सा. विवेकच्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ग्रंथाचे होणार सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन

विवेक मराठी    15-Apr-2024
Total Views |

rss
१८ एप्रिल रोजीच्या रेशीमबाग येथे कार्यक्रम होणार, रमेश पतंगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि विचारांची व्याप्ती, विस्तार आणि परिणाम यांचा सखोल आढावा घेणाऱ्या 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती' या साप्ताहिक विवेकच्या ग्रंथाचे प्रकाशन येत्या गुरूवार, दि. १८ एप्रिल रोजी पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते नागपूर येथे होणार आहे.
 
 
डॉ. हेडगेवार स्मारक समिती, रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृह येथे सायंकाळी ६.३० वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ लेखक-विचारवंत श्री. रमेश पतंगे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि नागपूर महानगर संघचालक श्री. राजेशजी लोया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी निर्माण झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघ संस्थापक पू. डॉ. हेडगेवार यांच्यापासून चालत आलेला संघाचा पुण्यप्रवाह आज डॉ. मोहनजी भागवत यांच्यापर्यंत सशक्तपणे व स्पष्टतेने प्रवाहित झाला आहे. आज विविध आयामांच्या व गतिविधींच्या माध्यमातून संघ सर्वदूर पोहोचला आहे. येत्या संघशताब्दीच्या निमित्ताने संघ कार्यकर्त्यांचे भावविश्व व संघाने घडवलेले सामाजिक परिवर्तन यांचे विविध पैलू सा. विवेकच्या या ग्रंथात तपशीलवार शब्दबद्ध झाले आहेत. आपल्या स्थापनेचा अमृत महोत्सव साजरा करत असलेल्या साप्ताहिक विवेकच्या या महत्वपूर्ण ग्रंथाच्या नोंदणीस महाराष्ट्रासह देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
 
 
तेव्हा पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते होत असलेल्या या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास तमाम राष्ट्रीय विचारांचे कार्यकर्ते, बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साप्ताहिक विवेकद्वारा करण्यात आले आहे.