खांदेरीची मोहीम - इंग्रजांना आणि सिद्दीला शह

लेखांक : 13

विवेक मराठी    18-Mar-2024   
Total Views |
 
khanderi fort  
 
इंग्रजी आरमाराविरुद्ध झालेली खांदेरीची मोहीम म्हणजे मराठ्यांच्या आरमाराच्या चिवट आणि अखंड प्रतिकाराचे सर्वोत्तम उदाहरण. खांदेरी बेट ताब्यात घेतल्यावर इंग्रजांनी जंग जंग पछाडले, तरी मराठ्यांनी अखेरपर्यंत किल्ल्याचे बांधकाम करून सिद्दीला पायबंद घातलाच.
 
स्वराज्याच्या सागरी सीमांचे संरक्षण आणि सागरी व्यापाराचा विकास या प्रमुख हेतूंसाठी शिवरायांनी सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच अशा सागरी सत्तांसमोर मराठ्यांचे आरमार निर्माण केले. 1657-58पासून सुरू झालेल्या छोट्या आरमाराचा विस्तार 1678-79पर्यंत किती झाला आणि मराठी नौदलाची ताकद किती वाढली, याचे उत्तम उदाहरण म्हणजे खांदेरी मोहीम. आरमाराच्या हालचाली, रसद, शस्त्रांचा पुरवठा आणि स्वराज्याचे सागरी सीमासंरक्षण यासाठी शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर जलदुर्गांची माळ बांधली. सिद्दीच्या जंजिरा किल्ल्याच्या उरावर पद्मदुर्ग बांधून दुसरी राजपुरी निर्माण केली. दक्षिणेला विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यासारखे बलाढ्य किल्ले उभे ठाकले.
 
 
सिद्दीला शह देण्यासाठी उत्तरेला मुंबईजवळ जलदुर्ग बांधावा ही शिवरायांची योजना होती. त्यासाठी त्यांचे लक्ष वेधले खांदेरी-उंदेरी बेटांनी. पण मुंबई बेटावर संसार मांडलेल्या इंग्रजांना मराठ्यांचे खांदेरीवर किल्ला बांधणे अजिबात मान्य नव्हते. वसईच्या बाजूला पोर्तुगीज आणि कोकणात सिद्दी हे सागरी मराठ्यांचे विरोधक होतेच. पण मराठ्यांचे ठाणे मुंबईच्या उंबर्‍यावर उभे राहिले, तर मुंबईला मराठ्यांकडून धोका उत्पन्न होईल याची इंग्रजांना पक्की कल्पना होती. खांदेरी-उंदेरी बेटे आपल्याच मालकीची आहेत हा त्यांचा दावा होता आणि म्हणूनच इंग्रजांच्या मुंबई काउन्सिलने 2 सप्टेंबर 1670 रोजी शिवरायांच्या खांदेरी बेटावरील किल्ल्याचे बांधकाम होऊ न देण्याचा आणि त्यासाठी तीन शिबाडे (मालवाहू जहाजे) गस्तीला ठेवण्याचा ठराव केला.
 
 
शिवरायांनी 1672मध्ये खांदेरी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले, तरी अनेक विघ्नांमुळे हे काम बरेचसे रेंगाळले. पण 1679च्या पावसाळ्यात मराठ्यांनी हे कार्य हाती घेऊन तडीस नेण्याचे ठरवले. 27 ऑगस्टला हा उद्योग सुरू झाल्याची बातमी मुंबईच्या इंग्रजांना कळताच त्यांनी ताबडतोब सुरत काउन्सिलला पुढील कार्यवाहीसाठी लिहिले. पण मराठ्यांना परावृत्त करणे सहज शक्य आहे याचा मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर हेन्री ऑक्झिंडेन आणि मुंबई काउन्सिल यांना आत्मविश्वास होता. मराठ्यांचे आरमार निकृष्ट दर्जाचे असून त्यांच्या माणसांना समुद्री युद्धांचा अनुभव नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
 
