मिटींग

विवेक मराठी    20-Mar-2024   
Total Views |
satire
  अर्कचित्र - अमोघ वझे
इशय भरकटाया नगं, म्हनून दाद्याणं फुडाकार घिऊन बोलनी चालू क्येली. “बोला चुलते.. कश्यापयी बलावली मिटींग?” दाद्याच्या सवालावं सुप्रीच्या बापाणं खून क्येली, तशी सुप्री बोलाया लागली. “इलेक्षणचा टाईम ए. परिवाराणं येक र्‍हायला पायजेन हुतं. आपल्या आपल्यात मिटलं आसतं.‘’ सुप्रीचं बोलनं मदीच तोडत दाद्याची बायकू म्हन्ली, “मिटवतंच आन्लं हुतं म्हनून येगळी चूल मांडावी लागली.” सुप्रीला पुन्ना मिरच्या झोंबल्या. “तुमी जरा गप र्‍हाता का?” दाद्यानं दरडावल्यागत क्येलं. “गप र्‍हाऊन काय भेटलं? मर मर मरायचं तुम्मी आनि मलई खायला दुसरेच!” दाद्याची बायकू आयकन्याच्या परिस्थितीत नवतीच. “म्हनून इलेक्षन ला हुब्या र्‍हायल्या व्हय तुम्मी वैणी? णंदा भावजया येकम्योकींसमूर इलेक्षन लढतायत.. बरं दिसतं का ह्ये?” 
वांग्याच्या शेताला पानी पाजून सुप्री लगबगीनं घराकडं चाल्ल्याली. आज सुप्रीच्या बापाणं भावकीची मिटींग बलवल्याली. पावने जमायच्या आदुगर कामं उरकून घ्यावी, म्हनून सुप्रीचा जीव चाल्ल्याला. सुप्री तनातना चालंत घरात घुसली. घरात भावकीतली मंडळी आदीच जमल्याली पाहून सुप्री पुन्यांदा वयतागली. पन तसं जानवू न द्येता न्हेमीसारकं खोटं खोटं हासत “या या या.. स्वारीहा, माला उश्यार जाला. शेतीची कामं युणो? यकटीवंच पडल्यात!”
 
 
तिच्या आवताराकं पाहात दाद्या, दाद्याची बायकू, दाद्याचं पोरगं, दाद्याचा भाव, र्‍होयत्या आनी कच्चे बच्चे पयकी दाद्याच्या बायकूनं तोंडाला पदर लावला. दाद्यानं ‘हासू नगा’ म्हनत कोपराणं ढोसल्ल्यालं सुप्रीणं न्येमकं पाह्यलं. “लय हासाया यतंय वैणी?” सुप्री फनकारूण बोल्ली. “न्हाई म्हंजी आमच्या वैणी तशा हासतमुखच एत!” आसं बोलून लगीच सावरूण घ्येतलं, तरी वादाची ठिनगी पडलीच. “हासन्यासारकंच वागताय की ओ वन्सं, मंग हासनारच की मानूस!” दाद्याच्या बायकूणं वचपा काहाडला.
 
 
सुप्रीच्या बापाणं चर्चेआदीच भांडन नगं म्हनून मांडवली करायचा प्रेत्न क्येला. सुप्री घाम पुसंत बैठकीवं यून बसली. संज्याणं बरफ घाटल्यालं सरबत आनून सुप्रीसमूर धरलं. दाद्याच्या बायकूणं लागलीच कोपर मारत दाद्याला गल्लासातला बरफ दाकवला. “आपल्याला बिगर बरफवालं धिलं!” आसं सुप्रीला आयकू जाईन यवड्या आवाजात पुटपुली. दाद्यानं लगीच “गपा हो.. कशाला पायजेल बरफ? घसा धरंन. प्रचाराची भाश्नं करायचीत आपल्याला!” आसं दटावलं. दाद्याचं ‘घसा धरंन’ आयकून सुप्रीणं पयल्या घोटाबरूबर हावरटावानी त्वांडात वडल्याला बरफ गालात सरकावला आनी सरबताचा घोट घशाखाली घाटला. घसा धराया नगं, म्हनून बरफ गिळता यीना आनी पावन्यांसमूर पाटदिशी गल्लासात परत टाकता यीना आशी आवस्ता झाल्ती. सेवटी दाताला झिंझिन्या यून कळ लागल्यावं नाविलाजाणं बरफाचा खडा त्वांडातून गल्लासात फ्येकावा लाग्ला. ‘डुब्बूक’ आसा आवाज करत खडा गल्लासात पल्डा आनि दाद्याच्या बायकूणं पुन्ना त्वांडाला पदर लावला. आता सुप्रीच्या दाताच्या झिंझिन्या टक्कुर्‍यात ग्येल्या.
 
 
इशय भरकटाया नगं, म्हनून दाद्याणं फुडाकार घिऊन बोलनी चालू क्येली. “बोला चुलते.. कश्यापयी बलावली मिटींग?” दाद्याच्या सवालावं सुप्रीच्या बापाणं खून क्येली, तशी सुप्री बोलाया लागली. “इलेक्षणचा टाईम ए. परिवाराणं येक र्‍हायला पायजेन हुतं. आपल्या आपल्यात मिटलं आसतं.‘’ सुप्रीचं बोलनं मदीच तोडत दाद्याची बायकू म्हन्ली, “मिटवतंच आन्लं हुतं म्हनून येगळी चूल मांडावी लागली.” सुप्रीला पुन्ना मिरच्या झोंबल्या. “तुमी जरा गप र्‍हाता का?” दाद्यानं दरडावल्यागत क्येलं. “गप र्‍हाऊन काय भेटलं? मर मर मरायचं तुम्मी आनि मलई खायला दुसरेच!” दाद्याची बायकू आयकन्याच्या परिस्थितीत नवतीच. “म्हनून इलेक्षन ला हुब्या र्‍हायल्या व्हय तुम्मी वैणी? णंदा भावजया येकम्योकींसमूर इलेक्षन लढतायत.. बरं दिसतं का ह्ये?” सुप्रीणं डायरेक बाँम्बच टाकला. “मंग तुम्मी द्याल त्यवडं घिऊण गप र्‍हायाचं हुतं का काय?” दाद्याची बायकू पुन्ना उसाळली. “आमी कुटं आसं म्हनल्यालं? पन प्रचारासाटी नवरा भाशन दिऊन निवडून आनंल ओ.. पंचायतीच्या मिटींगमदी तुमचं तुमालाच बोलावं लागनार हाय. तवा नवरा न्हाई यनार.” सुप्रीनं वार काहाडला. “तुमचं चालतंय की त्वांड. पटकावलायकी पंचायतरत्न. येक सोडून दोनदा. पन निस्ती बडबड करूण लोकांची कामं नस्त्यत हुत. बोलाया न्हाई आलं तरी कामं येत्यात आमाला.” दाद्याच्या बायकूनं पलटवार क्येला.
 
 
प्रकरन हाताभाईर जायाला नगं, म्हनून दाद्या पुन्ना मदी पल्डा. “ओ, तुमी गपा जरा.. आनि सुप्रे तू बी गप. म्होटा भाऊ म्हनून सांगतूय.. गबसा दोघीबी!” दाद्याच्या चढलेल्या आवाजाणं वातावरन जरा तनावपूर्न शांत जालं. र्‍होयत्यानं संज्याला सरबताचा आजून येक राऊंड आनन्याची खून क्येली. संज्या आर्डर घिऊन सयपाकघरात पळाला. त्यो सरबत घिऊन परत यीस्तवर भाईर शांतताच हुती. संज्याणं सरबताचा पयला गल्लास दाद्याच्या बायकून्होरं धरला. दुसरा दाद्याणं उच्यालला. तिसरा दाद्याच्या पोरानं घेटला. मंग सुप्रीचा बाप, सुप्री, र्‍होयत्या आन् दाद्याचा भाऊ यांला वाटून संज्या रिकामा ट्रे आत ठिवायला जानार, यवड्यात दाद्याची बायकू खुदकनी हासली. तिच्या हासन्यानं वातावरन पुन्ना टाईट जालं. “तब्बेत बरी हाय नव्हं? काय हुतंय?” दाद्यानं दमात घिऊन इच्यारलं, तसं दाद्याच्या बायकूनं त्वांडाचा पदर काहाडला आन् हाळूच म्हन्ली, “वन्स मगाशी म्हन्ल्या पंचायतीत बोलाया नवरा यनार न्हाई.. म्हंजी वन्संला ग्यारंटी हाय की म्या पंचायतीवं निवडून जाईल आनी त्या घरी बसत्याल!”
 
 
दाद्याच्या बायकूच्या सवालावर फनकारून सुप्रीनं सरबताचा गल्लास येका घोटात घशात रिकामा क्येला. सरबत घशात ग्येलं पन बरफ त्वांडात तसाच र्‍हायला. त्यो त्वांडात फिरत र्‍हायला आन् दाताला पुन्ना झिंझिन्या यून टक्कूर्‍यात ग्येल्या. त्या नक्की बरफामुळं हुत्या का दाद्याच्या बायकूच्या सवालामुंळं.. ह्ये सुप्रीला उमगंना जालं.

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.