खरा ‘अशोक’ कोणता?

विवेक मराठी    19-Mar-2024
Total Views |
@प्रा. सुहास द. बारटक्के  9423295329
 
कोकणात अनेक ठिकाणी सध्या अशोकवृक्ष बहरलाय.. हा ‘सीता अशोक.’ रावणाने सीतेला लंकेत पळवून नेल्यावर सीतेने रावणाच्या रत्नजडित महालात राहण्यास नकार दिला. रावणाने तिला अशोकवनातील पर्णकुटीत कैदेत ठेवलं. या ठिकाणी अशोकाची भरपूर झाडं होती. सीतेला मन मोकळं करण्यासाठी आणि कुणाशीतरी बोलून आपलं दु:ख कमी करण्यासाठी इथे कोण सोबती होतं? तर अशोकवृक्ष!
ashoka tree 
 
सीतेचा शोक ज्याने ऐकला व तो कमी केला, तोच हा सीता अशोक! सध्या उन्हाळा असल्याने अशोकाची झाडं बहरली आहेत. अवघं झाड लाल-गुलाबी व पिवळसर फुलांच्या गुच्छांनी लगडलं आहे.
 
खरं तर शिमग्याचे ढोल वाजू लागले की त्या तालावर पळस, पांगारा, शेवर आणि सीता अशोक ही लाल फुलांची झाडं नाचू लागतात. लाल गुलाल उधळू लागतात. पळस, पांगारा आणि शेवर (काटेसावर) यांच्या तुलनेत हे झाड गाजावाजा न करता अचानकहळूच फुलतं आणि हो.. त्याला एक मंद मादक असा सुगंधही असतो. इतर जंगली झाडांसारखं हे झाड सगळीकडे आढळून येत नसल्याने त्याचं फुलणं हा केवळ रसिकांच्याच कौतुकाचा विषय असतो.
 
 
‘शोक हरण करणारा’ अशोक हिंदू धर्मीयांमध्ये अतिशय पवित्र वृक्ष म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच घराच्या आवारात हे झाड मुद्दाम लावलं जातं. सीतामाता या झाडाखाली बसून आपलं दु:ख कमी करी, म्हणूनच या झाडाखाली बसून पूजा केली, तर खूप सकारात्मक परिणाम होतात अशी श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटीच हे झाड घराच्या बाहेर डाव्या बाजूस लावण्याची पद्धत आहे. या झाडामुळे कोणतंही शुभकार्य विनासायास पूर्णत्वास जातं व गृहकलह नष्ट होऊन आर्थिक सुबत्ताही प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या झाडाला पाणी घातलं, तर सर्व दोष नाहीसे होतात अशीही पूर्वापार समजूत असल्याने बर्‍याच ठिकाणी हे झाड लावलं व जगवलं जात होतं. परंतु हा मध्यम उंचीचा (20-25 फूट) एक वृक्ष असल्याने व हल्ली घरांचं रूपांतर ब्लॉकमध्ये होत असल्याने हा वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
 
ashoka tree 
 
 चिपळूणच्या विध्यंवासिनी परिसरात शेंबेकर यांच्या घराबाहेर फुललेला अशोकवृक्ष
 
 
या झाडाचं शास्त्रीय नाव ‘जोनेशिया अशोका’ किंवा ‘सराका अशोका’ (saraca asoCa) असं असलं, तरी भारतात महाराष्ट्र-गुजरात भागात ‘सीता अशोक’ या नावानेच ते ओळखलं जातं. लॅटिन भाषेत सराका इिंंडका, जोनेसिया अशोका असं त्याचं नाव आहे. बंगाली भाषेत ‘अस्पाल’, तर गुजरातमध्ये ‘आसोपालव’ अशा नावाने ओळखतात. याची पानं 8 ते 9 इंच लांब व साधारणपणे अडीच इंच रुंद असतात. ती प्रारंभी लाल व नंतर हिरवी होत जातात, म्हणून त्याला ‘ताम्रपल्लव’ असंही नाव आहे. मंगल कार्यात या झाडाची पानं वापरली जातात.
 
साधारणपणे मार्च महिन्याच्या प्रारंभापासून या झाडाच्या फुलांचा बहर सुरू होतो तो अगदी मे महिन्यापर्यंत टिकतो. झाड आपल्या सर्वांगावर लांब देठाच्या लाल गुलाबी फुलांचे घोस धारण करतं. फुलं खोडावरही येतात आणि झाडाच्या वरच्या फांद्यांवरही येतात. मेअखेर फुलांच्या जागी लांब शेंगा लोंबू लागतात. त्यातली ‘बी’ चक्क फणसाच्या आठळ्यांएवढी असते. पुंकेसरांचे दांडे मिरवत खोडाला चिकटलेली फुलं अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे एरवी लक्ष वेधून न घेणारं सीता अशोकाचं झाड जाणार्‍यायेणार्‍यांचं पटकन लक्ष वेधून घेतं. रक्तातली साखर कमी करण्यासाठी व इन्शुलीनचा पाझर वाढवण्यासाठी फुलांचा वापर केला जातो, तर झाडाची सालसुद्धा औषधी असल्याने हाडं मजबूत करण्यासाठी, तसंच ‘अशोकारिष्ट’ हे औषध बनवण्यासाठी वापरतात. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच या औषधांचा वापर केला जातो.
 
हे झाड दिवस-रात्र मिळून तब्बल 22 तास प्राणवायू देतं. पिंपळाखालोखाल हेच झाड सर्वात जास्त प्राणवायू सोडतं, म्हणूनच या झाडाच्या सावलीत बसलं की उत्साहपूर्ण वाटतं.
 
 
मात्र आजकाल शहरातून अशोकाचं म्हणून जे झाड लावलं जातं, ते मूळचं सीता अशोकाचं नव्हेच! त्याला ‘पेंडुला अशोक’ असं नाव आहे. सरळसोट उंच वाढणारा व निमुळती पानं असणारा हा अशोक वृक्ष व सीता अशोक वृक्ष यात फरक आहे. शहरी अशोकाची पानं जमिनीकडे झुकलेली (सूचिपर्णीप्रमाणे) व काहीशी कडक असतात. सीता अशोकाची सर या शहरी वृक्षाला नाहीच.
 
 
सध्या कोकणात खरा सीता अशोक पाहायला मिळतो आहे. त्याचं सौंदर्य खरोखरच मनावर गारूड करतं.