नदी नव्हे ही निसर्ग-नीती

विवेक मराठी    27-Mar-2024   
Total Views |
कृष्णा नदी ही विष्णूचा अंश मानली जाते. कृष्णेची भक्ती करणारे लोक तिला कृष्णा नव्हे ‘गंगा’ असे संबोधतात. पूर्वी सांगली संस्थानकाळात कृष्णामाईचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. मात्र काळाच्या ओघात तो बंद पडला होता. गेल्या काही वर्षांपासून माईघाटावर ‘कृष्णामाई महोत्सव’ सुरू झाला आहे. ‘नदी नव्हे ही निसर्ग-नीती, आत्मगतीने सदा वाहती...’ या ओळींना स्मरून तिची आत्मगती राखण्यासाठी आता नदीच्या उत्सवात निसर्ग-नीतीही जपली जाते आहे, हा बदल कालसुसंगत व आश्वासक आहे.
krishna river
 
कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज्य देवता, पाषाणाची घडवून मूर्ती, पूजित कुणी राही, संथ वाहते कृष्णामाई’ असं सुंदर गाणं कृष्णामाईकरिता गदिमांनी लिहिलं. भारतातल्या महत्त्वाच्या पवित्र नद्यांपैकी एक आणि लांबीने भारतातली तिसर्‍या क्रमांकाची असलेली कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावते आणि जवळजवळ चौदाशे किमी अंतर चालून समुद्राला मिळते. यातला 282 किमीचा प्रवास महाराष्ट्रातून होतो आणि त्यापैकी 130 किमी सांगली जिल्ह्यातून.
 
कृष्णेचे काठ मुळातच अतिशय सुंदर आणि समृद्ध आहेत. सांगली जिल्ह्यात भिलवडी, सांगली, हरिपूर, मिरज आणि शेजारीच; पण कोल्हापूर जिल्ह्यात येणारं कुरुंदवाड, या गावांत कृष्णा नदीच्या तीरांवर लहान-मोठे, पण देखणे दगडी घाट आहेत. सुघट असे घाट, त्यावरची मंदिरे आणि नदीच्या पाण्यात पोहणारी तिची लेकरं यामुळे कृष्णा अधिक देखणी दिसते. वाळवा तालुक्यात असलेले बहे रामलिंग इथे कृष्णेच्या पात्रात असलेल्या बेटावर श्रीरामांनी स्थापन केलेले शिवलिंग आणि समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. दत्तांचे क्षेत्र असलेल्या औदुंबर या ठिकाणचा कृष्णातीर धार्मिक कार्यांसोबत इथल्या साहित्य संमेलनामुळे सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध आहे.
 
krishna river 
 
बहुतेक घाटांवर कृष्णामाईची मंदिरे आहेत. तिच्या निरनिराळ्या रूपांतल्या प्रतिमा लहानशा देवळात बसवलेल्या आहेत. कृष्णा नदी ही विष्णूचा अंश मानली जाते. समर्थांनी कृष्णेच्या आरतीत ‘श्रीकृष्णे अवतार जळवेश धारी, जलमय देहे निर्मळ साक्षात हरी’ असं म्हटलं आहे. त्यामुळे कृष्णामाईच्या चतुर्भुज मूर्तीच्या हातात विष्णूची आयुधे आहेत. शंख, गदा, पद्म ही बहुतेक ठिकाणी आहेत, तर चवथा हात वरदहस्त किंवा काही ठिकाणी हातात अन्नपूर्णेसारखं पात्र किंवा फळ आहे.
 
 
मिरज संस्थानपासून वेगळे होऊन जेव्हा सांगली संस्थान स्थापन झाले तेव्हा पटवर्धन सरकारांनी प्रथम त्यांच्या आराध्य दैवताच्या म्हणजे श्रीगणेशाच्या मंदिराची रचना केली. साधारण त्याच वेळी सांगलीच्या ‘सरकारी’ घाटावर असलेले कृष्णामाईचे मंदिर उभे राहिले असावे. काळ्या दगडातले नेटके मंदिर व आत काळ्या पाषाणातली कृष्णामाईची अतिशय सुंदर रेखीव मूर्ती आहे.
 
