ईव्हीएमच्या नावानं व्यर्थ शिमगा

विवेक मराठी    01-Apr-2024
Total Views |
@अमित लिमये
निवडणुकीचे पडघम वाजायला लागले की विरोधक ईव्हीएमच्या नावाने शिमगा घालायला लागतात. नागरिकांमध्ये ईव्हीएमवर आणि पर्यायाने निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेवर अविश्वास निर्माण करण्याचे काम विरोधक करीत राहतात. त्यासाठी नागरिकांनी भारतीय निवडणूक आयोग वेळोवेळी आपल्या वेबसाइटवर सादर करत असलेली माहिती वाचली पाहिजे, जेणेकरून निवडणूक प्रक्रियेवरचा तुमचा विश्वास दृढ होईल. मग लोक हेतुपुररसर किती का गोंधळ घालेनात, तुम्ही विश्वासाने मतदान करून लोकशाहीचा रथ पुढे न्या.

EVM
 
उन्हाळा आला की बाजारात जशी आंब्याची चाहूल लागते तद्वत लोकसभेच्या निवडणुका लागल्या, की समस्त विरोधी पक्ष, काही सरकारद्वेष्टे तथाकथित समाजसेवक आणि बरेच अवसानघातकी लोक ईव्हीएमच्या(EVM) नावाने उघड अपप्रचार करत सुटतात. जवळपास सगळ्या डाव्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधून ह्याला हवा द्यायला सुरुवात होते, कोर्टात केसेस टाकल्या जातात, आयोगाला पत्रं लिहिली जातात. सोशल मीडिया वापरून इतका दंगा केला जातो की, सामान्य मनुष्य चक्रावून जावा आणि हे सगळं खरंच आहे की काय, अशी शंका त्याला यावी. शंका ही वाळवीसारखी असते. एकदा पोखरायला सुरुवात झाली की ईव्हीएमवरून सुरू होणारी विचारमालिका आपणाला लोकशाहीच्या नावाखाली बनवले जात नाही ना, ह्या धोकादायक वळणावर येऊन थांबते. भारतीय ईव्हीएमबद्दल आणि निवडणुकांबाबत बोलायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अमेरिकेसारख्या प्रगत आणि बलाढ्य देशातल्या लोकशाही निवडणुकीची खरीखुरी गोष्ट.
 
 
2020 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन 80 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप सपाटून हरले होते. 6 जानेवारी 2021 ला प्रोटोकॉलप्रमाणे अमेरिकन संसदेच्या दोन्ही सदनांचे संयुक्त सत्र लागले होते. ह्या सत्रात औपचारिकरीत्या प्रातिनिधिक मतमोजणी होऊन उपाध्यक्ष माईक पेन्स बायडेनना विजयी घोषित करणार होते. संसदेबाहेर साधारण दोन-अडीच हजार लोकांचा प्रक्षुब्ध जमाव जमला होता. सगळे डोनाल्ड ट्रंपचे समर्थक. त्यांना ही निवडणूक आणि तिचा निकाल मान्य नव्हता. जसजशी नियोजित वेळ जवळ यायला लागली तसतशी ह्या लोकांची सहनशक्ती संपायला लागली.
 
 
शेवटी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना मारहाण करून, गेट्स, बॅरिकेड्सवरून उड्या मारून सगळा जमाव नारेबाजी करत संसदेत शिरला. त्यांना जो बायडेनना विजयी जाहीर करणारं सत्र उधळून लावायचं होतं. तत्कालीन उपाध्यक्षांना पकडून निवडणुकीचा निकाल रद्दबातल करायला लावायचा होता. त्यांनी खिडक्या फोडल्या, दारं तोडली, लोकसभेत घुसले, लोकसभा अध्यक्षा नॅन्सी पेलोसीचा राजदंड पळवला, तिच्या ऑफिसमध्ये घुसले, फर्निचरची तोडफोड केली. वेळेत सगळे खासदार आणि उपाध्यक्ष तिथल्या बंकरमध्ये लपले नाही तर अनवस्था प्रसंग होता. काही लोक नॅन्सी पेलोसीच्या ऑफिसमध्ये, कॉरिडॉरमध्ये शब्दशः मलमूत्र विसर्जन करून आले. हा विटंबनेचा नंगानाच दिवसभर चालला. शेवटी नॅशनल गार्ड बोलावून परिस्थिती आटोक्यात आणावी लागली. तोपर्यंत 4 लोक मेले होते, हजारो जखमी झाले होते. जगातल्या सर्वोच्च लोकशाहीच्या सगळ्यात भव्य प्रतीकाची प्रचंड नासधूस झाली होती आणि अमेरिकेची जगभर नाचक्की. त्या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांपैकी सात पोलिसांनी आपल्याच नागरिकांवर शस्त्र चालवायला लागल्याच्या उद्वेगामुळे पुढच्या सहा महिन्यांत आत्महत्या केल्या. विचार करा, हे सर्व अमेरिकन नागरिकांनी, ज्यांचं देशावर प्रेम आहे अशा लोकांनी केलं आहे. शिकलेले, हुशार, चांगल्या नोकर्‍या असलेले एका उन्मादात सगळं उद्ध्वस्त करून बसले.
 

