हैदराबाद - विजयपताका फडकणार?

विवेक मराठी    15-Apr-2024
Total Views |
@चिन्मय रहाळकर
सध्या सगळीकडे एप्रिलपासून सुरू होणार्‍या लोकसभा निवडणुकांची धामधूम चालू आहे. बहुधा भारतातील प्रत्येक घरात या निवडणुकांची आणि देशातल्या राजकारणाची चर्चा चालू असणार. लोकसभेच्या एकूण 543 जागा जरी असल्या तरी प्रत्येक ठिकाणची परिस्थिती सारखी नसते. वायनाडच्या जागेकडे सगळ्यांचे लक्ष आहे तसेच वाराणसीला नरेंद्र मोदी किती मतांनी जिंकणार याच्याबद्दलही सगळ्यांच्या मनात उत्सुकता आहे. याबरोबरच यंदा हैदराबाद शहराच्या लोकसभेच्या जागेलाही नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. या जागेवर 2004 पासून असदुद्दीन ओवेसी जिंकून येत आहेत आणि त्याआधी या जागेवर 1984 पासून ओवेसी यांचे वडील, सुलतान शहाबुद्दीन ओवेसी जिंकून येत असत. म्हणूनच हा मतदारसंघ ओवेसी कुटुंबाचा अजिंक्य बालेकिल्ला मानला जातो. ओवेसी कुटुंबीय अखिल भारतीय मजिलिस-ए-ईत्तेहुदुल-मुसलमीन (एम-आय-एम) हा राजकीय पक्ष चालवितात. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत ही जागा भाजपानेही नव्या जोशात लढविण्याचे ठरवलेले दिसते. पक्षाने इथे श्रीमती माधवी लता यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. प्रखर हिंदुत्ववादी आणि भरीव समाजकार्य करणार्‍या माधवी लता या उत्कृष्ट वक्त्या आणि एक निडर कार्यकर्त्या आहेत. या पार्श्वभूमीवर या दोघांमधील संभाव्य लढतीचा घेतलेला वेध...

hyderabad election
हैदराबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लाख 57 हजार मतदार आहेत आणि या मतदारसंघात एकूण 7 विधानसभा जागा येतात. इथे 59% मतदार मुस्लीम समाजाचे आहेत व उर्वरित हिंदू मतदार आहेत. सन 2009 च्या काँग्रेसच्या वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या सरकारने केलेल्या डिलिमिटेशनच्या अंतर्गत हिंदू विभाग दुसर्‍या भागात टाकले गेले आणि त्यामुळे या मतदारसंघात मुस्लीम मतदारांचे सांख्यिक वर्चस्व वाढले. येथील 7 विधानसभा जागांपैकी 6 जागांवर नेहमी ओवेसी यांचा पक्षच निवडून आलेला आहे. एक विधानसभेची जागा- गोशामहाल इथून भाजपाचे राजा सिंग नेहमी निवडून येतात. मुस्लीम समाजाचे वर्चस्व असलेल्या या भागात हिंदूंच्या अस्मितेसाठी सतत संघर्ष करणारे राजा सिंग नेहमी वादाच्या भोवर्‍यात असतात.
 
 
असदुद्दीन ओवेसी 2004 पासून या मतदारसंघातून जिंकून येत आहेत. त्यांचा मुस्लीम समाजावर चांगलाच पगडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात निझामच्या रझाकारांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. भारत सरकारने हैदराबाद भारतात विलीन केल्यावर रझाकारांवर कारवाई केली. मात्र एम-आय-एम हे त्या रझाकारांचे राजकीय रूपांतर आहे असे म्हणता येईल. काही वर्षांपूर्वी असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे भाऊ, अकबरुद्दीन ओवेसी यांनी हिंदूविरोधी फार प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्या वेळी त्यांच्यावर टाकलेली पोलीस केस अजूनही चालूच आहे. असे असले तरी, उत्तम वक्ते, इस्लामचे आणि हैदराबादच्या मुस्लीम समाजाचे रक्षक, उत्तरेत ज्यांना ’बाहुबली’ म्हणतात तशा प्रकारची प्रतिमा ओवेसी कुटुंबीयांची आहे. ओवेसी कुटुंबीय ओवेसी हॉस्पिटल नावाने एक मोठे रुग्णालय चालवते आणि ’दारूस्सलाम’ नावाची बँकही या कुटुंबाच्या आधिपत्यात आहे. याव्यतिरिक्त दारूस्सलाम एज्युकेशन ट्रस्ट या छत्राखाली अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये हे कुटुंबीय चालवितात. या सगळ्या संस्थांचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी किंवा त्यांचे धाकटे बंधू, अकबरुद्दीन ओवेसीच आहेत. आपली चांगली प्रतिमा जनमानसात रुजवण्यासाठी या बँक आणि रुग्णालयाचा ओवेसी कुटुंबीय चांगलाच फायदा उठवितात.
 
 
थोडक्यात, जनमानसावर पकड असलेल्या अतिशय प्रभावी अशा ओवेसींविरुद्ध आव्हान उभे करणे सोपे नाही. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपा कुठल्याही पक्षाला किंवा मोठ्या नेत्याला ’वॉक-ओव्हर’ देत नाही. किमान आव्हान तरी दिले जातेच आणि या आव्हानाला बळ द्यायला पक्ष, पक्षाधिकारी अहोरात्र झटतात. या विचारांतून भाजपाने माधवी लता यांना ओवेसीविरुद्ध उभे केले आहे. ही लढत लता यांच्यासाठी सोपी नसली तरी त्या विजयी होण्याची शक्यता दोन कारणांमुळे आहे. पहिले कारण म्हणजे, श्रीमती माधवी लता यांच्यासारख्या तडफदार, झुंजार आणि समाजात प्रभाव असलेल्या व्यक्तीला दिली गेलेली उमेदवारी आणि दुसरे म्हणजे गेल्या दोन दशकांत रा.स्व. संघ आणि भाजपाने मुस्लीम समाजासाठी केलेले कार्य.
 
 


hyderabad election
 
श्रीमती माधवी लता नुकत्याच ’आप की अदालत’मध्ये आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल साधारण माहिती सगळ्यांना आहेच. त्या अस्सल हैदराबादी आहेत. त्यांचे जीवन आणि शिक्षण हैदराबादेतच झाले आहे. त्यांच्या वाढत्या वयात त्या जिथे राहात असत तिथे हिंदू-मुस्लीम दंगली फार होत असत. त्यामुळे त्यांना हिंदू-मुस्लीम यांच्यामधील संवेदनशील संबंधांची चांगलीच जाणीव आहे. त्यांचे शिक्षण हैदराबादेतील प्रसिद्ध निझाम कॉलेजमधून झाले आहे. त्या वैद्यकीय डॉक्टर नाहीत. मात्र त्यांनी आणि त्यांच्या यजमानांनी मिळून वीरेंची नावाचे रुग्णालय चालू केले आणि त्या माध्यमातून जनसेवेचा एक मार्ग या दांपत्याला खुला झाला. हे रुग्णालय हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात आहे. या भागातही मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो सुशिक्षित आणि सधन आहे. हा समाज विचारात पुढारलेला आहे. त्यांची मते लता यांच्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लता यांच्या उमेदवारीची हैदराबादेत चांगलीच हवा आहे. लोकांमध्ये कुतूहल आणि उत्सुकता दोन्ही आहे. हैदराबाद शहर इंटरनेटमध्ये प्रगत आहे आणि मुख्यतः तरुण वर्ग मोबाइलमध्ये मग्न असतो. हे लक्षात घेऊन लता यांनी ऑनलाइन प्रचाराकडे सुरुवातीपासून लक्ष दिले. त्यांनी कुठल्याही तर्‍हेची प्रक्षोभक वक्तव्ये केली नाहीत. विकास हाच त्यांचा मुख्य मुद्दा आहे. त्या हैदराबादला आणि समाजाला भेडसावणार्‍या प्रश्नांबद्दलच फक्त बोलतात. मोदी सरकारने राबवलेल्या अनेक धोरणांचा त्या प्रचार करतात आणि त्याचा उपयोग कसा सगळ्यांना झाला आहे, हा संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचवीत आहेत. एकूण इंटरनेटचेे मायाजाल असो की थेट प्रचार असो, लता आणि त्यांची टीम ही जागा जिंकण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहे.
 
 
2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा हैदराबाद मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकावर होता आणि जवळपास 25% टक्के मते पक्षाला मिळालेली आहेत. याचा अर्थ मुस्लीम समाजही भाजपाला मते देत आहे आणि निवडणुकांमध्ये गणित महत्त्वाचे असले तरी आकडे नेहमी चपखल बसतातच असे नाही. मतांची टक्केवारी थोडी जरी इकडेतिकडे झाली तरी निर्णय झपाट्याने बदलू शकतो.
 
hyderabad election
 
 
गेली काही वर्षे रा. स्व. संघ आणि भाजपा मुस्लीम समाजात राष्ट्रीयतेची जाणीव रुजविण्यासाठी आणि सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी मुस्लीम राष्ट्रीय मंच स्थापन करून त्याद्वारे मुस्लीम समाजाच्या समस्यांवर काम चालू आहे. त्या समस्यांचे मुस्लिमेतर समाजाशी साम्य आणि त्यामुळे, या सगळ्या समस्या सोडविण्यात सगळ्यांचे भले होणार, हा विचार मांडला जातो आहे. मुस्लीम समाजाला राष्ट्रवादी विचारसरणीकडे वळविण्याचा हा एक प्रयत्न आहे.
 
 
दुसरे म्हणजे, मुस्लीम समाज हा एकसंध नाही. या समाजात अश्रफ, अजलफ आणि अर्जल हे गट (किंवा जाती) आहेत. यातील अश्रफ यांचे पूर्वज हे काही शतकांपूर्वी परदेशातून (मध्य आशिया, इराण इत्यादी) आलेले आहेत, तर अजलफ आणि अर्जल यांना पसमंदा म्हणतात. हे मूळ भारतीय आहेत. साहजिकच पसमंदा मुस्लीम गट बहुसंख्य आहे. या गटाला भेडसावणार्‍या समस्या म्हणजे गरिबी, साधने आणि संधींचा अभाव, शिक्षणाचा अभाव आणि एकूणच प्रगतीचे मार्ग कमी. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार लक्ष देऊन गांभीर्याने कामे करीत आहे. सामाजिक समस्यांतील तीन तलाक या कुरीतीला आळा घालून मोदी सरकारने मुस्लीम स्त्रियांना एक नवीन ओळख आणि आत्मविश्वास दिला आहे.
 
 
या सगळ्या सकारात्मक, एकीकरणाचे उद्दिष्ट ठेवून उचललेल्या ठसठशीत पावलांच्या खुणांचे प्रतिबिंब मतदानात नक्कीच दिसेल. म्हणूनच ओवेसी यांना यंदाची निवडणूक सोपी नाही. केवळ वादाचे भोवरे उठवून भागणार नाही वा उत्तर प्रदेशात एका कुख्यात गुंडाच्या जेलमध्ये झालेल्या निधनानंतर भेटी देऊन पुरणार नाही, तर ओवेसी यांनी समाजासाठी काय काम केले आहे याचा जाब मतपेटीतून विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. धर्माच्या आडून धर्मांधतेचा प्रचार करणार्‍या आणि धर्मांधतेला वाव देणार्‍या व्यक्तीस मत द्यायचे की गरजू व्यक्तीचा धर्म न बघता जनसेवा आणि लोकहितासाठी काम करणार्‍या व्यक्तीस मत देऊन आपला पुढारी म्हणून निवडून द्यायचे, या प्रश्नाचा मुस्लीम मतदारांनी गंभीरपणे विचार करायला हवा.
 
 
 
हैदराबादसारख्या एका महत्त्वाच्या मतदारसंघात माधवी लता यांच्यासारख्या धडाडीच्या आणि कर्तृत्ववान व्यक्तीला उमेदवारी दिल्याबद्दल भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचे आपण अभिनंदन करायला हवे. अंतिम निर्णय काही का लागेना; पण पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून समाजाच्या सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याचे लक्ष्य ठेवून काम करणार्‍या श्रीमती माधवी लता यांना यश मिळेल, अशी आशा करू या.