 
संस्थानकाळात धरणे नसल्यामुळे पावसाळ्यात कृष्णेला वारंवार पूर येत असत. पहिल्यांदा नदी पात्राबाहेर आली, की स्वतः राजेसाहेब व राणीसाहेब मंदिरात येत व कृष्णामाईची ओटी भरत. नवीन लग्न झालेले दांपत्य किंवा नवे जन्मलेले मूल यांना जेव्हा प्रथम देवदर्शनाला नेले जाते तेव्हा गणपती, मारुती, ग्रामदेवी केंगणेश्वरीसोबत कृष्णामाई मंदिरात दर्शनाला येण्याची प्रथा आजही आहे. संस्थानकाळात याच ठिकाणी कृष्णामाईचा उत्सव होत असे. या मंदिरासमोर मोठे ओत (मोठा खड्डा) आहे. पूर आला की प्रथम ते ओत भरते व अजून पाणी वाढले तरच ते इतरत्र पसरते.
 
 
संस्थानकाळात कृष्णामाईचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. उत्सवावेळी या ओतात जनावरांचा मोठा बाजार भरत असे. पशूंचे प्रदर्शन, शर्यतीही होत. आता उत्सव होत नाही. जनावरांचा बाजार तुरळक प्रमाणात असतो. गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेने गणपती देवळाच्या मागे असलेल्या माईघाटावर ‘कृष्णामाई महोत्सव’ सुरू केला आहे. मात्र त्याचे स्वरूप आधुनिक आहे. विक्री, मनोरंजन, खाद्यजत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते.
 
 
सांगली जिल्ह्यातून वाहताना वारणा, येरळा, मान, अग्रणी आणि बोर या उपनद्या आणि अनेक छोटेमोठे प्रवाह कृष्णेच्या जलसाठ्यात भर घालतात. हरिपूरला कृष्णा व वारणा यांचा संगम आहे. या संगमावरच्या घाटावर कृष्णामाईचे लहानसे मंदिर आहे. माघ पौर्णिमेपासून तिथे कृष्णामाईचा उत्सव चालतो. पूर्वी हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत असे, असे गावातली जुनी मंडळी सांगतात. सात दिवस भजनकीर्तन रंगत असे. प्रत्येक घरातून कृष्णामाईची ओटी भरली जायची, नैवेद्य यायचा.
 प्रसादाला पुरणपोळीचा बेत असायचा. त्या वेळी गावातल्या घराघरांतून बायका आपले पोळपाट-लाटणे घेऊन पोळ्या लाटायला बसत. लोकवर्गणीतून सारे कार्यक्रम व प्रसाद व्हायचा. नंतर हळूहळू पुढाकार घेऊन करणारी मंडळी कमी झाली व उत्साह मंदावत गेला. मात्र आताही माघ पौर्णिमेनंतर एक आठवडा सकाळ- संध्याकाळ पूजा, आरती, भजन, कीर्तन, स्तोत्रपठण सुरू असते. पूर आल्यानंतर तिची ओटी भरायची पद्धत सर्वच ठिकाणी आहे. आजही पावसाळ्यात पहिला पूर आला, की गावातल्या अनेक महिला नदीची ओटी भरतात. पुरावेळी मंदिर पाण्यात जाते. कृष्णामाई स्वतःच जणू पात्रातून मंदिरात आणि कधी अगदी दारातच येते तेव्हा त्या पाण्याचीच ओटी भरली जाते.
 
 
krishna river
 
मिरज संस्थानात होत असलेला उत्सवही काळाच्या ओघात बंद पडला होता. मात्र पटवर्धन सरकार यांच्या सहकार्याने मिरजेतील उत्साही कार्यकर्ते ओंकार शुक्ला यांच्या पुढाकाराने गेल्या पाच वर्षांपासून उत्सव पुन्हा होऊ लागला आहे. पहिल्या वर्षी एक दिवसाचा उत्सव, मग मिरवणूक, आता तर संस्थानच्या चांदीच्या पालखीतून कृष्णामाईची मिरवणूक काढून मग उत्सव साजरा होतो. हळूहळू लोकांचा प्रतिसाद व सहभाग वाढत असल्याने सांस्कृतिक कार्यक्रमही होत आहेत. शिवाय शुक्ला यांनी हिंदीत श्री कृष्णामाईची आरती रचली व गंगा आरतीप्रमाणे घाटावर आरती सुरू केली. अनेक दाम्पत्ये बोलावून सर्वांच्या हातात आरतीचे तबक देऊन केल्या जाणार्‍या सामूहिक आरतीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हळूहळू नदीचे माहात्म्य व सोबत पर्यावरण जागरूकता या दोन्ही दृष्टिकोनांतून उत्सव अधिक प्रभावी करण्याचा ‘कृष्णवेणी मंडळा’चा संकल्प आहे.
 
 
तेथून जवळच असलेले नृसिंहवाडी हे प्रशासकीयदृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्यात असले तरी सांगलीलाच अधिक जवळ आहे. वाडी हे श्रीदत्तगुरूंचे जागृत स्थान असल्याने विविध उत्सवांची रेलचेल असतेच; पण कृष्णा नदीचे माहात्म्य श्री गुरुचरित्रातही असल्यामुळे येथे कृष्णामाई उत्सवाचे महत्त्वही खूप आहे. टेंबेस्वामींनी रचलेल्या ‘कृष्णालहरी’ स्तोत्रानुसार वाडी हे कृष्णेचे हृदयस्थान आहे. स्वामींना कृष्णामाईचे दर्शन त्रिपुर सुंदरी रूपात झाले होते, त्यामुळे तेथील मूर्तीही तशीच देखणी आहे. उत्सवाचे मानकरी असलेले कागलकर यांच्या घरातून कृष्णामाईची सालंकृत मूर्ती पालखीतून सर्व सरंजामासह वाजतगाजत मंदिरात आणली जाते. वाटेवर भरगच्च रांगोळ्या काढल्या जातात. मग तिची प्राणप्रतिष्ठा होऊन पूजाअर्चा, अनुष्ठाने, होम, धार्मिक ग्रंथांची पारायणे आणि गायन, वादन, नृत्य असे विविध कार्यक्रम होतात. जनांच्या कल्याणासाठी जीवनदायिनी कृष्णेला लोक मनोभावे भजतात. वाडीला कृष्णा व पंचगंगा यांचा संगम असल्याने पावसाळ्यात हमखास येणार्‍या पुरावेळी मंदिर परिसरात उत्तरेकडून पाणी शिरते व ते दक्षिण बाजूने बाहेर येते. येताना ते श्रीपादुकांच्या वरून वाहत येत असल्याने त्या वेळी कृष्णेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. शेजारी कुरुंदवाडला असलेला घाटदेखील अतिशय भव्य, प्रशस्त व देखणा आहे.
 
 
कृष्णेचे ऐतिहासिक महत्त्वही खूप आहे. छत्रपती शिवरायांचे स्वराज्यकारण आणि समर्थांचे राजकारण तसेच समाजकारण याची ती प्रमुख साक्षीदार आहे. ज्या काळात आक्रमणांच्या भीतीने मूर्त्या पाण्यात फेकल्या जात, त्या काळात समर्थ व शिवाजी महाराजांच्या आधारामुळे लोक पुन्हा उघडपणे धर्मकार्ये करू लागले. याच काळात कृष्णेच्या घाटांवर मोठ्या प्रमाणात कृष्णामाईच्या मंदिरांची स्थापना झाली. ‘कृष्णातीरी धर्मकार्य कर’ या समर्थांना मिळालेल्या आदेशानंतर त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र कृष्णा तीरावरच राहिले. चाफळच्या राम मंदिराची मूर्ती, अकरा मारुती स्थापनेची प्रेरणा त्यांना कृष्णामाईनेच दिली. त्यामुळे अफझलखान वधावेळी वाईतल्या लोकांनी कृष्णामाईला साकडे घातले व त्या विजयानंतर हे उत्सव सुरू झाले, हा तर्क पटण्याजोगा आहे. ही मंदिरे त्या अभूतपूर्व परिवर्तनाची साक्षीदार आहेत.
 
