लाकडी घाण्याचा - ‘तृप्ती फार्म’ ब्रँड

विवेक मराठी    27-Mar-2024
Total Views |
भास्कर पाटील
9422529923
मलकापूर (जि. बुलढाणा) येथे लघु कृषक व्यापार संघ (SFAC)च्या माध्यमातून व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने 1 एप्रिल 2021 रोजी ज्योत्स्ना प्रशांत तळोले यांच्या अध्यक्षतेखाली मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.ची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून परिसरातील 750 शेतकरी बांधवांना एकत्रित करून कामाला सुरुवात केली. कंपनीने खाद्यतेलात भरीव असे कार्य केले आहे. तेलनिर्मितीला सुरुवात करण्यापूर्वी कंपनीच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताईंचे पती प्रशांत तळोले यांनी लातूर येथे पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून ज्योत्स्नाताईंनी उद्योगाची इत्थंभूत माहिती मिळवली. मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून लाकडी घाण्यावर, तसेच कोल्ड प्रेस मशीनद्वारे तेलनिर्मितीला सुरुवात केली.
 
malkapur
 
उद्योग उभारणीसाठी कंपनीला लघु कृषक व्यापार संघाकडून सुमारे 15 लाख रुपये, तर पोकरा योजनेतून 11.49 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. केंद्र सरकारच्या नॅब किसान योजनेच्या माध्यमातून 40 लाख रुपयांचे कर्ज मिळाले आहे. याद्वारे पुणे, लातूर येथून खाद्यतेल निर्मिती तंत्रज्ञानाची खरेदी व इतर कार्य हाती घेेऊन दिशादर्शक कार्य उभे केले आहे.
 
 
नैसर्गिक तेलाची निर्मिती
 
खाद्यतेल प्रक्रिया उद्योगासाठी लागणार्‍या तीळ, मोहरी, भुईमूग शेंगा, सूर्यफूल, करडई या कच्च्या मालाची खरेदी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून केली जाते. उत्पादनाचा दर्जा टिकून कसा राहील याची कंपनीने काळजी घेतली आहे. या ठिकाणी तयार होणार्‍या तेलांसह विविध पदार्थांमध्ये कुठलीही भेसळ व रासायनिक घटकाचा वापर केला जात नाही. या तेलांना नैसर्गिक रंग असतो. शुद्धता, स्वच्छता, पारदर्शकता, गुणवत्ता या चार बाबींवर विशेषत्वाने भर दिला जातो. वर्षाकाठी सुमारे 3 हजार लीटर खाद्यतेलाची निर्मिती करून विक्री केली जाते.
 
 
संपर्क
malkapur 
ज्योत्स्ना प्रशांत तळोले - अध्यक्षा
मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी,
ता. मलकापूर, जि. बुलढाणा.
संपर्क क्रमांक - 9960783901
 
 
 
’तृप्ती फार्म’ हा ब्रँड विकसित
 
प्रारंभीचे काही महिने बाजारपेठ विकसित करण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागले. मात्र गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे हळूहळू ग्राहकांकडून विविध प्रकारच्या तेलांना मागणी वाढू लागली. गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर देण्यासाठी व ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचवण्यासाठी कंपनीने लाकडी घाण्याचा ’तृप्ती फार्म’ हा ब्रँड विकसित केला आहे. याअंतर्गत उत्पादित तेलांचा अधिक प्रचार होण्यासाठी कंपनीने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्नही सुरू ठेवले आहे.
 
malkapur 
 
वर्षाकाठी एक कोटीची उलाढाल
 
 
सध्या कंपनीच्या खाद्यतेलास ग्राहकवर्गाकडून मोठी मागणी आहे.केंद्र शासनाच्या ’लघु कृषक व्यापार’ संचच्या ’जछऊउ चू डीेींश’च्या माध्यमातून इतर राज्यांतूनसुद्धा तेलाची मागणी येऊ लागली आहे. या वर्षी बुलढाणा कृषी विभाग, ’लेवा चेंबर ऑफ कॉमर्स’च्या माध्यमातून आयोजित प्रदर्शनात कंपनीने सहभाग नोंदवला होता. यातून लाकडी घाण्याचा तृप्ती फार्म ब्रँड ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाली. यातून 2023-24 या वर्षात कंपनीची सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
 
 
रोजगारनिर्मितीला चालना
 
स्वत: उद्योग करून जास्तीत जास्त महिलांना रोजगार द्यायचा असे कंपनीने ठरवले. त्यानुसार तेलनिर्मिती उद्योगाच्या माध्यमातून कंपनीने वर्षभर एका कामगाराला आणि चार महिलांना रोजगार दिला आहे.
 
 
कुटुंबीयांची भक्कम साथ
 
 
अध्यक्षा ज्योत्स्नाताई तेल विक्री व्यवस्थापन सांभाळतात. विक्री केंद्रात मालाची उपलब्धता, तयार तेलांचे पॅकिंग, त्यावर लेबलिंग, स्वच्छता अशी विविध कामे त्या करतात. या प्रक्रिया उद्योगामध्ये पती प्रशांत, दीर रवींद्र तळोले व सासू-सासरे यांची चांगली साथ मिळाली आहे.
 
शेतकर्‍यांना थेट बांधावर मार्गदर्शन
 
 
टाटा केमिकल्सअंतर्गत कंपनी ’सी-सेफ’ हा डाळवर्गीय पीक प्रकल्प राबवीत येत आहे. यामध्ये तूर, हरभरा, उडीद, मूग इत्यादी पिकांसाठी शेतकर्‍यांना शास्त्रोक्त पद्धतीने थेट बांधावर मार्गदर्शन लाभत आहे. या प्रकल्पात कंपनीच्या सल्लागारांमार्फत शेतकरी बंधूंना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी व पीक सल्ला देण्यात येत आहे.
 
 
येत्या काळात कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी माती परीक्षण प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत माती परीक्षण व बीजोत्पादन प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा मानस आहे.