EVM 
 
भयंकर चीड आणि द्वेषाने आंधळं झाल्याशिवाय, कुणी तरी जबरदस्त पेटवल्याशिवाय सामान्य माणसं अशी कृत्ये करत नाहीत. का एवढे चिडले होते ट्रंप समर्थक? अध्यक्ष असताना निवडणूक हरलेला काही तो पहिला अध्यक्ष नव्हता. इथे साधारण दोन वर्षे आधीच अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजायला लागतात. आपल्या दरिद्री कारभारामुळे आपली लायकी सगळ्यांना कळली आहे आणि ही निवडणूक आपल्याला जड जाणार आहे हे ट्रम्प आणि त्यांच्या टोळीला कळून चुकलं होतं. त्यांनी तेव्हापासूनच ह्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाने भ्रष्टाचार केला तरच मी हरेन अन्यथा मी जिंकणारच, असं सांगायला सुरुवात केली. पुढे कोविडमुळे प्रत्यक्ष न होता मतदान पत्राने होईल, असं जाहीर झाल्यावर तर ह्यांना चेवच चढला.
 
 
कोव्हिड हा डेमॉक्रॅटिक पक्षाला निवडणुकीत मतपेट्या पळविण्यासाठी सोपं जावं म्हणून रचलेला बनाव आहे अशा स्टोर्‍या लीक व्हायला लागल्या. सोशल मीडिया, ठरावीक टीव्ही चॅनल्स झाडून कामाला लागले. माहोल तयार झाला होता. ट्रंप हरणार होताच. मतमोजणीत तसे कल दिसायला लागल्यावर मतमोजणी केंद्रावर मोर्चे गेले, निदर्शनं झाली. निकाल जाहीर झाल्यावर ह्यांनी कोर्टात अक्षरशः हजारो केसेस टाकल्या. प्रत्येक केसचा निकाल एकच. निवडणुकीत कुठेही कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. मग त्यावर कोर्ट्ससुद्धा डेमॉक्रॅटिक पक्षाने विकत घेतली आहेत अशा कथा पसरवल्या गेल्या. आता लोक अगदी पेटले होते. कोर्टाने निकाल देऊनही ट्रम्प अन् त्याचे सरदार लोकांना चिथावत होतेच. ह्या सगळ्या बनावामुळे लोकांचा लोकशाहीत सगळ्यात महत्त्वाच्या अशा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडाला, त्यांना आपला विश्वासघात झाल्याची खात्री पटली अन् भल्या भल्या हुशार, देशभक्त लोकांनी आपलीच संसद फोडली. या सगळ्या लोकांवर खटले चालले, त्यांना शिक्षा झाल्या, अनेक लोक आयुष्यातून उठले. तिथल्या समाजमनात अजूनही ह्या घटनेचे व्रण आहेत. अजूनही बरेच ट्रम्प समर्थक निवडणुकीत मोठा भ्रष्टाचार झाला, ह्या मतावर ठाम आहेत. समाजात एक प्रचंड मोठी उभी फूट पडली आहे.
 
 
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाने पत्राने मत देण्यावरून लोकांची माथी भडकावली. भारतात तेच काम काँग्रेस, डावे आणि काही प्रादेशिक पक्षांचे लोक ईव्हीएमवरून करताहेत. हा प्रकार 2019 च्या सुमारास जोरात सुरू झाला तेव्हाच सरकारने, निवडणूक आयोगाने जबाबदारीने काही ठोस पावलं उचलली आहेत.
 
 
आयोगाने पत्रकार परिषदा घेतल्या, कोर्टात जबानी दिली, पुरावे सादर केले. इतकंच नव्हे, तर ईव्हीएम हॅक करायचं खुलं आव्हान दिलं. या सगळ्या सव्यापसव्यातून ईव्हीएम बनवणे, ते बूथ्सवर पोहोेचवणे, मतदान घेणे, ते मतमोजणी करून निकाल जाहीर करणे ह्या प्रवासाला अजून विश्वासार्ह बनवणारी vvpat पद्धत आणली. हे सगळं करून ईव्हीएम घाऊकरीत्या हॅक करून निवडणुका कुणालाही आपल्या बाजूने वळवता येत नाहीत हे निर्विवाद सिद्ध केलं. तरीही परत 2024 ला त्याच तिकिटावर तोच खेळ सुरू आहे.
 
