मल्लखांबातील गुरुवर्य

विवेक मराठी    02-Mar-2024
Total Views |
@डॉ. नीता ताटके 9833479939
‘ज्याला आवड आहे तो कोणीही मल्लखांब करू शकेल’ ही संकल्पना मल्लखांबात उदय देशापांडे यांनी आणली. या खेळासंबंधी जनजागृती केली आणि मल्लखांबाच्या प्रशिक्षण केंद्रांचे जाळे विस्तारायला लागले. झपाटल्याप्रमाणे काम करणार्‍या सरांच्या या कष्टाने, त्यागाने मल्लखांबाला एक वेगळाच आयाम मिळाला. भविष्याकडे नजर ठेवण्याचा एक वेगळा द्रष्टेपणा त्यांच्याकडे आहे. या त्यांच्या कार्यासाठी त्यांना मल्लखांबातले पहिले पद्मश्री होण्याचा बहुमान मिळाला. त्यांच्या पहिल्या तुकडीतल्या विद्यार्थिनी डॉ. नीता फणसीकर-ताटके यांनी घेतलेला सरांच्या कारकिर्दीचा ‘आँखो देखा’ धावता आढावा.
 

mallakhamb
 
मे 1976. ऐन उन्हाळ्यात राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स संघटनेने त्या वर्षीच्या जिम्नॅस्टिक्स व मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा आगरताळा, त्रिपुरा येथे जाहीर केल्या. मुंबई-लखनऊ-लुंबडिंग-धरमनगर-आगरताळा हा तीन रेल्वेगाड्या बदलून व पुढे बसने बारा तास असा सहा दिवसांचा प्रवास. रेल्वेचे आरक्षण नाही, गाड्यांना तुफान गर्दी, यामुळेच 16 जणांचा संघ या स्पर्धेला मुकणार असे लक्षात आल्यावर 23 वर्षांचा एक युवक आगरताळ्याला जायला तयार झाला. कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइजमधली नोकरी नवीन असूनसुद्धा आपल्या वरिष्ठांकडे रजेचा अर्ज घेऊन गेल्यावर वरिष्ठ जरा कुत्सितपणे म्हणाले, “तुला नोकरी करायची आहे की खेळामागे धावायचंय?” या शब्दांनी नाउमेद न होता हा युवक थेट ‘कमिशनर’च्या कचेरीत पोहोचला व आपली रजा मंजूर करून घेतली. हा युवक होता उदय देशपांडे. आम्हा सर्वांचे ‘देशपांडे सर’. अत्यंत धकाधकीचा प्रवास करून जेव्हा संघ आगरताळा येथे पोहोचला, तेव्हा एक नवीनच समस्या पुढे उभी ठाकली. आयोजकांनी जिम्नॅस्टिक्सचे साहित्य मिळवले होते, मात्र त्यांच्याकडे मल्लखांबच नव्हता. पण परिस्थितीसमोर हार मानतील ते देशपांडे सर कुठले? त्यांनी तिथे लाकडाची वखार शोधली, एका दिवसात मल्लखांब बनवून घेतला आणि मल्लखांबाची ती राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर केंद्र सरकारच्या ‘एक खेळ एक संघटना’ या नियमावलीनुसार जिम्नॅस्टिक्स संघटनेने मल्लखांबापासून फारकत घेतली आणि 1980 साली भारतीय मल्लखांब महासंघाची स्थापना झाली. मात्र राज्य वा राष्ट्रीय पातळीवरील मल्लखांब संघटनांकडून मल्लखांबाचा कुठेही विकास होताना दिसत नव्हता. 1987मध्ये राज्य आणि 1989मध्ये राष्ट्रीय मल्लखांब संघटनेचे सचिव झाल्यानंतर बिनपगारी रजा काढून, वेळप्रसंगी महिनोन्महिने रात्रपाळी करून सरांनी महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा, देशातील प्रत्येक राज्य पिंजून काढले, मल्लखांबातली माणसे एकत्र करून विविध पातळ्यांवर संघटना बांधणीला प्राधान्य दिले. लवकरच राज्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हे सहभागी होऊ लागले आणि राष्ट्रीय स्पर्धेत राज्यांची संख्या झपाट्याने वाढली. स्पर्धात्मक सादरीकरणाचे मूल्यांकन प्रमाणित असावे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नियमावली’ तयार केली. ऐंशीच्या दशकात राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुलींच्या दोरीच्या मल्लखांबाचा समावेश त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच झाला. अशाच पाठपुराव्यामुळे मुंबई विद्यापीठ आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले आणि 2004मध्ये या स्पर्धांमध्ये मुलींच्या दोरी मल्लखांब स्पर्धांचाही समावेश झाला.
 
 
अगदी गल्ली ते दिल्ली या उक्तीनुसार सगळीकडे मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखवून या खेळाबद्दल जागृती करण्यास सुरुवात केली. ही प्रात्यक्षिके सर्कशीप्रमाणे न करता, समालोचनाने मल्लखांबाबद्दलची माहिती व महती, त्यातल्या उड्यांची नावे लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली, मल्लखांबाचे प्रशिक्षणही द्यायला सुरुवात झाली. होता होता मुंबईत, महाराष्ट्रात आणि भारतात मल्लखांबाच्या प्रशिक्षण केंद्रांचे जाळे विस्तारायला लागले. लोकांपर्यंत मोठ्या संख्येने पोहोचण्यासाठी वृत्तपत्रांतून विपुल लिखाणाला सुरुवात झाली. मल्लखांबाच्या अनेक वर्षे स्पर्धा होऊनसुद्धा दिल्लीतले बाबू मल्लखांबाला दंड-बैठकांसारखा व्यायाम समजत. समस्या समोर ठाकली की तिचा बाऊ न करता उत्तरे शोधायची, या सरांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी देशातल्या विविध राज्यांतल्या सुमारे 120 खासदारांकडून पत्रे घेऊन ती केंद्र सरकारला सादर केली. मुंबईतले क्रीडाप्रेमी खासदार मोहन रावले यांच्या मदतीने 1996मध्ये मल्लखांबाला केंद्र शासनाची मान्यता, रेल्वेची सवलतही व 1998 साली भारतीय ऑलिम्पिक महासंघाचीही मान्यता मिळवली.
 

