श्री स्वामी समर्थ म्हणजे ज्ञानाचा अथांग, खोल सागर

विवेक मराठी    10-Apr-2024
Total Views |
@स्नेहा शिनखेडे
 
 
SWAMI SAMARTH
 
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ चरित्र, त्यांच्या अगम्य लीला व त्यांचे कलियुगात अवतरण समजून घेण्यासाठी काळाची वेगवान गती, उत्क्रांती आणि त्या गतीला वेळीच रोखण्यासाठी स्वामी समर्थांच्या हाती असलेला चाबूक कळायला हवा; तेव्हा कुठे त्यांच्या चरित्राचा खर्‍या अर्थाने बुद्धीप्रमाणे उलगडा होईल. स्वामी समर्थ म्हणजे ज्ञानाचा अथांग, खोल सागर आहे. मेंदूच्या परिघात, कक्षेत येईल असे स्वामींचे चरित्र नाही. ते समजून घेण्यासाठी वैचारिक परंपरेचा अभ्यास हवा. डोळस आणि सश्रद्ध मनाने स्वामींचे अवतरण जाणून घेतले पाहिजे. स्वामी समर्थ हे भारतीयांच्या आयुष्याला उत्क्रांतीतून पूर्णत्वाकडे अर्थात विकासाकडे नेणारे ब्रह्मांडनायक आहेत. स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाकडे येण्यापूर्वी समर्थपूर्वकालीन सामाजिक, राजकीय, वैचारिक व मानसिक पार्श्वभूमीचा विचार करणे, इतिहासाचा मागोवा घेणे हे औचित्यपूर्ण आहे. स्वामी समर्थ का व कशासाठी अवतीर्ण झाले? त्याचे मर्म नेमके कोणते? भारतीय समृद्ध परंपरेचे कोणते फळ कसे उदयास येऊन स्वामी समर्थ जनसामान्यांच्या उद्धारासाठी प्रकट झाले? हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी थोडे मागे वळून बघताना श्रीदत्त संप्रदाय व त्यांचे अवतारकार्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 
श्रीदत्तात्रय स्वरूप
 
श्रीदत्तमूर्तीचे ध्यान नेमके कसे आहे याविषयी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे.
 
तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ॥
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान॥
माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर ॥
शंखचक्रगदा हाती । पायी खडावा गर्जती ॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥
 
 
उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सृष्टिचक्र अव्याहत सांभाळणारी दत्त ही देवता आहे. मानवी देहाला मर्यादा असतात. श्रीदत्तप्रभू हे मानवी देहधारी नाहीत म्हणून त्यांचे ‘तीन शिरे सहा हात’ हे रूप ग्राह्य धरावे लागते. त्यात विषमता नाही. भगवान श्रीधर स्वामी म्हणतात,
 
अवतार उदंड होती। सवेचि मागुती विलया जाती।
तैसी नोहे दत्तमूर्ती। नाश कल्पांती असेना ॥
 
श्रीदत्तात्रय ही संघर्ष व भेदापलीकडे जाऊन सामंजस्य साधणारी देवता आहे. सर्वोच्च मूल्यांचा चिरंतन विकास करणारी देवता आहे. तिची उपासना म्हणजे उत्क्रांत अवस्था देणार्‍या जीवनमूल्यांची साधना आहे. श्रीदत्त हे पूर्णावतार असून सत्त्व, रज, तम या तिन्ही गुणांचा त्यात समन्वय आहे. श्रीदत्तांना तुळसही चालते व बेलपत्रही. मंत्र, यंत्र, तंत्र, सर्वधर्मसमभाव असणार्‍या या शक्तीमध्ये काळचक्र फिरवण्याचीही ताकद आहे.
 
 
दत्त यांचा दुसरा अर्थ दान असा आहे. दत्तात्रय हा परमात्मशक्तीने अत्री-अनसूयेला दान दिला. म्हणून दत्त संप्रदाय हा त्यागप्रधान आहे. वैराग्यशील व संचारी आहे. श्रीदत्तात्रय हे योगी, अवधूत, दिगंबर, स्वेच्छाचारी, विहारी, जीवन्मुक्त, परमहंस, अतिवर्णाश्रमी, सुभोगी, त्यागी, विरक्त, शांत, दांत ब्रह्मविद्वरिष्ठ आणि विश्वगुरू आहेत. ते भिक्षाशी व संचारी आहेत. श्रीदत्तात्रयांची दिनचर्या अद्भुत आहे. श्रीदत्तप्रभू नित्य गंगास्नान करतात. माहूरक्षेत्री निद्रा, गाणगापुरी ध्यान, कुरुक्षेत्री आचमन करून धोपेश्वरी भस्म धारण करतात. कर्‍हाडला संध्या करतात. कोल्हापूरला अंबाबाईच्या द्वारी भिक्षा मागून ते पांचाळेश्वरला भोजन करतात. पंढरपूरला गंधलेपन आणि पश्चिम समुद्र चिपळूण येथे सायंसंध्या करतात. अशा दत्त संप्रदायात स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी समर्थांचे कार्य दत्त संप्रदायाशी सुसंगत आहे.
 
