विनाशकाले विपरीत बुद्धी!

विवेक मराठी    19-Mar-2024
Total Views |
@रवींद्र मुळे
9422221570
 
modi
 
 
 मोदीविरोधी पलटण आणि प्रामुख्याने राहुल आणि त्याचे द्रमुक साथीदार यांना हिंदुद्वेषाने पछाडले आहे. त्या अवस्थेत मोदीद्वेषाची दारू त्यांनी प्यायली आहे. त्यामुळे झालेल्या बुद्धीवरील विपरीत परिणामांमुळे सनातन धर्माची चेष्टा, हिंदू शक्तीविरोधी लढण्याचा महिषासुरी पवित्रा असे प्रमाद त्यांच्याकडून घडत आहेत. दुर्दैवाने उबाठा पक्ष सत्तेच्या मोहामुळे या हिंदुविरोधी शक्तीच्या आहारी जाऊन आपली बुद्धी गहाण ठेवत आहे. त्यामुळे विनाश अटळ आहे.
माणसाला स्वत:चा विनाश ओढवून घ्यायचा असला की त्याला बुद्धी अशी सुचते की त्याचा विनाश अटळ ठरतो.
 
पुरातन काळात रामायणात रावणाला सीतेच्या अपहरणाची बुद्धी झाली, महाभारतात दुर्योधनाला द्रौपदीचा अपमान करण्याची, शिशुपालाला भगवान श्रीकृष्णांना आव्हान देण्याची बुद्धी झाली, हिरण्यकशिपूला नरसिंह यांना ललकारण्याची बुद्धी झाली, तर अफझलखानास भवानीमातेच्या मूर्तीच्या भंजनाची बुद्धी झाली. परिणाम काय सांगतात? असे असूनसुद्धा..
 
 
हीच विनाश ओढवून घेणारी विपरीत बुद्धी इंडी आघाडीतल्या घटक पक्षांना झाली आहे. त्यामुळे सनातनचा अपमान करण्याची, राम मंदिर आमंत्रणावर बहिष्कार टाकण्याची आणि आता तर हिंदू धर्मातील शक्तीलाच आव्हान देण्याची दुर्बुद्धी या मंडळींना होत आहे. आणि म्हणूनच आम्हाला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ या उक्तीचे स्मरण झाल्याशिवाय होत नाही.
 
 
आणीबाणी जाहीर झाली आणि जेव्हा पोलीस आदरणीय जयप्रकाश नारायण यांना पकडायला आले, तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला, “आपली यावर प्रतिक्रिया काय?” तेव्हा जयप्रकाशजी एवढेच म्हणाले, “विनाशकाले विपरीत बुद्धी!” पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे!
 


modi 
 
दि. 17 मार्चला शिवाजी पार्क येथे स्वा. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीच्या साक्षीने मोदीविरोधी आघाडीचा पोस्टर बॉय याने या उक्तीची आठवण करून दिली. किंबहुना प्रत्येक मोदी विरोधकाला या विपरीत बुद्धीचा झटका सातत्याने येताना दिसला आहे, त्याची ही पुढची कडी होती.
 
 
द्रमुकच्या लोकांनी सनातन धर्म म्हणजे पाल, झुरळ, मच्छर अशी उपमा देऊन सनातन धर्माची टिंगल केली, तर त्यांच्या काही नेत्यांनी डेंग्यू, HIVशी तुलना केली. खरगे यांचा चिरंजीव प्रियांक याने त्याची री ओढली. एकदा विनाश ओढवून घ्यायचा म्हटल्यावर या वक्तव्याने परिणामस्वरूप आज संपूर्ण दक्षिण भारतात हिंदुत्वाची लाट निर्माण होत आहे. ही द्रमुकची विपरीत बुद्धी होती. विनाश अटळ आहे.
 
 
modi
 
तिकडे पाटण्यात काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी “मोदी यांना परिवार नाही, त्यांना परिवारवादावर बोलायचा अधिकार नाही” असे वक्तव्य केले. परिणामी भारतातील कोट्यवधी परिवार या वक्तव्यावरून मोदी यांच्याबरोबर जोडले गेले. ही लालू यांची विपरित बुद्धी होती. त्यामुळे विनाश अटळ ठरून गेला.
 
 
रामजन्मभूमी मंदिर निमंत्रण नाकारण्याची विपरीत बुद्धी या मंडळींना झाली. आमच्या महाराष्ट्रातील जाणत्या नेत्याने मशिदीचा ट्रस्ट का नाही? असे पिल्लू सोडून आपल्या विपरीत बुद्धीचे प्रदर्शन केले, तर या विपरीत बुद्धीने ज्यांचे डोके फिरवले, त्या राऊत- ठाकरे दुकलीला रोज विनाश जवळ आणण्याचा जणू छंदच लागला आहे. कालच्या सभेतही या विपरीत बुद्धीने उद्धव ठाकरे यांना “माझ्या तमाम हिंदू बांधवांनो” या संबोधनापासून रोखले आणि भाबड्या शिवसैनिकांची उरलीसुरली आशाही मावळली.
 
 
modi
 
या विपरीत बुद्धीनेच उबाठा नेत्यांना सनातनचा अपमान करणारा द्रमुक, 370ला रद्द करण्याचा निर्णयला विरोध करणारे फारुक आणि मेहबूबा यांच्या रांगेत जाऊन बसण्यास भाग पाडले. त्यांना राहुलजी, प्रियांकाजी म्हणावे लागले. ह्या विपरीत बुद्धीची पेरणी करणारे जाणते राजे गालातल्या गालात हसत ही विनाशाकडे चाललेली उबाठाची वाटचाल बघत होते. ज्या लाचारीबद्दल स्व. बाळासाहेब कोरडे ओढायचे, त्यांच्या स्मृतीच्या साक्षीने काल त्याच लाचारीचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याची विपरीत बुद्धी उबाठाला व्हावी, याला काय म्हणावे?
 
 
या इंडीच्या सभेत शेवटी तर राहुल गांधी यांनी या विपरीत बुद्धीच्या प्रदर्शनावर कळसच चढवला. या सगळ्या मंडळींना मोदीद्वेषाची नशा इतकी चढली आहे की त्या नशेत ते जे काही बरळत आहेत, त्यामागे त्यांची बुद्धी अशी विपरीत होत आहे, हे कारण आहे. तसे नसते, तर राहुल गांधी फक्त ’शक्ती’ उल्लेख करताना ‘हिंदू धर्मातील शक्ती’ असा उल्लेख न करता! पण हिंदू धर्मात शक्ती असते, त्याविरुद्ध आपल्याला लढायचे आहे असे म्हणून बिच्चारे(?) राहुल गांधी स्वयंगोल करून बसले.
 
 
आपली लढाई मोदीसारख्या कसलेल्या योद्ध्याबरोबर आहे, हे विसरून विरोधक आपल्या विपरीत बुद्धीने मोदी यांचा ‘400 पार’ नारा जवळ आणत आहेत आणि त्याच वेळेस स्वत:चा विनाशसुद्धा. अर्थात ही बुद्धी त्यांना येण्यामागे या सर्व मंडळींचा हिंदुद्वेष, घराणेशाहीची लालसा, संपत्तीचा मोह आणि विलासी जीवनाची सवय कारणीभूत आहे.
 
 
या हिंदू धर्मातील शक्तीला विरोध करण्याच्या राहुलबाबाच्या वाक्याला मोदी यांनी उचलून आज दक्षिणेतील सभेत शक्तीचा संदर्भ देताना ‘या देवी सर्व भुतेषू, शक्ती रूपेन् संस्थिता’ म्हणून स्त्रीशक्ती, मातृशक्ती, शिवशक्ती याचा उल्लेख करत विपरीत बुद्धीच्या फुलटॉसवर मोदीजींनी असा काही षटकार मारला की आज याचे स्पष्टीकरण देताना काँग्रेस आणि त्यांचे नेते, प्रवक्ते यांच्या नाकी, नऊ आले. स्पष्टीकरण करता करता ही मंडळी आणखी विनाशाच्या खाईत गेली आहेत.
 
 
या विपरीत बुद्धीच्या गँगने स्पष्टीकरण देताना नेहमीप्रमाणे मग शक्ती म्हणजे आरएसएसची शक्ती, मनूवादी शक्ती असे नेहमीचे तुणतुणे सुरू केले. संघाचे नाव घेत, शिव्या देत, बंदी आणत आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबून संघ संपला तर नाही, आणखी वाढतच राहिला आणि आज खरोखरच हिंदुत्वाची शक्ती म्हणून उभा राहिला आहे. यांचे तीन पंतप्रधान, अनेक नेते संघ संपवायला निघाले होते, अरबी समुद्रात बुडवणार होते, पण त्यांना शक्य झाले नाही, हे खरगेबाबा, विपरीत बुद्धीच्या फेर्‍यात अडकल्याने तुम्हाला कसे कळणार? तुमच्या पक्षाचा विनाश तुम्हीच करणार, असे दिसते.
 अनेक नेते संघ संपवायला निघाले होते, अरबी समुद्रात बुडवणार होते, पण त्यांना शक्य झाले नाही, हे खरगेबाबा, विपरीत बुद्धीच्या फेर्‍यात अडकल्याने तुम्हाला कसे कळणार? तुमच्या पक्षाचा विनाश तुम्हीच करणार, असे दिसते.
 
