सावरकरायण

विवेक मराठी    29-Mar-2024
Total Views |
@गीता चारुचंद्र उपासनी
चित्रपट हे कलाविष्काराचं एक अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे. चित्रपट माध्यमातून सलग कित्येक वर्षं आपल्या संस्कृतीची, धर्माची, भाषेची विटंबना होत असताना याच माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रप्रेमी, भाषाशुद्धीसाठी आग्रह धरणार्‍या महापुरुषाचा खराखुरा इतिहास लोकांसमोर आणण्याचं शिवधनुष्य रणदीप हुड्डा याने उचललं आणि अतिशय लीलया पेललंदेखील. या तीन तासांत प्रेक्षक ‘सावरकरायण’ जगतात हे नक्की.

Swatantra Veer Savarkar
 
’सावरकर’ चित्रपटावर अनेकांनी भाष्ये आणि टिपणी केली आहे, ती बहुधा, वीर सावरकर ज्यांना प्रिय आहेत अशांनी केली असल्यामुळे ह्या चित्रपटाचं त्यांनी केलेलं भरभरून कौतुक हा त्यांच्या त्या सावरकरप्रीतीचाच परिणाम वाटून जे लोक सावरकरांविषयी उदासीन आहेत किंवा सावरकरांविषयीच्या पूर्वग्रहामुळे ज्यांना त्यांच्याविषयी आकस अन् द्वेष आहे त्यांच्यावर या भाष्याचा फारसा परिणाम होणार नाही.
 
 
मी स्वतः तर सावरकरभक्त म्हणावी इतकी त्यांच्याविषयी पूज्यता बाळगणारी आहे, त्यामुळे मी केलेली या चित्रपटाची समीक्षा याच गटात मोडली जाऊ नये यासाठी मी ती एका वेगळ्या दृष्टिकोनातून करू इच्छिते.
 
 
चित्रपट हे कलाविष्काराचं एक अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक कलांच्या कलात्मक समन्वयातून चित्रपट ही कलाकृती जन्माला येते. आपण सहसा चित्रपट, ह्याच कलेचा आस्वाद घेण्यासाठी पाहात असतो. कलाकाराला त्याची कलाकार म्हणून जी उंची आहे ती गाठण्याआधी त्या कलेचा आत्मा गवसावा लागतो. गायकाला थोर गायक होण्यासाठी किंवा होण्याआधी त्याचा सूर गवसावा लागतो तसा! तो सूर सापडला तर तो गायक त्याच्या मर्यादेत सर्वोत्तम सादरीकरण करू शकतो. अर्थात कलेची त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आणि त्याने त्या कलेचा जीव ओतून केलेला सराव ह्या गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या ठरतात. या निकषांवर या चित्रपटाची लगड घासून पाहिली असता ती सोन्याची असून हिणकस असं तिच्यात काहीच आढळत नाही, असंच म्हणावं लागेल. रणदीप हुड्डा अभिनेता म्हणून पूर्वी किती मोठा होता हे मी त्याचे पूर्वीचे चित्रपट पाहिले नसल्यामुळे थेट सांगू शकत नसले तरी या चित्रपटातला त्याचा सकस अभिनय आणि दिग्दर्शन पाहता त्याला त्याचा सूर गवसला आहे, असं निश्चित म्हणता येईल. सूर गवसताच त्याने स्वतःला झोकून देत घेतलेले परिश्रमही या चित्रपटात ठायी ठायी दिसतात.

Swatantra Veer Savarkar  
 
ज्यांना सावरकर अप्रिय आहेत, पण ज्यांना कलेची मनुष्यसुलभ आवड आहे, ज्यांचं मन रसिकाचं आहे, त्यांनीही हा चित्रपट पाहिला तर त्यातील कला, मानवी भावनांचं त्यात होणारं मनोज्ञ दर्शन त्यांना स्पर्शून जाईल. अगदी गाण्यातले शब्द फारसे आवडीचे नसले किंवा फारसे कळत नसले तरी संगीतरसिक जसा केवळ सुरांनी हेलावून जातो किंवा चित्तात ईश्वरभक्ती नसली तरी संतांच्या काव्यातल्या काव्यगुणांनी काव्यरसिक जसा आनंदून जातो, त्याप्रमाणे!
 
 
अंदमानमधल्या जन्मठेपेच्या कठोर शिक्षेला तोंड देणारे सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर त्या यमयातना केवळ याच चिवट आशेवर सहन करत होते की, आपलं अपूर्ण राहिलेलं कार्य आपला समर्थ कनिष्ठ बंधू पूर्ण करेल; पण वर्षभरातच अचानक अन् अनपेक्षितपणे अंदमानात बंदिवेशातल्या त्या आपल्या भावाला पाहून त्यांच्या मुखावर उमटलेले हताश भाव इतके लक्षणीय आहेत की, ते प्रत्यक्ष पाहिल्यावाचून नुसत्या शब्दांनी कळणार नाहीत. त्यांना पाहून झालेली वीर सावरकरांची घालमेल, वडीलबंधूंना त्यांनी दिलेला धीर चित्त वेधून घेतो. पुढे या दोन बंधूंना एकमेकांशी संपर्क करता यावा म्हणून त्यांचे निरोप आणि चिठ्ठ्या पाठवायला साहाय्य करणार्‍या बंद्याला (कैद्याला), तो हे करत असताना पकडला गेल्यावर झालेली असह्य मारहाण जीवघेणी ठरते. ते पाहून अंगावर काटा येतो.

Swatantra Veer Savarkar  
 
आजचं आपलं स्वातंत्र्य हे किती हुतात्म्यांच्या बलिदानाचं, किती आत्मत्यागी लोकांच्या अतोनात यातनांचं फलित आहे हे पाहून त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेनं मन भरून येतं.
 
बारी हा बंदिपाल सावरकरांनी त्यांच्या आत्मवृत्तात जसा चित्रित केला आहे तशीच त्याची भूमिका इथे साकारली गेली आहे. त्यावरून त्या काळातल्या कनिष्ठ ब्रिटिश अधिकार्‍यांची दंडेली, निर्दयता आणि त्यांचा अत्यंत सामान्य आवाका चांगलाच लक्षात येतो.
 
आपल्या कार्यकाळातच सावरकरांची इतिश्री होईल याविषयी बारी नि:शंक असे आणि तशी ती व्हावी म्हणून प्रयत्नरतही! पण बारीच्या दुर्दैवाने आणि देशाच्या सुदैवाने तसं तर काही झालंच नाही. उलट सावरकर तिथे असतानाच बारी सेवानिवृत्त झाला. त्याच्या समोर सावरकर संपले तर नाहीच, उलट त्याला पुरून उरलेत आणि हे ढळढळीत सत्य त्याला, 'I outlasted you' ’ म्हणून ऐकवणारे सावरकर इथे पाहाताना प्रेक्षक आनंदून जातात.
 

SAWARKAR 
 
सावरकरांच्या पत्नी माई सावरकरांची भूमिकाही अशीच समरसून वठवलेली आहे. त्या वेळी कलेक्टर झालेल्याची पत्नी विनासायास कलेक्टरीण होई; पण क्रांतिकारकाची पत्नी क्रांतिकारिणी होण्यासाठी करावे लागणारे सायास, सोसाव्या लागणार्‍या दु:सह यातना काय होत्या त्या माई सावरकरांच्या भूमिकेतल्या अंकिता लोखंडे हिने तिच्या अभिनयातून यथावत साकारल्या आहेत. सावरकर अंदमानात जाण्यापूर्वी डोंगरी कारागृहात पतीशी झालेली त्यांची भेट आणि त्या वेळी झालेली कालवाकालव प्रत्यक्ष पाहण्यासारखी आहे.
 
 
थोडक्यात काय, तर गेली काही दशकं या कलेच्या माध्यमातून, अभिव्यक्तीच्या नावाखाली आपला इतिहास, धर्म, संस्कृती, भाषा, महापुरुष यांचं विकृतीकरण करणारे, त्यांचा उपहास करणारे, परकीयांचा उदोउदो करणारे चित्रपट भारतीयांच्या माथी मारले गेले. गंध लावणार्‍या, पूजाअर्चा करणार्‍या हिंदू खलनायकाच्या तावडीतून सामान्य प्रजेला सोडवणारा परधर्मीय नायक, ’इच्छा’ हा संस्कृत शब्द वापरल्यावर जीभ चावून ’तमन्ना’ अशी सुधारणा करणारा हिंदू नायक आपण अनेक वर्षं पाहिला.
 

SAWARKAR

  
चित्रपट माध्यमातून सलग इतकी वर्षं आपल्या संस्कृतीची, धर्माची, भाषेची अशी विटंबना होत असताना याच माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रप्रेमी, भाषाशुद्धीसाठी आग्रह धरणार्‍या महापुरुषाचा खराखुरा इतिहास लोकांसमोर आणण्याचं शिवधनुष्य रणदीप हुड्डा याने उचललं आणि अतिशय लीलया पेललंदेखील. अवघ्या तीन तासांत सावरकरांसारख्या शतपैलू हिर्‍याच्या महत्त्वाच्या सगळ्या पैलूंना स्पर्श करणं हे अतिशय अवघड काम आहे आणि यात चित्रपट बहुतांशी यशस्वी झाला आहे. ’अभिनव भारत’ची स्थापना, त्यांनी दिलेला सशस्त्र क्रांतीचा मंत्र, काळ्या पाण्याच्या शिक्षेत अतिशय कष्टप्रद जीवन जगत असतानाही रचलेलं अफाट साहित्य, कैद्यांचं केलेलं शुद्धीकरण, सुटकेनंतर केलेले जात्युच्छेदनाचे प्रयत्न, पतितपावन मंदिराची उभारणी, सहभोजनाचे कार्यक्रम, स्वातंत्र्योत्तर काळातही झालेली त्यांची उपेक्षा, गांधीहत्येनंतर झालेली दुर्दशा, त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकरांची समाजकंटकांनी केलेली हत्या या सगळ्याचे उल्लेख चित्रपटात आहेत.
 
 
चित्रपटाचे नायक जरी सावरकर असले तरीही चित्रपट केवळ त्यांच्यापुरता मर्यादित न राहता चापेकर बंधू, लोकमान्य टिळक, मादाम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा, सुभाषचंद्र बोस अशा इतरही अनेक क्रांतिकारकांचं आपल्याला दर्शन होतं. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन इंग्रजांशी दोन हात करणार्‍या खुदिराम बोस, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, भगतसिंग आदींच्या फाशीच्या वेळी पडद्यावर दिलेल्या त्यांच्या कोवळ्या वयाच्या उल्लेखानं ते प्रसंग अधिकच अंगावर येतात.
 
 
आणि त्या पार्श्वभूमीवर ज्यांनी केवळ विलासी आयुष्य व्यतीत केलं, स्वार्थ जपला, देशाचे तुकडे केले आणि त्यात लाखो हिंदूंना प्राण गमवावे लागले, त्यांनाच हिंदूंनी आपलं नायक केलं, निवडून दिलं आणि सावरकरांसारखा हिरा गारगोटी समजून फेकून दिला याची रुखरुख वाटत राहते.
 
 
दहा-अकरा वर्षांच्या अंदमानातील अत्यंत कष्टमय कारावासातून सावरकरांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि पुढे जातिनिर्मूलनाचं आणि इतरही मोठं कार्य केलं
 
 
ते पाहून ज्युलियस् सीझरचं एक सुंदर निरीक्षण आठवलं. तो म्हणतो,
It is easier to find men who will volunteer to die than to find those who are willing to endure pain with patience.
मृत्यूला स्वेच्छेनं वरणार्‍या लोकांपेक्षाही शांतपणे वेदना सहन करत कार्यरत असणारे लोक फार दुर्मीळ आहेत. सावरकरांनी प्राणांतापर्यंत अंदमानातच खितपत पडायला हवं होतं, असं म्हणणार्‍यांनी हे वाक्य लक्षात घ्यावं.
 
 
शरीर थकलं आणि अंगीकृत कार्य करायला अक्षम झालं तेव्हा अन्नजलत्याग करून ते शरीरही टाकणारे धैर्यशील सावरकर आपल्याला इथेच पाहायला मिळतात.
 
प्राचीन ग्रीसमधील तत्त्ववेत्ती हिपॅशिया म्हणते,
 
He who influences the thought of his times, influences all the times that follow. He has made his impression on eternity.
 
’जो त्याच्या जीवनकालात स्वतःच्या विचारांनी लोकांना प्रभावित करतो, तो नंतरच्या अखंड कालासाठी आपल्या विचारांचा ठसा उमटवून जातो.’
 
हा चित्रपट याच वचनाचं प्रत्यंतर आहे.