संघाच्या अ.भा. प्रतिनिधी सभेतील राष्ट्रमंथन

विवेक मराठी    23-Mar-2024
Total Views |
 @ल.त्र्यं. जोशी
समाज परिवर्तन आणि समाज संघटन हे उद्दिष्ट केंद्रस्थानी ठेवून, त्याला कुठेही धक्का न लावता, संघ नवनवे आयाम जोडत आहे. संघ बदलत गेला आणि आजही ती प्रक्रिया थांबलेली नाही. संघाचे जे काही आहे ते सगळे समाजसमर्पित आहे. म्हणूनच सरसंघचालक म्हणतात की, ’संघ कुछ नही करेगा, जो कुछ करेंगा वह समाज करेगा’. त्या समाजाच्या घडवणुकीसाठी सर्व शक्ती पणाला लावून एक स्थायी, समर्थ, नित्यसिद्ध शक्तीयुक्त व्यवस्था निर्माण करणे हे संघाचे उद्दिष्ट आहे व त्यासाठीच त्याची सतत धडपडही आहे. हा संकेतही संघाच्या प्रतिनिधी सभेच्या नागपूर बैठकीतून मिळाला आहे.
rss
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची नुकतीच नागपुरात आटोपलेली बैठक हा दर तीन वर्षांतील औपचारिकतेचा एक विषय असला तरी या बैठकीने दोन मुद्द्यांबाबत वेगळेपण अधोरेखित केलेले दिसते. सकृद्दर्शनी तसे जाणवणार नाही; पण थोडा अधिक विचार केला तर ते वेगळेपण स्पष्ट होते.
 
 
प्रतिनिधी सभेच्या या नागपूर बैठकीची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे ही बैठक तीन वर्षांतून एकदा नागपुरात होते व दुसरे म्हणजे या बैठकीत संघाच्या सरकार्यवाहांची निवड होते; पण ही झाली औपचारिकता. मात्र ही औपचारिकता इथेच थांबत नाही. ती त्याच्या किती तरी पुढे जाऊन या आयोजनाला भविष्यवेधी आशयही प्रदान करते. कुणाला असे वाटू शकते की, संघात एकचालकानुवर्तित्व असल्याने सरकार्यवाहांनाच काय, सर्व पदाधिकार्‍यांना सरसंघचालकच नियुक्त करीत असतील; पण ते खरे नाही. खरे तर संघात सरसंघचालकांचे स्थान ’गाईड अँड फिलॉसॉफर’ असे आहे; पण ते नाममात्र असे नाही. त्यातही संघाच्या आतापर्यंतच्या सर्व सरसंघचालकांनी आपली प्रतिभा, परिश्रम आणि कर्तृत्व पणाला लावून त्या पदाचे महत्त्व कैक पटींनी वाढवून ठेवले आहे. तरी संघाचे सर्व कार्यकारी अधिकार मात्र निर्वाचित सरकार्यवाहांकडे आहेत. संघाचे टॉप एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे सरकार्यवाह. या पदाचे वहन करणार्‍या अधिकार्‍यांनीही आपल्या कर्तृत्वाद्वारे त्या पदाची गरिमा वाढविली आहे.
 
 
सरकार्यवाहांची नामावली पाहिली आणि त्यांच्या कारकीर्दीवर दृष्टिक्षेप टाकल्यास ते स्पष्ट होते. सरकार्यवाहांनीच नंतर सरसंघचालक व्हावे, असा संघात नियम नसला तरी बहुतेक सरकार्यवाहांकडे सरसंघचालकांनंतर त्या पदाची जबाबदारी आली आहे व त्या प्रत्येक सरसंघचालकांनी या राष्ट्रव्यापी संघटनेला प्रगतीचे नवनवे आयाम प्रदान केले हा इतिहास आहे.
 