‘मोहब्बतचे दुकान’ ही या विपरीत बुद्धीची आणखी एक भंपक कल्पना. आजच यांच्या या दुकानात, बेंगळुरूमध्ये एका हिंदू व्यक्तीने अजानच्या वेळेस हनुमान चालिसा म्हटली, म्हणून त्याला मारहाण झाली. नगरमध्ये एकाने ‘अहिल्यानगर झाले’ म्हणून स्टेटस ठेवले, याचा राग येऊन त्याला मारहाण झाली आहे. यांच्या मोहब्बत की दुकानात फक्त हिंदूंनी एकतर्फी मोहब्बत करायची आहे. बदल्यात हिंसाचार, अत्याचार, जिहाद हे सगळे हिंदूंच्या पदरात पडण्याची राहुलबाबाची गॅरंटी आहे.
 
 
या विपरीत बुद्धीची बाधा झालेल्या सगळ्या मंडळींना संदेशखाली येथील स्त्रियांच्या शोषणाबद्दल आणि त्याला जबाबदार असणार्‍या शहानवाज शेख या बांगला देशी गुंडाबद्दल बोलायची परवानगी ही बुद्धी देत नाही. हिंदुत्वाचा बँड वाजवणारे उबाठा सैनिक ममताचे स्वागत करतात, पण संदेशखालीतला दुर्लक्षित करतात.
 
 
या विपरीत बुद्धीची बाधा झालेला उबाठा प्रवक्ता “काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळाले” हे बोलत असताना हजारो क्रांतिकारक, ज्यात सावरकरही अग्रक्रमाने येतात (यांचे नाव स्वार्थासाठी जे घेतात), त्यांचा अपमान करायला मागे पुढे पाहत नाहीत. या विपरीत बुद्धीने काँग्रेसला हे दोन नवीन भाट मिळाले आहेत. काँग्रेसमुळे फाळणी झाली नाही, तर काँग्रेसने पाकिस्तानची फाळणी केली असे म्हणतात. यांची विपरीत बुद्धी सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा या विषयावरून भारतीय सैन्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करते.
 
 
संविधानासाठी, त्याचे रक्षण करण्यासाठी आमचा मोदींना विरोध आहे असे यांची विपरीत बुद्धी यांना बोलायला लावते; पण याचे नेतृत्व त्याच काँग्रेस पक्षाला बहाल करते, ज्या काँग्रेस पक्षाने संविधानाची मोडतोड करून आणीबाणी आणली, अनेक वेळा 356 कलमाचा चुकीचा उपयोग करून विरोधी पक्षांची सरकारे पाडली आहेत आणि म्हणूनच यांचा विनाशकाळ अटळ आहे.
 
 
यांची विपरीत बुद्धी खोटे बोलण्यासही कारण ठरते आहे. अशोक चव्हाण यांचे नाव न घेता “ते माझ्या आईकडे रडले, तुरुंगात जाण्यास घाबरतो, म्हणून काँग्रेस सोडतो असे म्हणाले” अशी लोणकढी थाप मारून राहुलबाबा मोकळे झाले. आज अशोक चव्हाण यांनी खुलासा केल्यावर मात्र तोंडावर आपटले.
 
 
एकूणच मोदीविरोधी पलटण आणि प्रामुख्याने राहुल आणि त्याचे द्रमुक साथीदार यांना हिंदुद्वेषाने पछाडले आहे. त्या अवस्थेत मोदीद्वेषाची दारू त्यांनी प्यायली आहे. त्यामुळे झालेल्या बुद्धीवरील विपरीत परिणामांमुळे सनातन धर्माची चेष्टा, हिंदू शक्तीविरोधी लढण्याचा महिषासुरी पवित्रा असे प्रमाद त्यांच्याकडून घडत आहेत. दुर्दैवाने उबाठा पक्ष सत्तेच्या मोहामुळे या हिंदुविरोधी शक्तीच्या आहारी जाऊन आपली बुद्धी गहाण ठेवत आहे. त्यामुळे विनाश अटळ आहे.