मलकापूरचे कृषी विश्व

विवेक मराठी    27-Mar-2024
Total Views |
@ललित सूर्यवंशी 7588096343
 
मलकापूर तालुका हा समृद्ध आणि अत्यंत सुपीक काळ्या मातीचा आहे. कापूस, सोयाबीन, मका या पिकांत अग्रेसर तालुका म्हणून मलकापूरची ओळख आहे. शिवाय डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत तालुक्याला 10 शेतकरी गटाचा 50 हेक्टर प्रतिगटप्रमाणे उद्दिष्ट असून गटनिर्मिती पूर्तता झाली आहे. येत्या काळात या तालुक्यात सोयाबीन, मका व कापसावर उद्योग उभा राहिला, तर शेतकर्‍यांची आणखीन उन्नती होण्यास वाव आहे.

malkapur
 
बुलढाणा हा विदर्भातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत. तापी व गोदावरी नद्यांच्या खोर्‍यात हा जिल्हा वसलेला आहे. शिवाय काटेपूर्णा, नळगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, बाणगंगा (वान), कोराडी, धामणी इ. अन्य नद्याही आहेत. शेती हाच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराला व तालुक्याला मोठा धार्मिक व ऐतिहिासक वारसा लाभला आहे. विशेषत: कृषी क्षेत्रातील प्रगती देदीप्यमान आहे. इथल्या शेतकर्‍यांना काळ्या कसदार जमिनीची साथ लाभली आहे, म्हणूनच आशिया खंडात हा तालुका कापूस उत्पादनात प्रसिद्ध आहे. कापसाची मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. कापसाबरोबर येथे मोठ्या प्रमाणात तूर, सोयाबीन, मका आणि मिरचीचे पीक घेतले जाते. विशेष म्हणजे मका हे मलकापूरचे मुख्य बलस्थान आहे. युरोप व अरब राष्ट्रातील देशांना मका पुरविण्याचे केंद्र मलकापूर तालुका आहे. मक्याची जास्तीत जास्त निर्यात व्हावी यासाठी रेल्वे विभागाने मलकापूरसाठी विशेष रेल्वेमार्ग तयार केला आहे. तालुक्याचे अर्थकारण कृषी उद्योगाशी निगडित आहे.
 
 
मलकापूरचे कृषी विश्व
 
मलकापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 46782 हेक्टर असून वहीती (लागवड)खालील क्षेत्र 43400 हेक्टर आहे. सरासरी लागवडीलायक क्षेत्र 42134 हेक्टर आहे. मलकापूर तालुक्याची सरासरी पर्जन्यमान 638 मि.मी. आहे. रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र 6168 हेक्टर आहे. या वर्षी मलकापूर तालुक्यात रब्बी हंगामात 12103 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली. रब्बी हंगामात प्रामुख्याने रब्बी ज्वारी (676 हेक्टर), गहू (1929 हेक्टर), रब्बी मका (2786 हेक्टर), हरभरा (6367 हेक्टर) इत्यादी मुख्य पिकांची व इतर पिकांची लागवड झालेली आहे.
 

malkapur 
 
खरीप हंगामामध्ये मलकापूर तालुक्यामध्ये कापूस (19080 हेक्टर), तूर (4888 हेक्टर), मका (8463 हेक्टर), सोयाबीन (8429 हेक्टर) या मुख्य पिकांची व उडीद, मूग, ज्वारी, भाजीपाला या इतर पिकांची लागवड होते.
 
 
मलकापूरचे आयडॉल शेतकरी
 
कृषी विभागामार्फत राबविलेल्या महाडीबीटी (शेतकर्‍यांसाठी विविध योजना ऑनलाइन उपलब्ध करून देणारे पोर्टल) व पोकरा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे काही शेतकरी फळबाग व भाजीपाला लागवडीकडे वळत आहेत.
 
 
malkapur
 
मलकापूर तालुक्यात शेतीत प्रयोगशीलता जपत अधिक उत्पादन काढणारे व इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणा बनलेले अनेक शेतकरी पाहायला मिळतील. नरवेल (ता. मलकापूर) येथील प्रयोगशील शेतकरी प्रमोद ज्ञानदेव वराडे (महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त) यांची सामूहिकरित्या 37 एकर शेती आहे. या शेतकर्‍याने पाच एकरात जैन टिश्यूकल्चर केळीची लागवड केली आहे. यंदा एकरी चार टन उत्पादन मिळविण्यात या शेतकर्‍याला यश आले आहे. शिवाय पाच एकर ऊस लागवडीतून ते एकरी 60 टन उत्पादन घेतात. मका, तूर, कापूस, मिरची आणि सोयाबीनचे किफायतशीर उत्पन्न मिळवत आहेत. हरणखेड गावातील जयंत दिगंबर होले यांची 22 एकर शेती आहे. त्यांनी पोकरा योजनेतून शेततळे घेतले आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून नैसर्गिक पद्धतीने पपईची (वाण 786) 500 झाडे लावली आहेत. यातून वर्षाकाठी 3 लाखाचे उत्पन्न मिळवितात. चार एकरांवर मका पिकाची लागवड करून एकरी 40 क्विंटल उत्पन्न घेतले आहे. कापूस, हरभरा, गहू आदी पिकांचे समाधानकारक उत्पन्न घेतात. याखेरीज वाघोळा गावातील सचिन गजानन गावंडे हे शेतकरी नैसर्गिक शेती करतात. पोकरा योजनेचा लाभ घेऊन त्यांनी तीन एकरामध्ये सीताफळाची बाग फुलविली आहे. मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करून गहू, हरभरा, कापूस, तूर, उडीद, ज्वारीचे पीकदेखील घेतात. मैसवाडीचे सचिन गिरिधर राणे या शेतकर्‍याची सहा एकर शेती आहे. महाडीबीटी योजनेतून त्यांनी 284 लिंबांची लागवड केली आहे. लोणवाडीचे ज्ञानदेव पाटील व वाघूड गावचे अनिल घाटे यांनी आपल्या शेतात प्रयोगशीलता दाखवत प्रेरक कार्य केले आहे.
 
 
सेंद्रिय शेतीला ’आत्मा’चे पाठबळ
मलकापूर तालुक्यात सेंद्रिय शेती अधिकाधिक प्रमाणात व्हावी, यासाठी कृषी विभाग उत्तेजन देत आहे. ‘आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत शेतकर्‍यांना पाठबळ दिले जात आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. 2023-2024साठी दहा गट जैविक शेतीगट विस्तार योजनेतून बनवायचे आहेत. तर 50 हेक्टरचे 7 गट सेंद्रिय/नैसर्गिक शेतीशी जोडण्यात येणार आहेत. सध्या तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र 875 सेंद्रिय शेतीखाली तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके घेतली जाणार आहेत.
 
- जवाहर देशमुख
आत्मा प्रकल्प, मलकापूर तालुका
 
 
तालुक्यातील घिर्णी या गावात ऊस लागवडीचे प्रमाण जास्त आहे. या गावातला ऊस नगावर विकला जातो व इतर राज्यांतील व्यापारी तो गावातूनच कापून नेऊन विक्री करतात. तालुक्यातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या शेततळे योजनेमुळे फळबाग लागवडही वाढलेली आहे. अलीकडे कापूस पिकाला भाव नसल्यामुळे, केळी लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढतो आहे. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून मलकापूर तालुक्यात कापसाचे उच्च उत्पन्न घेणारे बरेच शेतकरी आहेत.
 

malkapur 
 
 
शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती व विकास
 
मलकापूरच्या कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी एफपीओ अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. मका या पिकाचे क्षेत्र मलकापूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने पोल्ट्री फीड म्हणून व बेकरी उद्योगात मका या पिकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. तालुक्यातील दाताळा गावातील अरविंद चौधरी यांनी दाताळा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मक्याचे उत्पादन ते निर्यात असा राजमार्ग तयार केला आहे. सध्या अरब व युरोपीय देशांमध्ये मलकापूरच्या मक्याची निर्यात केली जात आहे. मक्याचे क्लीनिंग व ग्रेंडिग करून मागणीनुसार त्या देशांना पुरवठा केला जातो.
यामध्ये जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी संताजीनगर, मलकापूर (पशुखाद्य, डाळमिल, क्लीनिंग व ग्रेडिंग, संवर्धन), सृष्टी शेतकरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी, बन्सीलालनगर मलकापूर (लाकडी घाणा), मलकापूर तालुका कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी, चंदनगर मलकापूर (लाकडी घाणा), कृषीरंग शेतकरी उत्पादक कंपनी, हरणखेड ता.मलकापूर (भाजीपाला व फळबाग उद्योग), भक्तिराज शेतकरी उत्पादक कंपनी, मलकापूर (शेतमाल खरेदी व विक्री), गो विश्व अ‍ॅग्रो प्रोड्यसूर कंपनी, बेलाड ता. मलकापूर (दूध संकलन व विक्री), कृषी तेज शेतकरी उत्पादक कंपनी, चिखली ता. मलकापूर (बियाणे निर्मिती), महाशक्ती कृषी शेतकरी उत्पादक कंपनी, मलकापूर (दूध संकलन) आदी कंपन्यांनी आदर्श कार्य केले आहे. तालुक्यात कृषिपूरक व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतात. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत तालुक्यातील काही लाभार्थींना त्या योजनेचा लाभही मिळालेला आहे.
 

malkapur 
 
भविष्यवेध
 
येत्या काळात मलकापूर तालुक्याचा कृषी विकास घडवून आणायचा असेल, तर प्रत्येक पिकाची मूल्यसाखळी निर्माण झाली पाहिजे. मूल्यसाखळी निर्माण करण्याकरता कच्च्या मालावर प्रोसेसिंग करण्याकरता शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनांअंतर्गत अनुदान उपलब्ध आहे. या माध्यमातून काही कंपन्या पुढे येत आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास व मूल्यसाखळी योग्यरित्या तयार झाल्यास या कंपन्यांचा विकास होऊन शेतकर्‍याला योग्य मोबदला मिळेल, असे वाटते.
 
 
मलकापूर तालुक्यात तेल प्रक्रिया, मसाले उद्योग किंवा दुग्धपदार्थावर प्रक्रिया करण्याचे उद्योग काही प्रमाणात सुरू आहेत. कच्च्या मालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याचे मूल्यवर्धन (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) होणार नाही व त्याला योग्य भाव मिळणार नाही. त्यामुळे विकसित देशांप्रमाणे कच्च्या मालाचे मूल्यवर्धन त्याच ठिकाणी झाल्यास, कच्चा माल पुरविणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा मोबदला मिळतो. कापूस हे मुख्य पीक असलेल्या या भागात जिनिंग मिलही मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. शेतकर्‍यांनी स्वत:होऊन अथवा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत जिनिंग चालू केले, तर कापसाची मूल्यसाखळी विकसित होईल व त्यामुळे त्या पिकामध्ये शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळेल. सोयाबीन व मका पिकांसाठी पशुखाद्यनिर्मितीचा एखादा प्रकल्प आल्यास त्यापासून शेतकर्‍यांच्या शेतमालास चांगला दर मिळेल.
 
लेखक मलकापूर तालुका कृषी अधिकारी आहेत.