भाजपाच्या झंझावाती प्रचाराची त्रिसूत्री - वारसा, विकास, वर्धिष्णुता!

विवेक मराठी    08-Mar-2024   
Total Views |

bjp lok sabha election campaign 2024
सलग तिसर्‍यांदा आणि तेही विक्रमी जागा जिंकत सत्तेत येण्याचा निर्धार भाजपाने केला आहे, तर भाजपाला सत्तेवरून पायउतार करण्याचा विरोधकांचा मनोदय आहे. भाजपाच्या प्रचारासमोर विरोधक नेमके कोणते कथानक तयार करणार आणि कोणत्या आश्वासनांच्या आधारावर भाजपाला तोंड देणार, हे पाहणे औत्सुक्याचे. आताचे चित्र भाजपाला अनुकूल आहे असे मानले जाते. वारसा, विकास आणि वर्धिष्णुता या त्रिसूत्रीवर बेतलेल्या झंझावाती प्रचाराने भाजपा निवडणुकांत बाजी मारेलच असेच सर्वत्र वातावरण दिसून येत आहे...
लोकसभेच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होतील. एकीकडे भाजपा सरकारची दहा वर्षांची कामगिरी आणि दुसरीकडे विरोधकांची आश्वासने, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा आणि दुसरीकडे सामायिक चेहर्‍यावर मतैक्य न झालेले विरोधक, एकीकडे भाजपाचा ओसंडता आत्मविश्वास आणि दुसरीकडे विरोधकांचे चाचपडणे असा हा सामना रंगणार आहे. भाजपाने आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. तत्पूर्वी केवळ केरळमध्ये तेथील सत्ताधारी डाव्या आघाडीने त्या राज्यापुरती वीस उमेदवारांची घोषणा केली होती. त्या यादीने ‘इंडिया’ आघाडीतील अंतर्विरोध चव्हाट्यावर आणले. ज्या वायनाड येथून गेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती, तेथून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एकतर्फी आपला उमेदवार घोषित करून टाकला. त्रिपुरा किंवा पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढविणार, पण केरळात मात्र एकमेकांच्या समोर शड्डू ठोकणार असा हा विचित्र विरोधाभास आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी दिल्ली, गुजरात आणि हरियाणा येथे एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. पण पंजाबात मात्र हेच पक्ष परस्परांना आव्हान देतील. अशाने ‘इंडिया’ आघाडीचा किमान समान कार्यक्रम आणि सामायिक नेतृत्व यांचा तिढा कसा सुटणार, हा प्रश्नच आहे. त्यातच आघाडीतील काही घटक पक्षांचे नेते वादग्रस्त विधाने करून आघाडीला आणखीच अडचणीत आणत आहेत. द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी अश्लाघ्य उद्गार काढले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ’तुम्ही तुमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आहे’ अशा त्यांना कानपिचक्या दिल्या. द्रमुकचे अन्य एक नेते ए. राजा यांनी भारत हे राष्ट्र नसून उपखंड आहे असे विधान केले. आगामी निवडणूक विचारधारांचा संघर्ष आहे असा दावा काँग्रेस नेहमी करत असते. पण ‘इंडिया’ आघाडीत सामील पक्षांची नेमकी विचारधारा कोणती? असा प्रश्न उपस्थित होतो.
 
modi
 
भाजपा गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेत आहे. सलग सत्तेत असले की काही धोरणात्मक निर्णयांच्या विरोधात काही समाजघटकांची नाराजी निर्माण होतेच. त्यात अस्वाभाविक काही नाही. मात्र व्यापक समाजमनाचा कल कोणत्या दिशेने आहे, यावर निवडणुकीचा निकाल ठरत असतो. निवडणुकीची व्यूहरचना म्हणूनच दोन स्तरांवर करण्यात येते आणि त्यात यश मिळाले तर विजय पक्का असतो. एक स्तर हा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आणि आनुषंगिक राजकीय डावपेचांचा. पक्ष सत्तेत असला, नेता निवडणूक जिंकून देणारा असला की पक्ष संघटनेत काही वेळा आत्मसंतुष्टता येऊ शकते किंवा अतिरिक्त आत्मविश्वास येऊ शकतो. पण ‘संकल्प जितका भव्य, तितकी मेहनत कठोर’ असा कानमंत्र स्वत: मोदींनीच दिला आहे. तेव्हा भाजपा सर्व ताकद पणाला लावेल, यात शंका नाही. मेहनत जितकी महत्त्वाची, तितकीच निकड असते ती राजकीय डावपेचांची. भाजपाला गेल्या दोन निवडणुकांत स्वबळावर बहुमत मिळाले असले, तरी आता त्याहून मोठा पराक्रम करण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. यात अडचण येते ती गेल्या निवडणुकीत दक्षिण भारतातील राज्यांत भाजपाच्या तुलनेने क्षीण कामगिरीची. गेल्या निवडणुकीत राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांत भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकलेल्या होत्या. तेथे आता त्याहून सरस कामगिरीची अपेक्षा करता येणार नाही. उत्तर प्रदेशात भाजपाने 62 जागा जिंकल्या होत्या. तेथे कितीही कामगिरी सुधारली, तरी त्यास एकूण जागांच्या संख्येची मर्यादा आहे. तेव्हा भाजपाला मित्रपक्षांसह चारशेच्या वर जागा जिंकायच्या, तर जेथे भाजपाला गेल्या निवडणुकीत स्थान नव्हता तेथे स्वत:ची ताकद वाढविणे आणि मित्रपक्ष मिळविणे हा मार्ग होय.
 
 
अनेक जागांवर भाजपाने आपले स्थान पक्के केले आहे. भाजपाच्या या प्राबल्याचा निकष म्हणजे भाजपाच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य. जेव्हा मताधिक्य भव्य असते आणि सलग दोन निवडणुकांत ते कायम राहते, तेव्हा तो त्या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. 2019च्या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांची संख्या 105, तर भाजपाच्या पंधरा विजयी उमेदवारांचे मताधिक्य पाच लाखांहून अधिक होते. तेव्हा जेथे स्थान भक्कम, तेथे ते आणखी भक्कम करणे आणि जेथे पराभव झाला तेथे लक्ष केंद्रित करणे हा भाजपाच्या व्यूहनीतीचा भाग झाला. 2019च्या निवडणुकीत भाजपाने ज्या 133 जागा गमावल्या, त्यापैकी 72 ठिकाणी भाजपा दुसर्‍या स्थानावर होता. या 72पैकी 56 जागा अशा होत्या, जेथे भाजपाला बिगर-काँग्रेस प्रादेशिक पक्षांकडून पराभव पत्करावा लागला. या 72पैकी 22 जागा पश्चिम बंगालमधील, 16 उत्तर प्रदेशातील, तर 11 ओडिशातील होत्या. पश्चिम बंगालमध्ये संदेशाखाली येथील घटनांमुळे तृणमूल काँग्रेसच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर असणारे पंतप्रधान मोदी यांची संदेशाखाली येथील अत्याचारांना बळी पडलेल्या काही महिलांनी भेट घेतली. आरोपी शहाजहान शेख याच्या अटकेबाबत आणि नंतर उच्च न्यायालयाने त्याची कोठडी सीबीआयला देण्याचे निर्देश दिल्यानंतर त्याला हस्तांतरित करण्यात तृणमूल काँग्रेसने चालढकल केली, त्याने भाजपा हा मुद्दा प्रचारात आणेल यात शंका नाही. तेव्हा गेल्या वेळच्या 133 पराभूत जागांपैकी काही जागा पश्चिम बंगालमध्ये वाढू शकतात, असा भाजपाचा होरा असावा. तेच अन्य राज्यांतील जागांना लागू आहे.
 

bjp lok sabha election campaign 2024 
मात्र निवडणूक व्यूहरचनेचा दुसरा स्तर असतो तो कथानक (नॅरेटिव्ह) तयार करण्याचा. पक्षाने गेल्या निवडणुकीत किती जागा जिंकल्या किंवा किती मताधिक्याने जिंकल्या वा गमावल्या या आकडेमोडीत पक्षाला स्वारस्य असले, तरी मतदारांना ते असण्याचे कारण नाही, मात्र कथानक कोणते तयार करायचे हे निश्चित करण्यात पक्षाला तीच आकडेमोड हातभार लावत असते. भाजपाचा सगळा भर आहे तो गेल्या दहा वर्षांच्या कामगिरीवर. निवडणुकांची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नसली, तरी भाजपाने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे, हे नाकारता येणार नाही. गेल्या काही दिवसांत मोदींनी अनेक राज्यांचा दौरा केला आहे आणि लाखो कोटी रुपयांच्या योजनांचे भूमिपूजन केले आहे किंवा त्यांचे लोकार्पण केले आहे. जानेवारी महिनात अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण झाले. 370वे कलम रद्दबातल ठरविण्याचा निर्णय वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. नव्या संसद भवनाचे उद्घाटन, त्याच सभागृहांत महिला आरक्षण विधेयकाला मिळालेली सर्वपक्षीय मान्यता या सर्व बाबी भाजपा प्रचारात प्रकर्षाने मांडेल, यात शंका नाही. मात्र गेल्या काही दिवसांतील मोदी, अमित शहा, भाजपा अध्यक्ष नड्डा यांची भाषणे बारकाईने पाहिली, तर त्यात सूत्र दिसेल आणि भाजपाची प्रचाराची दिशा कोणती, याचा त्यातून उलगडा होईल. विरोधकांना केवळ भाजपाला विरोध करून चालणार नाही, भाजपाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आपला कार्यक्रम कोणता, हे मतदारांना सांगावे लागेल. पण तेवढेच पुरेसे नाही. ती आश्वासने पूर्ण करण्याची विश्वासार्हता आपल्यापाशी आहे, हे मतदारांना पटवून देणे हे विरोधकांसमोरील आव्हान आहे. त्या दृष्टीने मोदी ज्या मुद्द्यांवर भर देत आहेत, ते पाहणे महत्त्वाचे.
 
