देशासाठी मतदान, शंभर टक्के मतदान

विवेक मराठी    19-Mar-2024
Total Views |
@डॉ. दिनेश थिटे - 9822025621
 
राजकारणातील काही जण जातीयवाद, पंथवाद, कट्टरतावाद वाढवतात, म्हणून आपल्याला उबग येतो आणि आपण मतदानापासून दूर राहतो. मतदान टाळून आपण असे करणार्‍यांना मदतच करत असतो. जात, धर्म, पंथ, प्रदेश अशा भेदांच्या पलीकडे जाऊन केवळ देशाचा विचार करून मतदान करणार्‍या मतदारांचा प्रभाव वाढला, तर संपूर्ण राजकीय प्रक्रियेला तसेच वागावे लागते. ही मतदानाची ताकद असते. पण त्यासाठी अवश्य मतदान करावे लागते. ज्यांना देशाबद्दल कळकळ आहे, अशा सज्जनशक्तीने ठरवून निर्धाराने मतदान केले, तर सर्वच राजकीय पक्षांना त्यानुसार वागावे लागेल. पण हे परिवर्तन घरात बसून होणार नाही.
   
Voting
 
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशी ही जगातील सर्वात मोठी निवडणूक असेल. एकूण मतदारांची संख्या 96 कोटी आहे. इतकी तर अनेक देशांची लोकसंख्या नाही. अमेरिका आणि युरोप खंड एकत्र करून त्यांची निवडणूक घेतली, तरीही त्यापेक्षा भारतातील लोकसभेची निवडणूक मोठी ठरेल. शिवाय आपल्या देशात भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता प्रचंड आहे. राजकीय समीकरणेही वेगवेगळी आहेत. तरीही देशात चांगल्या रितीने निवडणूक होते.
 
 
या वर्षी आपण अठराव्या लोकसभेसाठी मतदान करणार आहोत. म्हणजे यापूर्वी सतरा वेळा लोकसभेसाठी निवडणूक झाली आहे. त्या त्या वेळी देशातील मतदारांनी आपला कौल दिला आहे. अनेकदा भारतीय मतदारांच्या निर्धारामुळे आश्चर्यकारक निकाल लागले आहेत.
 
 
आपल्या देशात संसदीय लोकशाही रुजली, याचे महत्त्वाचे कारण असे आहे की आपला भारतीयांचा मूळ स्वभावच लोकशाहीचा आहे. आपल्या रोजच्या जगण्याचा विचार करा. आपण नकळत लोकशाही प्रक्रियेचे किती पालन करत असतो, हे जाणवेल. घरात असो किंवा कार्यालयात, नकळत आपण त्याच मार्गाने जातो. प्रत्येकाला मत असते, ते स्वतंत्र असते आणि सर्वांची मते ध्यानात घेऊन पुढे जायला पाहिजे, असे आपल्याला वाटत राहते. सहमतीवर आपला भर असतो. चर्चा करण्याचा आपला आग्रह असतो. पण मला प्रश्न पडतो की, रोजच्या जगण्यात लोकशाहीचा आग्रह धरणारे आपण मतदानाच्या बाबतीत कधीकधी उदासीन का राहतो?
 
 आपण आणि ते नव्हे, आपण सर्व
  
पांढरपेशा मध्यमवर्गामध्ये मतदानाबद्दल असलेल्या उदासीनतेचे कारण मला वाटते की, या वर्गाचे एकूण संसदीय लोकशाही व्यवस्थेबद्दलचे आकलन चुकले आहे. होय, मी पांढरपेशा मध्यमवर्गाबद्दल स्पष्ट बोलत आहे, कारण मतदानाबद्दलची उदासीनता ही समस्या प्रामुख्याने याच वर्गात आहे. आकलन चुकले म्हणजे काय झाले, तर एखाद्या पुरवठादार कंपनीकडे पाहावे तसे आपण राजकीय प्रक्रियेकडे किंवा राजकीय पक्षांकडे पाहतो - म्हणजे माल खराब निघाला किंवा सेवा चांगली मिळाली नाही, तर आपण त्या कंपनीबद्दल तक्रार करतो आणि उलट माल चांगला निघाला तर समाधान व्यक्त करतो. राजकारणाबद्दल आपली तशी मानसिकता झाली आहे. पण संसदीय लोकशाहीमध्ये आपण आणि ते असा राजकारण्यांबद्दल भेद करता येत नाही. आपण निवडणुकीत मतदानाने आपले प्रतिनिधी निवडून देतो व त्यांना देशाचा कारभार करण्याचा अधिकार देतो. पाच वर्षांनी पुन्हा आपण त्याबाबत निर्णय घेतो. आपण आपले प्रतिनिधी निवडून देत असल्याने ते आपले व आपल्यासारखेच असतात, हे ध्यानात घेतले पाहिजे. योग्य प्रतिनिधी निवडले गेले नाहीत, तर मतदार म्हणून आपलीसुद्धा त्यात जबाबदारी असते. आपले काही चुकले का, याचाही आपण विचार करायला हवा.
 
 
Voting
 
आता यावर काही सजग नागरिक प्रश्न करतील की, उमेदवारांमध्ये काही गुन्हेगारीचे आरोप असलेले असतात, काही जण जातीयवाद निर्माण करतात, तर अशांना आम्ही का मतदान करावे? वरकरणी हा प्रश्न बरोबर वाटला, तरी व्यापक विचार केला तर मुळातच असा प्रश्न पडणे योग्य नाही. ही लोकशाही व्यवस्था तुमची-आमची सर्वांची आहे. ही व्यवस्था आपल्या जगण्याबद्दल निर्णय घेते आणि आपले भवितव्य ठरवते. त्यामध्ये सेवा पुरवठादार राजकारणी आणि आपण ग्राहक असे काही नाही. त्यामुळे मला चांगला माल मिळत नाही तर मी कशाला निवडू, असा प्रश्न पडणे योग्य नाही. आहे त्या उमेदवारांमधून आपल्याला चांगला वाटणारा उमेदवार निवडणे आणि लोकशाही प्रक्रियेतील आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.
 
 
सर्वच उमेदवार खराब, तर मी कशाला निवडू? असा प्रश्न काही जणांना पडतो. अशांना मी श्वासाचे उदाहरण देईन. माझ्या शहरातील हवा प्रदूषित आहे. एखाद्या पर्वतावरील किंवा विस्तीर्ण शेतातील हवेसारखी शुद्ध आणि ताजी हवा मला शहरात मिळत नाही, म्हणून आपण श्वास घेणे बंद करत नाही किंवा शुद्ध हवा मिळेल तेव्हाच श्वास घेईन, असेही ठरवत नाही. निवडणूक आणि त्यासाठी मतदान हा संसदीय लोकशाही प्रक्रियेचा श्वास आहे. हवा प्रदूषित आहे म्हणून श्वास घेणे बंद केले, तर हमखास जीव जाणार. त्याचप्रमाणे मतदान केले नाही, तर निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होणार, मग लोकशाही कशी जिवंत राहणार? आहे त्या उमेदवारांमधून आपल्याला योग्य वाटणार्‍या उमेदवाराला मतदान करणे, हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. मी मतदान करणार नाही, एकही उमेदवार निवडणार नाही, तर लोकशाही कशी चालू राहणार? आता कोणाला लोकशाहीच नको असेल, तर गोष्ट वेगळी. पण मला वाटत नाही की कोणी भारतीय माणसाला लोकशाही नको असेल. रोजच्या जगण्यात सर्वत्र कळत-नकळत लोकशाहीचा आग्रह धरणारे आपण आपले सरकार ठरवताना मात्र लोकशाही नको, असे कसे म्हणू शकतो?
 
मतदान टाळणे म्हणजे गुन्हेगारांना मदत करणे
 
आपल्यापैकी अनेक जण प्रामाणिक संतापामुळे मतदान करत नाहीत. त्यांचा पुन्हा तोच प्रश्न असतो की हे राजकारणी इतके वाईट आहेत, तर मी कशाला त्यांना मतदान करू? किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक निवडणूक लढवतात तर मला उबग येतो, मी कशाला मतदान करू? अशा पद्धतीने विचार करणारे तुमच्या-आमच्यासारखे लोक मतदान टाळून नकळत त्यांना गुन्हेगार वाटणार्‍या राजकारण्यांनाच मदत करत असतात, तीसुद्धा सहजपणे निवडून येण्यासाठी.
 
पटत नाही ना? आपल्याला निवडणुकीचे तंत्र सांगतो. आपल्या संसदीय लोकशाही पद्धतीत निवडणुकीत कोण विजयी होतो? ज्याला सर्वाधिक मते मिळाली, तो उमेदवार विजयी होतो - म्हणजे समजा, एकूण मतदार शंभर आहेत व त्यापैकी तीस जणांनी मतदान केले. एका उमेदवाराला दहा मते मिळाली, दुसर्‍याला आठ मते मिळाली, तिसर्‍याला सात मते मिळाली, चौथ्याला पाच मते मिळाली, तर एकूण मते तीस होतात व दहा मते मिळालेला सर्वाधिक मतांचा धनी ठरल्याने विजयी होतो. म्हणजे प्रत्यक्षात ज्याला एकूण मतदारांच्या केवळ दहा टक्के मते मिळाली, तो विजयी झाला व त्याला सर्व शंभर जणांच्या रोजच्या जगण्याबद्दल निर्णय करण्याचा अधिकार मिळाला. आता तो का विजयी झाला? तर केवळ तीस जणांनी मतदान केले व सत्तर मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. जर उरलेल्या सत्तर जणांनी मतदान केले असते, तर केवळ दहा मतांच्या जोरावर हा उमेदवार विजयी झाला नसता.
 
