निसर्गसंवर्धनासाठी पितांबरीचे ‘मियावाकी जंगल’!

विवेक मराठी    27-Mar-2024   
Total Views |
 निसर्गसंवर्धनाची संकल्पना काळाच्या ओघात मागे पडत चालली आहे. याकरिता ‘देवराई’च्या माध्यमातून पितांबरीने निसर्गसंवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘पितांबरी अ‍ॅग्रीकेअर डिव्हिजन’ने रत्नागिरी जिल्ह्यातील तळवडे येथे अद्ययावत पद्धतीचा अवलंब करत सुमारे 25 एकरावर तुल्डा जातीच्या बांबूचे बेट व दापोली येथे मियावाकी (मानवनिर्मित उद्यान) विकसित करून ‘देवराई’ निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त (11 मार्च) घेतलेला हा वेध.
 
Miyawaki Forest
सध्याच्या हवामान बदलाच्या काळात जीवविविधता संवर्धनाला खूप महत्त्व आले आहे. किमान 33 टक्के भूभाग जंगलाखाली असणे आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्रात केवळ 16.91 टक्के क्षेत्रावर जंगल आहे, ही चिंतेची एक बाब आहे, असो. आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कामानिमित्ताने माझा ईशान्य भारतात प्रवास झाला होता. आसामच्या घनदाट जंगलात फिरताना तेथील हिरवाईने नटलेल्या ’तुल्डा बांबू’च्या प्रेमात पडलो. जन्मभूमीत परतल्यानंतर जल, जमीन आणि जंगल हे जीवविविधतेचे महत्त्वाचे तीन घटक आहेत, यांचे महत्त्व लक्षात घेऊन ’जंगल’ संवर्धनासाठी आधुनिक पद्धतीची ’देवराई’ (मानवनिर्मित उद्यान) विकसित करण्याचा संकल्प केला. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. आजच्या पिढीला देवराई ही संकल्पना माहीत नाही. विशेषत: वृक्षतोडीमुळे देवराया नष्ट होत आहेत. त्यामुळे आम्ही वनसंपदेतून शाश्वत उत्पन्न देणार्‍या नव्या देवराई संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आणि काही प्रमाणात यशस्वी करून दाखवली.
 
 
 
तळवडे येथे सुमारे 25 एकरावर ’तुल्डा बांबू’चे बेट, तर दापोलीत पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझम येथे ‘आयुर्तेज उद्यान’ विकसित करून ’मियावाकी जंगल’ अर्थात ’देवराई ’साकारली आहे. ही संकल्पना साकारताना प्रथम आम्ही पितांबरी देवराईचा आराखडा तयार केला. झाडांचा प्रकार, त्याची पुढील काळात वाढणारी उंची, त्याच्या वाढीचा वेग म्हणजेच जास्त वाढणारी झाडे, मध्यभागी व कमी उंचीची झाडे बाहेरील बाजूस, उपयोगी फळझाडे, सीमारेषेलगत झाडे जेणेकरून काढणीस सोयीस्कर होईल अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करून आराखडा तयार केला. 10 गुंठे क्षेत्रामध्ये 100 फूट ु 100 फूट सपाट क्षेत्र निवडले. त्यामध्ये फळझाडे, फुलझाडे, आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाची झाडे, जंगली झाडे, वेलवर्गीय झाडे, झुडुपे अशी जीवविविधता असलेली झाडे लागवडीसाठी घेतली. दोन रोपांमधील अंतर 1.5 फूट by 1.5 फूट या अंतरावर लागवड केली. यासाठी 1.5 by 1.5 खड्डा करून पितांबरी गोमय सेंद्रिय खत टाकले.
Miyawaki Forest 
 
पितांबरी देवराईचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रादेशिक जीवविविधता लक्षात घेऊन त्या हवामानास अनुकूल अशाच वृक्षांची लागवड केली. यामध्ये वृक्षांचे विविध प्रकार - म्हणजेच मोठे वृक्ष, वेली, झुडूपवर्गीय, गवतवर्गीय व हर्ब्स यांचा योग्य समतोल राखण्यात आला आहे. याशिवाय फळवर्गीय प्रकारात वन्यझाडे, औषधी झाडे अशा विविध आवश्यक झाडांचाही समावेश करण्यात आला आहे. सघन म्हणजेच हाय डेन्सिटी पद्धतीने विशिष्ट रचनात्मक पद्धतीने या झाडांची लागवड केली आहे. सूर्यप्रकाशासाठी व अन्नद्रव्यांसाठी एकमेकांमध्ये (वाढीसाठी अडथळा निर्माण न करता) स्पर्धा करतात व परिणामी इतर झाडांच्या तुलनेत या झाडांची वाढ अतिजलद होण्यास मदत मिळाली.
 
पितांबरीची ’पर्यावरणीय’ संकल्पना
पंच हरितक्षेत्र - गावांच्या सार्वजनिक ठिकाणी (रस्ते, शाळा, ग्रामपंचायत, मंदिरे, जलस्त्रोत) या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण झाडांची लागवड.
 
नक्षत्रवने, पंचमहाभूतवने, राशी उद्यान, मसालाबाग, लाखी (फळ)बाग अशा विविध संकल्पनांवर आधारित झाडे मार्गदर्शनासहित उपलब्ध होतील.
 
 
 
पितांबरी देवराईमध्ये जांभूळ, हरडा, बेहडा, आवळा, टेटू, शिवण, जितसया, खैर, उंडी, सीता अशोक, कदंब, फणस अशा विविध रोपांची लागवड केली आहे. रोपांच्या वाढीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे देवराईची जलद गतीने वाढ झाली आहे. पितांबरीच्या देवराई परिसरात एक प्रकारे ’मायक्रोक्लायमेट’ तयार होऊन या ठिकाणी 10 ते 20 से.पर्यंत तापमान कमी असल्याचे आढळून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे परिसरातल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. याखेरीज झाडाची पाने, काडी-कचरा तेथेच पडून व कुजून गेल्यामुळे जमिनीतील जीवनद्रव्य (ह्यूमस) वाढला आहे. यामुळे मातीच्या जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्मात वाढ झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे या ठिकाणी विविध प्रकारच्या पक्ष्यांचा वावर वाढला आहे. एकूणच जीवसंपदेत वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे.
 
 
येत्या काळात पितांबरीचे वनशास्त्रतज्ज्ञ पराग साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पितांबरी देवराई मॉडेल आणखी आकार घेणार आहे. पर्यावरणप्रेमींना मियावाकी (मानवनिर्मित) उद्यान उभे करायचे असेल, तर अशांसाठी आम्ही दापोलीच्या पितांबरी अ‍ॅग्रो टूरिझमद्वारे तांत्रिक मार्गदर्शन करत असतो. मियावाकी जंगलासाठी लागणारी विविध रोपे पितांबरी नर्सरी फ्रँचाइसींकडून उपलब्ध करून दिली जातील.
 
 
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
 
भ्रमणध्वनी - 9867112414
वेबसाइट - www.pitambari.com

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.