mallakhamb
 
झपाटल्याप्रमाणे काम करणार्‍या सरांच्या या कष्टाने, त्यागाने मल्लखांबाला एक वेगळाच आयाम मिळाला. भविष्याकडे नजर ठेवण्याचा एक वेगळा द्रष्टेपणा त्यांच्याकडे आहे. मल्लखांब प्रामुख्याने स्पर्धात्मक म्हणून बघितला जायचा आणि स्पर्धेत खेळणारी मुले प्रात्यक्षिके दाखवायची, त्यामुळेच मल्लखांब हा लहान मुलांचा खेळ आहे, असा एक सार्वत्रिक समज होता. ‘ज्याला आवड आहे तो कोणीही मल्लखांब करू शकेल’ ही संकल्पना मल्लखांबात सरांनी आणली आणि त्यामुळेच मोठी माणसे, वयस्कर मंडळी - अगदी अंध, अपंग ही ‘दिव्यांग मंडळी’ही मल्लखांब करू लागली. कमीत कमी वेळात शरीराच्या जास्तीत जास्त भागांना उत्कृष्ट व्यायाम देणारा एकमेव क्रीडाप्रकार हे मल्लखांबाचे फायदे अनुभवू लागली. मल्लखांब एक ‘तंदुरुस्ती’साठीचा उत्कृष्ट व्यायाम म्हणूनही पुढे येऊ लागला. ‘कलावंतांनी तर मल्लखांब करावाच’ या भूमिकेतून पद्मश्री डॉ. वामन केंद्रे यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठातही मल्लखांबाचा समावेश झाला. मुंबई महापौर चषक अ.भा. मल्लखांब स्पर्धेत मुलींच्या पुरलेल्या मल्लखांबाच्या स्पर्धांना सुरुवात करून त्यांनी याला स्पर्धात्मक अधिष्ठान मिळवून दिले.
 
 
समर्थमध्ये अनेक परदेशी व्यक्ती मल्लखांब शिकायला येतात. त्यांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरही मल्लखांबाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न सुरू झाला. 2004पासून दर वर्षी म्युनिक, जर्मनी येथे मल्लखांबाची शिबिरे होत होतीच. मग प्रवास अमेरिका, इंग्लंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, कझाकस्तान असे करत जगातल्या तीन खंडांमध्ये पोहोचला. आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा घेण्याचे स्वप्न बघून 2014मध्ये पहिल्यांदाच एका भव्य वातानुकूलित शामियान्यात महापौर चषक व राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा घेण्यात आली आणि त्यातूनच पुढे 2019मध्ये समर्थच्या प्रांगणावर पहिली जागतिक अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा रंगली. 15 देशांच्या सहभागाने ही स्पर्धा गाजली. पुरलेल्या मल्लखांबावर सुवर्णपदक जपानची कायको टाकेमोटो आणि रौप्यपदक इटलीची डेलिया सिरूटी घेऊन गेली. या स्पर्धेने मल्लखांबाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक अधिष्ठान दिले. या स्पर्धेपासून केंद्र सरकारनेही मल्लखांब खेळाडूंना ‘अर्जुन’ व ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करायला सुरुवात केली. सरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांचे एक उत्कृष्ट दस्तऐवजीकरण - प्रत्येक दिवस, प्रत्येक दौर्‍याच्या दैनंदिन्या हा जणू मल्लखांबाचा चालताबोलता इतिहासच! रोज सकाळी 4.30 वाजता ‘समर्थ’च्या मैदानावर येणार्‍या देशपांडे सरांची मल्लखांबाची गेली 50 वर्षांहून अधिक असलेली निरलस सेवा संपूर्णपणे मानसेवी आहे, ही विशेष बाब. कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइजमधली 38 वर्षांची नोकरी सुरू असताना आणि आता निवृत्तीनंतरही मल्लखांब यज्ञ अव्याहतपणे सुरू आहे.
 
 
श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या सुप्रसिद्ध संस्थेमध्ये संस्थापक व्यायाममहर्षी प्र.ल. काळे गुरुजी यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलेल्या देशपांडे सरांनी व्यायामशाळा वाढवली. 100 मुलांपासून संस्थेतल्या खेळाडूंची संख्या 1000 च्या वर गेली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विजेते, शिवछत्रपती, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू घडले आहेत. शिवाजी उद्यानावर समर्थची देखणी वास्तू उभी राहिली, आता सरांचे स्वप्न आहे संपूर्ण क्रीडा सुविधेला वाहिलेल्या 80 कोटीचे अंदाजपत्रक असलेल्या 22 मजली भव्य ‘समर्थ शताब्दी भावना’चे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित देशपांडे सरांना आता भारत सरकारचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे, सरांचे हे स्वप्न साकारायला सक्रिय मदत हेच सरांचे खरे ‘हार्दिक अभिनंदन’ ठरेल. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!