 
समर्थांनी स्वराज्य रक्षणासाठी तरुणांची फौज घडवली तीही कृष्णेच्या साहाय्याने. समर्थांनी तरुणांना प्रेरित करून, प्रशिक्षित करून घाटांवर शेकडो तरुणांकडून शेकड्यानी सूर्यनमस्कार घालून घेतले आहेत. ती सूर्यनमस्कारांची परंपरा आजही काही ठिकाणी सुरू आहे. सांगलीतील कृष्णामाई क्लब ही संस्था सुट्टीत मुलांना पोहणे शिकवते. मुलांना पाण्यात उतरवण्याआधी घाटावर मुलांकडून सूर्यनमस्कार घालून घेतले जातात. घाटावरचे नमस्कार, पाण्यात मुक्तपणे पोहणारी मुले, पावसाळ्यात चालणार्‍या नावांच्या शर्यती, धाडसाने पुराच्या पाण्यात उड्या घेणारे तरुण हे खरे नदीचे उत्सव!
 
 
कृष्णेची भक्ती करणारे लोक तिला कृष्णा नव्हे ‘गंगा’ असे संबोधतात, स्वतःला ‘गंगापुत्र’ म्हणवतात. त्यांना नदीची भीती वाटत नाही. नदीत पोहून मोठी झालेली, नावा चालवणारी मुले महापुरातही न भीता लीलया तिच्या पाण्यात उतरून मदतकार्य करतात.
‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ असे सांगत समर्थांनी समाजजीवनाला उत्सवांचे अधिष्ठान दिले. आता या उत्सवांना पर्यावरण चळवळीचे अधिष्ठान लाभावे ही काळाची गरज आहे. ती ओळखून ‘चला जाणू या नदीला’ असे उपक्रम सुरू झालेत. नदीकाठी बांबू लावणे, प्लास्टिक नदीत येऊ न देणे आणि नदीशी जवळीक घडावी याकरिता छोट्या परिक्रमा आयोजित करण्याचे नियोजन कार्यकर्ते करीत आहेत.
 
 
‘नदी नव्हे ही निसर्ग-नीती, आत्मगतीने सदा वाहती...’ या ओळींना स्मरून तिची आत्मगती राखण्यासाठी आता नदीच्या उत्सवात निसर्ग-नीतीही जपली जाते आहे, हा बदल कालसुसंगत व आश्वासक आहे!

विनीता शैलेंद्र तेलंग

विनीता शैलेंद्र तेलंग (D.pharm.Post Dip.in Ayu.Pharm.)

 पुनर्वसु आयुर्वेदीय औषधी निर्माण या नावाने स्वतःचा आयुर्वेदिक औषध निर्मितीचा 1995 पासून व्यवसाय .सुमारे शंभर उत्पादने . बेळंकी व हरीपूर येथे चालणाऱ्या कामातून स्थानिक महिलांना रोजगार .

१९८८ ते ९० अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे औरंगाबाद येथे पूर्ण वेळ काम .

 भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्य. या संस्थेतर्फे तीन अनाथाश्रम, एक अल्पमुदत निवासस्थान, कुटुंब सल्ला केंद्रे इ .उपक्रम चालतात .नुकत्याच सुरु केलेल्या नर्सिंग विभागाची संपूर्ण जबाबदारी . अनेक अन्य सामाजिक कामात सक्रिय.

त्याचबरोबर अनेक संगीत व नुत्यविषयक कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन. काव्य लेखन, विविध अंक संपादन याबरोबर ग्राहक हित, सा.विजयंत, सा. विवेक, विश्वपंढरी, प्रसाद ,छात्रप्रबोधन या अंकात नैमित्तिक लेखन. अनेक स्मरणिकांचे संपादन,  रा.स्व.संघाची पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वय समिती सदस्य .