 
rss 
 
1940 साली डॉक्टर हेडगेवारांचे निर्वाण झाले तेव्हा सरकार्यवाहपदाची जबाबदारी श्रीगुरुजी पार पाडत होते. 1973 साली जेव्हा श्रीगुरुजींचे निर्वाण झाले तेव्हा बाळासाहेब देवरस सरकार्यवाह होते. त्यांनी आपल्या हयातीतच सरसंघचालकाचा पदभार प्रा. राजेंद्रसिंहजी यांच्याकडे सोपविला तेव्हा रज्जूभय्या म्हणून ओळखले जाणारे राजेंद्रसिंहजी सरकार्यवाहच होते. त्यांनीही आपल्या हयातीतच सरसंघचालकाचे पद आपल्या सहकार्‍याकडे सोपविले असले तरी ते सहकारी म्हणजे सुदर्शनजी त्या वेळी सरकार्यवाहच होते; पण सरसंघचालक न झालेलेही अनेक सरकार्यवाह आहेत.त्यात सर्वश्री स्व. भय्याजी दाणी, मल्हारराव काळे, एकनाथजी रानडे, माधवराव मुळ्ये, हो.वे. शेषाद्री यांचा समावेश आहे.
 
 
संघात सरकार्यवाहाची निवड सर्व स्वयंसेवक आपल्या प्रतिनिधींमार्फत मतदानाने दर तीन वर्षांनी करीत असतात. त्यासाठी शाखाशाखांमधून मतदान होते; पण सर्व प्रतिनिधी अविरोध निवडून येतात, कारण संघात लाभाचे कोणतेही पद नाही. पदाबरोबर दायित्व अपरिहार्यपणे येते.
 
 
खरे तर संघात जेवढी लोकशाही आहे तेवढी लोकशाही त्याच्यासारख्या दुसर्‍या कुठल्याही संघटनेत नाही. इथे प्रत्येक विषयावर अतिशय खोलात जाऊन चर्चा होते. विषयाच्या सर्व पैलूंचा एकमत होईपर्यंत विचार केला जातो आणि एकदा निर्णय झाला की, सर्व प्रकारच्या मतभिन्नता समाप्त होतात. या प्रक्रियेत कधी कधी निर्णयाला उशीरही होतो; पण निर्णय मात्र अचूक होतो. या प्रक्रियेतूनच सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबाळे यांची यंदा पुन्हा सरकार्यवाहपदी फेरनिवड झाली आहे.
 
 
तसे पाहिले तर प्रतिनिधी सभेच्या बैठकीत देशासमोर त्या त्या काळात असलेल्या समस्यांच्या संदर्भात प्रस्ताव संमत होतात. या वेळी मात्र एकच प्रस्ताव संमत झाला व त्याला संदर्भ आहे अयोध्येत नुकत्याच झालेल्या प्राणप्रतिष्ठेनंतर साकारलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा; पण हा प्रस्ताव एका भव्यदिव्य इमारतीच्या उद्घाटनापुरता मर्यादित नाही, हेही संघाने या ठरावातून अधोरेखित केले आहे. त्यातून श्रीराम मंदिराची तात्कालिकता समाप्त होते व त्या विषयाला चिरंजीवीत्व प्राप्त होते.
 
rss 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीरामाला देवत्व प्रदान करण्यात धन्यता मानत नाही व तेथेच थांबतही नाही. संघ मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला ’परिलक्षित त्याग, प्रेम, न्याय, शौर्य, सद्भाव, निष्पक्षता आणि धर्माच्या शाश्वत मूल्यांचे प्रतीक मानतो. सर्व प्रकारच्या भेदांना, वैमनस्याला समाप्त करून समरसतायुक्त पुरुषार्थी समाजाचे निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले प्रेरणास्थान या स्वरूपात तो श्रीरामाकडे पाहतो. कोणत्याही एका विशिष्ट पक्षाकडे सत्ता जावी, अशी संघाची कामना नाही; पण सत्तेवर येणार्‍या प्रत्येक पक्षाने श्रीरामाच्या या आदर्शांचे पालन केले पाहिजे, ही संघाची केवळ अपेक्षाच नव्हे तर आग्रहदेखील आहे. त्या दृष्टीनेच संघाने आपल्या कार्याला बहुविध आयाम जोडले आहेत.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटला म्हणजे आपल्यासमोर गणवेशधारी स्वयंसेवकांचे घोषाच्या निनादात होणारे संचलन, विविध प्रकारच्या कवायती, शाखाशाखांमधून होणारे खेळ, संघ शिक्षा वर्गांचे आयोजन, संघाचे सहा उत्सव समोर येतात. त्या सर्वांचे आपापल्या स्थानी महत्त्व आहेच; पण संघाला तेथेच थांबायचे नाही. त्याला बंधुभावयुक्त, कर्तव्यनिष्ठ, मूल्याधारित सामाजिक न्यायाची सुनिश्चितता करणारा समाज निर्माण करायचा आहे. संघासाठी ’सामाजिक समरसता’ ही केवळ एक स्ट्रॅटेजी नाही, ती त्याची जीवननिष्ठा आहे व हीच भावना या वेळच्या प्रतिनिधी सभेतील एकमेव ठरावाची विशेषता आहे.
 
 
श्रीराम जन्मभूमीवरील श्रीरामाच्या मूर्तीची भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा हा एक इव्हेंट म्हणून संघ त्याकडे पाहत नाही. विश्वाच्या इतिहासातील एक अलौकिक स्वर्णिम पान म्हणून त्या आयोजनाकडे पाहतो. हिंदू समाजाचा शेकडो वर्षांचा संकल्प, संघर्ष व बलिदान यांचे प्रेरणादायक पर्व म्हणून पाहण्याची संघाची भूमिका आहे व तीच या एकमेव ठरावात नमूद करण्यात आली आहे.
संघाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, जे कुणाच्या सहजासहजी लक्षात येत नाही. खरे तर जगात एकही गोष्ट अशी नाही की, जी कधीच बदलत नाही. उलट बदल हा जगाचा नियम आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला अपवाद नाही. वस्तुस्थिती तर अशी आहे की, 1925 साली संघ जसा होता तसा तो आता राहिलेला नाही. प्रत्येक वेळी संघ बदलत गेला; पण त्याचे मूलभूत उद्दिष्ट मात्र कधीही बदलले नाही.
 
 
पूर्वी संघाच्या विविध स्तरांवरील बैठकांमधून चर्चिले जाणारे विषय म्हणजे शाखाकेंद्रित असत. किती शाखा वाढल्या, त्यात किती स्वयंसेवक येतात, शाखांमध्ये कोणते कार्यक्रम होतात, संघ शिक्षा वर्गात किती स्वयंसेवक येणार आहेत, प्रचारक म्हणून कार्य करण्याची किती लोकांची तयारी झाली, असे ते चर्चेचे विषय होते. त्या वेळी विनोदाने म्हटले जायचे ’आमचा डॉ. हेडगेवारांचा संघ असा नव्हता. आता संघात इतके बदल झाले आहेत की, आमचा गुरुजींचा संघ असा नव्हता’ आणि ते खरेही आहे, कारण संघाने आता शाखाकेंद्रित विचाराचा आणखी विस्तार केला आहे. त्याने आपल्या कार्यपद्धतीला अधिक व्यापक असे समाजकेंद्रित आयाम जोडले आहेत. त्या आयामांची नावेही निश्चित केली आहेत. त्यालाच समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आदी गतिविधींची जोड दिली आहे. आता संघात शाखांची संख्या, कार्यक्रमांचे स्वरूप, त्यांना मिळणारा प्रतिसाद यांची चर्चा तर होतेच; पण त्याबरोबर कोणत्या शाखेने कोणत्या सेवावस्तीची निवड केली? त्या वस्तीत स्वयंसेवक जातात काय, तिथल्या समस्यांचा वेध घेतात काय, त्या वस्तीतील किती मंडळी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होतात, तेथील आरोग्यादी समस्यांवर कोणते उपाय योजले जातात याचीही चर्चा होते. म्हणजे समाज परिवर्तन आणि समाज संघटन हे उद्दिष्ट केंद्रस्थानी ठेवून, त्याला कुठेही धक्का न लावता, संघ नवनवे आयाम जोडत आहे. संघ बदलत गेला आणि आजही ती प्रक्रिया थांबलेली नाही. संघाचे जे काही आहे ते सगळे समाजसमर्पित आहे. म्हणूनच सरसंघचालक म्हणतात की, ’संघ कुछ नही करेगा, जो कुछ करेंगा वह समाज करेगा’. त्या समाजाच्या घडवणुकीसाठी सर्व शक्ती पणाला लावून एक स्थायी, समर्थ, नित्यसिद्ध शक्तीयुक्त व्यवस्था निर्माण करणे हे संघाचे उद्दिष्ट आहे व त्यासाठीच त्याची सतत धडपडही आहे. हा संकेतही संघाच्या प्रतिनिधी सभेच्या नागपूर बैठकीतून मिळाला आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर