सेवा करणारी ही ‘संस्था’ हे आधुनिक काळातील ‘तीर्थक्षेत्र’ - डॉ. मोहनजी भागवत

विवेक मराठी    01-Apr-2024
Total Views |
@विलास आराध्ये
9423075697
लातूर येथील ख्यातकीर्त विवेकानंद रुग्णालयाच्या कर्करोग व सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या, व्यापक विस्ताराचा ‘लोकार्पण’ कार्यक्रम दि. 20 फेब्रुवारी रोजी पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया व टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राजेंद्र बडवे (प्रो. एमिरिट्स) हेही उपस्थित होते. अत्यंत भव्य, हृद्य व नेटक्या सोहळ्याचा वृत्तान्त आमचे प्रतिनिधी विलास आराध्ये यांनी दिला आहे.
 Vivekanand Hospital Latur
 
विवेकानंद रुग्णालय गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लातूर व परिसरातल्या 5 ते 10 जिल्ह्यांत वैद्यकीय सेवेसाठी सुप्रसिद्ध आहे. विश्वस्त रुग्णालय म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून येथे अत्याधुनिक उपचार अत्यंत उचित आणि अल्प मूल्यात केले जातात. रुग्णालयात सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा व विविध विषयांचे विशेषज्ञ उपलब्ध आहेत. सुमारे 12 वर्षांपूर्वी डॉ. राजेंद्र बडवे यांच्या प्रेरणेतून कर्करोग रुग्णालयाची स्थापना झाली. यासाठी रुग्णालयाने आवश्यक ते तज्ज्ञ मनुष्यबळ व पायाभूत सुविधा कष्टपूर्वक उभ्या केल्या. डॉ. बडवे यांनी रेडिएशनसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचे कोबाल्ट युनिट उपलब्ध करून दिले. डॉ. प्रमोद टिके व डॉ. ब्रिजमोहन झंवर यांच्या नेतृत्वाखाली या विशेष रुग्णालयाचे काम सुरू झाले.
 
 
‘विवेकानंद’च्या परंपरेप्रमाणे उत्तम व्यावसायिक गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी, उचित अर्थकारण व सुसंघटित प्रयास, यामुळे या भागातील कर्करोगग्रस्त रुग्णांची मोठीच सोय झाली. या सेवेच्या व्यापक विस्ताराच्या ‘लोकार्पण’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी केले. ते म्हणाले, या कर्करोग केंद्राला केंद्र शासनाकडून ‘टर्शरी केअर कॅन्सर सेंटर’ अशी मान्यता व साहाय्यता मिळाली. पूर्ण देशभरात खासगी क्षेत्रातील ही अशी पहिली संस्था ठरली. सुरुवातीच्या कोबाल्ट रेडिएशन युनिटपाठोपाठ अत्याधुनिक युनिट रेडिएशनसाठी उपलब्ध झाले. कर्करोगाच्या उपचारासाठी आवश्यक त्या गुंतागुंतीच्या सर्व मोठ्या शस्त्रक्रिया येथे होतात. केमोथेरपीची उत्तम सोय विशेषज्ञांच्या साहाय्याने केली आहे. प्रत्येक रुग्णाचा उपचार, टाटा हॉस्पिटलच्या धर्तीवर ट्युमर बोर्डमध्ये चर्चा करून नियोजनबद्ध केला जातो. आज सुमारे 100 रुग्णांचे रेडिएशन रोज होते. त्याचबरोबर सुमारे 40 रुग्णांची केमोथेरपी व महिन्याभरात सुमारे 60 मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी आवश्यक त्या सर्व चिकित्सा - सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत. उपचार घेत असताना रुग्णांमध्ये ‘निदान’निश्चिती झाल्यावर सुमारे 65% ते 70% रुग्ण पूर्णपणे मोफत उपचार घेतात. शासनाच्या विविध योजनांचा त्यासाठी लाभ घेतला जातो, असे निश्चितपणे म्हणता येईल.
  
या विस्तारित वास्तूमध्ये आणखी काही विशेष सुविधा नजीकच्या भविष्यकाळात उपलब्ध केल्या जातील. Bone Maro Transplant, Kidney Transplant, Neuro Surgery अशा विषयांची या ठिकाणी उत्तम व्यवस्था होत आहे. आपणा सर्वांचा आशीर्वाद व केंद्रीय आरोग्य विभागाच्या पाठबळाच्या आधारावर गतीने हे सर्व होईल असा विश्वास डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी व्यक्त केला.
 

