वंदेऽ हं श्रीशितळादेवी!

विवेक मराठी    16-Apr-2024
Total Views |
@प्रा. स्मिता पाटील  8007848384
श्रीशितलामाता ही पालघर पंचक्रोशीतील भाविकांचे आराध्यदैवत. केळव्यातील श्रीशितलामातेची जत्रा केळवे गावात चैत्र पौर्णिमेला भरते. पौर्णिमेच्या आधीचा एक दिवस आणि नंतरचा एक दिवस मिळून तीन दिवसांची ही जत्रा भरते. जत्रेच्या तिन्ही दिवसांत पालघर पंचक्रोशीतील सगळ्या वाटा केळव्याच्या दिशेने माणसांनी आणि वाहनांनी तुडुंब भरून वाहू लागतात.
Kelva
 
 
फाल्गुनातील होळीचा खांब पडला, की गावकर्‍यांना वेध लागतात ते शितळादेवीच्या जत्रेचे. ही जत्रा चैत्र पौर्णिमेला केळवे गावात भरते. श्रीशितलामाता ही पालघर पंचक्रोशीत भाविकांचे आराध्यदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. पौर्णिमेच्या आधीचा एक दिवस आणि नंतरचा एक दिवस मिळून तीन दिवसांची जत्रा भरते. जत्रेच्या तिन्ही दिवसांत पालघर पंचक्रोशीतील सगळ्या वाटा केळव्याच्या दिशेने माणसांनी आणि वाहनांनी तुडुंब भरून वाहू लागतात.
 
 
श्रीशितळादेवीस श्रीशितलामाता या नावानेही भाविक संबोधतात. देवीच्या नावातच शीतलतेचा अनुभव होतो. श्रीशितळादेवी ही सोमवंशी क्षत्रियांची उपास्यदेवता. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी इतिहासकालीन राजा बिंब याच्या काळापासून श्रीशितळादेवीच्या उपासनेचे उल्लेख आढळतात. (राजा बिंब सोमवंशी क्षत्रिय राजा आहे.) याच बिंब राजाने वसवलेल्या मुंबईत श्रीशितळादेवीचे मंदिर आहे.
 
 
असे असले तरी शेतकरी, सुतार, लोहार, सोनार, मच्छीमार... सार्‍या अठरापगड जातींच्या श्रमजीवींचा ओढा मातेकडे आहे. आपली दुःखे, वेदना घेऊन ते देवीच्या दाराशी येतात. कुणी व्यवसायाच्या गुंत्यात सापडलेला, कुणी आजारपणाने त्रासलेला, शाळेत जाणारी पोरं परीक्षेच्या भयानं ग्रासलेली, तर कुणी एखादी लेकराच्या स्पर्शासाठी आसुसलेली. श्रीशितलाईनं सर्वांना आपल्या कृपेच्या पंखाखाली घेतलेलं असतं. लेकरांवर मायेची शाल पांघरून देवी लेकरांची दु:खे दूर करते. अपार भक्तिभावाने गावोगावचे भाविक जन तिच्या दर्शनासाठी मंदिराची वाट चालतात.
 
 
Kelva 
 
या जत्रेचे आयोजन देवस्थानच्या उत्सव समितीचे भाविक कार्यकर्ते आणि सेवक करतात. जत्रेच्या पूर्वतयारीत देवीचे आवार, मंदिराबाहेरचा परिसर स्वच्छ केला जातो. यात्रेत खाऊची, खेळण्यांची भरपूर दुकाने असतात. दुकानांचे मालक देवस्थानाशी संपर्क करून आपापल्या जागा निश्चित करतात. पौर्णिमेच्या दिवशी भल्या पहाटे दर्शनार्थींची लांबलचक रांग मंदिराला पुष्पहारासारखी वेढून घेते. भाविकांची रांग मंदिराचे आवार ओलांडून शंभरेक मीटर दूरवरच्या वडाच्या झाडापर्यंत पोहोचलेली असते.
 
