साक्षेपी पुरातत्त्वशास्त्रज्ञ - के. के. मोहम्मद

विवेक मराठी    13-Apr-2024   
Total Views |
kk muhammed
‘भारत ः विरासत आणि संस्कृती’ या व्याख्यानाचे नुकतेच पुणे संवाद, डेक्कन कॉलेज आणि भांडारकर संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात त्यांच्या दोन मोठ्या कार्यांची माहिती दिली - एक अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिराचे उत्खनन आणि दुसरे बटेश्वर येथील मंदिरांचा जीर्णोद्धार.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आयोजित ’भारत ः विरासत आणि संस्कृती’ या व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. पुणे संवाद, डेक्कन कॉलेज आणि भांडारकर संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, ‘पुणे संवाद’चे संयोजक मनोज पोचट आदी उपस्थित होते. प्रमुख वक्ते ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात त्यांच्या दोन मोठ्या कार्यांची माहिती दिली - एक अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिराचे उत्खनन आणि दुसरे बटेश्वर येथील मंदिरांचा जीर्णोद्धार.
 
 
आपल्या व्याख्यानात के. के. मोहम्मद यांनी सांगितले की, मोहेंजोदाडो, हडप्पा, तक्षशिला, छानु दाडो ही उत्खनन केलेली, भारताचा समृद्ध वारसा सांगणारी सगळी गावे पाकिस्तानकडे गेली. भारतीय पुरातत्त्व संस्थेला हे शल्य स्वस्थ बसू देईना. स्वतंत्र भारतात, पुरातत्त्व विभागाने सिंधू संस्कृतीच्या स्थळांचा शोध तातडीने सुरू केला. निर्धाराने चाललेल्या या कामाला लवकरच फळ मिळाले - 1950 पर्यंत 70 नवीन स्थळांचा शोध लागला. फाळणीच्या जखमेवर ही एक हलकी फुंकर होती! त्यानंतर 70 च्या दशकात भारतीय पुरातत्त्व संस्थेचे (ASI) बी. बी. लाल ह्यांनी रामायण आणि महाभारतातील स्थळांचे उत्खनन हाती घेतले. त्यामध्ये - अयोध्या, चित्रकूट, हस्तिनापुर, इंद्रप्रस्थ आदी ठिकाणी उत्खनन केले गेले. याच दरम्यान गुजरातच्या समुद्रतटाजवळ अडख च्या एस. आर. राव ह्यांनी द्वारकेचा शोध सुरू केला. त्याच दशकात उपग्रहाद्वारे काढलेल्या चित्रांमधून वैदिक सरस्वती नदीचे पुरावे मिळाले. अशा प्रकारे 70च्या दशकात वेद, रामायण आणि महाभारताची ऐतिहासिकता सिद्ध करणारे हे पुरावे पुढे आले.
 
kk muhammed 
 
अयोध्येमध्ये पाच ठिकाणी उत्खनन चालू होते. त्यामध्ये एक स्थळ होते - रामजन्मभूमी मंदिराचे आवार. 1975-1977 मध्ये चालू असलेल्या ह्या कामात बी. बी. लाल यांच्याबरोबर एक युवक होता - के. के. महम्मद. ह्या उत्खननात अनेक गोष्टी मिळाल्या. जसे - प्राचीन देवालयाच्या स्तंभांचे अवशेष, देवतांच्या भग्न मूर्ती, सुंदरींच्या पुतळी, द्वारपाल, कलशाचे शिल्प, मकरप्रणाल इत्यादी. ह्या सर्व वस्तू केवळ एका हिंदू मंदिरातच असू शकतात. अर्थातच पूर्वी तिथे मंदिर नव्हते आणि पहिल्यापासून तिथे मशीद होती, ह्या मताला छेद दिला गेला. त्याच वेळी तेव्हा तिथे असलेल्या बाबरी ढाचामध्ये जुन्या मंदिरातील वापरलेले पूर्ण कलशाचे शिल्प असलेल्या स्तंभाचीही नोंद घेतली गेली.
 
