कर्मयोग्याची साधना

विवेक मराठी    10-Apr-2024   
Total Views |

ram naik
पद्मभूषण मा. राम नाईक नव्वदीत पदार्पण करीत आहेत. राम नाईक यांचे नव्वद वर्षांतील आयुष्य हे देवाने दिलेल्या दुसर्‍या पानासारखे आहे. त्यात उदंड अर्थ भरलेला आहे आणि नव्या पिढीला राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा देण्याचे बळही त्यात आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना राष्ट्रीय दृष्टी रामभाऊंनी कधी सोडली नाही. आमदार आणि खासदार म्हणून त्यांची कारकीर्द आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे मापदंड ठरविणारी आहे. ‘सा. विवेक’ परिवारातर्फे त्यांना अनंत शुभेच्छा आणि त्यांची शताब्दी साजरी करण्याचादेखील असाच सुखद अनुभव आम्हाला येवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
पद्मभूषण मा. राम नाईक नव्वदीत पदार्पण करीत आहेत. ’सा. विवेक’ परिवारातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांची शताब्दी साजरी करण्याचादेखील असाच सुखद अनुभव आम्हाला येवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
 
 
राम नाईक हे जनसंघाच्या पहिल्या पिढीतील कार्यकर्ते आहेत. 1951 साली जनसंघाची स्थापना झाली. 1960 सालापासून रामभाऊ नाईक यांनी गोरेगावमधून जनसंघाचे काम सुरू केले. राजकीय पक्ष म्हणून जनसंघाचा हा कालखंड बाल्यावस्थेतील कालखंड होता. राजकीय पक्ष म्हणून पक्षाला जनमान्यता प्राप्त झालेली नव्हती. या काळातील जनसंघाचे कार्यकर्ते ‘घरचं खाऊन लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचे’ काम करीत होते.
 
जनसंघाची स्थापना संघविचारातून झाली. यामुळे जनसंघाच्या पहिल्या पिढीतील बहुतेक सगळे कार्यकर्ते संघातून जनसंघात पाठविले गेलेले कार्यकर्ते होते. त्यांच्यापुढे एकच लक्ष्य होते, ते म्हणजे, आपला राष्ट्रीय विचार राजकारणात रुजवायचा. तेव्हाचे राजकीय-वैचारिक वातावरण जनसंघाच्या राष्ट्रवादी विचारांना सर्वस्वी प्रतिकूल होते. अशा प्रतिकूल कालखंडात राजकीय यशापयशाची अजिबात चिंता न करता पक्षाचे काम करीत राहाणे ही कार्यकर्त्यांची कसोटीच होती. राम नाईक हे अशा कार्यकर्ता वर्गातील एक आदर्श कार्यकर्ता आहेत.
 
संघाच्या कामाची पद्धती वेगळी आहे आणि राजकीय क्षेत्रातील राजकीय पक्ष म्हणून जनसंघाच्या कामाची पद्धती वेगळी होती. संघाच्या कामातून दखल घ्यावी एवढी मते मिळत नाहीत. मते मिळविण्यासाठी सतत जनसंपर्क करावा लागतो. जनतेचे जगण्याचे प्रश्न कोणते आहेत ते शोधावे लागतात. ते प्रश्न घेऊन जनआंदोलने करावी लागतात. मोर्चा, धरणे, सत्याग्रह इत्यादी सनदशीर मार्गांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी लागते. मुंबईतील जनसंघाचे कार्यकर्ते हे काम अतिशय निष्ठेने करीत होते, त्यामुळे त्यांची जनमान्यता हळूहळू वाढत गेली.
 

ram naik
 
आणीबाणीच्या कालखंडापूर्वी देशपातळीवर तसेच महाराष्ट्र आणि मुंबई स्तरावरदेखील भारतीय जनसंघ हा दखलपात्र पक्ष झाला. त्या पक्षाला एवढे बळ प्राप्त करून देण्यासाठी जे शेकडो कार्यकर्ते झिजले त्यामध्ये रामभाऊ नाईक यांचे स्थान फार मोठे आहे. 60 ते 70 च्या दशकात जनसंघ कार्यकर्त्यांकडे आणि नेत्यांकडे गाड्यादेखील नव्हत्या. भव्य कार्यालयेदेखील नव्हती. बहुतेक कार्यकर्त्यांची घरे हीच पक्षाची कार्यालये होती. सत्ताप्राप्ती करणे, आमदार होणे, खासदार होणे अशा व्यक्तिगत ध्येयाने या पिढीतील कोणीही कार्यकर्ता काम करीत नव्हता. रामभाऊंची गणना अशा कार्यकर्त्यांत करावी लागते.
 
 
यथावकाश रामभाऊ पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष झाले. 1980 साली पूर्वीच्या भारतीय जनसंघाचे नामांतर भारतीय जनता पार्टी असे झाले. नाव बदलले, पण विचार बदलला नाही आणि ध्येयदेखील बदलले नाही. राजकीय मार्गावर वैचारिक ध्येयवाटचाल करायची आहे, हे पक्कं होतं. ज्या जबाबदार्‍या येतील त्या स्वीकारायच्या. रामभाऊ मुंबई प्रदेशचे अध्यक्ष झाले. हे अध्यक्षपद त्यांनी तीन वेळा भूषविले. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा ते आमदार म्हणून विजयी झाले. (1978-89) यानंतर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम राम नाईक यांनी केला. राजकीय पक्षाच्या कामाची विभागणी सामान्यत: तीन स्तरांवर करता येते. पहिला स्तर संघटनात्मक कामाचा आहे. दुसरा स्तर जनसंपर्काचा आहे आणि तिसरा स्तर लोकप्रतिनिधींचा आहे. या तीनही क्षेत्रांत रामभाऊंनी अत्यंत भरीव काम केलेले आहे. आमदार आणि खासदार म्हणून त्यांची कारकीर्द आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे मापदंड ठरविणारी आहे. दरवर्षी ते आपल्या कार्याचा अहवाल जनतेला सादर करीत असतात. त्यांच्यापासून सुरू झालेल्या या प्रथेचे अनुसरण अनेक आमदार आणि खासदार आजही करताना दिसतात.
 
संसदीय लोकशाहीत आमदार किंवा खासदार हा राज्याच्या सार्वभौम शक्तीचा अंग असतो. राज्याची सार्वभौम शक्ती कायदे करणे, कायद्याची अंमलबजावणी करणे आणि कायद्यावर न्यायनिवाडा करणे या तीन माध्यमांतून व्यक्त होते. यासाठी लोकप्रतिनिधीला कायद्याचे भान असावे लागते. समाज हा सतत गतिशील असतो. नवीन परिस्थितीच्या संदर्भात नवीन कायदे करावे लागतात. विधानसभेत किंवा लोकसभेत त्यावर चर्चा होतात. त्या चर्चेत अभ्यासपूर्ण वक्तव्य करून भाग घ्यावा लागतो. राम नाईक यांची कारकीर्द मौनी खासदार किंवा आमदार अथवा झोपा काढणारा आमदार किंवा खासदार अशी राहिलेली नाही.
 
