लक्षवेधी शहाणपण, हतबल कुटिलता

विवेक मराठी    01-Apr-2024   
Total Views |

political
महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेने टोपी फिरवली. शरद पवार यांच्या कारस्थानी नेतृत्वाची कास धरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद बळकावले. कोरोनामुळे काही काळ त्यांची चलती झाली. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चतुर राजकारणाचे चक्र असे काही फिरले, की उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनाही अस्मान पाहावे लागले. त्यानंतर मविआसारखी अभद्र युती स्थापन करून आपलेच वाभाडे काढले, तर दुसरीकडे रालोआमधील ‘सब का साथ, सब का विकास’ नारा सर्वांना विश्वास देत आहे.
लोकसभेसाठी निवडणुकीचे रण अखेर सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासक आणि गौरवशाली नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार सलग तिसर्‍यांदा सत्तेवर येण्याची आता सर्वांना आशा आहे. आशा कसली, खात्रीच! सुरुवातीला आपापसात एकी करून भाजप सरकारला कडवी लढत देण्याचा मनसुबा विरोधी पक्षांनी व्यक्त केला होता; परंतु ’मूळ स्वभाव जाईना’ या उक्तीप्रमाणे त्यांच्यात बेकी झाली आणि अखेर ही लढत एकतर्फीच होण्याची परिस्थिती निर्माण झाली. ’इंडिया, इंडिया’ असा गलका करत शड्डू ठोकणारे पैलवानच बाल्कन देशांप्रमाणे वेगवेगळे झाले. जन्मतःच कृत्रिम आणि बेगडी असलेल्या या आघाडीने कधी बाळसे धरलेच नाही. ज्या आघाडीचे सुकाणू राहुल गांधी यांच्यासारख्या बालिश नेत्याच्या हाती असेल, ती बाळसे धरणार तरी कशी? राहुल यांच्या वावदूक थेरांना कंटाळून प्रत्येक पक्षाने आपापला सवतासुभा कायम ठेवण्याकडे लक्ष दिले. तुमच्या नादानपणापायी आमचं आहे ते संचितही जायचं, हे फक्त त्यांनी राहुल यांना स्पष्ट ऐकवलं नाही एवढेच! बाकी हे नाही तर ते खुसपट काढून त्यांनी ते लक्षात मात्र आणून दिलं.
 
 
जी गोष्ट राष्ट्रीय राजकारणात तीच महाराष्ट्राच्या राजकारणात. इथे तर विरोधकांच्या दृष्टीने परिस्थिती आणखीच बिकट होती. राष्ट्रीय पातळीवर इंडी आघाडीत सामील झालेल्या तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, द्रमुक या पक्षांकडे किमान एकेका राज्याची सत्ता आहे. आपापल्या प्रांतात जनाधार गमावत असले तरी सरकार ताब्यात आहे. इकडे तसे नाही.
 
 देवेंद्र फडणवीस यांच्या चतुर राजकारणाचे चक्र असे काही फिरले, की उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनाही अस्मान पाहावे लागले.
 
पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागून जनादेश मिळविलेल्या शिवसेनेने निवडणुकीनंतर टोपी फिरवली. शरद पवार यांच्या कारस्थानी नेतृत्वाची कास धरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद बळकावले. विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे 105 आमदार घरी बसवले म्हणून हिणवण्यात भूषण मानले. कोरोनामुळे काही काळ त्यांची चलती झाली. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चतुर राजकारणाचे चक्र असे काही फिरले, की उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनाही अस्मान पाहावे लागले. आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी आपली ताकद दाखवली आणि राजकारणाचे चित्र 180 अंशांनी फिरले. महाविकास आघाडी नावाच्या एका आचरट प्रयोगात सहभागी झालेल्या तीन पक्षांचे पाच पक्ष झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची दोन-दोन शकले झाली, तर काँग्रेस असूनही नसल्यासारखी झाली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपलेच असल्याचे वैधानिक पद्धतीने सिद्ध केले.
 