 
मोदींची आणि भाजपा नेत्यांची अलीकडची भाषणे पाहिली, तर ‘वारसा, विकास आणि वर्धिष्णुता’ अशी भाजपाची प्रचाराची त्रिसूत्री असेल असे दिसते. वारसा हा सांस्कृतिक आहे आणि त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीपासून काशी-तामिळ संगममपर्यंत अनेक विषयांना भाजपा प्रचारात स्थान देईल. त्याउलट विरोधकांच्या दृष्टीने वारसा हा कौटुंबिक वारसा - म्हणजेच घराणेशाही हा आहे हा विरोधाभास भाजपा मांडेल. लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर जी वैयक्तिक टीका केली, त्याने विरोधकांच्या कोत्या मनोवृत्तीचा प्रत्यय आला. त्यांनतर मोदी समर्थकांनी ’आम्ही मोदींचा परिवार’ अशी मोहीम चालविली. मोदींनी गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, तेलंगण, ओडिशा, तामिळनाडू, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल असे दौरे केले आहेत. त्यात त्यांनी अनेकदा घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र तेव्हाच देशाच्या सांस्कृतिक वारशाचा मुद्दाही मांडला आहे. मध्य प्रदेशात उज्जैन येथे मोदींच्या हस्ते विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उद्घाटन झाले, तेव्हा त्यांनी कालचक्राचा उल्लेख केला. त्याउलट विरोधकांचा ‘वारसा’ हा घराणेशाहीचा आहे आणि घराणेशाही लोकशाहीला मारक आहे, अशी त्यांनी टीका केली.
 

bjp lok sabha election campaign 2024 
ओडिशात बोलताना मोदींनी विरोधकांसाठी ’फॅमिली फर्स्ट’ तर आपल्यासाठी ’नेशन फर्स्ट’ असा दावा केला. अमित शहा यांनीही महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असताना पवार आणि ठाकरे कुटुंबीयांच्या घराणेशाहीवर कोरडे ओढले. तेलंगणात बोलताना मोदींनी तीन मुद्दे महत्त्वाचे असल्याचे सूतोवाच केले - भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण. खर्‍या सामाजिक न्यायासाठी तुष्टीकरण नव्हे, तर सर्व घटकांचे संतुष्टीकरण निकडीचे असल्याचे मोदींनी बिहारमध्ये बोलताना म्हटले. सामाजिक न्याय आणि विकास हे संलग्न मुद्दे आहेत. एका बाजूला कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि दुसर्‍या बाजूला विकासाचे प्रकल्प या दोन रुळांवरून भाजपा सरकारने वाटचाल केली असल्याची अनेक उदाहरणे मोदींनी भाषणांमधून दिली आहेत.
 