khanderi fort  
खांदेरीवर तोफा आणि माणसे घेऊन पोहोचलेल्या मायनाक भंडारीला त्यांनी निघून जाण्यासाठी पत्र लिहिले. शिवरायांच्या आज्ञेशिवाय काम थांबणार नाही, असे मायनाकने इंग्रजांना ठणकावले. खांदेरी बांधकामाला विरोध करण्याचा ब्रिटिशांचा निरोपही चौलच्या सुभेदाराने रायगडाला कळवला. या बाबतीत मुंबई काउन्सिल आणि सुरत यांच्यात बराच पत्रव्यवहार झाला. खांदेरी बेट इंग्लंडच्या राजाचे आहे आणि शिवाजी महाराजांनी त्याच्यावर घुसखोरी करू नये, त्यासाठी प्रथम सामोपचाराने, गोडीगुलाबीने किंवा ते जमले नाही तर लढाईने खांदेरीच्या बांधकामास मज्जाव करण्याचे आदेश सुरत काउन्सिलने मुंबईला दिले. एन्साइन ह्युझ या अधिकार्‍याची नेमणूक केली.
 
 
सावधगिरीचा उपाय म्हणून मराठ्यांच्या मुलखातील कारवार आणि राजापूर येथील वखार बंद करावी आणि तेथील आपल्या लोकांना परत आणावे, असे हुकूम सुरत काउन्सिलने दिले. परंतु तोपर्यंत मराठे आणि इंग्रज यांच्यात खांदेरीच्या युद्धाला सुरुवात झाली होती. इंग्रजांनी पोर्तुगीजांना मदतीसाठी विचारले असता शिवाजी महाराजांशी आपला तह असल्यामुळे आपण या युद्धात उतरू शकत नाही, असे उत्तर देत त्यांनी या युद्धात तटस्थ राहण्याचे ठरवले.
 
 
4 ते 9 सप्टेंबर 1679 या कालावधीत इंग्रजांनी खांदेरीची नाकेबंदी केली, तरीही मराठ्यांनी बेटावर दगडमातींचे आडोसे, छोट्या झोपड्या आणि काही तोफखानाही तयार केला. ब्रिटिशांनी आपली रिव्हेंज नावाची 16 तोफांची फ्रिगेट, तीन शिबाडांसह कॅप्टन विल्यम मिंचनच्या नेतृत्वाखाली खांदेरीपाशी तैनात केली. दरम्यान ह्युझ आजारी असल्यामुळे लेफ्टनंट फ्रान्सिस थॉर्फ याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली. 18-19 सप्टेंबरला आपण बेटावर उतरणार आहोत असे त्याने मिंचिनला कळवले, पण मिंचिन रिव्हेंजवर असतानाच थॉर्फने 19च्या रात्री तीन शिबाडातून खांदेरीवर अकस्मात हल्ला केला. मराठ्यांनी त्याला जोरदार प्रत्युतर दिले आणि बेटाजवळ आलेल्या थॉर्फच्या शिबाडावर तोफा डागत त्याचे शिबाड पकडले व बाकीची दोन शिबाडे माघारी फिरली. या लढ्यात लेफ्टनंट थॉर्फ आणि आणखी काही इंग्रज मारले गेले, काही टोपॅझ कैद झाले. मिंचन काहीही करू शकला नाही. ही हकीगत कळताच सुरत काउन्सिलने थॉर्फच्या मूर्खपणालाच जबाबदार धरले. मराठ्यांकडून झालेला हा पहिला पराभव मिंचनच्या जिव्हारी लागला.
 
 
इंग्रजांनी सागरी युद्धात हलक्यात घेतलेल्या मराठ्यांच्या चिवट प्रतिकाराची समज मुंबई काउन्सिलला लिहिलेल्या मिंचनच्या पत्रातही दिसून येते - ‘आम्ही त्यांच्या माणसांचे नुकसान फारसे करू शकत नाही, कारण आम्ही जवळ जातो, त्या वेळेला ते खडकांमध्ये अशा रितीने लपतात की एकही माणूस नजरेस पडत नाही. त्यांच्या तटबंदीवर तोफा डागता येतील, पण आपल्या देशबांधवांच्या रक्ताचा बदला घेताना त्यांचे रक्त सांडले तरी आपलीच हानी त्यांच्यापेक्षा जास्त होईल.’
 