 
दक्षिणेकडील वसई, मुंबईपासून उत्तरेकडच्या डहाणू, बोर्डीच नव्हे, तर गुजरातच्या संजाण व डांग जिल्ह्यातले भाविक देवीच्या दर्शनासाठी आलेले असतात. त्यात असतात आदिवासी, मांगेले, बारी, भंडारी, वाडवळ, वंजारी, पांचाळ... माऊलीला तिची सगळी लेकरे समान वाटतात. शिस्तीत शांतपणे हळूहळू पावलं टाकीत देवीचे दर्शन घेणार्‍या भाविकांच्या चेहर्‍यावर असीम समाधानाचे चांदणे खेळते.
 
 
श्रीशितलामाता म्हणजे सर्वरोगभयहारिणी. ती अशुभाचे निवारण करते. भक्ताच्या मनातील कोणतीही धाकधूक केवळ तिच्या दर्शनाने दूर होते. अखंड पाषाणात कोरलेली तिची मूर्ती... रुंंद कपाळ, माथ्यावर मुकुट, सरळ नासिका, विशाल कर्णद्वय आणि नेत्रात भरून राहिलेली अपार ममता. ते सुंदर रूप पाहताच भाविकाचे मन प्रसन्न आणि मंगल भावनेने भरून येते.
 
 
Kelva 
 
श्रीशितलामाता... आदिशक्तीचे एक रूप. ती दुष्टांचे निर्दालन करते. म्हणूनच तिच्यामागे एक त्रिशूळ आणि दोन्ही हातांच्या बाजूने ढाल-तलवारी दिसतात. मूर्तीच्या पाठीमागचा भाग आज चांदीच्या पत्र्याने सुशोभित केला आहे.
 
 
शोभेच्या दिव्यांनी कळसापर्यंत साकारलेले मंदिर रात्रीच्या अंधारात फारच शोभिवंत दिसते. रामकुंडातील कारंजाचे इंद्रधनुषी रंग स्वर्गीय सौंदर्याचा आभास निर्माण करतात. दीपमाळेवरील दीपशिखा त्या पाण्यावर तेजाच्या ठिपक्यांची आणि तरंगांच्या ज्योतिर्मय लहरींची सुरेख रांगोळी घालतात. असंख्य चंद्रटिकल्यांच्या आराशीनं नटलेल्या भुईचं सौंदर्य पाहण्याचा मोह आकाशीच्या चंद्रचांदण्यांनाही आवरत नाही. त्या दुधाळ चांदण्यांत रोषणाईने न्हालेला मंदिराचा परिसर स्वर्गातल्या नंदनवनातील शोभा भूतलावर घेऊन येतो.
 
 
जत्रेदिवशी देवीला भरजरी शालू नेसवतात. कपाळावर ठसठशीत कुंकू, कानात कर्णफुले, नाकात मोत्यांची नथ, गळ्यात मंगळसूत्र आणि सोन्याचा हार, मस्तकी चांदीचा मुकुट, माथ्यात जाईजुई, मोगर्‍याच्या वेण्या, गळ्यात गुलछडीचे आणि शेवंतीचे हार. या सर्व साजशृंगाराने शितलामातेचे रूप अधिकच साजरे दिसते.
 
 
Kelva 
 
उत्तर दिशेला वालुकेश्वर भवानीशंकर मातेला निरंतर सोबत करतो, तर दक्षिण दिशेला हनुमानाचे मंदिर आहे. रामकुंडातील पवित्र पाण्याने हातपाय धुऊन दर्शनाला जाण्याआधी दाराशी उभ्या असलेल्या खंडोबाला प्रथम वंदन केले जाते. खंडोबा म्हणजे देवीचा लाडका बंधुराया. देवीला भेटण्याआधी खंडोबाच्या पायाशी नारळ वाहायचा. मग ’शितलामातेकी जय’ म्हणत गाभार्‍यात प्रवेश करायचा.
 
 
बरेच जण केवळ दर्शनलोभाने तिला भेटायला आलेले असतात. कुणा एखाद्याला आपलं छोटं लेकरू तिच्या पायावर घालावेसे वाटते. लग्न झालेले नवदांपत्य तिचा आशीर्वाद घ्यायला येते. सश्रद्ध सुवासिनी खणानारळाने तिची ओटी भरते आणि मनोमन विनवते, ”जय मातेश्वरी, तूच आमची तारिणी. भवदुःखहारिणी. आम्हाला सद्बुद्धी दे आणि सुखासमाधानाचा प्रसाद तू आमच्या ओटीत घाल.”
 
