आला, वसंत ऋतू आला..

विवेक मराठी    19-Mar-2024
Total Views |
आरती कुलकर्णी
9881223554
वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंदसोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण, उत्सव साजरे करण्यासाठी निमित्तच शोधत असतो म्हणा ना! या काळात येणार्‍या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! वसंत म्हणजे शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा - त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा ऋतू. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रती-मदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. असा हा ऋतुराज वसंत आला आहे, तर हा निसर्गाचा सर्जनसोहळा आपणही मनात साठवू या आणि तितक्याच उत्साहाने साजराही करू या.

vasant ritu
 
आपल्याकडील ऋतुचक्रामधील सुरुवातीचा आणि सगळ्यांच्याच थोड्या अधिक आवडीचा ऋतू म्हणजे वसंत ऋतू! याला कारणही तसेच. वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंदसोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण, उत्सव साजरे करण्यासाठी निमित्तच शोधत असतो म्हणा ना! या काळात येणार्‍या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते निसर्गातूनच. सगळ्या आसमंतातच या दिवसांमध्ये निरनिराळ्या रंगांची उधळण झालेली दिसते. निसर्ग नेहमीच सुंदर असतो, पण या काळात - विशेषत: वसंत ऋतूच्या चाहुलीनंतर त्याची अनेक रंगीत आणि लक्षवेधी रूपे बघायला मिळतात. पळस, पांगारा, सावरी, शाल्मली या काळात फुलून येतात. केशरी, पिवळा, गुलाबी, लाल अशा अनेक रंगछटांनी जणू निसर्गाची रंगपंचमीच सुरू होते.
 
ऋतू वसंत
 
ही सगळी किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! वसंत म्हणजे शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा - त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा ऋतू, म्हणूनच तो सर्वकालीन सर्वप्रिय असावा. भारतासारख्या अतिविशाल देशात, नैसर्गिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ-फाल्गुन, काही ठिकाणी फाल्गुन-चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र-वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असे असले, तरीही सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसांनंतर, माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमीपासून वसंतोत्सव सुरू होतो, याला मान्यता असल्याचे दिसते.
 
वसंत.. नावीन्याचा, चैतन्याचा, यौवनाचा ऋतू! साहजिकच या काळात भारतभर अनेक उत्सव साजरे केले जातात आणि ही परंपरा अगदी जुन्या काळापासूनची आहे. प्राचीन काळात मानव निसर्गाच्या अधिक सान्निध्यात होता व सभोवतालच्या निसर्गक्रमाप्रमाणे, ऋतुचक्राप्रमाणे त्याचे एकूणच सगळे व्यवहार चालत असल्याने, सर्व प्रकारची व्रते, सण, उत्सव या अनुषंगानेच आखण्यात आलेले दिसतात. वसंतोत्सव, मदनोत्सव, होळी, रंगपंचमी असे कितीतरी उत्सव या दिवसांमध्ये येतात.
 

vasant ritu 
यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव! अर्थात, या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची-विद्यांची देवी सरस्वती या देवतांचे महत्त्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वतीसुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असे मानतात. याच दिवसाला श्री पंचमी असेही म्हटले जाते, कारण श्री लक्ष्मीसुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंतोत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी ’सुवसंतक’ नावाचा उत्सव साजरा केला जात असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र या ग्रंथातही येतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्टी करतात. नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी देवतांना वाहतात. देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळे वगैरे खाणे सुरू करतात. अर्थात नवान्नेष्टीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणार्‍या पिकांप्रमाणे व त्यांच्या उपलब्धीच्या वेळेप्रमाणे बदलतो.
 
अगदी प्राचीन काळापासून कविमनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणार्‍या या वसंताची मोहक वर्णने अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यातही दिसतात. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मणग्रंथात तर या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुले, फळे येतात असे उल्लेख आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, “सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे (ऋतूनां कुसुमाकर:)” आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम तर सर्वांना माहीत आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सर्वच रचनांमध्ये वसंतातील निसर्गाची उधळण आणि वसंत व कामदेव या जोडगोळीने प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव या सर्व गोष्टींची वर्णने मोठ्या प्रमाणात येतात. विशेषत: रघुवंशमध्ये व कुमारसंभवात वसंतामुळे बदलेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरीत वर्णन सापडते.
 

vasant ritu 
 
वसंत आणि कामदेव यांचा धागा मात्र प्राचीन काळापासून या उत्सवांमध्ये दिसतो. ऋतुराज वसंत हा कामदेवाचा सखा. कामदेव हा इच्छा, आकांक्षा यांचा प्रणेता देव! सर्व ऐहिक सुखे मिळवण्यासाठी प्रेरणा देणारा, तसेच यौवन व प्रेम यांचाही देव. आपल्या इक्षुदंडातून फुलांचे बाण मारून प्रेमीजनांना घायाळ करणारा देव म्हणून सर्वांनाच तो माहीत असतो. परंतु पूर्वी या कामदेवाची पूजा होत असे व त्याच्या मूर्ती देवालयांमध्ये स्थापित केलेल्या असत. कामदेव प्रसन्न व्हावा म्हणून अनेक व्रते व उपवासदेखील केले जात. त्याच्या देवळांत अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जात. या उत्सवांमध्ये नगरातील सर्व युवक, युवती सहभागी होत. निरनिराळ्या कलांचे प्रदर्शन, भेटीगाठी, जागरणे, वेगवेगळे खेळ अशा स्वरूपाचे कार्यक्रम असत. अनेक संस्कृत व प्राकृत नाटके, कथा, काव्ये यांतून वसंतोत्सव, मदनोत्सव यांची वर्णने वाचायला मिळतात व तेव्हाच्या समाजात हे उत्सव कशा प्रकारे साजरे केले जात असत याची माहिती समजते.
 
