भारत अजून जागा आहे

विवेक मराठी    16-Apr-2024
Total Views |
@प्रा. रवींद्र भुसारी
नुकताच मी तीनशे तरुण-तरुणींसोबत हिमालयामधील खेड्यांमध्ये सेवाकुंरच्या माध्यमातून एका सेवा प्रकल्पासाठी प्रवास केला त्या वेळी जाणवले की, भारत अजून जागा आहे. आपल्याला ज्या भारतीय मूल्यांचा अभिमान वाटतो, या काळातही टिकून आहेत. विशेष म्हणजे सेवांकुर हा सेवा उपक्रम गेली आठ वर्षे यशस्वीपणे चालू आहे. त्याचे हे अनुभवकथन मांडताना मला विलक्षण संतोष होत आहे.
rss
 
आजच्या तरुण पिढीबद्दल अनेक आक्षेप व्यक्त केले जातात. ते सतत सोशल मीडियात बुडालेले असतात; पण स्वतः मात्र सोशल नसतात, म्हणजे प्रत्यक्ष संवाद आणि संपर्क नसतो. आपल्या करीअरची चिंता असते आणि सामाजिक जबाबदारीचे मात्र भान नसते. सगळ्या गोष्टी पैशात मोजतात; पण बिनापैशाच्या आनंदात त्यांना रस नसतो. अशा अनेक तक्रारी ऐकायला मिळतात. दुसरीकडे अशीही तक्रार असते की, शहरांमध्ये तर नाहीच नाही; पण आता ग्रामीण भागातही माणुसकी उरली नाही. आपल्या प्रथा-परंपरा लोक विसरत चालले आहेत. आत्मीय भाव हरवत चालला आहे. अशा अनेक तक्रारी ऐकायला मिळतात.
 
नुकताच मी तीनशे तरुण-तरुणींसोबत हिमालयामधील खेड्यांमध्ये एका सेवा प्रकल्पासाठी प्रवास केला त्या वेळी जाणवले की, भारत अजून जागा आहे. आपल्याला ज्या भारतीय मूल्यांचा अभिमान वाटतो, या काळातही टिकून आहेत. विशेष म्हणजे हा सेवा उपक्रम गेली आठ वर्षे यशस्वीपणे चालू आहे. त्याचे हे अनुभवकथन मांडताना मला विलक्षण संतोष होत आहे...
 
 
vivek
 
गेल्या आठ वर्षांपासूनचा सेवांकुर उपक्रम यंदा 25 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत आयोजित केला होता. धुळवडीच्या दिवशी 25 मार्च रोजी सकाळी साडेसहापासून टिळक नगर टर्मिनस मुंबई येथे युवक-युवती जमू लागले. रंग, गुलाल व घोषणांनी स्टेशन परिसर निनादू लागला. कोण होते हे युवक-युवती? देशातील 77 वैद्यकीय महाविद्यालयांतून शिक्षण घेणारे 280 भावी डॉक्टर्स म्हणजेच मेडिकलचे विद्यार्थी, सोबतच प्रॅक्टिस करणारे 40 डॉक्टर्स व माझ्यासारखे डॉक्टर नसलेले पाच-सहा जण. अतिथींचे स्वागत औक्षण करून झाले. भारतमातेची पूजा करून व नारळ फोडून 325 प्रवासी गाडीत शिरले. एकूण 18 गटांत विभागणी केली होती. साधारणपणे एका गटात 16 कन्सल्टंट व तीन गटप्रमुख अशी सांभाळ करणारी मंडळी. भारतमातेचा जयजयकार, श्रीरामाचा जयघोष, ‘जय भवानी जय शिवराय‘ असा घोष करत टिळक नगर - हरिद्वार एक्स्प्रेसने ही मंडळी निघाली.
 
गटातील सर्व आल्याची खात्री जमा झाल्यानंतर गटगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अठराही गटांत वेगवेगळी राष्ट्रभक्तीपर गीते गायली जाऊ लागली. अधिकार्‍यांनी येऊन सर्वांची चौकशी केली. नाष्टा झाला. सर्वांचा आपापसात परिचय सुरू झाला. कुणी आंध्रचा, कोणी तेलंगणाचा, मध्य प्रदेशचा, ओडिशाचा, गुजरातचा; उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, हरियाणा अशा विविध राज्यांतील होते. संघाचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी, विदर्भ अशा प्रांतांतील होते. स्वाभाविकपणे हिंदीमध्ये संवाद होत होता. 28 तासांच्या प्रवासात भिन्न कार्यक्रमांची आखणी केली होती. इतर प्रवाशांची ओळख व्हावी व त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टींची माहिती कळावी म्हणून सर्वेक्षण घेण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने एका प्रवाशाची सविस्तर मुलाखत घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘ट्रेझर हंट’ अशा भिन्न भिन्न खेळांच्या माध्यमातून, ‘डिब्बे में डिबेट’ या कार्यक्रमातून रात्र गप्पांच्या फडात रंगली.
 
 
rss
 
देवभूमी उत्तराखंड येथील रूडकी स्थानकावर (स्टेशनवर) 28 तासांनंतर प्रवास थांबला. तेथे सर्वांचे स्वागत करण्यात आले. तेथील नागरिक पारंपरिक वेशभूषेत स्वागताकरिता सज्ज होते. प्रत्येकाचे औक्षण करून गळ्यात हार घालण्यात आले व मिष्टान्न भरविण्यात आले. या स्वागताने तर सारेच भारावले. धर्मवाला या स्थानी सर्व पोहोचले. हे स्थान आजूबाजूला पहाडी व जंगल असे नयनरम्य आहे. येथे डॉ. अनुज व डॉ. तारा सिंगल या दांपत्याने विवेकानंद मेडिकल हेल्थ मिशन असा दवाखाना सुरू केलेला आहे. केवळ येथेच नाही तर या उत्तराखंडमध्ये सर्व तीर्थक्षेत्री 14 चॅरिटेबल हॉस्पिटल्स ही मंडळी चालवतात. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांनाही यांच्याकरिता काय करू असे झाले होते.
 
 
कार्यक्रमाची सुरुवात मी विद्यार्थ्यांशी संवाद साधून केली. याच वेळी डॉ. अनुजजी यांचेही उद्बोधन झाले. डॉ. तारा व डॉ. अनुज या दांपत्याची प्रदीर्घ मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली. प्रश्नांचा भडिमार व त्यांची यशस्वी उत्तरे असा हा कार्यक्रम रंगला. दोन दिवस वनवासी भागात आणि पहाडी गावात सर्व विद्यार्थी गेले. तिथे मुक्काम केला. तेथील समाजजीवनाचा अभ्यास केला. त्यांच्यासोबत नृत्य केले. काही भगिनींनी तर तेथील महिलांसोबत शेतामध्ये वाटाण्याच्या शेंगा तोडण्याचेही काम केले. रात्री ग्रामसभा व लहान मुलांचे खेळ आणि घरोघर संपर्क असा 50 गावांमधून केला गेला. 18 गावांमध्ये वैद्यकीय शिबिर झाले. यातून 125 गावांच्या 2650 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला. त्यांची तब्येत तपासून त्यांना औषधेसुद्धा देण्यात आली. वैद्यकीय कँपनंतर या प्रत्येक गावातून विद्यार्थी बाहेर पडत होते त्या वेळी गावकर्‍यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहत. केवळ दीड दिवसामध्ये इतकं प्रेम परस्परांमध्ये दिसून आले. याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या जीवनावर खोलवर होईल एवढे नक्की.
 
 
या सात दिवसांमध्ये संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांच्या उद्घाटनपर मार्गदर्शनापासून, तर राष्ट्रीय सेवा भारतीचे संघटनमंत्री सुधीरजी यांच्या समारोप मार्गदर्शनापर्यंत वैचारिक पर्वणी होती. भिन्न भिन्न कार्यक्रम, मग ते रमेश पांडवांचे असेल किंवा माणिकताई दामले यांची सत्रे असतील अथवा उत्तराखंड प्रांत प्रचारक डॉ. शैलेंद्र यांचे अनुभवकथन असो, अशा कार्यक्रमांमध्ये बौद्धिक मेजवानी मिळाली. इथे मध्य प्रदेश वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू, उत्तरांचल वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू, इंदोरचे शल्यचिकित्सक, लातूर येथील डॉक्टर मंडळी, वनवासी कल्याण क्षेत्र संघटनमंत्री, संघाचे क्षेत्रीय प्रचारक प्रमुख यांचासुद्धा सहवास व मार्गदर्शन लाभले. संभाजीनगरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेशजी पांडव, संभाजीनगरचे उद्योगपती मिलिंदजी कंक व संघाचे प्रचारक वनवासी कल्याण आश्रमाचे अ. भा. अधिकारी गिरीशजी कुबेर यांच्या सर्वांच्या सहवासात- मार्गदर्शनात हे विद्यार्थी न्हाऊन निघत होते.
 
 
सेवांकुरची टीम अतिशय उत्तम. म्हटले तर याच्या मुळाशी असणारे, परंतु कुठेही पुढे नसणारे डॉ. अश्विनी कुमार तुपकरी सर्व काही नीट होत आहे की नाही हे पाहत होते.
 
 
माझ्याकरिता हे सात दिवस तरुण डॉक्टरांच्या सहवासात राहणे भाग्यकारक व लाभदायी ठरले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम झाले. एक रात्री भजन संध्या, तर एक रात्री कॅम्प फायर, एखादा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम झाले. सर्वच कार्यक्रम उत्तम होते. कॅम्प फायरमध्ये डॉ. कृष्णगोपालजी यांच्याशी झालेला संवाद सर्वांना भावून गेला. सांस्कृतिक कार्यक्रम तर अनोखाच म्हणावा असा झाला. दोनदा मेडिकल कॉलेजच्या डीनपदी राहिलेल्या 66 वर्षीय मॅडमसोबत एमबीबीएस पार्ट वनला असलेल्या मुली एकत्र नाचतात, हे दृश्य सेवांकुर भारतमध्येच घडू शकते हे लक्षात आले.
 
 
समारोपानंतर डॉ. अनुज आणि डॉ. तारा यांच्यासोबत फोटो सेशन तर कमालीचे आनंददायक झाले. ते दोघेही विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडले. सात दिवस कसे संपले कळलेच नाही.
 
 
नव्या पिढीबद्दलच्या सर्व तक्रारी किती गैरसमजातून निर्माण झाल्या आहेत याचा सुखद अनुभव घेतला. नव्या पिढीतही भारतीय मूल्ये तितकीच खोलवर आहेत, फक्त त्यांना तशी संधी मिळायला हवी हे जाणवले.