 
ताज्या निवडणुकीची ही पूर्वपीठिका आहे आणि ती महत्त्वाची आहे, कारण एकनाथ शिंदे व अजित पवार आज भाजपच्या जोडीला आहेत. भाजप त्यांच्याशी कसा व्यवहार करतो, यावर त्यांचे राजकारण अवलंबून आहे आणि भाजपचेही. शिवाय ज्या कारणासाठी या दोघांनी आपल्या निष्ठा बदलल्या ती कारणेही उद्भवता कामा नयेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबतीत त्यांचे जुने नेते स्वतःला मालक समजू लागले होते, तर अजित पवार यांच्याबाबतीत त्यांचे सख्खे काकाच मुलीच्या प्रेमासाठी त्यांचा राजकीय बळी द्यायला निघाले होते. भाजपशी सख्य केल्यानंतर या दोघांनाही अशीच वागणूक मिळाली असती, तर गेल्या दीड-दोन वर्षांतील त्यांच्या राजकीय निर्णयांचे समर्थन करणे त्यांना अवघड गेले असते. इतकेच नाही तर भाजपला भविष्यात राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर राजकीय मित्र मिळविणेसुद्धा अवघड गेले असते.
 
 
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपने जे जागावाटप केले आहे किंवा जे उमेदवार दिले आहेत त्याकडे या दृष्टीने पाहिले पाहिजे. एकीकडे सलग तिसर्‍यांदा मोदी सरकार आणण्यासाठी ’अब की बार चारसौ पार’ हे स्वप्न साकार करायचे, दुसरीकडे आपल्यासोबत येणार्‍या मित्रांची व्यवस्थित राजकीय बूज राखायची, अशी तारेवरची कसरत भाजपला करावी लागत आहे. जागावाटपाकडे पाहिलं तर ती कसरत उत्तम करत आहे, असे म्हणावे लागेल.
 
 जागावाटपाच्या प्रश्नावरून प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने तथाकथित मविआचे वाभाडे काढले ते फार शोभनीय होते का? मग गडकरींच्या निमित्ताने त्यांनी स्वतःची आणखी शोभा का करून घ्यावी?
 
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले तेव्हापासून सर्वांना उत्सुकता एकाच गोष्टीची होती - सरकार भले एकत्र चालवाल; पण जागावाटप कसे करणार? त्यात निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच भाजपने अर्धेअधिक उमेदवार जाहीर करून एक पॉइंट सर केला. हा लेख लिहीत असताना भाजपने 23 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी विदर्भातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखलसुद्धा केले आहेत. अन्य जागांसाठी तिन्ही पक्षांच्या (व अन्य मित्रपक्षांच्या) बैठकाही चालू आहेत. जागांसाठी ओढाताण आहे; परंतु रस्सीखेच नाहीये, ही त्यातील गोम आहे.
याला कारण म्हणजे अशी रस्सीखेच व्हावी, यासाठी विरोधक आतुर आहेत. त्यांच्या स्वतःमध्ये लढण्याचे त्राण नाही, आपसात एकी नाही, परस्परांवर विश्वास नाही. त्यामुळे माझ्या सदर्‍यापेक्षा याचा सदरा शुभ्र कसा, हा जळफळाट घेऊन जगणे, एवढेच त्यांच्या हाती उरते. एरव्ही नितीन गडकरी यांच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरे यांनी भोचकपणा कशाला करावा? त्यांच्या स्वत:च्या जागा निश्चित नाहीत, मिळाल्या त्या जागी उमेदवार मिळत नाहीत आणि हे चालले नितीन गडकरींना उमेदवारी द्यायला!! जागावाटपाच्या प्रश्नावरून प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने तथाकथित मविआचे वाभाडे काढले ते फार शोभनीय होते का? मग गडकरींच्या निमित्ताने त्यांनी स्वतःची आणखी शोभा का करून घ्यावी?
 
 जो पवारांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’, हे त्यांना मातोश्रीच्या मालकाकडे पाहून उमगले असावे.
 