 
श्रीदत्तात्रयांजवळ चक्र, गदा ही आयुधे असून ‘पायी खडावा गर्जती’ असे तुकोबाराय म्हणतात. श्रीदत्तात्रय कुठेही, केव्हाही, कधीही प्रकट होतात. श्रीदत्तात्रयांचे राज्य म्हणजे पादुकांचे राज्य आहे. गाणगापूर इथे निर्गुण पादुका, औदुंबर क्षेत्री विमल पादुका, तर श्रीक्षेत्र नरसोबावाडी इथे मनोहर पादुका आहेत. श्रीदत्तात्रयेंना विशेष रूप संभवत नाही.
 
 
संक्रमण आणि उत्क्रांतीचा संदेश देणार्‍या पादुका नुसत्या दर्शनाने परमेश्वराशी एकरूपता घडवतात. ‘गर्जती’ हे विशेषण महाराज लावतात, कारण शत्रू व संकटे नुसत्या पादुकांच्या खाडखाड आवाजाने दूर पळतात. स्वामी समर्थांच्या भक्तवृंदाला अनुभव आहेच, की स्वामी म्हणजे कडक दत्तावतार आहेत.
 
 
श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार
 
 
श्रीस्वामी समर्थांचे अवतारकार्य व चरित्र यातील गूढ, अगम्य रहस्य समजून घेण्यासाठी श्रीदत्तात्रेयांचे पूर्वावतार श्रीपाद वल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती यांच्या अद्भुत जीवनपटाचे अवलोकन केले पाहिजे. या विभूतींमध्ये एकच सूत्र असल्यामुळे त्यातील घटना, प्रसंग एकमेकांशी जोडले आहेत ते जाणून पुढे गेले पाहिजे. इ.स. 1320 ते 1350 या कालखंडात श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. दक्षिणेतील श्रीक्षेत्र पीठापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यामुळे पीठापूर ही पुण्यभूमी देवभूमी झाली. श्रीपादांचा जन्म आपळराज व सुमती या सात्त्विक दांपत्याच्या पोटी श्रीदत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने झाला. श्रीपादांच्या जन्मवराचा एक दृढ संस्कार समाजमनावर झाला आहे. श्रीदत्त संप्रदायाचे प्रधान वैशिष्ट्य भिक्षा आहे. एका पितृपंधरवड्यातील अमावस्येला आपाळराजांच्या घरी श्राद्ध होते. श्राद्ध व्यवस्था झाली होती; परंतु श्राद्धक्रिया सुरू व्हायची होती. तेव्हा दुपारच्या वेळी साक्षात दंडकमंडलूधारी श्रीदत्तात्रेयांची स्वारी ‘ॐ भवती भिक्षा देही’ म्हणत सुमतीच्या दारी आली. तिने श्राद्धभोजनापूर्वी आधी कोणासही भिक्षा देऊ नये या शास्त्र नियमाचे उल्लंघन करून ‘दत्तार्पणमस्तु’ म्हणून त्यांच्या झोळीत भिक्षा टाकली तेव्हा श्रीदत्तप्रभू प्रकट झाले व त्यांनी तिला पुत्रप्राप्तीचा वर दिला. दुपारच्या वेळी दारी आलेला अतिथी हा साक्षात दत्त असतो, हा विश्वास यामुळे समाजात रुजला. श्रीपादांना काशी, हरिद्वार, हृषीकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, गोकर्ण महाबळेश्वर इथे वास्तव्य केले व ते कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचे हृदयमीलन घडावे म्हणून ते कृष्णाकाठी श्रीक्षेत्र कुरवपूर इथे आले. इथेच त्यांनी अवतारसमाप्ती केली.
 
 
 
श्रीपादांचे वास्तव्य कुरवपुरात असताना ज्या दोन घटना घडल्या त्याचा संबंध त्यांचे उत्तरावतार श्रीनृसिंह सरस्वतींशी आहे. त्यांच्या जीवनाशी या दोन घटना जोडल्या आहेत. पहिली घटना म्हणजे कुरवपूर येथील वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची अंबिका नावाची पत्नी होती. तिची संतती वाचत नव्हती म्हणून ती दु:खी होती. पुढे तिचा एक मुलगा वाचला; परंतु तो जडमूढ निघाल्यामुळे समाजात तिला निंदेला तोंड द्यावे लागले. एक दिवस जीवन जगणे असह्य झाल्यामुळे ती कृष्णा नदीत जीव द्यायला निघाली. कृष्णा नदीत त्याच वेळी श्रीपादयती स्नानास आले होते. तेव्हा ती दोेघे त्यांच्या दर्शनास गेली आणि आत्महत्येच्या दोषातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांना प्रार्थना केली. तेव्हा आत्महत्येपासून परावृत्त करून श्रीपादांनी अंबिकेला प्रदोष व्रताचे महत्त्व सांगितले व त्याचे आचरण केल्याने तुझा पुत्र प्रज्ञावान होईल, असा आशीर्वाद दिला. तिच्या इच्छेनुसार पुढच्या जन्मी तुला ब्रह्मज्ञानी व जगदवंद्य पुत्र होईल, असाही आशीर्वाद दिला. ही अंबिका पुढे लाडकारंजा येथे जन्माला आली व तिने नृसिंहसरस्वती या श्रीपादांच्या उत्तरावताराला जन्म दिला. दुसरी घटना एका रजकभक्तांची आहे. श्रीपादांची भक्ती करीत असताना एका म्लेंछ राजाचे वैभव पाहून त्याला भुरळ पडली आणि स्वत:च्या परिस्थितीविषयी विषाद वाटला. तेव्हा त्याची मनोकामना ओळखून श्रीपादांनी त्याला पुढच्या जन्मी म्लेंछ राजा होऊन राज्यभोग मिळण्याचा आशीर्वाद दिला. गुरुविरहाच्या दु:खाने व्याकूळ झालेल्या श्रीपादयतींनी त्याला वर दिला की, पुढच्या जन्मी तू बिदर नगरात राजाचा जन्म घेशील तेव्हा नरसिंह सरस्वतीच्या रूपात अंतकाळी तुला मी भेट देईन. ही घटना पुढे सत्य झाली. दक्षिणोत्तर भारतामध्ये जे वैचारिक वैमनस्य होते ते श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपूरच्या वास्तव्यात दूर करून सर्वांचे मानसिक ऐक्य घडवून आणले.
 
 
श्रीनृसिंह सरस्वती या नावाने श्रीपाद श्रीवल्लभांनी पुन्हा अवतार घेतला. दरम्यानच्या कालखंडात भारतामध्ये परकीय यवन घुसले व त्यांनी केवळ आपले राजकीयच नव्हे, तर धार्मिक वर्चस्व स्थापन करायचा प्रयत्न केला. इ.स. 1312 मध्ये देवगिरीचे राज्य नष्ट होऊन महाराष्ट्रावर मुसलमानांचे राज्य सुरू झाले. इ.स. 1493 मध्ये बहामनीशाहीतून पाच शाह्या निर्माण झाल्या. यवनी सत्तेचा महाराष्ट्रावर भयंकर दुष्परिणाम झाला. लोक आपले स्वत्व विसरले. व्यसनात बुडाले, भांडणे, कलह यात गुंतले. आळशी झाले आणि आपले सांस्कृतिक वैभव गमावून बसले. इ.स. 1498 मध्ये वास्को दी गामा हा भारतात शिरला आणि पुढे डच, इंग्रज आणि फ्रेंच यांनी आपले वर्चस्व भारतात प्रस्थापित केले. पुढे मुसलमानांबरोबरच ख्रिस्ती लोकांनी हिंदू धर्माची निंदानालस्ती करून हिंदूंना बाटवले. पुढे हजारो लोकांना मुसलमान करून मुसलमानांचे राज्य स्थिर झाले. राजकीय व सामाजिक क्षेत्रांत हिंदूंची पीछेहाट झाली. जेव्हा वैदिक हिंदू तत्त्वज्ञान, संस्कृती, परंपरा, साहित्य यांना कुणी वाली उरला नाही, तेव्हा दत्त संप्रदायातील विभूतींनी अतुलनीय असे कार्य केले. श्रीदत्त संप्रदायातील सत्पुरुषांनी यवनी सत्तेला गाडून कुशल नेतृत्व करीत हिंदुत्वाची ध्वजा उंच फडकावली. हे कार्य त्यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत केले हे समजून घ्यायला हवे.
 