प्राचीन साहित्यातून दिसणारा कामदेव हा निश्चितपणे मोहक, प्रेमाचा व प्रेमीजनांचा आवडता देव आहे. अनेक प्रसिद्ध काव्य, नाटकांमध्ये मन्मथ हजेरी लावून जातोच. मृच्छकटिकमध्ये वसंतसेना व चारुदत्त प्रथम भेटतात ते मदनमहोत्सवातच! राजा उदयन केंद्रस्थानी ठेवून रचलेली अनेक काव्ये आहेत. यांतील उदयन म्हणजे जणू मदनाचाच अवतार असतो. अनेकदा नायक म्हणजे जणू प्रति कामदेव असतो, तसेच मदनबाण नायिकेला व्याकूळ करत असतात. एकंदरीत प्रेमी युगुलाला नेहमी मदनाची मदत लागतेच आणि तोसुद्धा त्याचे हे काम चोख बजावत असतोच. अविमारक, ऋतुसंहार, रघुवंश, रत्नावली, मालती-माधव, तिलकमंजरी, नवसाहसांकचरित, नलचम्पु या आणि अशा अगणित संस्कृत व प्राकृत साहित्यात कामदेवाच्या पूजनाचे, मदनोत्सवाचे महत्त्वाचे उल्लेख दिसतात.
 


vasant ritu 
 
कामसूत्रात व तत्सम इतरही ग्रंथांतून कामदेवाच्या मंदिरांचे अनेकदा उल्लेख येतात. अशा मंदिरांमध्ये नागरिक विशिष्ट दिवशी जमत असत व उत्सव साजरे करीत असत, असे या संदर्भांवरून समजते. त्या काळी आपली कला वा विद्या सर्वांसमोर सादर करण्यासाठी, विविध गुणदर्शनासाठी, मनोरंजनासाठी निरनिराळे उत्सव केले जात. कलांची अधिष्ठात्री देवी सरस्वती, तसेच प्रेमीजनांचा, गणिकांचा आराध्य असा कामदेव यांच्या मंदिरांमध्ये असे विविध समारंभ होत असत. कामदेवासंबंधीचे वा त्याला मध्यवर्ती ठेवून साजरे होत असलेले अनेक उत्सव पूर्वी प्रचलित होते. त्या काळात तरुणाईला एकत्र आणणारे, मनोरंजन करणारे हे उत्सव अतिशय आवश्यक व लोकप्रिय असणारच!
 
 
यातील सर्वात मोठा व परिचित उत्सव म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाला साजरा होणारा मदनोत्सव. याला वसंतोत्सव असेही म्हणतात. या उत्सवामध्ये नृत्य, गाणी यांचे सादरीकरण, विविध वाद्यांचे वादन याचे महत्त्व असते. निसर्गात वसंताने केलेली रंगांची उधळण व उत्सवी वातावरण यांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच नगरांत आनंदाचे व उत्साहाचे वारे वाहत असले पाहिजे. या मदनोत्सवातील आणखी एक महत्त्वाचा उपचार म्हणजे मदनपूजा वा मकरध्वज पूजा. यात मदनाचे चित्र वा मूर्ती तयार करून सर्वांसमवेत त्याचे पूजन होत असे. साधारणत: राणी किंवा तशाच प्रमुख युवतीच्या हस्ते मदनपूजा होत असे. राजपरिवार, सरदार, व्यापारी यांबरोबर सर्वसामान्य लोक सपरिवार या उत्सवात भाग घेत असत. वन-विहार, जलक्रीडा आणि मनोरंजनाचे अनेकविध कार्यक्रम या काळात आयोजित केले जात असत. उत्तर भारतात, विशेषत: राजस्थानात अजूनही हे उत्सव साजरे केले जातात. वसंत पंचमीनंतर लगेचच येते रथसप्तमी. हिला भानुसप्तमी असेही म्हटले जाते. या दिवशी सूर्याची पूजा होते. उत्तर भारतात अनेक ठिकाणी सूर्याची त्याच्या रथातून मिरवणूकसुद्धा काढतात. हासुद्धा वसंतोत्सवाचा एक भाग आहे.
 
 
याखेरीज याच काळाच्या थोडे आधी, नंतर होणारे उत्सव म्हणजे होलिकोत्सव वा होळी, फाल्गुनोत्सव, कुसुमायुध महोत्सव, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे उत्सव! वसंतोत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो, त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत व कालगणनेनुसार निरनिराळी नावे व दिवस असले, तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच असलेले दिसते. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखलसुद्धा एकमेकांवर उडवणे, पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे, मोठमोठ्या आवाजात बोलणे, एकमेकांना चिडवणे, गाणी म्हणणे, मिरवणुका काढणे अशा अनेक क्रीडांची वर्णने साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहे. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण व गोपी यांचे नाते खूप जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णने सर्वांच्याच परिचयाची! कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महा-रास आयोजित करीत असत.
 
वसंत पंचमीला सरस्वती आणि रती-मदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो.
 
 
तर मंडळी, असा हा ऋतुराज वसंत आला आहे, तर हा निसर्गाचा सर्जनसोहळा आपणही मनात साठवू या आणि तितक्याच उत्साहाने साजराही करू या.