कृष्णामाई उत्सवसमानतेचा एक आदर्श

विवेक मराठी    27-Mar-2024
Total Views |
मधु नेने
9881208760

 
vivek
वाईच्या वर पश्चिमेला महाबळेश्वरच्या डोंगररांगेतून कृष्णा नदीचा उगम होतो. वाई येथे कृष्णा नदीचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची पद्धत अनेक वर्षे चालू आहे. प्रत्येक आळीची उत्सवमूर्ती स्वतंत्र असते. ती वर्षभर ठरावीक ठेवण्याची परंपरा आहे. या उत्सवांना कार्यकर्ते तयार होण्याची पाठशाळा म्हणतात. इथे सर्व जातींची माणसं एकत्र येतात आणि समानतेचा एक आदर्श जपला जातो.
वाई हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठचे प्रमुख गाव. वाईच्या वर पश्चिमेला महाबळेश्वरच्या डोंगररांगेतून कृष्णा नदीचा उगम होतो. कृष्णेबरोबरच कोयना, वेण्णा ऊर्फ वेणी, सावित्री (हिला सरस्वती असेही म्हणतात) आणि गायत्री या चार अशा एकूण पाच नद्या उगम पावतात. पैकी सावित्री उगमस्थानीच लुप्त होते. गायत्री जवळच एका नदीला मिळते. कृष्णा आणि वेण्णा ऊर्फ वेणी यांचा संगम सातारजवळ माहुली येथे होतो, तर कृष्णा आणि कोयना कराडजवळ मिळतात. कराडपासून ही नदी कृष्णा या नावानेच ओळखली जाते. महाबळेश्वरपासून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या राज्यांतून प्रवास करत ही नदी तेलंगणातील कृष्णा जिल्ह्यात अरबी समुद्राला जाऊन मिळते. उगमापासून समुद्रसंगमापर्यंत कृष्णेचा हा सुमारे तेराशे किलोमीटरचा प्रवास आहे. वाटेत तिला लहान-मोठ्या पन्नासहून अधिक नद्या मिळतात; तरी अखेरपर्यंत कृष्णा हेच नाव कायम राहिले आहे. महाराष्ट्रात एकाच नदीला जास्तीत जास्त नद्या येऊन मिळण्यात गोदावरीपाठोपाठ कृष्णेचाच क्रमांक लागतो. भारतात ज्याप्रमाणे सात नद्या पवित्र म्हणून प्रसिद्ध आहेत तशाच महाराष्ट्रातील पाच नद्या पवित्र म्हणून मानल्या जातात त्यामधील कृष्णा ही एक आहे. आद्य शंकराचार्य यांनी कृष्णा नदीवर स्तोत्र रचली आहेत. इतर नद्यांवर स्नानाने शुद्धी मिळते, तर तुझ्या नुसत्या नामस्मरणाने सर्व पापे नाहीशी होतात.
 

vivek 
कृष्णा नदीच्या उत्पत्तीचा इतिहास सांगणारी एक कथा ’कृष्णामाहात्म्य’ या नावाने स्कंदपुराणात येते. या ’कृष्णामाहात्म्या’त एकूण साठ अध्याय असून महाबळेश्वरपासून समुद्रात मिळेपर्यंतच्या अनेक तीर्थस्थानांच्या कथा सांगितल्या आहेत. त्यात कृष्णा नदीची उत्पत्ती कशी झाली हे सांगणारी एक कथा आहे. त्यानुसार खूप वर्षांपूर्वी महाबळेश्वरच्या रम्य डोंगर परिसरात तत्कालीन ऋषिमुनींनी यज्ञाचे आयोजन केले होते. यज्ञाची तयारी पूर्ण होऊन यज्ञ झाला आणि असुरांनी त्यात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली. कसाबसा तो यज्ञ पार पडला; पण पुढे असुर त्या ठिकाणी यज्ञच होऊ देत नसत. अनेक वेळा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ऋषिमुनींनी त्याबाबत आपली कैफियत श्रीविष्णूंपुढे मांडली. त्यांनी ती ऐकून असुरांशी युद्ध केले. त्यात श्रीविष्णूंनी असुर जमातीचा पराभव करून पूर्ण नायनाट केला. त्यानंतर ऋषिमुनींचे यज्ञ निर्वेधपणे पार पडले; तथापि पुन्हा असुर केव्हाही निर्माण होतील आणि त्रास देतील अशी शक्यता वाटल्याने तसेच आभार मानण्याच्या निमित्ताने सर्व ऋषिमुनी पुन्हा श्रीविष्णूंना भेटले. आभार मानल्यावर त्यांनी आपल्या मनातील शंका श्रीविष्णूंना बोलून दाखवली आणि असुरांचे हे संकट कायमचे दूर करण्यासाठी आपण या भागात कायम वास्तव्य करावे, अशी श्रीविष्णूंना विनंती केली. ती मान्य करताना श्रीविष्णूंनी आपण जलवेशात राहू, असे सांगितले आणि महाबळेश्वरला नदीचा उगम झाला. कृष्णावतार हा विष्णूंचाच असल्याने ही विष्णुरूपिणी नदी कृष्णा या नावाने प्रसिद्ध पावली.
 
कृष्णा नदीच्या काठी लोकसंस्कृती फुलली आणि बहरली. विष्णुरूपिणी असल्यामुळे तिला पावित्र्य प्राप्त झाले. तिच्या काठी अनेक तीर्थक्षेत्रे उभी राहिली. त्यातील महाबळेश्वरपासूनचे सर्वांत जवळचे आणि मोठे तीर्थक्षेत्र म्हणून वाई नावारूपास आली. वाईत अनेक मंदिरे बांधली गेली. वैदिक मंडळींचा रहिवास वाढला. यज्ञयागादी कर्मे वाढली. भारतातील प्रसिद्ध आणि पवित्र मानली गेलेली गंगा ही नदी होय. ती कृष्णेची बहीण मानली जाते. गुरू हा ग्रह दर बारा वर्षे आणि एक महिन्याने कन्या राशीत येतो. तो वर्षभर इथेच वास्तव्यास असतो. या काळाला कन्यागत असे म्हणतात. कन्यागताच्या काळात गंगेच्या काठी केली जात असणारी सर्व धर्मकृत्ये कृष्णाकाठी करण्यास धार्मिक मान्यता आहे, त्यामुळे कृष्णाकाठाला गंगाकाठाचे माहात्म्य प्राप्त झाले आहे. कन्यागतात कृष्णेला गंगा भेटावयास येते. ते ठिकाण वाईत आहे. तिथे त्या काळात पाणी येताना दिसते.
 
vivek
 
वाई येथे कृष्णा नदीचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची पद्धत अनेक वर्षे चालू आहे. नदीला देवी मानून तिची मूर्ती करून तिचा उत्सव करणे ही एक वेगळी परंपरा वाईपासून सुरू झाली असे मानतात. वाई येथे या होत असलेल्या कृष्णाबाई उत्सवाला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या भेटीची पार्श्वभूमी आहे. त्या काळात वाई विजापूरच्या आदिलशाहीत होती आणि अफझलखानाच्या ताब्यात होती. प्रतापगडभेटीच्या वेळी अफजलखानाचा तळ वाईतच होता आणि तो इथूनच प्रतापगडावर गेला होता. त्या वेळी शिवाजीमहाराजांचा विजय झाल्यास कृष्णा नदीचा उत्सव करू, असा नवस वाईतील काही जणांनी केला होता. महाराजांचा विजय झाल्यावर वाईत कृष्णाबाईचे उत्सव सुरू झाले, असे सांगितले जाते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते मात्र ही उत्सवाची परंपरा कन्यागताच्या पूजनातून आली असावी.
वाईत कृष्णाकाठावर सात घाट बांधले असून त्या प्रत्येक घाटावर स्वतंत्रपणे हे उत्सव केले जातात. सध्या माघ शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन शुद्ध द्वादशीपर्यंत सुमारे दीड महिना हे उत्सव होतात. वाईत लोकवस्तीला शाही, आळी किंवा पुरी असे म्हणतात. भीमकुंड आळी, मधली आळी, धर्मपुरी, गणपती आळी, ब्राह्मणशाही, रामडोह आळी आणि गंगापुरी या क्रमानुसार ठरलेल्या तिथ्यांना हे उत्सव होतात. किमान पाच ते कमाल सात दिवस हे उत्सव होतात. तिथीचा लोप वा वृद्धी यामुळे एखादा दिवस कमी वा जास्त होतो. प्रत्येक उत्सव हा त्या-त्या विभागाच्या नावाप्रमाणे विश्वस्त कायद्याखाली नोंद झालेल्या संस्थेमार्फत होतो. प्रत्येक संस्थेचे एक मंडळ असते, त्याला पंचमंडळ आणि अध्यक्षाला सरपंच म्हणतात. यांची रीतसर निवड होते.
उत्सवाआधी किमान तीन आठवडे ते महिनाभर घाटावर मुहूर्तमेढ उभी करून उत्सवाच्या तयारीस प्रारंभ होतो. सर्व मंडप आळीतील स्वयंसेवकच उभारतात. मंडपाचे सामान तसेच महाप्रसादासाठी लागणारी भांडीकुंडी हे प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र आहे. हल्ली मंडप सजावट व्यावसायिकांकडून करून घेतात.
प्रत्येक आळीची उत्सवमूर्ती स्वतंत्र असते. ती वर्षभर ठरावीक ठेवण्याची परंपरा आहे. उत्सवकाळात तिथून आणून उत्सव संपला, की लगेच ती मूळ स्थानी ठेवली जाते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी उत्सवमंडपात उदकशांत केली जाऊन कृष्णाबाईचे तीर्थ असलेल्या कलशाची ज्याला गिंडी म्हणतात, तिची विधिवत पूजा करून सुशोभित सिंहासनावर स्थापना केली जाते. मूर्ती मात्र संध्याकाळपर्यंत परिसरातून पालखीतून मिरवून आणून मग देव्हार्‍यात स्थानापन्न केली जाते. गणपती आळी आणि गंगापुरीत शेवटच्या दिवशी छबिना काढला जातो; तर अन्यत्र पहिल्या दिवशीच पालखी काढली जाते. रोज सकाळी लघुरुद्र, सप्तशती पाठ, पूजा, देवे, मंत्रजागर, सायंआरती आदी धार्मिक कार्यक्रम होतात. प्रत्येक घाटावर एक दिवस सर्वांसाठी महाप्रसाद केला जातो. किमान पाच ते कमाल सात हजार लोक प्रत्येक ठिकाणी महाप्रसाद घेतात. रोज संध्याकाळी भजने, हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. पूर्वी रात्री फक्त कीर्तने होत. हल्ली कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, गायन, वादन, नृत्य असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होते आणि लगोलग संपूर्ण मंडप उतरवून सर्व सामान जागच्या जागी लावले जाते. सकाळी सूर्योदयावेळी घाटावर सुतळीचा एक तुकडाही दिसत नाही, फक्त उत्सव झाल्याची निशाणी म्हणून घाटावर सर्वत्र गुलाल उधळलेला उरतो.
वाईची ही फार मोठी सांस्कृतिक महत्ता आहे. इथे घाटावर स्वयंसेवक तयार होतात, स्वयंपाक करणार्‍या गृहिणी बनतात, आदर्श नेतृत्व तयार होते. म्हणून या उत्सवांना कार्यकर्ते तयार होण्याची पाठशाळा म्हणतात. इथे सर्व जातींची माणसं एकत्र येतात आणि समानतेचा एक आदर्श जपला जातो. पुण्याचे गणेशपंत जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी आपल्या आत्मचरित्रात एक नोंद करून ठेवली आहे, ती उल्लेखनीय आहे : वाईत घाटावर कृष्णाबाई उत्सवात सर्व जातींच्या स्त्रिया एकमेकींना हळदीकुंकू लावतात!
’कृष्णामाहात्म्या’तील एका श्लोकाने या लेखाची सांगता करतो:
कृष्णे कृष्णाङ्गसंभूते जन्तुनां पापनाशिनि॥
महादेवि महाकृष्णे महाभागे नमोऽस्तुते॥