठेपले डब्यात घेऊन स्वत:च्या गरजा मर्यादित ठेवणारे मोदी आम्ही पाहत आलो आहे आणि सरकारी पैशाची, संपत्तीची उधळपट्टी करणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारे सवंग पुढारी आम्ही पाहत आलो आहेत. म्हणून त्या पार्श्वभूमीवर मोदी आम्हाला वेगळे वाटतात, म्हणूनच आम्हाला मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत.
 
 
लहानग्या मुलाला कडेवर घेणारे, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस आजोबांच्या भूमिकेत सल्लामसलत करणारे, तरुण उद्योजक, शास्त्रज्ञ, खेळाडू, अभिनेते यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रोत्साहित करणारे, प्रसंगी आर्थिक गैरव्यवहारामुळे अस्वस्थ होत करड्या भाषेत बोल लावणारे, उद्योजकांना त्यांच्या परिभाषेत समजावून सांगत विकासासाठी सामावून घेणारे, महिलांना सशक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आणि दिव्यांगाना दया नव्हे तर अधिकार प्रदान करून बरोबरीची प्रतिष्ठा मिळवून देणारे खर्‍या अर्थाने कुटुंबप्रमुख असे पंतप्रधान मोदी आम्ही बघत आलो आहोत, म्हणून मोदी आम्हाला पंतप्रधान म्हणून पुन्हा हवे आहेत.
 
 
फक्त वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेणारे, पण आयुष्यभर कष्ट करणार्‍या आपल्या आईला पंतप्रधान मोदींची आई म्हणून ऐश्वर्य-उपभोग यापासून दूर ठेवणारे मोदी, आई गेल्यावर भावुक होणारे, पण त्या भावनांचा कुठलाही बाजार न मांडता आपल्या सामाजिक कर्तव्यात मग्न होणारे मोदी, आपली दिवाळी सैन्यातील जवानांबरोबर साजरी करताना त्यांच्यातले एक होऊन जाणारे मोदी ही मोदी यांची सगळी रूपे आम्हा सर्वसामान्य भारतीयांना जवळची वाटतात आणि म्हणूनच मोदी पंतप्रधान म्हणून भारतीयांना पुन्हा हवे आहेत.
 
 
एका अमृतकाळाची नांदी ठरणार्‍या लोकशाहीच्या या उत्सवासाठी योग्य मतदान करण्यास सिद्ध होऊ या. हे मतदान पाच वर्षांसाठी असेल, पण त्याचा परिणाम पुढील काही शतकांवर होणार आहे. चला तर मग, लोकशाहीचा हा उत्सव पुन्हा यशस्वी करू या, भारताला विश्वगुरू बनवू या.
 
भारत माता की जय!