 
भाविक आपापल्यापरिने श्रद्धेप्रमाणे, ऐपतीनुसार देवीला साडीचोळी, सोन्याचांदीच्या वस्तू, पैसे अर्पण करतात. काही जण कोंबडे, बकरे घेऊन नवस फेडायला येतात. (आज कोंबड्या-बकर्‍यांचा बळी देण्यास मनाई आहे.) देवस्थान ट्रस्टतर्फे या वस्तूंचा लिलाव होतो आणि ते पैसे मंदिराच्या पेटीत जमा होतात.
 
 
Kelva 
एखाद्याच्या मनात देवीचा कौल घेण्याची इच्छा असते. मात्र चैत्र महिन्यात देवींच्या यात्रा असतात. या काळात सर्व देवी आपल्या बहिणीला भेटावयास जात असतात, असा प्रघात आहे. शितळादेवीच्या बहिणींची नावे कंकरमाता, कुलमाता, पानशाही, बडीमाता, गुलसालिया अशी आहेत. शितळादेवी चैत्रात आपल्या बहिणींना भेटायला जाते. या कारणाने चैत्रात देवीला कौल लावला जात नाही. पितृपक्षाचे पंधरा दिवस आणि नवरात्रीचे दसरा धरून दहा दिवस या काळातही कौल लावला जात नाही.
 
 
वरणभाताबरोबर पुरणपोळी, भाजी, अळुवडी, पापड, लोणचे असा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तीन दिवसांच्या काळात पेढे, बर्फी, खीरपुरी, गुलाबजाम अशा मिष्टान्नांचा नैवेद्यात समावेश होतो. जत्रेच्या दिवसांत रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. त्यानंतर देवीच्या निद्रेसाठी मंदिर बंद केले जाते.
 
 
मंदिराच्या गाभार्‍यात मांगल्य आणि पावित्र्य यांचा अंमल असतो. मंदिराबाहेरच्या परिसरात चौफेर आनंदाचा कल्लोळ दिसतो. एलईडी दिव्यांनी सजवलेले पाळणे, चक्र्या आणि दुकानांनी जत्रेला झगमगाटी येते. नवे कपडे घालून आनंद उपभोगायला आलेल्या हौशागौशांचा कलकलाट जत्रेला जिवंतपणा बहाल करतो.
 
 
पौर्णिमेचा दिवस हा मोठ्या जत्रेचा. हनुमान जयंती याच दिवशी असते. हनुमानाला अभिषेक घालून हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे श्रीशितलाई आणि हनुमान या दोन्ही उत्सवमूर्तींना भेटण्याची पर्वणी असते. जत्रेत गर्दी उच्चांक गाठते, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडत नाही, कारण श्रीदेवीच्या अस्तित्वाने येथील उल्हासाला पावित्र्याचे कोंदण लाभलेले असते. हे विशेष.
 
 
पूर्वी जत्रेत उसाच्या रसाचा लाकडी घाणा तसेच लाकडी पाळणे असायचे. त्यांचा किर्रकिर्रपणादेखील हवाहवासा वाटे. आजच्या आधुनिक युगात हे सारे यंत्राधिष्ठित झाले आहे. भेळपुरी, शेवपुरी, आइस्क्रीम यांची छोटी-छोटी दुकाने हमखास जत्रेत बघायला मिळतात. या सगळ्यात सरस ठरते ती शितळादेवीच्या जत्रेतील खास वैशिष्ट्ये असलेली अस्सल चवीनं रसनेला वश करण्याची किमया साधलेली साजूक तुपातली सुरती मिठाई. अस्सल सुरती मिठाई हवी असेल तर केळव्याच्या शितळादेवीच्या जत्रेतच.
 
 
प्रतिपदेला देवीची पालखी निघते. हा जत्रेचा अखेरचा दिवस. पालखीचा मान क्रमाक्रमाने गावातील एकेका आळीला देण्याची प्रथा आहे. उन्हे कलू लागताच फुलापानांनी पालखी सजवली जाते. ढोलताशांनी बाहेरचा परिसर दुमदुमून निघतो. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. कपाळावर टिळा लावून भाविकांची पथके टाळांच्या ठेक्यावर देवीची गीते गात नाचत असतात.
 
