अशीही रुग्णसेवा

विवेक मराठी    16-Mar-2024
Total Views |

 patient care
बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागत आहे. या दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी लागणारा खर्चही अफाट असतो, त्यासाठी रुग्णांचे नातेवाईक आपल्या आयुष्याची जमापुंजीही खर्ची करतात. मात्र काही वेळा हा खर्च आवाक्याबाहेरचा असतो. अशा वेळी रुग्णांच्या मदतीला धावून येतात शासनाच्या आरोग्य विमा योजना. परंतु त्यांची पुरेशी माहिती नसल्यामुळे आणि त्यांची पूर्तता होण्यासाठी असलेल्या अज्ञानाअभावी रुग्णांना त्यांचा लाभ मिळत नाही. या सर्वांसाठी संजीवनी म्हणून नावारूपाला आला एक अनोखा प्रकल्प - सामाजिक उद्योग, तो म्हणजे तनुजा विकास देशमुख यांचा Preauth And Claim Management. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून ‘छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन’ ही कंपनी नावारूपाला आली.
 
@प्रसाद मोर्जे - 8104807768
 
प्रभू श्रीराम-रावण युद्धात मूर्च्छित झालेल्या लक्ष्मणासाठी मारुतीरायाला संजीवनी आणावी लागली, तोपर्यंत एक वेगळी शांतता पसरली होती. सर्वांचे चेहरे चिंताग्रस्त होते, हृदये काळजीने भरलेली होती. हनुमंतांनी वायुवेगाने जात द्रोणागिरी पर्वत मुळासकट उचलून आणला आणि संजीवनीच्या उपचाराने लक्ष्मण शुद्धीवर आले. आताच्या काळात परिस्थिती काही वेगळी नाही. बदलती जीवनशैली, सातत्याने बदलणारे ऋतुचक्र, रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर यामुळे आज असंख्य आजारांना निमंत्रण मिळाले आहे. मग सुरू होते शोधाशोध अत्याधुनिक अशा उपचारांची, होते धावपळ उपचारासाठी लागणारा खर्च उभा करण्याची.. दागिने विकले जातात, जमिनी गहाण ठेवल्या जातात. एवढे करूनही एका रस्त्याच्या कडेला संसार मांडावा लागतो, उपचार पूर्ण होईपर्यंत. परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रयत्न केले जातात, कुटुंबातील व्यक्तीला वाचवण्यासाठी धडपड सुरू होते. संघर्ष आपलाच आपल्याशी, डोळ्यासमोर उभे राहतात असंख्य प्रश्न. काही जीवने आत्महत्या करून संपवली जातात, तर काही घरच्यांच्या भविष्याची काळजी करत व्याकूळ होतात. अशातच संजीवनी स्वरूपात रुग्णांच्या मदतीला धावून येतात शासनाच्या आरोग्य विमा योजना आणि पुन्हा आशा पल्लवित होतात, पंखांना नवे बळ येते. परंतु शासकीय आरोग्य विमा योजनेबद्दलच्या अज्ञानामुळे कागदपत्रांची पूर्तता होत नाही आणि मग रुग्णांना सतत धावावे लागते त्याचा पाठपुरावा करण्यासाठी. योजनांचे असलेले क्लिष्ट नियम, मार्गदर्शक तत्त्वे या सर्वांमुळे रुग्णालयाची इच्छा असूनही रुग्णालयाला रुग्णांना मदत करता येत नाही. या सर्वांसाठी संजीवनी म्हणून नावारूपाला आला एक अनोखा प्रकल्प - सामाजिक उद्योग, तो म्हणजे PreAuth And Claim Management. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून ‘छत्रपती शिवाजींज क्रिएटिव्ह सोल्युशन’ ही कंपनी नावारूपाला आली. तनुजा विकास देशमुख या कंपनीच्या प्रोप्रायटर आहेत.
 
 
जोगेश्वरीतील बांद्रेकरवाडी येथे एका सामान्य कुटुंबात तनुजा यांचा जन्म झाला. तनुजा यांचे वडील रमेश सावंत हे संघस्वयंसेवक आहेत. त्यामुळे साहजिकच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, त्यामुळे समाजासाठी काही तरी केले पाहिजे, याचे लहानपणीच आईबाबांकडून बाळकडू मिळाले. सन 2004च्या आसपास अभाविपच्या संपर्कात आल्यानंतर पश्चिम मुंबई, अंमळनेर, धाराशिव या ठिकाणी अभाविपच्या पूर्णवेळ रचनेतून त्यांनी भाग संघटनमंत्री म्हणून काम केले. पूर्ण वेळ म्हणून काम थांबवल्यानंतर तनुजा यांनी जनसेवा बँकेत काम सुरू केले. परंतु आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना मनात असल्याने, आरोग्य क्षेत्रातील शासकीय विमा योजना राबवताना येणार्‍या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली आणि बँकेची सुरळीत सुरू असणारी नोकरी सोडून दिली. अभाविपच्या संस्कारामुळेच आपले पती विकास देशमुख यांच्या सोबतीने आरोग्य क्षेत्रात अशा वेगळ्या उद्योगांमध्ये शिरण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला. अभाविपचे कार्यक्रम, कार्यपद्धती, विविध शिबिरे, अभ्यासवर्ग यातून कार्यकर्ता कसा घडला जातो, याचे प्रात्यक्षिक तनुजा यांनी कंपनीच्या जडणघडणीत दाखवले.
 

deshmukh 
 
टाटा स्मारक रुग्णालयासारख्या कर्करोगांसाठी वरदान ठरणार्‍या रुग्णालयामधून ’छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन’ने आपल्या कामाला सुरवात केली. प्रशिक्षित मनुष्यबळ, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सेवाभाव वृत्ती, योग्य वेळेत कामाचा निपटारा करण्याची पद्धत यामुळे ही कार्यपद्धती रुग्णांच्या आणि रुग्णालयाच्या पसंतीस उतरली आणि मग सुरू झाला हा अनोखा प्रवास. 2012 ते 2023 या कालखंडात भारतातील जवळजवळ 8 राज्यांत छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन आपली सेवा देत आहे. आयुष्मान भारत योजना, तसेच विविध राज्य शासनांच्या अशा वेगवेगळ्या 13 योजना छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन अत्यंत प्रभावीपणाने राबवीत आहे.
 
 
आयुष्यान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन कार्यरत असलेल्या सर्व रुग्णालयांना Best Performance Awardने सन्मानित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन कार्यरत असलेल्या सर्व राज्यांमध्ये ते काम करत असलेली रुग्णालये योजनेच्या अंलबजावणीमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. शासकीय आरोग्य विमा योजनांचे नीट व्यवस्थापन करत असताना, रुग्णांच्या सोयींकडे विशेष लक्ष देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना धावपळ होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशनने सेवाव्रती ही संकल्पना अस्तित्वात आणली. रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करणे, कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मार्गदर्शन करणे, योजनांच्या नियमांप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून घेणे याचे नियोजन सेवाव्रतीमार्फत केले जाते.
 

deshmukh 
 
छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशनच्या कार्याचा आलेख वर्षांगणिक चढत्या क्रमांकाने वाढत आहे, असा आगळावेगळा प्रवास करताना 3 लाखापेक्षा जास्त रुग्णांना - लाभार्थींना 8 लाखापेक्षा जास्त विमा दाव्यांच्या माध्यमातून सुमारे 1300 कोटीपेक्षा जास्त मदत केली आहे. 1200 कोटी दाव्यांचे निराकरण करून हा निधी रुग्णालयांना उपलब्ध करून दिलेला आहे. दैनंदिन व्यवहारातील नम्रपणा आणि सहकार्य करण्याची वृत्ती यामुळे सेवाव्रती आणि रुग्ण यांचे एक अतूट नाते तयार होते, याचा मी स्वत: अनुभव घेतलेला आहे. सेवाव्रतींच्या सहकार्याने रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच कर्मचारिवर्ग एकमेकांच्या समन्वयाने रुग्णांना लाभ देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतरही बर्‍याच वेळेला या सेवाव्रतींना भेटायला येतो, ओळखीच्या रुग्णांना त्या सेवाव्रतींशी जोडून देतो. असा हा रुग्णसेवेचा ओघ अव्याहतपणे सुरू राहतो. हेच यश म्हणावे लागेल तनुजा विकास देशमुख यांच्या नियोजनाचे आणि प्रशिक्षणाचे.
 
 
छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशनच्या प्रत्येक कर्मचार्‍यामध्ये रुग्णसेवेचा ध्यास रुजलेला दिसतो, त्यामुळे वेळेची मर्यादा जरी असली, तरी प्रत्येक कर्मचारी जेवढे शक्य असेल तितके कामाचे तास वाढवत समाजकार्याच्या या प्रवासात आपले अमूल्य योगदान देत आहे. त्यामुळे ‘मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार 2024’ हा या सेवाव्रतींचे, विकास ज्ञानू देशमुख व तनुजा विकास देशमुख यांच्या मेहनतीचे फळ आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा पुरस्कार रुग्णांच्या आशीर्वादामुळे मिळाला अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. तनुजा विकास देशमुख यांच्या या धाडसी प्रवासाला, त्यांच्या टीमच्या कठोर मेहनतीला आमचा सलाम. छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशनचे हे कार्य आणखी वाढत जावो आणि अशीच रुग्णसेवा त्यांच्या हातून कायम घडो, ही मनापासून शुभेच्छा!
 
नर है नर का भाग्यविधाता,
पुरखो की यह सीख समझकर,
कर्मलीन हो सदा चले।
उस दिग्विजयी की गति लेकर,
सतत चले कर्मण्य बने।