 
ईव्हीएमची टेक्निकल माहिती सामान्य मतदारांना नसते. ह्या बाबीचा गैरफायदा घेऊन हा अपप्रचार चालतो. आपण ईव्हीएम जरा बाजूला ठेवून सोप्या उदाहरणांनी विषय समजून घेऊ. समजा, तुम्ही साधारण 100 कोटी रुपये 100 वेगवेगळ्या बँकांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ठेवले आहेत. ह्या सगळ्या बँका ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, ऑनलाइन मनी ट्रान्स्फर असल्या आधुनिक सुविधा देत नाहीत. पैसे भरायचे आणि काढायचे असतील तर बँकेत जायचं, स्लिप भरायची, व्यवहार करायचा आणि पासबुक भरून घरी यायचं असा प्रकार आहे. आता एका चोराला ते पैसे चोरायचे आहेत. कसा चोरेल तो? त्याला तुमच्या सगळ्या अकाऊंट्सचे डिटेल्स लागतील. ड्युप्लिकेट पासबुक्स बनवावी लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्या 100 बँकांत प्रत्यक्ष जाऊन पैसे काढावे लागतील. ह्याच बँका जर इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग देत असत्या, तर तुमचे युजर नेम, पासवर्ड इ. चोरून किंवा बँकेचे सर्व्हर दुरून हॅक करून तुमचे पैसे एखाद्या तज्ज्ञ हॅकरला बसल्या जागेवरून चोरता आले असते. आता ह्या सगळ्या बँकांच्या जागी लोकसभा निवडणूक आणि ईव्हीएम ठेवू. पैशांच्या जागी मतं आणि चोराच्या जागी सत्ताधारी पक्ष ज्याला सगळी मतं आपल्याकडे वळवायची आहेत. ईव्हीएम वापरून मतदान घेण्याची, मतमोजणीची पद्धत ही अकाऊंट्स इंटरनेटला न जोडलेल्या बँकेसारखी आहे. ईव्हीएमला इंटरनेटवरून अ‍ॅक्सेस करता येत नाही. 2019 चे आकडे बघायचे झाले तर 542 मतदारसंघांतून तब्बल 600 मिलियन मतदारांनी मतदान केलं होतं. म्हणजे बहुमतासाठी एक-दोन बूथ नाही, तर तब्बल 272 जागांसाठी मतं फिरवायला प्रत्येक मतदारसंघात जाऊन ईव्हीएममध्ये फेरफार करावा लागणार. कुठलीही बातमी एका क्षणात जगभर होत असणार्‍या आजच्या जमान्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएममध्ये फेरफार करणं हे फक्त दिवास्वप्न आहे.
 
 
असं असताना विरोधी पक्ष नेट लावून ईव्हीएमच्या मागे का लागत असतील? मला ह्याची तीन प्रमुख कारणं दिसतात.
 
1. आपल्या समर्थकांना आपले सतत इतके लाजिरवाणे पराभव का होत आहेत ह्याची सोपी कारणं सांगणं. आपल्याला जिंकता येत नसेल तर दुसर्‍यांच्या विजयावर शिंतोडे उडवणं ही सगळ्यात सोपी युक्ती असते.
 
2. ईव्हीएमवरून राळ उडवून देऊन पूर्वीची मतपत्रिकेची पद्धत आणायची. मतपत्रिकेचे गठ्ठे पळवायला, बदलायला सोपे जातात. ईव्हीएम हॅक होतं म्हणून नको आहे असं नसून, हॅक होत नाही म्हणून नको आहे... असं आहे ते.
 
3. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे; ईव्हीएम आणि निवडणुकीच्या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास डळमळीत करणे.
 
ईव्हीएमच्या आणि तदनुषंगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि एकूणच लोकशाहीवरचा विश्वास उडाला आणि बहुसंख्य जनतेत असंतोष निर्माण झाला तर काय होऊ शकतं ह्याची झलक तुम्हाला दिसावी म्हणून वर अमेरिकेची गोष्ट सांगितली. अमेरिकेतील लोकसंख्या, शिक्षणाचे प्रमाण आणि कायदा सुव्यवस्थेची अवस्था बरीच बरी म्हणून थोडक्यात निभावलं. भारतात लोकांची माथी भडकावून लोकशाही प्रक्रियेवरचा त्यांचा विश्वास उडाला तर काय होईल ह्याचा विचार ईव्हीएमच्या नावाने होळी साजरी करणारे तथाकथित सुशिक्षित, ज्ञानी, पुरोगामी लोक करत नाहीयेत. तो तुम्हीआम्ही करायचा आहे आणि त्यासाठी अपप्रचार नाकारायचा आहे. भारतीय निवडणूक आयोग वेळोवेळी आपल्या वेबसाइटवर सादर करत असलेली माहिती वाचलीत तरी आपल्या निवडणूक प्रक्रियेवरचा तुमचा विश्वास दृढ होईल. मग लोक हेतुपुररसर किती का गोंधळ घालेनात. तुम्ही विश्वासाने मतदान करून लोकशाहीचा रथ पुढे न्या.