विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीच्या किनार्यावर वसलेल्या मलकापूर गावाला मोठा धार्मिक व ऐतिहिासक वारसा लाभला आहे. मल्लिकार्जुनस्वरूप शिवाच्या नावावरून मल्लिकार्जुनपूर याचा अपभ्रंश होत या गावाचे नाव मलकापूर असे पडले, असा इतिहास आहे. येथील नेमिवंत राजास निजामाकडून वतनदारी मिळाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेवटचे भाषण मलकापूरच्या जाहीर सभेत झाले होते. मलकापूरची ऐतिहासिक, धार्मिक व कृषी उद्योगविश्वाचा आढावा घेणारी ही विशेष पुरवणी.
विदर्भ प्रांतातील बुलढाणा जिल्हा अजिंठ्याच्या कुशीत विसावलेला एक महत्त्वाचा जिल्हा समजला जातो. या जिल्ह्यात मेहेकर, जळगाव जामोद, चिखली, मोताळा, देऊळगाव राजा असे तेरा तालुके आहेत. त्यात मलकापूर हा एक महत्त्वाचा तालुका आहे. मलकापूर हे गाव नळगंगा नदीच्या किनारी वसलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहेच, शिवाय भुसावळनंतर द्रुतगतीच्या रेल्वेगाड्यांचे महत्त्वाचे स्टेशन आहे. मलकापूर या नावाविषयी अनेक संभ्रम आणि विवाद आहेत. येथील नेमिवंतच्या हवेलीत असलेल्या मल्लिकार्जुन मंदिराच्या नावावरून मल्लिकार्जुनपूर याचा अपभ्रंश होत या गावाचे नाव मलकापूर झाले असावे, असे म्हटले जाते. मलकापूर नगराला जुना परकोट आहे. नळगंगा नदीने याला दोन भागात विभागले आहे. पूर्व-पश्चिम भाग सालीपुरा या नावाने तर उत्तर-दक्षिण भाग हा पारपेठ नावाने प्रसिद्ध आहे. पारपेठ आणि मलकापूरला जोडणारे सिमेंट-काँक्रीटचे दोन पूल आहेत. ते श्रीमंत रघुजीराजे भोसले यांनी बांधले आहेत, असा इतिहास आहे. आजही हे पूल चांगल्या स्थितीत आहेत.
गुरू गोंविदसिंग यांचा पदस्पर्श
मलकापूर ही शिखाचे दहावे गुरू गोंविदसिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. गुरू गोविंदसिंग हे नांदेडला जाण्यापूर्वी सालीपुरा(मलकापूर)च्या भागात काही दिवस मुक्कामाला होते. त्यांच्या आठवणी जाग्या राहाव्या, यासाठी मलकापुरात दहा एकर जागेत गुरुद्वार (गुरुद्वारा कदमसर साहिब) उभारण्यात आले आहे. येत्या काळात विदर्भातील शीख संपद्रायाचे एक मुख्य शक्तिकेंद्र म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.
राजे नेमिवंतांची समृद्ध कल्पना
मलकापूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजे नेमिवंत यांचे कार्य. हैदराबादच्या निजामाकडून नेमिवंतांना वतनदारी मिळाली. नेमिवंतांनी मलकापुरात श्रीरामाचे भव्य मंदिर, मोठी हवेली, हलहान हवेली अशा वास्तू उभारल्या. श्रीराम मंदिरात तंत्रशास्त्राच्या आधारे स्थापन केलेले श्रीयंत्र (चक्र) हे एक अद्भभुत समजले जाते. राम मंदिरातील पादुकांच्या व श्रीचक्राच्या दर्शनासाठी कर्नाटकातील शृंगेरी शारदा पीठाचे पू.श्री शंकराचार्यही येऊन गेल्याचा इतिहास आहे. मोठ्या हवेलीचा पाया खोदत असताना एका मजुराला भव्य शिवलिंग सापडले. पुढे या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून मल्लिकार्जुन मंदिराची उभारणी करण्यात आली.