 
मराठ्यांनी इंग्रजांना बेटापाशी येऊ दिले नाही. रातोरात रसद, बांधकाम सामान पोहोचवत चिकाटीने तटबंदीचे बांधकाम सुरूच ठेवले. दरम्यान दौलतखानाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे आरमार तिथे पोहोचणार आहे, अशी बातमी इंग्रजांना लागली आणि त्यांनी सर्व पथकाला डागडुजीसाठी परत बोलवून सार्जंट फुलरला एका छोट्या मचव्यासह दोन फाइली घेऊन बेटांभोवती गस्त घालण्यास ठेवले. 7 ऑक्टोबरला रिव्हेंजसह चाळीसहून अधिक सुसज्ज तोफा असलेल्या आठ नौकांचे पथक जवळपास 188 सैनिक, अधिकारी अशा भरपूर कुमकेसह पुन्हा खांदेरीच्या नाकेबंदीसाठी गेले. अनेक युद्धांचा अनुभव असलेला कॅप्टन रिचर्ड केग्विन या पथकाचा प्रमुख होता. जर दौलतखानाचे आरमार पोहोचले, तर त्याला बेट आमचे आहे हे समजावून सांगावे, पण तो ऐकला नाही तर हल्ला करावा, असे काउन्सिलने केग्विनला सांगितले होते.
 
 
खांदेरीच्या संरक्षणासाठी पोर्तुगीजांच्या साष्टी बेटांतील समुद्रातून आपल्या आरमाराला जाण्यासाठी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे परवानगी मागितली, पण मराठ्यांनी साष्टीत पाय ठेवले, तर अवघड जाईल म्हणून पोर्तुगीजांनी नकार दिला.
 
 
इंग्रजांनी नाकेबंदीसाठी मुख्य भूमी आणि खांदेरी बेटाच्या मध्ये रिव्हेंजसह अनेक नौका समुद्रात नांगरून ठेवल्या होत्या. ही नाकेबंदी तोडून खांदेरीवर मदत पोहोचवण्याचे आव्हान मराठ्यांनी पेलले. 18 ऑक्टोबर 1679ला सकाळी सकाळी मराठ्यांचे आरमार नागावच्या खाडीतून बाहेर पडले आणि इंग्रजांच्या नौकांकडे धावत सुटले. वारा पूर्वेकडून होता. भरतीची वेळ होती. याचा फायदा उठवण्याचे मराठ्यांनी ठरवले. इतका अकस्मात हा हल्ला झाला की केग्विनला नांगर उचलून लढायला वेळच मिळाला नाही. धडाधड नांगराचे दोर कापून इंग्रजी नौका दक्षिणेकडे पळायला लागल्या. डव्ह आणि रिव्हेंज दोन्ही मागे राहिल्या होत्या. मराठ्यांनी अर्धवर्तुळाकार व्यूहरचना करत डव्हला वेढले. त्याचा कॅप्टन फ्रॅन्सिस मौलिव्हेरर होता. त्याने रिव्हेंजला हाक दिली, पण जवळून जाणार्‍या रिव्हेंजने कोणतीही मदत केली नाही. डव्हच्या पिछाडीला तोफाच नव्हत्या. हतबल अशा अवस्थेत फ्रॅन्सिसने शरणागती पत्करली. तो, त्याची माणसे आणि डव्ह नौका मराठ्यांच्या ताब्यात आली. मग युद्ध थांबवण्याचे नाटक करून रिव्हेंज आणि इतर नौकांनी मराठ्यांना जवळ येऊ दिले आणि जवळ येताच त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. मराठ्यांनी काही गुराबा आणि माणसांना गमावले, पण तिथून लगेच पळ काढत आरमार वाचवले. डव्हला मात्र खांदेरीवर ओढून नेले. कैदी इंग्रजी अधिकार्‍यांना सागरगडावर ठेवले. आरमारी सामर्थ्याची शेखी मिरवणार्‍या इंग्रजांची मराठ्यांच्या या तडाख्यामुळे चांगलीच घाबरगुंडी उडाली. पुन्हा एकदा 19 ऑक्टोबरच्या रात्री मराठ्यांच्या आरमाराने इंग्रजांना चाहूलही लागू न देता समुद्रात नांगरलेल्या रिव्हेंजचे दोर कापले आणि तिला वाचवण्याच्या नादात त्यांचे पथक दूर गेले असता खांदेरीला सुरक्षित रसद पोहोचवली.
 
