कृषी उद्योगाचा समृद्ध वारसा

विवेक मराठी    27-Mar-2024
Total Views |
@राजेश महाजन 9422562008
 
 
malkapur
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील प्रसिद्ध उद्योजक व स्वातंत्र्यसैनिक विष्णू सावजी यांनी 1902 साली जिनिंग फॅक्टरी सुरू केली. हा बुलढाणा जिल्ह्यातला पहिला कापूस उद्योग मानला जातो. तब्बल सव्वाशे वर्षांची वस्त्रोद्योगाची (जिनिंग मिलची) परंपरा लाभलेल्या या सावजी (महाजन) कुटुंबाने तीन पिढ्या औद्योगिक वारसा जपला आहे, इतकेच नव्हे, तर त्याचा विस्तार करून त्याला अनेक उद्योगांचे आयाम जोडून तो समृद्ध केला आहे.
मलकापूरचा उल्लेख करताना अनेक नावे डोळ्यासमोर येतात. त्यातील माझे पणजोबा विष्णू सावजी हे एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा असो की शेती उद्योग, समाजसेवा, धर्मसंस्था अशा वेगवेगळ्या घटकांशी त्यांचा संबंध आला. विष्णू सावजी हे सदगुरू गजानन महाराजांचे परमभक्त होते. संत दासगणू महाराज रचित ’श्री गजानन विजय’ ग्रंथाच्या 17व्या ग्रंथात सावजी यांचा महाराजांचे पट्टशिष्य म्हणून उल्लेख आढळतो. गजानन महाराज आमच्या घरी चार वेळा येऊन गेले. 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराजांनी शेगाव येथे संजीवनी समाधी घेतली. त्यानंतर झालेल्या संशोधनात असे समजते - महाराजांनी समाधी घेतली, त्या वेळी जी मोजकी मंडळी त्यांच्याजवळ होती, त्यात विष्णू सावजी हे एक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला त्यांनी हातभार लावला. तात्या टोपे, लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे अशा महापुरुषांशी त्यांचा संबंध आला. माझ्या कुटुंबाला, आजोबांना, वडिलांना आणि मला त्यांचे हे संस्कार लाभले, हे आमचे भाग्यच.
 

malkapur 
बुलढाण्यातील पहिल्या उद्योगाची मुहूर्तमेढ
कपाशी हे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मुख्य नगदी पीक होते. (आजही कपाशी, सोयाबीन व मका या पिकांचे उत्पादन घेतले जात आहे.) कपाशीच्या गाठींना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी होती आणि शेतकर्‍यांना मिळणारा दरही चांगला होता. पण जिल्ह्यात कपाशीवर प्रक्रिया करणार्‍या जिनिंग प्रेसिंगचा मोठा अभाव होता. उच्च उत्पादन घेेऊन शेतकर्‍यांना जिनिंग मिल्सअभावी योग्य दर मिळत नव्हता. जिनिंग मिल्स उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री भारतात उपलब्ध नव्हती. त्यामुळे हा उद्योग उभा करणे ही सोपी गोष्ट नव्हती आणि तेवढेच उद्योग चालविणेही. एक उद्योग उभा राहिला तर अनेक कुटुंबे उभी राहतात आणि त्यातूनच परिसराच्या विकासाला चालना मिळते, या दूरदृष्टीतूनच माझे पणजोबा, स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती विष्णू महाजन (सावजी) यांनी 1902पूर्वी मलकापूर (पारपेठ भागात) प्रायोगिक तत्त्वावर पाच रेच्चांचा (युनिट्सचा) जिनिंग प्रेसिंग उद्योग सुरू केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 1902 सालीच इंग्लंडहून अद्ययावत यंत्रसामग्री आणून ’बी.पी. सावजी जिनिंग प्रेसिंग’ उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. हा बुलढाणा जिल्ह्यातला पहिला उद्योग मानला जातो. या प्रकल्पाकरिता त्यांनी मोठी विहीर बांधली. या विहिरीने दुष्काळात सतत चार वर्षे 24 तास पाणी पुरविले आहे. शारीरिक विकासाकरिता 1903मध्ये व्यायामशाळेची स्थापना केली. 1912 साली त्यांचा अकाली मृत्यू झाला. परिस्थितीशी झुंजत पणजी यमुनाबाई यांनी जिनिंग मिल्स उद्योग सांभाळला. आपल्या कर्तबगारीने तिने स्त्री शक्तीचे दर्शन घडविले.
 