 
पालखीचे मानकरी पूजेची तयारी करतात. प्रथम श्रीसिद्धिविनायक गणेशासमोर फोटो ठेवून पूजा केली जाते. नंतर वाळकेश्वर श्रीशंकरासमोर फोटो ठेवून पूजा करतात. त्यानंतर हनुमानाच्या फोटोची आणि सर्वात शेवटी शितलाईच्या गाभार्‍यात देवीच्या फोटोची पूजा केली जाते. सुमुहूर्तावर श्रीफळासह देवीचा फोटो व तिची चांदीची पावले फुलापानांनी सुशोभित केलेल्या पालखीत मध्यभागी ठेवली जातात. शेजारी श्रीगणेशाचा, श्रीशंकराचा व रामभक्त हनुमानाचा फोटो पालखीत ठेवला जातो. फूल, पान वाहून धूपारतीने मंत्रोच्चारांसह पालखीत त्यांची पूजा केली जाते. पुण्याहवाचन झाल्यावर शितळादेवीसह सर्व देवांची गजरात आरती होते. देवीसमोर पेढ्यांचा नैवेद्य ठेवला जातो. मानकरी पालखी खांद्यावर घेत गावाच्या दिशेने चालू लागतात. भाविकांना वाटण्यासाठी कुरमुरे आणि साखरचण्यांनी भरलेले प्रसादाचे डबे घेऊन टाळ-चिपळ्या वाजवीत, गुलाल उधळीत, देवदेवतांच्या नावाचा गजर करीत भाविकांचा जथा पालखीला साथ करतो.
 
 
पालखीच्या स्वागतासाठी घराघराची अंगणे पाण्याच्या हबकार्‍यानं ओली होतात. त्यावर रेखीव रांगोळीची रेघ उमटते. दारात साक्षात देवीचं आगमन होतं तेव्हा घरच्यांच्या डोळ्यांत आनंद साकळून येतो. या क्षणाची वाट पाहण्यासाठी गावकर्‍यांना वर्षभर थांबावं लागते. हा क्षण डोळ्यांच्या ओंजळीत साठवण्यासाठी, मनाच्या कुपीत कोंडून ठेवण्यासाठी माणसे आसुसलेली असतात. देवीचा गुलाल अंगावर उधळून घेताना प्रत्येकाला धन्य धन्य वाटतं. पालखीतल्या देवदेवतांना ओवाळताना सुवासिनींच्या डोळ्यात आनंदाचं, मांगल्याचं चांदणं सांडलेलं असतं. ‘मातेसरी आये, कल्याण असो’ बोलताना आजीच्या स्वरात उमाळा दाटून येतो. त्याच वेळी कुरमुर्‍यांच्या प्रसादावर लहानग्यांची उडी पडत असते.
 
 
पाखाडी पाखाडी ओलांडत पालखी पुढे सरकते. मध्यरात्र ओलांडून दिवसाचा गोंडा पूर्वांचलावर उगवतो तरी टाळकर्‍यांचे हात दुखत नाहीत. सर्वांगानं गुलालाने रंगलेले पालखीकरी सूर्योदयाच्या शुभावसरी मंदिराच्या अंगणात पालखी घेऊन येतात तेव्हा मंदिरासमोरील उंबराच्या झाडाची फांदीन् फांदी पानांसह सर्वांगांनी शहारते. रामकुंडाच्या पाण्यातील माशांचे खिल्लार (समूह) सुळकन आवाज करीत पालखीला नमन करीत असतात. ‘शितलामातेकी जय’च्या ललकार्‍यांनी मंदिराचे आवार दुमदुमून जाते.
 
 
पालखी घेऊन भाविक मंदिराभोवती अकरा प्रदक्षिणा घालतात आणि पालखी गाभार्‍यात घेतात तेव्हा पेढे, कुरमुर्‍यांसह एखादे पेय देऊन पालखी वाहणार्‍यांचा सन्मान केला जातो. अशा रीतीने जत्रेची यथासांग सांगता झाल्याच्या समाधानाने भाविक आपापल्या घरी परततो.