 
ह्या उत्खननाशी काही संबंध नसलेल्या मार्क्सिस्ट इतिहासकारांनी मात्र अडख ला उत्खननात काही मिळाले नाही, अशा आशयाच्या मुलाखती इंग्रजी वृत्तपत्रांना दिल्या. रोमिला थापर, इरफान हबीब, आर. एस. शर्मा, डी. एन. झा आदी मार्क्सिस्ट इतिहासकारांनी मंदिराचा पुरावा मिळाला नाही, असे खोटेच निवेदन ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिले आणि ‘टाइम्स’नेदेखील शहानिशा न करता त्याची मोठी बातमी छापली. त्यावर बी. बी. लाल ह्यांनी प्राचीन मंदिराचे पुरावे मिळाल्याबद्दल मुलाखत दिली. त्यावर के. के. मोहम्मद ह्यांनी पुढे येऊन बी.बी. लाल यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. एका मुसलमान पुरातत्त्वशास्त्रज्ञाने, ज्याने अयोध्येत स्वतः उत्खननात भाग घेतला होता, त्याने दिलेल्या खुलाशाला अतिशय महत्त्व होते. के. के. मोहम्मद ह्यांच्यावर मार्क्सिस्ट इतिहासकारांनी अनेकदा दबाव आणला तरीही ते सत्यापासून ढळले नाहीत. अगदी त्यांचे निलंबन करायची वेळ आली तरी त्यांनी ‘स्वधर्मे निधनं श्रेयः’ हा गीतेतील श्लोक ऐकवला आणि जर मी माझे काम केले, माझे स्वकर्म केले, म्हणून माझ्यावर कारवाई होणार असेल तर खुशाल करा, असे म्हणाले.
 
kk muhammed 
 
के. के. मोहम्मद यांच्या संपूर्ण भाषणात अनेक संस्कृत श्लोक आणि सुभाषितांची पखरण होती. इतिहासाचा आणि पुरातत्त्वाचा अभ्यास करायचा असेल तर संस्कृत आणि इतिहास - पुराणांचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी मागे म्हटले होते. याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, हस्तिनापुरचे उत्खनन करताना पुराणातील हस्तिनापुरमध्ये आलेल्या पुराचे वर्णन आणि उत्खननात मिळालेले पुराचे पुरावे जोडता आले. ज्यामुळे उत्खननात मिळालेल्या माहितीला पुष्टी मिळते आणि ती भारतीय इतिहासाशी जोडता येते.
 
2005 मध्ये ASI ने चंबळ नदीच्या किनार्‍यावर असलेल्या पडझड झालेल्या 200 हून अधिक मंदिरांचे पुनर्निर्माण (reconstruction)चे कार्य हाती घेतले. ही बटेश्वर मंदिरे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात आहेत. ही मंदिरे शिव, विष्णू आणि देवीची आहेत. ह्या कामावर के. के. मोहम्मद ह्यांची नियुक्ती झाली. ह्या कामात दोन मोठे अडथळे होते. एक म्हणजे या संपूर्ण भागात डाकूंचे राज्य होते. एकेका डाकूवर दोनशे - चारशे - हजार खुनांचे, दरोड्यांचे खटले चालू होते. त्यांची प्रचंड दहशत असलेल्या ह्या दुर्गम भागात काम करणे मोठे जिकिरीचे होते.
 
 
हा संपूर्ण परिसर निर्भयसिंग गुर्जर आणि गदारिया डाकूंच्या जाळ्यात अडकला होता. त्या वेळी मोहम्मद ह्यांनी स्थानिक सरकारी यंत्रणा, पोलीस आणि शरण आलेल्या डाकूंची मदत घेऊन निर्भयसिंग गुर्जरशी संपर्क साधला. अतिशय धैर्याने आणि दृढनिश्चयाने निर्भय सिंगशी बोलणी केली. त्या वेळी शब्दात किंवा कृतीतली छोटीशी चूक झाली तरी ती आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते याची त्यांना जाणीव होती. तरीही, त्यांनी आपल्या मृदू भाषेने आणि सौम्य वर्तनाने, ह्या क्षेत्रावरील ताबा सोडण्यासाठी आणि एएसआयला काम करू देण्याची कळकळीची विनंती त्यांनी निर्भय सिंगला केली. त्यांनी पटवून दिले की, ही मंदिरे त्याच्या पूर्वज असलेल्या गुर्जर राजवंशाने बांधलेली होती. या पवित्र वास्तू पुनश्च उभ्या राहिल्याने त्याच्या पूर्वजांचा सन्मान होईल. तेथील डाकूंना समजावले की, ही देवाची स्थाने जी तुमच्या अनेक पिढ्यांनी शेकडो वर्षे सांभाळली आहेत, ती मंदिरे पुन्हा उभे करायचे काम आम्हाला करू द्यावे, अशी विनंती केली.
 