याच्या उलट वर्तन भाजप, म्हणजे पर्यायाने फडणवीस यांचे होते. महादेव जानकर मध्यंतरी नाराज होते; पण ते आपले जुने सहकारी आहेत. काँग्रेस व शरद पवार यांच्या विरोधातील संघर्षात त्यांनी चांगली साथ दिली आहे, याचे भान ठेवून त्यांना फडणवीसांनी सोबत घेतले. जानकर यांनी 2009 मध्ये शरद पवार यांच्या विरोधात माढ्यामध्ये निवडणूक लढविली होती. त्यात त्यांनी मोठ्या संख्येने मतेही मिळविली होती. आज त्याच जानकरांना शरद पवार त्याच माढ्यामध्ये उमेदवारी द्यायला निघाले होते; पण पवार आणि त्यांच्या प्रभावळीतील पक्षांची गत पाहून जानकरांनी पुढचा धोका ओळखला. ’जो पवारांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’, हे त्यांना मातोश्रीच्या मालकाकडे पाहून उमगले असावे.
 
 
गेल्या निवडणुकीत पवारांनी राज ठाकरे यांचा शिताफीने वापर करून घेतला. त्यात त्यांना यश आले नाही ही बाब वेगळी. मात्र तो प्रयत्न उत्तम होता; परंतु राज ठाकरे यांनी बजावलेल्या भूमिकेची बूज पवारांनी राखली नाही आणि त्यांना वापरून फेकून दिले. त्यामुळे खवळलेले राज ठाकरे आज पवारांचे कट्टर विरोधक बनले आहेत. ते दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटले. त्यांच्यात युतीबद्दल चर्चा झाल्याचे म्हटले जाते. खरे-खोटे तेच जाणो; परंतु ते पवारांसोबत जाणार नाहीत एवढे नक्की.
 
 
जानकरांप्रमाणेच राजू शेट्टी यांनीही पवारांशी संगत टाळण्याचा निर्णय घेतला. तेही भाजपचे जुने सहकारी. तेही असेच दुरावलेले, म्हणून पवारांनी त्यांना जवळ केलेले; परंतु पवारांची संगत काय किमतीला पडते, हे बघून त्यांनीही एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला. आणि का नाही घेणार? अगदी चिरफाळ्या झालेले पक्षसुद्धा विरुद्ध दिशेला तोंड करून बसल्याचे एक चित्र आणि आत्मविश्वासाने, परंतु सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व एकीकडे असे सध्याचे चित्र आहे. मविआमधील पक्ष ओसाडगावच्या पाटीलकीसाठी भांडताहेत, तर रालोआमधील ’सब का साथ, सब का विकास’चा नारा सर्वांना विश्वास देत आहे.
 
 
मुंबईमध्ये अमोल कीर्तिकरांना उमेदवारी दिल्यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केला. खिचडीचोरासाठी आपण प्रचार करणार नाही व काँग्रेस कार्यकर्ते काम करणार नाहीत, असे त्यांनी जाहीर केले. पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल यांनी थेट उपोषणाचा मार्ग धरला. सांगलीची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे तिथले काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले. बरं, या सर्वांना पाडायला आपण सज्ज असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी आधीच जाहीर केलेले!!
 
  वयाच्या नव्वदीत त्यांना आता तुतारी फुंकावी लागत आहे. त्यासाठीसुद्धा माणसे मिळत नाहीत.
 
या सगळ्याचा मथितार्थ स्पष्ट आहे. राजकीय कुरघोड्या करून सत्ता मिळविता येते; परंतु माणसे मिळविण्यासाठी प्रेम आणि विश्वास लागतो. पवारांकडे नेमके तेच नाही. त्यामुळे वयाच्या नव्वदीत त्यांना आता तुतारी फुंकावी लागत आहे. त्यासाठीसुद्धा माणसे मिळत नाहीत. गलितगात्र अवस्थेत आपली बारामतीची गढी सांभाळण्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे.
 
पवारांच्या प्रेमात पडलेली किंवा उपकृत झालेली मंडळी त्यांना बळेबळेच चाणक्य म्हणतात. या चाणक्यावर चाणाक्ष देवेंद्राने मात केली आहे. त्यांची सगळी कुटिलता हतबल झाली आहे, गळाठली आहे. याच्या उलट शहाणपण आणि सौजन्य यांच्या बळावर देवेंद्र फडणवीस दमदार वाटचाल करत आहे.

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक