बेरोजगार

विवेक मराठी    07-Mar-2024   
Total Views |
@केदार  दिवेकर 
 
vivek 
थंड कुटं भेटंन त्ये बगत डायरेक ष्टेजावर चढली. तिला बगून दाढीणं न बगितल्यागत क्येलं. दाद्याणं तर ‘ही हितं कशापायी आली कडकडायला’ आसा लूक देऊण त्वांड फिरवून घेटलं. सुप्रीणं त्ये पाह्यलं पन थंड कुटं भ्येटन ते पाहन्यासाटी फुडं ग्येली ती थेट देव्याच्या फुड्यात. देव्याणं हासून स्वागत क्येलं आनी आश्शी जालीम इच्यारपुस क्येली की सुप्रीचा घसाच कोर्डा पल्डा. देव्याणं हातात धिल्यालं थंड हातातच र्‍हायलं.. मट्कनी खुर्चीत बसल्याल्या सुप्रीकडं पंखा फिरवाया सांगून देव्या पुन्ना रोजगार मेळाव्याच्या कामाला लागला. 
 
‘धी गावटी चानक्य मल्टीफर्फज ष्टेडीयम’वर शेठच्या नावानं रोजगार म्येळावा भरल्याला. गावोगावचे शिकल्याले बेरोजगार तरून तिकडं आल्याले हुते. त्येंच्या च्यापान्याची यवस्ता करूण देव्या, दाढी आन् दाद्या ष्टेजवं आल्ते. येतायेता दाढीणं देव्याला डोळा मारून इच्यारलं, “‘काय मंग? आलं का आवतान?” देव्याबी हासून बोल्ला, “आलं आलं.. पन मटान बिटान घालत्याल खायाला म्हनून नगं म्हन्लं. पुरनपोळ्या आसत्या तं इच्यार क्येला आस्ता.” देव्यानंबी डोळा मारला. मागनं दाद्या हासला आन् म्हन्ला, “आपल्याकडं चला.. झकास गावरान ब्येत हाय.”
 
 
हिकडं सुप्रीचा बाप लै चरफडला. ही आजकालची पोरं ‘कामाच्या व्यस्ततेमुळं यायाला जमायाचं न्हाई’ आसं डायरेक त्वांडावं सांगत्यात. जेवाया बलवूण सम्दा सैपाक सुप्रीणं क्येलाय आसं सांगूण इंप्रेस करायचं आनी ‘सुप्रीला पयली म्हयला सरपंच करा’ म्हनायचं, आसा ब्येत हुता. पन त्येची ढीनर डिप्लोमसी फ्येल गेल्ती. त्यामुळं म्हत्तारं लै कावल्यालं. कायबी करूण सुप्रीला यांच्यात ढकलायचीच, आसा सुप्रीच्या बापाचा मनसुबा हुता.
 
 
रोजगार म्येळाव्यात तरूनांला रोजगारांच्या काय काय संधी आसत्याल ह्ये आयकायला ष्टेजम्हागं र्‍होयत्या आन् त्येचे भुक्कड दोस्त जमल्याले. ष्टेजवरणं आयकू येनार्‍या संधी आनि सुप्रीच्या बापाणं पयशे कमवायच्या सांगिटलेल्या संधी या कंप्लेट येगळ्या आसल्याणं र्‍होयत्या आन् ग्यांग भंजाळली. लांड्यालबाड्या ण करताबी पयशे भेटत्यात, यावर त्यांचा इस्वासच बसेणा. त्यांला तसं लपून बसल्यालं पाहूण संज्याणं मागून जाऊन त्यांला ‘भॉ’ क्येलं. र्‍होयत्या उचाकलं आन म्हन्लं, “‘मामा, तुमीबी आयका.. लवकरच तुमचंबी धोब्याचं कुत्रं हुनार हाये. कामाला येईन.” संज्या हिरमुसला. र्‍होयत्याणं त्येला पानी आनाय पाटवलं.
 
 
त्ये त्वांड पाडून जात आस्तानी पोरांच्या गर्दीतून जित्या मुच्छडनं त्येला बगिटलं आन् हाळी घाटली, “संजौ.. या हिकडं. मज्जा हाय. लागंल त्यवडा च्या आन् बिस्कूट हैत. माजे 3 कप झाले मगाधरनं. या, च्या घिऊ घोट घोट.. या!” आयजीच्या जिवावं बायजी उदार झाल्याला बगून संज्या कावलाच. पन फुकटचा च्या कोन सोडनार.. म्हनून र्‍होयत्याला तान्हेला ठिऊण संज्या जित्या मुच्छडसोबत च्या घ्यायाला ग्येला. जित्या चौथ्यांदा आल्याला बगून च्या वाडनार्‍या पोरानं ‘च्या दिऊ का हाकलून दिऊ’ आशा आर्थाणं म्हागं पाह्यलं. म्हागं हिशोब करत बसल्याला तावड्याचा इन्या “जितक्या टायमाला येईन तितक्या टायमाला द्येत जा च्या. यांलातरी दुसरं कोन हाय देनारं?” म्हन्ला. च्या देनार्‍या पोरानं त्वांड झाकून आलेल्या जित्याला च्या धिला. जित्या आन् संज्या मांडवीम्हागं जाऊन च्या ढोसाया लागले.
 
 
च्या पिता पिता संज्याला सुप्री मांडवाकडं येतानी दिसली. च्या पटकन संपवूण त्येणं सुप्रीला हाळी घाटली. सुप्री आली तं आपल्याला दुसरा आनि जित्या मुच्छडला पाचवा च्या भेटंन आशी त्येची स्कीम हुती. सुप्री आली, पन “च्या नगं बाई.. उकाड्यानं जीव हैरान जाला माजा. थंड काई आसंन तर पहा!” म्हन्ली. त्यावर जित्या म्हन्ला, “थंड हितं नाये तायडे. त्ये ष्टेजवरच्या पावन्यांला ष्टेजावंर पाटवलंय.”
 
 
जसं सुप्रीला ह्ये समाजलं, तशी सुप्री ताडताड चालंत ष्टेजाजवळ आली. थंड कुटं भेटंन त्ये बगत डायरेक ष्टेजावर चढली. तिला बगून दाढीणं न बगितल्यागत क्येलं. दाद्याणं तर ‘ही हितं कशापायी आली कडकडायला’ आसा लूक देऊण त्वांड फिरवून घेटलं. सुप्रीणं त्ये पाह्यलं पन थंड कुटं भ्येटन ते पाहन्यासाटी फुडं ग्येली ती थेट देव्याच्या फुड्यात. देव्याणं हासून स्वागत क्येलं आनी आश्शी जालीम इच्यारपुस क्येली की सुप्रीचा घसाच कोर्डा पल्डा. देव्याणं हातात धिल्यालं थंड हातातच र्‍हायलं.. मट्कनी खुर्चीत बसल्याल्या सुप्रीकडं पंखा फिरवाया सांगून देव्या पुन्ना रोजगार मेळाव्याच्या कामाला लागला.
 
 
त्येनं सुप्रीला यवडंच इच्यारल्यालं, “इलेक्शनला टाईम हाये सुप्रे.. आत्तापासनं बेरोजगारांच्या मेळाव्यात काय करतीस?”

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.