 
पश्चिम बंगालमध्ये त्यांनी 22 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण किंवा भूमिपूजन केले. त्याबरोबरच अनेक प्रकल्प तृणमूल काँग्रेसच्या असहकार्यामुळे लटकले असल्याचा आरोप केला. एका अर्थाने विकासासाठी ’डबल इंजीन’ या त्यांच्या प्रिय संकल्पनेचा त्यांनी पुनरुच्चार केला. ओडिशात मोदींनी 20 हजार कोटींच्या कामाचे लोकार्पण किंवा शुभारंभ केला आणि विकसित भारताचा मुद्दा मांडला. किंबहुना येत्या निवडणुकीत विकसित भारताच्या विषयावर भाजपाचा भर असेल, याची खात्री वाटावी इतक्यांदा मोदींनी हा विषय छेडला आहे. झारखंडमध्ये मोदींनी विमानतळाचे भूमिपूजन आणि लोकार्पण आपल्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले आणि एका अर्थाने आपण जे वचन देतो ते करून दाखवितो, हा विश्वास अधोरेखित केला. तामिळनाडू, तेलंगण, झारखंड येथे सुरू झालेल्या विविध ऊर्जा प्रकल्पांचा उल्लेख मोदींनी केला. सरकारची कार्यसंस्कृती पूर्वीपेक्षा बदलली आहे आणि ती सुरू केलेले काम पूर्णत्वास नेण्याची आहे, यावर त्यांनी भर दिला. विकासाचा मुद्दा भाजपाच्या प्रचार-भात्यातील हुकमी बाण आहे, असे दिसते. विकासाबरोबरच वंचितांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचविणे यावर सरकारचा भर राहिला आहे, हेही मोदींनी या सर्व ठिकाणी सांगितले. आदिवासी कल्याण मंत्रालयाचे अंदाजपत्रक गेल्या दहा वर्षांत पाच पटींनी वाढविण्यात आले आहे, असे त्यांनी झारखंडमध्ये आवर्जून सांगितले; तर किसान सन्मान योजनेत तीन लाख कोटींचे अनुदान आतापर्यंत अकरा कोटी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले असल्याचा उल्लेख केला. ग्रामीण भागांतील नागरिकांना पाइपमधून पाणी मिळण्याची सुविधा नव्हती; आपल्या सरकारच्या काळात हे प्रमाण 75 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, असा मोदींनी दावा केला. विश्वकर्मा योजना, वनवासींसाठी जनमन योजना, नारीशक्तीसाठी लखपती दीदी योजना, पायाभूत सुविधा ते मोफत रेशनपर्यंत मुद्दे मोदींनी गेल्या काही दिवसांत मांडले. त्यातून प्रचाराच्या त्रिसूत्रीतील वारसा आणि विकास यांचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही.
 
तिसरे सूत्र वर्धिष्णुतेचे. ही वर्धिष्णुता भाजपाची नव्हे, देशाची. भारताची अर्थव्यवस्था जगभरात तिसर्‍या क्रमांकावर नेण्याचा संकल्प मोदींनी व्यक्त केला आहे. जी-20चे अध्यक्षपद, कतारमध्ये अटक झालेल्या माजी नौदल अधिकार्‍यांची सुटका, कॅनडाने केलेल्या आरोपांनंतर भारताची कठोर भूमिका हे भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे लक्षण आहे आणि भारताची प्रतिमा जगभरात वर्धिष्णू राहावी, यासाठी भाजपाचेच सरकार सत्तेत असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मोदींनी केले आहे. तंत्रज्ञानापासून निर्यातीपर्यंत सर्व क्षेत्रांत भारताची घोडदौड सुरू ठेवायची, तर स्थिरबरोबरच निर्णयक्षम सरकार सत्तेत असणे गरजेचे आहे, हा मोदींच्या या सर्व भाषणांचा गाभा. त्यासाठी भाजपाच्या गेल्या दहा वर्षांची कामगिरी आणि पुढील पंचवीस वर्षांची दृष्टी यावर मोदींनी आणि अन्य भाजपा नेत्यांनी गेल्या काही दिवसांत भाषणांमध्ये भर दिला आहे.
 
या वर्षात जगभरात पन्नासेक देशांत निवडणुका होणार आहेत. पण त्यांतील निवडक लक्षवेधी निवडणुकांपैकी एक भारतातील असावी. सलग तिसर्‍यांदा आणि तेही विक्रमी जागा जिंकत सत्तेत येण्याचा निर्धार भाजपाने केला आहे, तर भाजपाला सत्तेवरून पायउतार करण्याचा विरोधकांचा मनोदय आहे. भाजपाच्या प्रचारासमोर विरोधक नेमके कोणते कथनाक तयार करणार आणि कोणत्या आश्वासनांच्या आधारावर भाजपाला तोंड देणार, हे पाहणे औत्सुक्याचे. आताचे चित्र भाजपाला अनुकूल आहे असे मानले जाते. वारसा, विकास आणि वर्धिष्णुता या त्रिसूत्रीवर बेतलेल्या झंझावाती प्रचाराने भाजपा निवडणुकांत बाजी मारेल का, हे समजण्यास आता घोडामैदान फार दूर नाही!

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार