श्री संत गोरोबाकाका साहित्य संमेलन संपन्न

विवेक मराठी    16-Apr-2024
Total Views |
sant gora kumbhar
 
“संतांनी अभंगातून जे मानवकल्याणाचे प्रेरणादायी विचार मांडले, त्याचा विचार आणि विमर्श होणे हेच आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.”
- ह.भ.प. दीपक महाराज
 
धाराशिवः- “संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीत भरविण्यात आलेले श्री संत गोरोबाकाका साहित्य संमेलन, हे अत्यंत उल्लेखनीय पाऊल असून संमेलनांच्या इतिहासात याची उचित दखल घेतली जाईल याचा मला विश्वास वाटतो. खरे पाहता पहिले संत साहित्य संमेलन गोरोबाकाकांनीच भरविले होते; जिथे अध्यात्म चर्चा चालू असताना नामदेवांचे मडके कच्चे आहे हे दाखवून पुढे विसोबा खेचरांचा अनुग्रह घेतल्यानंतर नामदेवांनी संप्रदायाचा विस्तार केला होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे,” असे ह.भ.प. दीपक महाराज यांनी आपले विचार मांडताना नमूद केले. ते पुढे म्हणाले की, “ज्ञानेश्वर महाराजांनी खरेच भिंत चालवली का? रेडा वेद बोलतो का? नामदेवांच्या हातून देवाने खरोखरीच नैवेद्य खाल्ला होता का? गोरोबाकाकांचे पायाखाली तुडविले गेलेले मूल परत कसे मिळाले? त्यांचे थोटे हात पुन्हा पहिल्यासारखे कसे झाले? या सर्व गोष्टींची चमत्कारात गणना होते; पण आपल्याला जेव्हा कोणत्याही चमत्कारामागचे विज्ञान कळत नाही तेव्हाच त्या गोष्टींना आपण चमत्कार म्हणून संबोधित असतो. संतांच्या चमत्काराविषयी काथ्याकूट करण्यापेक्षा त्यांनी मानवकल्याणाचे जे प्रेरणादायी विचार त्यांच्या अभंग साहित्याच्या माध्यमातून समोर ठेवले आहे त्याबद्दल विचार आणि विमर्श होणे हेच आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.”
 
 
धाराशिव येथे वैराग्य महामेरू संतपरीक्षक संतश्री गोरोबाकाका यांच्या 707 व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या श्री संत गोरोबाकाका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. संत गोरोबाकाकांच्या साहित्याविषयी बोलताना, र्टीरपींळीूं पेीं र्टीरश्रळीूं या सिद्धांतानुसार गोरोबाकाकांचे अभंग समाजमनावर कसे कोरले गेले आहेत ते सोदाहरण सांगितले. या संमेलनाचे उद्घाटन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे अध्यक्ष आदरणीय ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री संत गोरोबाकाका यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. ह.भ.प. श्री. गहिनीनाथ महाराज यांनी आपल्या उद्बोधनामध्ये संत गोरोबाकाकांच्या आशीर्वादाची महती विशद केली.
 
श्री संत गोरोबाकाका समितीचे पदाधिकारी अ‍ॅड. ह.भ.प. पांडुरंग महाराज लोमटे यांनी आपल्या भाषणामध्ये संत साहित्य संमेलन प्रयोजन किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले.
 

sant gora kumbhar 
 
धाराशिवमधील सुप्रसिद्ध कीर्तनकार, वादक, ह.भ.प. भारत महाराज कोकाटे यांनी आपल्या भाषणामध्ये संताची परीक्षा घेणार्‍या संत गोरोबाकाकांची थोरवी सांगितली. त्याचबरोबर सर्व संतांची मंदिरे उभारली जावीत आणि अशा मंदिरांमध्ये त्या संताचे साहित्य अभ्यासण्यासाठी उपलब्ध व्हावे, ही अपेक्षा व्यक्त केली.
 
धाराशिवमधील संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांनी संत साहित्याचे महत्त्व विशद करताना साहित्य कशाला म्हणावे इथपासून ते संत साहित्य सोनियाच्या खाणी कशा आहेत याचे स्पष्टीकरण दिले, तर धाराशिव येथील मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी संत साहित्य संमेलने व्हायला हवीत, असे प्रतिपादन आपल्या भाषणातून केले.
 
स्वागताध्यक्ष ह.भ.प. डॉ. ईश्वर महाराज कुंभार यांनी संमेलनाध्यक्षपदी ह.भ.प. दीपक महाराज जेवणे यांची झालेली निवड कशी योग्य आहे हे सांगताना, या क्षेत्रातील दीपक महाराज जेवणे यांच्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. भावी काळात साहित्याच्या माध्यमातून श्री संत गोरोबाकाका यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य त्यांच्या हातून घडून येवो, अशा सदिच्छा दिल्या.
 

sant gora kumbhar 
 
प्रा. सोमनाथ लांडगे सरांनी या प्रसंगी बोलताना अशा कार्याला श्रोत्यांचा आशीर्वाद लाभावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
 
प्रथम सत्रातील परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप करताना ह.भ.प. लोमटे महाराज यांनी, जीवनामध्ये परमशांती हवी असेल तर ज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टीला अध्यात्माची जोड हवीच, असे सांगितले. या सत्राला डॉ. रुपेश जावळे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकृष्णा लेटकर यांनी केले.
 
 
दुसर्‍या सत्रामध्ये मा. शांता ठाकूर, गीता पुदाले, रुपाली डुकरे, कविता पुदाले, मीरा महाबोले आणि इतर महिला सहकारी यांनी विविध विषयांवर भारूड सादरीकरण करून जीवनातील विकारांवर कशा पद्धतीने मात करू शकतो यावर प्रकाश टाकला.
 
 
संमेलनाच्या दुपारच्या सत्रामध्ये धाराशिव, सोलापूर, इतर जिल्ह्यांतील अनेक नामवंत कवी आणि त्यांच्या संतभक्तीपर काव्यरचना सादरीकरण केल्या. काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी माधव पवार हे होते, तर निमंत्रित कवी-कवयित्रींमध्ये राजेंद्र अत्रे, युवराज नले, डॉ. अरविंद हंगरगेकर, बाळू घेवारे, सुनील उकंडे, कविता पुदाले, कृष्णा साळुंखे, वनमाला पाटील, बाळ पाटील, शाम नवले, रत्नाकर उपासे, मधुकर गुरव, राधिका मिटकर आणि विमलताई आदी मान्यवर होते.
 
 
याशिवाय फेस्कॉम-महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुण रोडे आणि काव्यशिल्प-पुणेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनीदेखील रचना सादर केल्या. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी क्षीरसागर, माधुरी घोडके यांनी केले, तर आभार कविता पुदाले यांनी मानले.
 
 
संत साहित्य संमेलन समारोप सत्रात संत श्री गोरोबाकाका सेवा समितीचे निमंत्रक प्रा. सोमनाथ लांडगे, कार्यवाह शामराव दहिटणकर, सहकार्यवाह श्रीकृष्ण देशमुख, स्वागताध्यक्ष ह.भ.प. डॉ. ईश्वर महाराज कुंभार, डॉ. रुपेशकुमार जावळे, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. दीपकजी जेवणे महाराज, संमेलन उपाध्यक्ष कविता पुदाले, संत गोरोबाकाका कथा प्रवक्ते ह.भ.प. दीपक महाराज खरात हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या संमेलनाला श्री हरिकीर्तन प्रबोधिनीचे उपव्यवस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण हेही आवर्जून उपस्थित होते.
 
- राहुल मोकाशी
(लेखक श्री हरी कीर्तन प्रबोधिनी आळंदीचे
सरव्यवस्थापक आहेत.)