Voting 
 
आपल्याला ज्या उमेदवारांबद्दल मनातून राग असतो व त्यामुळे उबग येऊन आपण मतदान टाळतो, त्यांनाच आपण मतदान टाळल्यामुळे मदत होते. कारण त्यांचे समर्थक जरी मूठभर असले, तरी हमखास मदत करतात व त्यावर निवडणुकीचा निकाल लागतो. दुसरीकडे आपण मतदान न केल्यामुळे कमी जनाधार असला, तरीही निवडून येण्याचा त्या उमेदवाराचा मार्ग मोकळा होतो.
 
 
आपल्याला हवे तसे राजकारणी नसतील, तर त्याला जबाबदार आपणच असतो, कारण आपण मतदान टाळून नकोशा राजकारण्यांना निवडून यायला मदत करतो. आपण मतदान केले नाही, तर जे मूठभर लोक हमखास मतदान करतात, त्यांच्या मताची ताकद अनेक पटींनी वाढत जाते, हे ध्यानात घेतले पाहिजे. एखाद्या छोट्या समुदायाला राजकारणात व्हेटोचा अधिकार मिळतो, कारण ते हमखास आणि धोरणीपणे मतदान करतात आणि उरलेले लोक मतदानाबद्दल उदासीन राहतात. ज्यांच्यामुळे राजकारण बिघडले असे आपल्याला वाटते, त्यांना एकूण मतदारसंख्येच्या केवळ वीस टक्के मते मिळवूनही राज्य करण्याचा मार्ग आपल्याच उदासीनतेमुळे एकेकाळी उपलब्ध झाला. हे राजकारण आपण कधीतरी समजून घ्यायला हवे.
 
 
माझ्यासाठी मतदान, देशासाठी मतदान
 
आपण जेव्हा मतदान करतो, त्या वेळी आपण स्वत:लाच मदत करत असतो. कारण निवडणुकीतून जे लोकप्रतिनिधी निवडले जातात व त्याच्या आधारे जे सरकार बनते, ते आपल्या रोजच्या जगण्याबद्दल आणि आपल्या भवितव्याबद्दल निर्णय करत असते. त्यामुळे मतदानाबद्दल उदासीन राहणे म्हणजे आपण स्वत:बद्दल तसेच स्वतःच्या भवितव्याबद्दल उदासीन राहणे आहे. सरकार केवळ आपलेच नाही, तर देशाचेही वर्तमान आणि भवितव्य ठरवत असते. एखादे सरकार देशात परिवर्तन घडवते, तर अन्य एखाद्या सरकारमुळे देशात केवळ निराशाच निर्माण होते, हे आपण अनुभवले आहे.
 
 
आपल्याला आपल्या देशाबद्दल इतके प्रेम आहे, तर आपल्या देशाचे भवितव्य ठरवणारे सरकार निवडताना आपण उदासीन का राहावे? आपल्या मतदानातून निवडणूक प्रक्रिया निश्चित होणार आहे व त्यातून सरकार ठरणार आहे. आपण मतदानाबद्दल उदासीन राहणे म्हणजे आपल्या देशाबद्दल उदासीन राहणे आहे, हे कधीतरी ध्यानात घ्यायला हवे.
 
 
राजकारणातील काही जण जातीयवाद, पंथवाद, कट्टरतावाद वाढवतात, म्हणून आपल्याला उबग येतो आणि आपण मतदानापासून दूर राहतो. मतदान टाळून आपण असे करणार्‍यांना मदतच करत असतो. जात, धर्म, पंथ, प्रदेश अशा भेदांच्या पलीकडे जाऊन केवळ देशाचा विचार करून मतदान करणार्‍या मतदारांचा प्रभाव वाढला, तर संपूर्ण राजकीय प्रक्रियेला तसेच वागावे लागते. आपल्या देशात बहुसंख्य समाजाचा अपमान करण्याची परंपरा निर्माण झाली होती. पण गेल्या काही वर्षांत लोकांनी जाणीवपूर्वक मतदान केले आणि आता एखादा पक्ष नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिकेत बदल दिसतो की नाही? ही मतदानाची ताकद असते. पण त्यासाठी अवश्य मतदान करावे लागते.
 
 
ज्यांना देशाबद्दल कळकळ आहे, अशा सज्जनशक्तीने ठरवून निर्धाराने मतदान केले, तर सर्वच राजकीय पक्षांना त्यानुसार वागावे लागेल. पण हे परिवर्तन घरात बसून होणार नाही.
 
लेखक राजकारणाचे अभ्यासक आहेत.