ते जागृत लोकप्रतिनिधी म्हणून वावरले. या बाबतीतही त्यांचा व्यवहार आदर्शवत राहिला. राजकीय पक्षाचे काम करणार्‍या नव्या पिढीतील कार्यकर्त्याने त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे. आताचा कालखंड एका अर्थाने सहज निवडून येण्याचा कालखंड आहे. सत्तेवर जाण्याचा कालखंड आहे. पद्मभूषण रामभाऊ नाईक यांनी या कोणत्याही शक्यता नसतानाच्या कालखंडात काम केले. येणारी पिढी मागील पिढीच्या खांद्यावरून येत असते, असे म्हणतात. हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
राजकीय क्षेत्रात काम करीत असताना राष्ट्रीय दृष्टी रामभाऊंनी कधी सोडली नाही. त्यांच्याच खासदारकीच्या काळात बोरिवलीला स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. संसदेत वंदेमातरम् आणि जनगणमन गाण्याची प्रथा राम नाईक यांच्या आग्रहामुळेच 1992 मध्ये सुरू झाली. बाँबेचे मुंबई त्यांच्यामुळेच झाले. मद्रासचे चेन्नई, कलकत्ताचे कोलकाता, बंगलोरचे बंगळुरू, त्रिवेंद्रमचे तिरुवनंतपुरम झाले. अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबादचे नामकरण अयोध्या असे झाले. परक्यांची राजवट असताना आपली मूळ नावे बदलून त्यांनी विदेशी नावे ठेवली. ही नावे बदलण्याचे काम राम नाईक यांच्या प्रयत्नांमुळे झाले. हे त्यांचे योगदान ऐतिहासिक समजले पाहिजे.
 
 
तसे पाहू जाता पद्मभूषण राम नाईक यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झालेला आहे. पुणे आणि मुंबई येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या घराण्याला राजकारणाची मोठी परंपरा नव्हती. राजकारण त्यांच्या पिढीपासून सुरू झालं. स्वकर्तृत्वाने ते अटलबिहारी शासनात दोनदा केंद्रीय मंत्री झाले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाले आणि 2024 साली राष्ट्रपतींनी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
 
 
विनोबांचे एक प्रसिद्ध वचन आहे, ते असे -
 
जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली
 
तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली
 
पहिल्या पानावर ‘जन्म’ लिहिला आणि
 
तिसर्‍या पानावर ‘मृत्यू’ लिहिला
 
जे दुसरे पान कोरे ठेवले,
 
ते मानवाच्या हातात आहे.
 
मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते.
 
या दुसर्‍या पानालाच ‘जीवन’ म्हणतात.
 
विनोबांनी परमेश्वराने दिलेल्या तीन पानांचा विचार मांडला आहे. दुसरे पान जीवन असते, ते माणूस जसा जगतो त्याने ते भरत जाते. राम नाईक यांचे नव्वद वर्षांतील आयुष्य हे देवाने दिलेल्या दुसर्‍या पानासारखे आहे. त्यात उदंड अर्थ भरलेला आहे आणि नव्या पिढीला राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा देण्याचे बळही त्यात आहे.
 
राजकीय क्षेत्र हे रामभाऊंच्या जीवनातील कार्यक्षेत्र राहिले आणि या कार्यक्षेत्रातील जी यशाची शिखरे असतात ती शिखरे ते चढत गेले. त्यासाठी त्यांना कोणाचीही मनधरणी करावी लागली नाही. स्वकर्तृत्वाने त्यांनी ही सर्व पदे मिळविली आहेत. जीवनात असे यश संपादन करण्याचा एक महान मंत्र हेन्री वर्डस्वर्थ लॉँगफेलो या अमेरिकन कवीने आपल्या ’लॅडर ऑफ स्टेंट ऑगस्टाईन’ कवितेत अशा प्रकारे मांडला आहे.
 
 
The heights by great men reached and kept
were not attained by sudden flight,
but they while their companions slept,
were toiling upward in the night
 
त्याचा मराठी भावानुवाद असा - शिखरावर गेलेल्या महान माणसांनी जी उंची गाठलेली असते, ती आकस्मिकपणे गाठलेली नसते. त्यांचे सहकारी जेव्हा झोपा काढीत असतात, तेव्हा रात्रीदेखील ते अपार कष्ट करीत राहतात. याला भगवान श्रीकृष्णाने ’कर्मयोगी’ असं म्हटलं आहे. या कर्मयोग्याला उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांची शताब्दी पाहाण्याचे भाग्यही आम्हाला लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.