Vivekanand Hospital Latur 
 
डॉ. राजेंद्र बडवे यांनी आपल्या दीर्घ व्यापक अनुभवाच्या आधारावर मौलिक माहिती दिली. ते म्हणाले, भारतात गेल्या दोन दशकांत कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. दर लाख लोकसंख्येमागे शहरात 65, तर खेडेगावात 40 ते 45 असे हे प्रमाण आहे. 40% कर्करोग तंबाखूमुळे, 10% इन्फेक्शनमुळे, तर 15% ते 20% स्थूलपणामुळे होतो. गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण उत्तम उपचारामुळे व प्रतिबंधात्मक उपायांमुळे प्रति एक लाख 28 वरून 6 वर आलेले आहे. तसेच आपल्या देशांतर्गत संशोधनामुळे अत्यंत महाग औषधे खूप कमी किमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत. विवेकानंद रुग्णालयासारख्या संस्थेच्या माध्यमातून या सर्व उपचार पद्धतीला मोठेच बळ मिळत आहे.
 
 
आपल्या आयुर्वेद प्रणालीचाही प्रतिबंधात्मक व पूरक उपचार म्हणून उपयोग केला जात आहे. विवेकानंद रुग्णालयात यासाठी उत्तम सोय उपलब्ध आहे. या सर्व उपचार पद्धतीबरोबरच मानसिक उपचारासाठी योग्य संवाद व सल्लामसलतीसाठी ‘केवट’ हा अभ्यासक्रम आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये सुरू केला आहे. त्याचा उत्तम प्रकारे लाभ होत आहे. अशा प्रकारे काम करणार्‍या रुग्णालयांची संख्या वाढत आहे, त्यामुळे कर्करोगाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65% ते 70% वर पोहोचले आहे. ‘प्रतिबंधात्मक उपाय’ व ‘प्राथमिक अवस्थेत निदान’ या दोहोंची उत्तम परिणामासाठी महत्त्वाची भूमिका आहे, असे मत डॉ. राजेंद्र बडवे यांनी मांडले.
 
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आज जगातील सर्वांत मोठे व सर्वांत प्रभावी संघटन आहे. भारताच्या राष्ट्र व समाजजीवनातील प्रत्येक क्षेत्रात, परिणामकारक व मार्गदर्शी संस्था संघ स्वयंसेवकांनी प्रस्थापित केल्या आहेत. विवेकानंद रुग्णालय ही वैद्यकीय क्षेत्रातील अशीच अग्रेसर संघटना आहे. सुमारे 55 वर्षांपूर्वी डॉ. राम आलुरकर, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. ज्योत्स्ना कुकडे व डॉ. अशोक कुकडे यांनी या संस्थेचे बीजारोपण केले. त्याचे रूपांतर आज वटवृक्षासमान झाले आहे.
 
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री मनसुखभाई मांडविया यांनी या प्रसंगी विचार व्यक्त करताना, “विवेकानंद रुग्णालय ‘सेवाभावी’ वृत्तीने काम करत आहे. देशपरत्वे मकशरश्रींह चेवशश्रफ, बदलत असते. भारताचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णावरचे उपचार ‘सेवा’ म्हणून केले जातात. हाच आमचा संस्कार आहे. आरोग्याला व्यापारी दृष्टिकोनातून पाहता येत नाही. विवेकानंद रुग्णालय या पद्धतीने काम करत आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या कोविड रोगाच्या साथीत भारतातील डॉक्टरांनी जगापुढे आदर्श निर्माण केले. अनेक पुढारलेल्या देशांत वैद्यकीय व्यवसायी रोग्यांना टाळत होते. भारतात मात्र अनेक डॉक्टरांनी कोविड रुग्णांची सेवा करताना स्वत:च्या प्राणाची पर्वा केली नाही. शासनाचे प्रयास पुढील काळात आरोग्यासाठी अधिक आर्थिक बळ देण्याचा आहे.
 
 
आमच्या समाजात परंपरेने आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काही व्यवस्था आहेत. मानसिक आधारासाठी आमची कुटुंबपद्धती फार उपयुक्त आहे. आमची खाद्यसंस्कृती, आमचे स्वयंपाकघर हेसुद्धा उपचाराला व कर्करोग प्रतिबंधाला पूरक आहेत; परंतु शारीरिक कष्टांपासून आपण दूर जात आहोत हे योग्य नाही.
 

Vivekanand Hospital Latur 
 
कोविडच्या साथीने भारताला व जगाला आगळा अनुभव दिला. पृथ्वीवर आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली. या कालावधीत मला विदेशातून रोज फोन येत होते. आम्ही सर्वांना ’वसुधैव कुटुंबकम्’चा अनुभव दिला. सुमारे 150 देशांना कोविडची लस पुरविली. एक गमतीची कथा - ब्राझिलला भारतीय लस विमानातून पोहोचवली, तेथील लोकांनी रामायणातील हनुमानाचे उदाहरण दिले. लक्ष्मणासाठी हनुमंताने द्रोणागिरी उचलून आकाशमार्गे आणला होता, जणू तशीच ही कृती झाली. आपल्या देशात कोविड साथीचे अतिशय उत्तम व्यवस्थापन झाले. या सर्व कामांत भारतीय शास्त्रज्ञांचा मोठा सहभाग होता. विवेकानंद रुग्णालयाने ‘सेवा, संस्कार व संघटन’ या त्रिसूत्रींना महत्त्व दिल्यामुळे या संस्थेला नित्य कामात अडचणी येणार नाहीत,” असा विश्वास मांडविया यांनी या वेळी व्यक्त केला.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आज जगातील सर्वांत मोठे व सर्वांत प्रभावी संघटन आहे. भारताच्या राष्ट्र व समाजजीवनातील प्रत्येक क्षेत्रात, परिणामकारक व मार्गदर्शी संस्था संघ स्वयंसेवकांनी प्रस्थापित केल्या आहेत. विवेकानंद रुग्णालय ही वैद्यकीय क्षेत्रातील अशीच अग्रेसर संघटना आहे. सुमारे 55 वर्षांपूर्वी डॉ. राम आलुरकर, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. ज्योत्स्ना कुकडे व डॉ. अशोक कुकडे यांनी या संस्थेचे बीजारोपण केले. त्याचे रूपांतर आज वटवृक्षासमान झाले आहे. या संस्थेच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च अधिकारी डॉ. मोहनजी भागवत यांनी उपस्थित राहणे हा एक ‘मणिकांचन’ योगच म्हटला पाहिजे. सरसंघचालकांची उपस्थिती यावरून रुग्णालयाच्या कामाचे स्थान व महत्त्व प्रतीत होते. धन्वंतरी प्रतिमापूजन व औपचारिक लोकार्पण पार पडल्यानंतर पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे उद्बोधन झाले.
 
 
पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या उद्बोधनात,“आरोग्य हा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषय आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सर्वांसाठी आरोग्य सुविधा सुलभ आणि स्वस्त मिळावी यासाठी विवेकानंद रुग्णालयासारख्या संस्था कार्यरत आहेत. सेवा करणारी ही ‘संस्था’ हे आधुनिक काळातील ‘तीर्थक्षेत्र’ आहे. येथे ऊर्जा असून येथील वातावरणातून प्रेरणा मिळते व काम करण्यास बळ मिळते. भारतीय परंपरेत ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ असे म्हटले आहे. त्याच दृष्टीने दीर्घकाळ आपल्या पूर्वजांनी समाजात संस्कार रुजविले. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातही आपण पुढारलेले आहोत. मधल्या हजार वर्षांच्या अंधकार काळात परकीय आक्रमण व अन्य कारणांमुळे आपली गती मंदावली, पाश्चात्त्य जगत पुढे गेले, त्यांनी संशोधन केले. आमची ती परंपरा थांबली. खरे तर ती काळाच्या कसोटीवर उतरली होती. त्यात संशोधन व योग्य त्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन होणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य ज्ञानाच्या अनुकरणाबरोबरच, तो अनुभव जमेस धरून आपल्या गरजेनुसार त्याचा स्वीकार करावा. आपल्या संस्कृतीमध्ये रुग्णाला पाहून त्याला बरे करण्याची पद्धती आहे, तर पाश्चात्त्य पद्धतीत रोग पाहून त्याचा उपचार केला जातो. हा मूलभूत फरक आहे. रुग्णचिकित्सा व उपचार हा आपण धर्म मानतो, व्यवसाय नाही. अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत ही काळाची गरज आहे.
 