नेमिवंतांचे आणखी एक ऐतिहासिक कार्य म्हणजे त्यांनी आपल्या लालबाग शेतातील बांधलेली पाय विहीर. जवळपास 20हून अधिक पायर्याची ही विहीर कोरीव दगडांनी बांधलेली आहे. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या विहिरीत आजही मुबलक प्रमाणात पाणी आहे. मोठी हवेली, श्रीराम मंदिर, गौरीशंकर मंदिर, पायरीची विहीर, गुरुद्वार, जामा मशीद, दुर्गा मंदिर ही मलकापूरची प्रेक्षणीय स्थळे आहेत.
राजकीय चळवळीचे केंद्र
पारतंत्र्याच्या काळात मलकापूर हे विदर्भातील राजकीय चळवळीचे एक महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे. आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पदस्पर्श मलकापूरला लाभले. स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व लो. टिळकांकडे होते. त्या वेळी या परिसरात त्यांचे बरेच अनुयायी होते. लो. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव प्रारंभ केला, त्याला प्रतिसाद म्हणून तेव्हा मलकापुरात श्री पार्वती सूत भक्त मंडळाच्या गणेशोत्सवास प्रारंभ झाला. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करणार्या मलकापूर शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली. त्यासाठी त्या काळचे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ भाऊसाहेब हातवळणे यांनी पुढाकार घेतला. आजही ती संस्था विद्यमान आहे. तसेच येथे गोरक्षण संस्था सुमारे 100 वर्षांपासून कार्यरत आहे. स्व. मनालाल लखानी यांनी ती सुरू केली आहे. आजही त्यांचे वंशज ते सेवा कार्य करीत आहेत.
स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब खापर्डे, दादासाहेब खापर्डे, अण्णासाहेब पटवर्धन यांनी निजामाकडून वर्हाड प्रांत विकत घेऊन येथे सर्व प्रकारच्या क्रांतिकार्याला पूरक अशा गोष्टींची आखणी केली होती. या क्रांतिकार्यात मलकापूरचे श्रीमंत विष्णू सावजी यांचा सिंहाचा वाटा होता. सावजी यांनी या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सावजी यांच्यामुळे मलकापूरला शेगावचे संत श्री गजानन महाराजांचे आगमन झाले. पण निजामाचा दिवाण सालारजंग याचा इंग्रजांनी कूटनीतीने काटा काढला. त्यामुळे निजामाकडून वर्हाड प्रांत विकत घेता आला नाही. असो.
स्वातंत्र्य आंदोलनातील एक महत्त्वाचे अंग म्हणजे आझाद हिंद सेना’! या चळवळीचे संस्थापक, मार्गदर्शक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेवटचे जाहीर भाषण मलकापूरलाच झाले. या वेळी नेताजींना मानपत्र देण्याचा मान मलकापूर नगरीने मिळविला.
प.पू. डॉ. हेडगेवार ते अटलींचा पदस्पर्श
मलकापूर नगरीला संघस्थापनेपासून ते आतापर्यंतच्या वरिष्ठ अधिकार्यांनी व पदाधिकार्यांनी भेटी दिल्या आहेत. यामध्येे रा.स्व.संघ संस्थापक प.पू. डॉक्टर हेडगेवार यांनी सन 1933मध्ये मलकापूर येथील किल्ला शाखेला भेट दिली होती. त्यानंतर प.पू.श्रीगुरुजी यांचेही जाहीर भाषण येथे झाले. याशिवाय भारतीय जनसंघाच्या काळात पंडित दीनदयाळजी, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, मा. जगन्नाथराव जोशी यांच्या घणाघाती वक्तृत्वाने येथील आसमंत अनेक वेळा पुलकित झाला आहे.
असे हे मलकापूर गाव आजही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांत आपले अस्तिव टिकवून आहे.
लेखक मलकापूर येथील लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.