मनोगत एका मुक्त बंदिवानाचे

विवेक मराठी    16-Apr-2024
Total Views |

Occult of a freed captive
बंदिवानांमध्ये सामाजिक संवेदना निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यात राष्ट्रभक्ती वाढीस लागावी, कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वतः स्वाभिमानाने जगावे तसेच चांगले कार्य करून स्वतःबरोबरच समाज आणि देशहितासाठी कार्य करण्याची भावना मनात ठेवावी यासाठी रामचंद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कारागृहांमध्ये 2018 पासून कार्य केले जात आहे. पुरुष आणि महिला विविध भाषिक बंदिवान यांना क्रांतिकारक तसेच संस्कारक्षम ग्रंथसंपदा देऊन त्याच्यावर आधारित तसेच देशहितासाठी त्यांच्या संकल्पनांचे विचार त्यांच्यात रुजवून त्या अनुषंगाने लिहायला भाग पाडणे. त्यांच्यातील विचारांचे मूल्यांकन करणारा हा उपक्रम गृह विभागाच्या कारागृह प्रशासनाच्या सुधारणा व पुनर्वसन कार्यास हातभार लावत आहे. सुमारे 50 हजारांहून अधिक बंदिवानांपर्यंत हा उपक्रम पोहोचत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यातील एक उदाहरण...
एका छोट्याशा चुकीमुळे कारागृहात तीन महिन्यांची शिक्षा भोगायची होती. मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. त्यातील एक महिना कसाबसा संपला होता. कधी इथून बाहेर पडतोय, असे वाटायचे. पहाटे 5 वाजता वॉर्डन येऊन उठवायचा. दोन रांगांत आम्ही बसायचो. नंतर पावणेसहा वाजता बॅरेकचे दरवाजे उघडायचे, मोजणी व्हायची. त्यानंतर 7 वाजता नास्ता. सकाळीच साडेदहा वाजेपर्यंत जेवण यायचे. त्यानंतर 12 वाजता आत डांबले जायचे. दुपारनंतर थोडा वेळ बाहेर. मग परत 6 वाजता जेवण घेऊन आत जायचे. हेच आपले आयुष्य आणि आपला वेळ असाच वाया जाणार, काहीच करता येणार नाही याची जाणीव मनाला खूप वेदना द्यायची.
  
 
मध्यवर्ती कारागृह असल्यामुळे तिथे बंदिवानांसाठी वाचनालय होते. कारागृहात गुरुजीदेखील असायचे. त्यांच्याकडून आवडीच्या विषयातील पुस्तके वाचनालयातून मिळायची. वाचनालयात निवडक वर्तमानपत्रे यायची. एरव्ही पेपर वरवर वाचत असे; पण इथे प्रत्येक ओळ न् ओळ वाचायला भरपूर वेळ होता आणि अचानक एके दिवशी बातमी वाचनात आली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफचे सैनिक हुतात्मा झाले. आपल्यासाठी, आपल्या देशासाठी कुटुंबीयांपासून दूर असलेल्या या जवानांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. मन विषण्ण झाले. त्या जवानांनी दिलेले बलिदान हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी आणि भारतमातेसाठी होते.
 
 
Occult of a freed captive
 
त्याच वेळी मनात विचार आला, आपण इथे कशासाठी आलो? यातून काही प्रायश्चित्त करता येईल का, देशासाठी किंवा समाजासाठी आपण काही तरी करू शकतो का, की परतीचे सगळेच दोर कापले गेलेत...
 
 
विचारचक्र चालूच होते. दिवस जात होते अन् एके दिवशी मुंबईच्या रामचंद्र प्रतिष्ठान संस्थेची एक नोटीस आमच्यापर्यंत गुरुजींमार्फत आली. बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीस लागावी, कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांनी स्वतःबरोबरच समाज आणि देशहितासाठी कार्य करावे, याची प्रेरणा मिळण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व कारागृहांमध्ये हा उपक्रम सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी आमच्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, सावरकरबंधूंचा त्याग, स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतिकारक यांच्या विचारांवर आधारित निबंध स्पर्धा आयोजित केली. त्यासाठी पारितोषिकेदेखील मिळणार होती.
 
 
डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे मानकरी
रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई
 
महाराष्ट्रातील बंदिवानांसाठी करत असलेल्या कार्याचा गौरव म्हणून शनिवार, दि. 13 एप्रिल 2024 रोजी जळगाव येथील केशवस्मृती सेवा समूहाच्या वतीने रामचंद्र प्रतिष्ठान संस्थेला डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार जैन समूहाचे प्रमुख अशोक जैन यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केशवस्मृती सेवा समूहाचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर उपस्थित होते. या वर्षी यवतमाळ येथील दिलासा संस्था, पुणे पाबळ येथील विज्ञानआश्रम आणि मुंबई दादर येथील रामचंद्र प्रतिष्ठान यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 

vivek 
 
रामचंद्र प्रतिष्ठान संस्था कारागृहात असलेल्या बंदिवानांचे मानसिक पुनर्वसन करून त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण करण्याबरोबर राष्ट्रभक्तीची भावना अधिक प्रखर केली पाहिजे, या विचारातून रामचंद्र प्रतिष्ठान या मुंबई येथील संस्थेने महाराष्ट्रातील सर्व कारागृहांमधील बंदिवानांमध्ये देशभक्ती वृद्धिंगत करण्याचा ध्यास घेतला आहे. संस्थेचे प्रमुख अशोक शिंदे आणि संचालिका नयना शिंदे या दोघांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प महाराष्ट्रातील कारागृहामध्ये राबविला जात आहे.
 
  
देशभक्तीविषयीची भावना जागृत आणि प्रबळ करण्याची ही एक संधी होती. एव्हाना माझा वाचनालयात येणार्‍या काही जणांशी संवाद वाढू लागला होता. माझ्यासारखीच त्यांच्यापैकी काहींचीदेखील भावना होती. त्यामुळेच आम्ही क्रांतिकारकांच्या पुस्तकाचे वाचन सुरू केले. स्पर्धेत विजयी व्हायचा निर्धार केला. ठरलेल्या दिवशी संस्थेचे प्रतिनिधी आले. त्यांनी आमचे समुपदेशन केले. त्यानंतर निबंध स्पर्धेला प्रारंभ झाला. मी आणि माझ्यासोबतच्या बंदिवान मित्रांनीही मनापासून निबंध लिहिले. काही दिवसांनंतर त्यांचे निकाल आले. आनंदाची गोष्ट म्हणजे मला आणि माझ्या मित्रांना पारितोषिके मिळाली.
 
 
नेमकी हीच संधी आहे आपल्याला राष्ट्रभक्तीच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची, हे मी मनात योजले. माझ्यासोबत विजेत्या मित्रांशी चर्चा केली. त्यानंतर पारितोषिक वितरणाचा दिवस उजाडला. वाचनालयाच्या हॉलमध्ये आम्ही कार्यक्रमाची तयारी केली. ठरलेल्या वेळी कारागृहाचे अधीक्षक, तुरुंगाधिकारी, गुरुजी आणि रामचंद्र प्रतिष्ठान संस्थेचे प्रतिनिधी आले. कार्यक्रम संपत आला असताना मला बोलायचे आहे, असे मी हात उंचावून सांगितले. अधीक्षकांनी परवानगी दिली. त्या वेळी मी आणि माझे सहकारी पारितोषिकांची रक्कम पुलवामा हल्ल्यात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांना देऊ इच्छित आहोत, असे सांगितले. सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. आमची बदललेली मानसिकता, भारतमाता आणि सैनिकांबद्दलची भावना यामुळे सर्व जण भारावले. आमच्या निर्णयाबद्दल सर्वांनीच आमचे कौतुक केले, शाबासकी दिली. अधीक्षकांनी आमची इच्छा पूर्ण करण्याबाबत आश्वासित केले.
 
 
आठवडाभरातच अधीक्षकांनी आनंदाची बातमी दिली की, पारितोषिकांची ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुलवामा हल्ल्यातील सैनिकांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवली जाईल. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. एक कर्तव्यपूर्तीची भावना तर मनात होतीच; पण बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्याची, स्वतः स्थिर होऊन समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली होती. हीच संधी होती, आमच्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलून दाखवण्याची, नव्या उमेदीने आयुष्य जगण्याची. आमच्या कार्याची दखल वर्तमानपत्रांनीदेखील घेतली. खूप आनंद वाटला. याचे श्रेय जाते ते कारागृहातील बंदिवानांना देशभक्तीच्या मार्गाला वळविणार्‍या रामचंद्र प्रतिष्ठानसारख्या संस्थांना.
 
 
यामुळेच कारागृहातून सुटका झाल्यानंतर माझ्यातील आत्मविश्वास वाढला, आत्मसन्मानप्राप्तीची ओढ लागली. त्यातूनच नवे पर्वजगत, मित्रपरिवार वाढवला. सामाजिक कार्यात सहभाग वाढला. आज एका जबाबदार पदावर काम करताना मिळणारा आनंद या भावनेतून आला आहे.
 
 
शब्दांकन : अशोक शिंदे