 
‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेतून सेवा केली तर आपल्या स्वप्नातील ‘विश्वगुरू भारत’ बनविणे हे उद्दिष्ट शक्य होईल. देशातील आरोग्य उत्तम असेल, नागरिक स्वस्थ असतील तर विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने निश्चितच वाटचाल घडेल. विवेकानंद रुग्णालयाची 50 वर्षांची वाटचाल होऊन आता नवी पिढी त्या मार्गावरून वाटचाल करीत आहे. आपण सर्वांनी ते पाहून-समजून घेतले पाहिजे. आपणदेखील काय करू शकतो, हे ठरविले पाहिजे. केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन असे जीवन न जगता समाजासाठी जगावे, हा आदर्श यानिमित्ताने आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत होत आहे.” असे मार्गदर्शन प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. अशोकराव कुकडे लिखित ‘ध्येयसाधनेचे सांगाती’ या छोट्या पुस्तिकेचे पूजनीय सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यापूर्वीच रुग्णालयाची सविस्तर माहिती ‘कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहे. ‘ध्येयसाधनेचे सांगाती’ या पुस्तिकेत रुग्णालयाच्या नित्य कामात नसलेले, पण ज्यांनी दीर्घकाळ या ना त्या प्रकारे रुग्णालय कामाला सातत्याने निरपेक्षपणे हातभार लावला, अशांच्या कथा मांडल्या आहेत. त्यामध्ये मुक्तहस्ताने दान करणारे बद्रीनारायणजी बारवाले, हृदय शस्त्रक्रियांसाठी दीर्घकाळ साहाय्य करणारे डॉ. अशोक कानिटकर, व्यापक संपर्कासाठी लिनेश सेठ किंवा वैचारिक आणि संघटनात्मक कामाच्या संकल्पना रुजविणारे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव केतकर व दामुअण्णा दाते यांची व्यक्तिचित्रे व योगदान याविषयी वर्णन केले आहे. एका अर्थाने ते लिखाण प्रकट कृतज्ञता व्यक्त करणारे आहे. सर्वांनाच ते मार्गदर्शक होईल. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल अंधोरीकर यांनी अत्यंत समर्पक शब्दांत आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
 
 
मुख्य कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यांमधील केवळ वैद्यकीय व्यवसायी यांच्यासाठी डॉ. राजेंद्र बडवे व मनसुखभाई मांडवियाजी यांच्यासोबत संवादाचा कार्यक्रम योजला होता. त्यासाठी 350 वैद्यकीय व्यवसायी उपस्थित होते. हा कार्यक्रमदेखील उत्तम प्रबोधन करणारा व शासकीय योजनांची माहिती देणारा झाला. डॉ. बडवे यांनी कर्करोगाचा यशस्वी सामना करण्यासाठी लवकरात लवकर चिकित्सा व उपचार आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. हे काम तुम्हा सर्वांचे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. मनात सतत याविषयीची जागरूकता ठेवली तर हे नक्की घडू शकेल. आज उपलब्ध असलेल्या उत्तम उपचारांमुळे 65% ते 70% कर्करोगाचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.
 
 
मांडविया यांच्यासोबत झालेल्या संवादात, त्यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवणे व त्यासाठी आवश्यक ते आर्थिक साहाय्य उपलब्ध करणे हे काम शासन अग्रक्रमाने करीत आहे, असे प्रतिपादन केले. योग्य त्या आकडेवारीच्या माध्यमातून त्याची परिणामकारकता अनुभवता येते, हे प्रकट केले. या दोन्ही वक्त्यांनी सर्व डॉक्टर श्रोत्यांच्या जिज्ञासेचे समाधान करून, मने जिंकल्याचे अनुभवास आले.
 
 
विवेकानंद रुग्णालयाचा हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, नेटका व वेळेबरहुकूम पार पडला. त्या माध्यमातून प्रबोधन, संपर्क, आधुनिक उपचारांची माहिती व विवेकानंद रुग्णालयाच्या कामाच्या उपलब्धी या सर्वांचे यथार्थ दर्शन झाले.