malkapur 
कृषी उद्योगास चालना
 
माझे पणजोबा स्व. गोविंद सावजी यांनी जिनिंग प्रेसिंगचा उद्योग वाढविला. त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने मलकापुरात ’विष्णू ऑइल मिल’ सुरू केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आलेला कुळकायदा, सिलिंग कायदा यामुळे आमची हजारो एकर जमीन गेली. त्यामुळे उद्योग कोसळला. कापूस खरेदी बंद करण्याची वेळ आली. पण मोठ्या धैर्याने उद्योग चालविला. शेतकर्‍यांचे समाधान वाटून घेतले. याशिवाय त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. ग्वाल्हेर संस्थानामध्ये आमच्या कुटुंबाची 500 एकर जमीन होती. ही जमीन ट्रॅक्टरच्या मदतीने लागवडीखाली आणली. शेतीत आधुनिकता आणत या ठिकाणी ’मॉडेल पॉवर फार्मिंग’ नावाची संस्था उभी केली. या माध्यमातून कृषी प्रदर्शन, मेळावा भरविला. कृषी प्रदर्शनातील बैलजोड्या हा एक कुतूहलाचा विषय असायचा. आजोबांच्या निधनानंतर माझे वडील दत्ताभाऊ यांनी जिनिंग मिलची व शेतीची जबाबदारी सांभाळली. मलकापूर गाव व परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होऊ नये, यासाठी माझ्या वडिलांनी ’गौरीशंकर सेवा समिती’ची स्थापना करून तीन एकर जमीन दान केली. संस्थेद्वारे स्व. मधुभाऊ सावजी मेमोरियल इंग्लिश स्कूलमधून आज नर्सरी ते मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दिले जात आहे. हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे, पुढेही मिळत राहणार आहे.
 

malkapur 
प.पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा दत्ताभाऊंना आशीर्वाद
 
उद्योगावरील परिणाम व विकास
 
1971 साली महाराष्ट्र शासनाने ’कापूस एकाधिकार योजना’ लागू केली. त्यामुळे व्यापार्‍याने कापूस खरेदी न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा परप्रांतात मोठ्या प्रमाणात कापूस जाऊ लागला. परिणामी, महाराष्ट्रासह आमच्या जिनिंग उद्योगास ओहोटी लागली. यानंतर 1974 साली शासनाने व्यापार्‍यांना कापूस फेडरेशनबरोबर खरेदीची परवानगी दिली. 1975मध्ये शासनाने पुन्हा व्यापारी खरेदीवर बंदी आणली. तेव्हा जिनिंग प्रेसिंग व्यवसायाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यामुळे पर्यायाने आम्हाला जिनिंग प्रेसिंगव्यतिरिक्त शेतीपूरक उद्योगाची कास धरावी लागली. मलकापूरमधील इतर जिनिंग मिल व्यावसायिकांची हीच अवस्था आहे.
मलकापूर परिसराला सुपीक जमिनीचा वारसा लाभला आहे. इथल्या काळ्याभोर मातीतून आता मका पिकाचे उत्पादन निघत आहे. शिवाय योग्य बाजारभाव मिळत असल्यामुळे मलकापूरचे नाव राज्यभर होत आहे. मका पिकावर प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास मलकापूरच्या शेतीविश्वाला निश्चितच दिशा मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तालुक्यात होऊ घातलेला जिगाव जलप्रकल्प मार्गी लागल्यास इथली भूमी सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही.
 
 
लेखक मलकापूर येथील बी.पी. सावजी जिनिंग प्रेसिंग मिलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.