 
आता 21 ऑक्टोबरला गोव्याहून आलेले फॉर्च्युन नावाचे आणखी एक जहाज इंग्रजांच्या पथकात सामील झाले. याच सुमारास कल्याण-भिवंडीकडून तुर्भे-पनवेल इथे मराठ्यांचे आरमार आल्यामुळे मुंबईचेच रक्षण करण्याची पाळी इंग्रजांवर आली. शिवाय नागावकडून मराठ्यांची 37 गलबते समुद्रात उतरली. यामुळे मुंबईच्या संरक्षणार्थ काही शिबाडे परत पाठवावीत हा काउन्सिलने केग्विनला आदेश दिला, पण नाकेबंदी हातातून जाईल या कारणास्तव त्याने तसे करण्याचे टाळले.
 
 
खरे तर मराठ्यांच्या तावडीतून आपले पथक वाचवण्याची वेळ त्याच्यावर आली होती. चहूबाजूंनी नाकेबंदी करण्याऐवजी त्याच्या सर्व शिबाडांना त्याला एकाच ठिकाणी ठेवावे लागत होते. नागावच्या खाडीच्या तोंडाशी सर्व शिबाडे नांगरून नाकेबंदी करून मराठ्यांची रसद तोडावी असे त्याने पुष्कळ प्रयत्न केले, पण ते फोल ठरले. मराठ्यांनी समुद्रात इतर ठिकाणांहून खांदेरीला रसद पोहोचवलीच. मराठे रात्रीची वेळ निवडायचे, इंग्रजी शिबाडांनी पाठलाग केलाच तर त्यांच्या सरपट्या छोट्या नावा खाडीत सहज धावत सुटायच्या. इंग्रजांच्या मोठ्या मोठ्या नौका चिखलात अडकण्याच्या भयाने माघार घ्यायच्या. केग्विन जंग जंग पछाडत होता, पण त्याच्या नाकाखालून मराठ्यांच्या छोट्या छोट्या नौका खांदेरीवर जात, अखंड रसद पोहोचवीत होत्या आणि बांधकाम जोरात सुरू होते. एका बाजूला पथकांवर होणारा भरमसाठ खर्च आणि दुसर्‍या बाजूला नाकेबंदीची होणारी फजिती ह्या दोन्हींमुळे केग्विन हताश होत होता. त्याच्या या काळातील सर्व पत्रांत त्याचे हे वैफल्य ठळकपणे दिसून येते.
 
 
22 आणि 27 ऑक्टोबर 1629ला मुंबईने सुरतला लिहिलेल्या पत्रात या युद्धातली इंग्रजाची हतबलता आणि खेद दिसतो. मराठी आरमाराचे ठाणे जर खांदेरी किल्ला बांधून उभे राहिले, तर मुंबईचा व्यापारच नाही, तर बंदरच धोक्यात येईल व आपले अस्तित्वच अडचणीत येईल याची भीती ते सुरतला कळवत होते. सुरत काउन्सिलने कंपनीच्या कानावर ह्या सर्व घडामोडी घातल्या. मंजुरीपेक्षा खर्च दहापट वाढला होता. मोठ्या युद्धनौकांची आवश्यकता होती. युरोपचे एखादे मोठे जहाज आणून एकदाच हल्ला करावा, असेही मनात चालले होते. खांदेरीचा किल्ला आकाराला येत होता. इंग्रजांचे सर्व यत्न धुळीस मिळत होते, कारण परिस्थिती प्रतिकूल होती. या केविलवाण्या धडपडीत शिवरायांचे मुंबईला आलेले एक शिष्टाचाराचे पत्र ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरतला पोहोचले. त्याला सौजन्यपूर्वक उत्तर देऊन तहाच्या वाटाघाटीचे धोरण घ्यावे, असा सुरत काउन्सिलने निर्णय घेतला. पण खांदेरी बेटावरील मराठ्यांचा दावा मान्य न करता, मैत्री दृढ करता येईल का ते पाहावे, असे सुचवण्यात आले. मुंबई काउन्सिलला हे धोरण अजिबात मान्य नव्हते. दरम्यान हंटर नावाची फ्रिगेट विल्यम नॉग्रेव्ह या इंग्रजी कप्तानाच्या नेतृत्वाखाली सुरतहून मुंबईला पोहोचून 4 नोव्हेंबरला पथकात सामील झाली.
 