श्री  स्वामी  समर्थ  
 
श्रीनृसिंह सरस्वती
 
 
श्रीपाद श्रीवल्लभ निजानंदी बसले आणि काही वर्षांत परिस्थिती अशी निर्माण झाली की, दत्तावतार नृसिंह सरस्वती लोकोद्धारासाठी व हिंदू धर्माची पताका चिरंजीव फडकत राहावी म्हणून प्रकट झाली. पूर्वजन्मी दिलेल्या वरदानाप्रमाणे ते अंबिकाभवानी व माधव या ज्येष्ठ-श्रेष्ठ तपस्वी दांपत्याच्या पोटी जन्माला आले. वयाच्या सातव्या वर्षीपर्यंत मौन धरून त्यांनी उपनयन संस्कारप्रसंगी मुखातून प्रथम वेदवाणीचा उच्चार केला. नंतर वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांनी पूर्वसंकेतानुसार घर सोडले आणि श्रीदत्तात्रेय प्रभूंप्रमाणे भारतभर दिव्य संचार केला. कृष्णा-पंचगंगा संगमावर अमरापूर या गावी त्यांनी बारा वर्षे वास्तव्य केले. या प्रदीर्घ वास्तव्यामुळे या स्थानाला नरसोबाची वाडी हे नाव पडले. अमरापूरहून ते गाणगापुरी गेले व तिथे त्यांनी चोवीस वर्षे निवास केला. नृसिंह सरस्वतींकडे पाहून जनमानसाला आद्य शंकराचार्यांची आठवण झाली. लोकांना दिलासा मिळून त्यांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला. समाजाचे पुनर्जागरण करणारी संजीवनी म्हणजेच नृसिंह सरस्वती. जवळजवळ मुसलमान झालेल्या उत्तर भारतात श्री नृसिंह सरस्वतींचे वास्तव्य फार उपकारक ठरले.
 
 
गाणगापूरजवळ असलेल्या कडगंची गावी यवनांची सेवा करणारा सायंदेव त्यांना भेटला. बिदरचा पहिला बादशहा अहमदशहा याची राजवट इ.स. 1422 ते 1435 दरम्यान होती. तो क्रूर, ब्राह्मणद्वेष्टा आणि पाशवी अत्याचार करणारा होता. याच्यापासून वाचवून सायंदेवाला श्रीनृसिंह सरस्वतींनी प्राणदान दिले. सायंदेवाला श्रीनृसिंह सरस्वतींनी स्पष्ट सांगितले,
 
‘तुवां आता म्लेच्छांसी । सेवावंदन न करावे ।’
 
 
श्रीनृसिंह सरस्वतींनी क्रूर बादशहाच्या मनोवृत्तीत अकल्पित बदल घडवून आणला. त्याने सायंदेवाला मारण्याऐवजी त्याचा सत्कार केला. नंतर त्या पहिल्या बादशहाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मुलगा अल्लाउद्दीन हा गादीवर आला. हाच श्रीपाद श्रीवल्लभांनी पूर्वजन्मी वरदहस्त ठेवलेला रजक होय. त्याला पूर्वजन्मीचे स्मरण गुरुकृपेने झाले. तो गुरुचरणी लीन झाला व आपल्या राजधानीला भेट देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली तेव्हा श्रीनृसिंह सरस्वतींनी त्याला खडसावले. तुझ्या राज्यात नित्य धेनुहत्या, पाप, जुलूम चालतो तिथे आमच्यासारख्या तपस्वी संन्यासी यांनी कसे यावे? तत्कालीन परिस्थितीचा फायदा करून घेत द्रष्ट्या गुरूंनी बिंदरच्या राजधानीला भेट देऊन बादशहाला अनुकूल करून घेतले.
 
नंतर गाणगापुरी आपल्या पादुका व तेथील अणू-रेणूत अस्तित्व ठेवून शिष्यांचा निरोप घेऊन ते श्रीशैल पर्वताकडे गेले.
 
‘शिशिर ॠतु माघमासी ।
 
असित पक्ष प्रतिपदेसी ।
 
शुक्रवारी पुण्य दिवसी ।
 
श्रीगुरु बैसले निजानं देसी ॥’
 
निजानंदी गेल्यावर आपल्या शिष्यांसाठी त्यांनी चार शेवंतीची प्रसादपुष्पे पाठवली.
 
 
नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले आणि सुमारे सहाशे वर्षांनी भागीरथीच्या घनदाट जंगलात वारुळातून श्री स्वामी समर्थांच्या रूपातून पुन्हा जगदोद्धारासाठी प्रकटले.
 
 
( सदर लेख विवेक प्रकाशन प्रकाशित ‘सप्तर्षी‘ ग्रंथामधील श्री स्वामी समर्थ लेखातील काही भाग)