kk muhammed 
 
मोहम्मद यांनी केलेल्या विनंतीने आणि दूरदृष्टीमुळे प्रभावित झालेल्या डाकूंनी माघार घेतली. त्याच्या माणसांनी अनिच्छेने ते क्षेत्र रिकामे केले आणि एक उल्लेखनीय परिवर्तन घडण्याचा मार्ग निर्माण केला. के. के. मोहम्मद यांनी आपल्या चमूसह मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांना पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा कठीण प्रवास सुरू झाला.
 
 
दुसरे मोठे आव्हान होते पडझड झालेल्या मंदिरांचे. 8व्या शतकात बांधलेली मंदिरे 13व्या शतकात झालेल्या भूकंपाने आणि नंतर नैसर्गिक कारणांनी पडून गेली होती. केवळ दगडांचे ढिगारे पडले होते. एका दृष्टीने डाकूंच्या तेथील वावरामुळे नकळतपणे बटेश्वर मंदिर परिसर सुरक्षित राहिला होता. त्यांच्यामुळे या ऐतिहासिक स्थळावरून पडलेल्या एकाही दगडाला इजा पोहोचली नव्हती. तसेच येथील स्थानिक लोकांनी काहीही लुटले नव्हते. सगळे दगड तसेच तिथे पडून होते. त्यात मोठमोठे वृक्ष वाढले होते. त्या सगळ्या पसार्‍यातून मंदिरांचा पाया शोधून, त्याचे स्तंभ बरोबर शोधून, शिखरे आणि शिल्पकाम केलेले दगड शोधून पुन्हा मंदिरे बांधायची होती. एक प्रचंड मोठे jigsaw puzzle सोडवण्यासारखे होते.
 
 
विखुरलेले मंदिराचे दगड योग्य जागी एकमेकांना जोडणे हे एक गुंतागुंतीचे कोडेच होते. मार्गदर्शन करण्यासाठी कोणतीही ब्ल्यू प्रिंट किंवा मास्टर प्लॅन नव्हता. 8व्या शतकातील तशा प्रकारच्या इतर मंदिरांचे प्लॅन, तसेच मंदिर स्थापत्याने ग्रंथांचा आधार घेतला. स्थापत्यशास्त्राच्या - मनसार शिल्पशास्त्र आणि मयमत वास्तुशास्त्र ह्या ग्रंथांचे अनुसरण केले. त्यावर अंदाज बांधत मोठ्या कष्टाने इतस्ततः पसरलेले दगड एकत्र करून ही बांधणी सुरू झाली.
 
 
एका मंदिराच्या समोर एक लहानशी खाच होती. मंदिर शिवाचे होते, म्हणजे त्या खाचेत पूर्वी नंदी बसवला असावा असा अंदाज बांधून ते आजूबाजूला नंदी शोधू लागले. पाहतात तर प्रदक्षिणा मार्गावर त्यांना खरोखरच एक सुरेख नंदी मिळाला. बाराशे वर्षांच्या पूर्वीच्या नंदीची मोहम्मदांनी पुन्हा एकदा त्याच्या प्राणप्रिय अशा शिवासमोर स्थापना केली.
 
 
पहिल्या चार महिन्यांत त्यांनी एक मंदिर उभे करून दाखवले. मग पुढच्या कामाची परवानगी मिळाली. मग एक एक करत मंदिरे उभी राहू लागली. लागेल तशी वाढलेली झाडे तोडून, मंदिराचे काही भाग जे जमिनीखाली गाडले गेले होते ते खणून काढून, जागा स्वच्छ आणि सपाट करून, नव्याने बांधकाम सुरू झाले. मोहम्मद ह्यांनी झाडे तोडताना आगम ग्रंथात सांगितलेल्या पद्धतीने तोडल्याची माहिती दिली. ते म्हणाले, आधी जे झाड तोडायचे आहे त्याची पूजा करून, मंत्र म्हणून, झाडाची क्षमा मागून, झाडावर राहणार्‍या पक्ष्यांची, कीटकांची क्षमा मागून मग झाडे तोडली पाहिजेत.
मोहम्मद ह्यांनी स्थानिक लोकांनादेखील ह्या कामात जोडून घेतले. जिथे उत्खननाचे काम चालत असे तिथे मोहम्मद ह्यांनी कामगारांच्या लहान मुलांसाठी शाळादेखील सुरू केल्या. त्यांच्या दिल्लीतील पुराना किल्ला येथील शाळेला अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा ह्यांनी भेट दिली होती. चंबळच्या खोर्‍यातील स्थानिक लोकांना इथे काम करून एक तर उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आणि आता त्यांच्यापैकी काहींना प्रशिक्षण देऊन गाईडचे कामदेखील दिले आहे.
सुमारे 100 मंदिरे आता बांधून झाली आहेत. के.के. यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (अडख) पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या पथकाने जीर्णोद्धाराचा एक अद्भुत पराक्रम केला. बटेश्वरच्या जीर्णोद्धारासाठी त्यांना भरघोस मदत मिळाली ती इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांची. त्यांनी इतक्यातच ह्या कामाला 4 कोटी रुपयांची मदत दिली. तसेच त्या वेळेच्या केंद्रीय पर्यटनमंत्री अंबिका सोनी यांचीदेखील मदत मिळाल्याचे सांगितले. आता मंदिरे उभी राहू लागली तसा पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. ह्या दरम्यान अनेक डाकू पकडले गेले, त्यांची दहशत कमी झाली आणि मग खाणमाफियाला कुठलाच धाक राहला नाही. ते मोठ्या प्रमाणात त्या भागाचे नुकसान करू लागले. त्यासाठी करत असलेल्या स्फोटांमुळे मंदिरांना धोका उत्पन्न झाला होता. सरकारदरबारी तक्रारी केल्या तरी त्याचा उपयोग होत नव्हता, तेव्हा मोहम्मद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुदर्शनजी ह्यांची मदत मागितली. त्यांनी तत्काळ सरकारी यंत्रणेला ह्यावर काम करावयास उद्युक्त केले आणि खाणमाफियांचे प्राबल्य कमी झाले.
अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात बोलताना मोहम्मद म्हणाले की, मध्ययुगीन कालखंडात झालेल्या आक्रमणाला आणि मंदिर विध्वंसाला आजचे मुस्लीम जबाबदार नाहीत. मात्र, या आक्रमणाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करणारे नक्कीच दोषी आहेत. माझ्या पूर्वजांकडून भारतातील हजारो मंदिरांचा विध्वंस झाला. त्याचे पारिपत्य म्हणून माझ्या हातून हे प्राचीन मंदिरांच्या पुनर्निर्माणाचे कार्य झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आधुनिक समाज म्हणून आपण ऐतिहासिक तथ्ये स्वीकारायला हवीत. मुस्लिमांसाठी ज्याप्रमाणे मक्का आणि मदिना पवित्र आहेत. त्याचप्रमाणे हिंदूंसाठी काशीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थळ पवित्र आहेत. मुस्लिमांच्या दृष्टीने तेथे केवळ एक प्रार्थनास्थळ आहे जे तिथून हलवले जाऊ शकते. स्थानमाहात्म्यामुळे हिंदू मंदिर मात्र त्याच ठिकाणी असायला हवे. मुसलमानांनी स्वतःहून ही स्थाने हिंदूंना सुपूर्त करावी, असेही मोहम्मद शेवटी म्हणाले.
भांडारकर इन्स्टिट्यूटच्या खुल्या अँफिथिएटरमध्ये या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ’पुणे संवाद’ या गटाने आयोजिलेले हे दुसरे व्याख्यान होते. पहिल्या संवादपुष्पात विक्रम संपत, जे. साई दीपक व शेफाली वैद्य यांनी विक्रम संपत यांच्या काशी विश्वनाथ मंदिरावरील पुस्तकाविषयी चर्चा केली होती. दोन्ही कार्यक्रमांना पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
एका साक्षेपी पुरातत्त्वशास्त्रज्ञाची झालेली भेट उपस्थितांना समृद्ध करून गेली.

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com