 
दर दोन-तीन दिवसांनी मराठ्यांच्या चपळ होड्या इंग्रजांच्या फ्रिगेटना आणि शिबाडांना चकवून त्रस्त करीत होत्या. नागावसह थळचीसुद्धा नाकेबंदी करायला हवी, या हेतूने केग्विनने काउन्सिलकडे जास्त नौकांची मागणी केली. पण याउलट त्यानेच खांदेरीपाशी परतावे असे त्याला सांगण्यात आले. त्याला कारणही तसेच घडले होते. 10 नोव्हेंबरला सिद्दीची गलबते मुंबईच्या समुद्रात आली होती आणि जर त्याने खांदेरीचा ताबा घेतला, तर शिवरायांपेक्षा त्याचा शेजार महाग पडेल ह्याची काउन्सिलला कल्पना होती. सिद्दीला खांदेरीच्या मुलुखात शिरू द्यायचे नाही, पण तो मुघलांचा मांडलिक असल्यामुळे व्यापारी हितसंबंधासाठी त्याच्याशी वैरही घ्यायचे नाही, असे दुटप्पी धोरण इंग्रजांनी स्वीकारले. एव्हाना सिद्दीचे आरमार खांदेरीभोवती फिरायला लागून बेटावर तोफांचा मारा करू लागले होते. मराठ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सिद्दी आणि इंग्रज या दोघांच्या एकत्र होण्याने खांदेरीची नाकेबंदी मात्र मजबूत झाली आणि रसद पोहोचवण्याचे मोठे आव्हान मराठ्यांपुढे उभे राहिले.
 
 
एके दिवशी त्यांनी बेटावर पांढरे निशाण लावले. त्यामुळे इंग्रज आणि सिद्दी दोघांनीही बेट ताब्यात देण्यासाठी परस्परांना न कळवता बेटावरील मराठ्यांशी गुप्त बोलणी सुरू केली. मात्र मराठे दोघांची दिशाभूल करत आहेत, हे काही काळातच त्यांच्या लक्षात आले. तिकडे शिवरायांनीसुद्धा इंग्रजांबरोबर आपल्या अधिकार्‍यांमार्फत सिद्दी खांदेरीवर आल्यास मुंबईला धोका होईल, त्यामुळे आम्हाला बेट द्यावे व युद्ध थांबवावे, अशा तहाचे प्रयत्न सुरू केले. सिद्दीनेसुद्धा इंग्रजांबरोबर खांदेरीवर एकत्र हल्ला करू, अशी बोलणी सुरू केली. दोन्ही बाजूंच्या नाकेबंदीतही मराठ्यांनी हार न मानता अधूनमधून खांदेरीला रसद यशस्वीरित्या पोहोचवली. प्रदीर्घ काळ समुद्रात राहूनसुद्धा यश मिळत नसल्याचे केग्विनच्या लक्षात आले. मुंबई काउन्सिलच्या धरसोड धोरणानेही तो वैतागला होता. शेवटी त्याने सेवामुक्त होण्याची विनंती केली आणि ती स्वीकारली जाऊन 17 डिसेंबर 1679ला त्याच्या जागी कॅप्टन अ‍ॅधडर्टन इंग्रजी पथकाचा प्रमुख झाला. एव्हाना खांदेरीवर मराठ्यांचे तटबंदीचे बांधकाम बरेचसे झाले होते.
तितक्यात एका गोष्टीने मराठ्यांची डोकेदुखी वाढली. सिद्दीने खांदेरीजवळील उंदेरी बेटावर उतरून तिथे किल्ल्याचे बांधकाम आणि तिथून तोफांचा मारा सुरू केला. जानेवारीच्या महिन्यात सिद्दीचे थळवरचे आणि खांदेरीवरचे हल्ले वाढले. मराठ्यांनीही सिद्दीवर चढाया केल्या. सिद्दीने उंदेरीवर 3000 माणसे आणि दहा तोफा उतरवल्या होत्या. 26 जानेवारी 1680ला दौलतखानाने नागावकडून 30 नौका घेऊन उंदेरीवर जोरदार हल्ला चढवला, पण सिद्दीच्या तोफांच्या मार्‍यामुळे मराठ्यांचे बरेच नुकसान झाले. भरपूर हाणामारीनंतर दौलतखानाचे आरमार मागे फिरले. इंग्रज आणि सिद्दी दोघांनी मराठ्यांचा पाठलाग केला, पण त्यांना अपयश आले. ओहोटी आणि आग्नेयेकडचा वारा यामुळे मराठे नागावला सुखरूप पोहोचले.
 
 
शेवटी शिवरायांनी अण्णाजी दत्तो आणि चौलच्या सुभेदाराकरवी इंग्रजांशी तहाची बोलणी पूर्ण करण्यासाठी आदेश दिले. या तहात परस्परांच्या संमतीने तहाची कलमे मंजूर झाली, ती म्हणजे, इंग्रजांनी त्यांचे नाविक पथक खांदेरीहून काढून घ्यावे, मराठ्यांनी इंग्रजी कैद्यांची मुक्तता करावी, मराठ्यांनी काबीज केलेल्या इंग्रजी गुराबांच्या मोबदल्यात 100 खंडी सुपारी द्यावी, पूर्वमैत्री सांभाळून सिद्दीला मराठ्यांच्या विरोधात दारूगोळा वा तोफांची मदत इंग्रज करणार नाहीत, शिवरायांच्या लोकांना इंग्रजांच्या मुलुखात व्यापार करण्याची मुभा असावी, इ. तह अंमलात आला. अखेरीस 30 जानेवारी 1680ला इंग्रजांचे नाविक पथक खांदेरीहून मुंबईला माघारी परतले.
 
 
‘खांदेरी प्रकरण झालेच नसते तर बरे झाले असते, असे आम्हांला मनापासून वाटते’ अशी मखलाशी मुंबई काउन्सिलने सुरतला लिहिलेल्या दि. 31 जानेवारी 1680च्या पत्रात केली. सुमारे सहा महिने चाललेल्या नाविक युद्धाची अशा समाप्ती झाली.
इंग्रजी आरमाराविरुद्ध झालेली खांदेरीची मोहीम म्हणजे मराठ्यांच्या आरमाराच्या चिवट आणि अखंड प्रतिकाराचे सर्वोत्तम उदाहरण. खांदेरी बेट ताब्यात घेतल्यावर इंग्रजांनी जंग जंग पछाडले, तरी मराठ्यांनी अखेरपर्यंत किल्ल्याचे बांधकाम करून सिद्दीला पायबंद घातलाच. मायनाक भंडारी आणि दौलतखानाचे पाठबळ असले, तरी मोठमोठ्या सागरी युद्धांच्या इंग्रजी अनुभवासमोर मराठी आरमाराच्या सामान्य कोळी, आगरी, भंडारी अशा साहसी वीरांनी झुंज मांडली आणि आपल्यावरची जबाबदारी तडीस नेली. काही नावा दर्यात बुडाल्या, कित्येकांनी बलिदान दिले, पण तरीही या युद्धांत इंग्रजांच्या शक्तिशाली आरमारापुढे मराठ्यांच्या छोट्या, सरपटणार्‍या नावांनी त्यांना चकवत खांदेरीला अखंड रसद पुरवली आणि इंग्रजी आरमाराला जेरीस आणले. सिद्दीसारखा कडवा शत्रू उंदेरीवर उतरून सामोरी आला, तरीही न डगमगता इंग्रज आणि सिद्दी या दोघांनाही अंगावर घेत मराठ्यांनी ह्या युद्धाचे यश खेचून आणले. मराठी ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर इंग्रजांशी नाविक युद्ध करणारी एकमेव भारतीय सत्ता. या युद्धाच्या तहात शेवटी शिवाजी महाराजांनी खांदेरीकडून इंग्रजांना सैन्य काढायला लावलेच, शिवाय सिद्दीला मदत करण्याच्या इंग्रजी उद्योगाला पायबंद घातला आणि इंग्रजी मुलुखात स्वराज्याचा व्यापार वाढवला. यात शिवरायांच्या चाणाक्ष बुद्धीची आणि आपल्या नौसैनिकांना दिलेल्या प्रेरणेची साक्ष पटल्याशिवाय राहत नाही.
 

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.