पार्वती बारुआ

विवेक मराठी    15-Apr-2024   
Total Views |

vivek
 
हत्तींना माणसाळवणारी भारतातील पहिली पद्मश्रीप्राप्त हत्ती प्रशिक्षिका
(1954)
 
यंदाच्या पद्म पुरस्कारार्थींमधलं एक नाव हत्ती प्रशिक्षिका पार्वती बारुआ यांचं. पार्वती बारुआ आसाममधील गौरीपूर राजघराण्यातील. गुवाहाटी विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली, पण हत्तींना नियंत्रित करण्याच्या कलेशी वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा संबंध आला आणि गेल्या 56 वर्षांत या शास्त्राशी आणि कलेशी प्रामाणिक राहत त्यांनी इतकं मोठं आणि महत्त्वाचं काम केलं आहे की या विषयात कुणा विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट द्यावी अशा योग्यतेचं ते ठरलं आहे.
 
 
पी.सी. बारुआ हे गौरीपूर या संस्थानाचे भूतपूर्व राजे. पार्वती ही त्यांची मुलगी. आसामच्या जंगलात ते ओळखले जात लालजी या टोपण नावाने. वर्षातील सहा ते नऊ महिने ते आणि त्यांचे कुटुंबीय जंगलात राहत. लालजींना चार बायका आणि नऊ मुलं. जंगलात जाताना लालजींबरोबर सत्तरेक कर्मचार्‍यांचा ताफा असे. त्यात डझनभर आचारी असत, डॉक्टर असे, न्हावी असे आणि मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकही असे. पार्वती ही त्या नऊ मुलांतील त्यांची सर्वात लाडकी. असं म्हणतात की तिने डोळे उघडले तेच मुळात हत्ती पाहत..
 
लालजींनी आसामच्या जंगलात वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो प्राण्यांची शिकार केली, परंतु चुकूनही त्यांनी एकदादेखील हत्तीची शिकार केली नाही. कारण स्पष्ट होतं, हत्ती हा बारुआ कुटुंबासाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा प्राणी. हिंदूंप्रमाणेच पूजला जाणारा. मुघलांचं राज्य भारतावर होतं, तेव्हा संस्थानांकडून जी कराची वसुली केली जात असे, त्या करापोटी बारुआंनी सहा सहा जंगली हत्ती कररूपाने दिले होते. पण 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताच्या सरकारने संस्थानिकांचे तनखे काढून घेतले, अधिकार रद्द केले आणि लालजींचे पंखच छाटले गेल्यासारखे झाले. त्यांचा राजवाडाही गेला आणि त्यातले चाळीस हत्तीही त्यांच्यापासून हिरावले गेले.
 
 
लालजी जंगलाच्या आश्रयाला गेले, त्यांच्याबरोबर पार्वतीही गेली. बाप-लेकीने मिळून अनेक जंगली हत्ती पकडले, त्यांना माणसाळवलं आणि खाजगीरित्या व सोनेपूरच्या यात्रेत नेऊन विकले. आज उत्तर आणि ईशान्य भारतात हिंदू मंदिरांमध्ये किंवा लाकडाच्या व्यापार करणार्‍या जंगलातील ठेकेदारांकडे किंवा राजस्थानी महालांमध्ये पर्यटकांना रिझवण्यासाठी जे हत्ती पाळलेले दिसतात, ते सर्व लालजी आणि पार्वतीने पकडून दिलेले आहेत, हे विसरता येणार नाही.
 
 
1977मध्ये भारत सरकारने हत्ती पकडण्यावर आणि त्यांचा व्यापारी वापर करण्यावर बंदी घातली. लालजी दुखावले गेले, त्यांचा जीवनोद्देशच संपला, तब्येत खालावली आणि त्यांचं निधन झालं. पार्वतीने कुटुंबीयांच्या साक्षीने वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि सर्व विधी पार पडताच ती एकटीच जंगलात परतली. शिकारखोर माणूस, त्याची शिकारीची लालसा आणि नऊ हजारांच्या संख्येत उरलेले जंगली हत्ती हा भविष्यातला संभाव्य संघर्ष तिला दिसत होता. पार्वती बारुआ यांनी हे आव्हान पत्करायचं ठरवलं. किमानपक्षी हत्तींना वाचवावं, त्यांना शिकारखोर माणसापासून सुरक्षित ठेवावं याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
 
 
पश्चिम बंगालच्या जलपैगुरी विभागातील जंगलामध्ये हत्तींची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. वीस वर्षांपूर्वी या भागात एक हजारच्या संख्येत हत्ती होते, आता ही संख्या कमी होत होत 185वर आली आहे. आसामच्या सीमावर्ती भागात बोडो अतिरेक्यांनी केलेली हत्तींची कत्तल चिंताग्रस्त करणारी आहे. या जंगलातील हत्ती 15 मिनिटं जरी चालत गेला, तरी तो जंगलाच्या बाहेर पडतो, मानवी हद्दीत पोहोचतो. मानवाने केलेलं हे अतिक्रमण त्याला सहन होत नाही, हत्ती नकळत शेतीत शिरतो, माणूस त्याच्या या घुसखोरीवर चिडतो आणि हत्तीला गोळी घालतो. अनेक हत्ती साखरेच्या मळीकडे आकर्षित होतात, एखाद्या भांड्यातली मळी त्यांना मिळते आणि ती तोंडाला लावलेला हत्ती बेभान होऊन थैमान घालत नासधूस करतो.
 
भूतानच्या पायथ्याशी असलेल्या सुभासिनी टी इस्टेट परिसरात पार्वती बारुआ यांनी नदीकाठी एक फार्महाउस बांधलं आहे. तिथे त्या राहतात. एस.एस. बिश्त हे या भागातील वनाधिकारी, ते पार्वती यांना अनेक वर्षं ओळखतात. ते म्हणतात, “पार्वतीच्या आवाजात काय जादू आहे समजत नाही, परंतु तिचा आवाज ऐकल्यानंतर हत्ती शांत होतात, ती सांगेल तसं वागतात.” बिश्त यांनी एकदा एका हत्तीसमोर पार्वतीला मिठी मारली. हत्तीने ते पाहिलं आणि सोंडेने इशारा करत बिश्त यांना दूर होण्यास सुचवलं.
 
पार्वती बारुआ यांनी पहिला वयात आलेला जंगली हत्ती पकडला, तो वयाच्या 14व्या वर्षी. हे कसं शक्य झालं? असं विचारलं असता त्या म्हणतात, “हत्तीला पकडण्यासाठी केवळ शक्तीची गरज नसते. तुमची मानसिक तयारी असावी लागतेच, तसंच नशिबाचे फासेही तुमच्या बाजूने पडावे लागतात. जंगली हत्ती पकडणं तसं धोकादायक असतं. बेफाम झालेल्या हत्तीच्या गळ्यात लोखंडी साखळ्यांचे फास टाकावे लागतात, कोणतीही दुखापत होणार नाही अशा पद्धतीने त्यांना ताब्यात घ्यावं लागतं आणि मग त्यांना माणसाळायला काही महिने द्यावे लागतात.” पार्वती यांनी पकडलेल्या, माणसाळवलेल्या आणि शिकवलेल्या तीन हत्तीणी - लक्ष्मीमाला, आलोका आणि कांचनमाला खूप लोकप्रिय बनल्या आहेत. वर्षानुवर्षं लालजींबरोबर राहून हत्तींना माणसाळवायचं तंत्र त्यांनी शिकून घेतलं आहे. हत्तींचा मसाज, त्यांना नदीपात्रात घातली जाणारी अंघोळ, त्यांचं खाणं-पिणं, त्यांची देखभाल अशा बर्‍याच गोष्टी..
 
 
हत्ती व्यवस्थापन हीदेखील एक कला आहे. त्याचंही अभ्यासाने, अनुभवाने बनवलेलं तंत्र आहे, त्या तंत्रात रिटेक नावाची गोष्टच नसते. जे काही करायचं ते एकदाच, बिनचूक राहून. त्या म्हणतात, “मला बिहार, पश्चिम बंगाल, आसाममधून हत्ती पकडण्यासाठी, त्यांना माणसाळवण्यासाठी बोलावतात, त्यांचं व्यवस्थापन पाहण्यासाठी बोलवतात. पण आता वयोमानाप्रमाणे नको वाटतं. ही शेवटचीच ट्रीप असं मी स्वत:शी म्हणते, पण माझ्यातला माहूत मला स्वस्थ बसू देत नाही.”
 
त्या मोहिमेवर जातात, तेव्हा त्यांचा वेष पूर्ण पाश्चिमात्य असतो, त्यात विरलेल्या रंगाची जीन्स, शिकारी घालतात तसं तांब्याची चकाकती बटणं असलेलं जाकीट, सोलर टोपी, डोळ्यांवर सनग्लासेस असतात, कंबरेच्या पट्ट्यात खुकरी खोचलेली असते. चार्ल्स ब्रॉन्सन, जॉन वेन हे त्यांचे आवडते हिरो. त्यांचे असंख्य चित्रपट त्यांनी पहिले आहेत, त्या पाहतातही. परंतु एरवी मात्र आसामी पद्धतीचा मेखला चादर नेसून वावरणं त्यांना आवडतं. त्या चटईवर उशी न घेता झोपतात, त्यांच्या शय्येशेजारी कायम लालजींचा सेपिया टोनमधला फोटो ठेवलेला असतो.
 
दोरखंड, साखळ्या, खुकरी ही त्यांची मोहिमेवर निघतानाची प्रमुख साधनं. मोहिमेवर निघण्यापूर्वी त्यांचीही काही ठरलेली आन्हिकं असतात, कालीमाता, गणपती, सतशिकारी (वनदेवता) आणि मुस्लीम संत माहूत पीर याची पूजा करूनच त्या बाहेर पडतात. गेली दोन दशकं त्या एकाकीपणे हत्तींना वाचवण्यासाठी झटत आहेत. त्यांचं म्हणणं नेमकं मर्मावर बोट ठेवणारं आहे. त्या म्हणतात, “एक माणूस हत्तीने मारला, तर फार चिंता करायचं कारण नाही. माणसांची संख्या मोठी आहे. पण एक हत्ती मारला गेला, तर आधीच कमी होत असलेली हत्तींची उरलीसुरली जमात नष्ट होण्याच्या मार्गावर उभी ठाकेल, हे विसरता येणार नाही.”

सुधीर जोगळेकर

  सुधीर जोगळेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत..