एका सेवाव्रतीची कहाणी

विवेक मराठी    17-Apr-2024   
Total Views |
book
 
 
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आणि वनवासी बांधवांच्या जीवनात आनंद फुलविणार्‍या प्रगती प्रतिष्ठानच्या विश्वस्त प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पटवर्धन यांचे आगळेवेगळे स्थान आहे. सुनंदाताईंच्या त्याग आणि सेवामय जीवनाची कहाणी सांगणारे पुस्तक म्हणजे ‘वनवासींच्या वहिनी’ (सुनंदाताई पटवर्धन) हे होय. प्रस्तुत पुस्तकातून लेखिका जयश्री कुलकर्णी यांनी सहज-सोप्या शब्दांत सुनंदाताईंच्या जीवनकार्याचा पट उलगडला आहे.

ठाणे - पालघर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात गोदुताई परुळेकर, अनुताई वाघ आणि सुनंदाताई पटवर्धन या तीन कर्तबगार महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गोदुताईंनी वनवासी बांधवांवर होणार्‍या शोषणाविरुद्ध आवाज उठविला (रचनात्मक कार्य पुढे आले नाही), तर अनुताई व सुनंदाताईंनी वनवासी बांधवांना ’तिमिरातून तेजाकडे’ (सामाजिक उत्थान) नेले. या तीन विभूतींतील समान दुवा म्हणजे वनवासी बांधवांनी या तिघींना ’ताई’ हे टोपणनाव दिले. गोदुताईंचे कार्य बर्‍यापैकी लोकांसमोर आले आहे; पण त्या तुलनेने उत्कृष्ट दर्जाचे सेवाकार्य असूनही अनुताई व सुनंदाताईंच्या कामाची नोंद घेतली गेली नाही. असो.
 
सुनंदाताईंच्या सेवाकार्याचे पैलू जयश्री कुलकर्णी यांनी आपल्या ’वनवासींच्या वहिनी’ या चरित्रात्मक पुस्तकातून प्रथमच लोकांसमोर आणले आहे. वाईतील एका सुखवस्तू परिवारातील शशिकला घोटवडेकरचा (सुनंदा पटवर्धन) विवाह ठाण्यातील अप्पा उपाख्य वसंतराव पटवर्धन या ध्येयवेड्या स्वयंसेवकांशी होतो. वसंतरावांनी जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागांत प्रवास करून वनवासींच्या वेदना समजून घेतल्या. वनवासींच्या उत्थानासाठी ’प्रगती प्रतिष्ठान’ची उभारणी केली. या प्रकल्पकार्याच्या सुनंदाताई सहप्रवासी ठरल्या. घरची समर्थपणे जबाबदारी सांभाळत सुनंदाताईंनी वनवासी बांधवांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले. स्वावलंबन, आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती, शेती आणि ग्रामविकासात भरीव योगदान देत त्यांनी वनवासी बांधवांचा विकास घडवून आणला. कृषी व ग्रामविकासात सौर ग्राम प्रकल्प, शेततळे, बचत गटाच्या माध्यमातून वनवासी बांधवांच्या आर्थिक उन्नतीत सुधारणा घडवून आणल्या. हे सारे चित्रण प्रस्तुत पुस्तकात शब्दबद्ध झाले आहे.
111 पृष्ठांच्या या पुस्तकात सुनंदाताईंचे वाईतील दिवस, वसंतराव पटवर्धन व कुटुंबासमवेतचे जीवन व प्रगती प्रतिष्ठानसाठी व्यतीत केलेल्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पाच दशके वनवासी बांधवांत राहून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आलेख चढता ठेवला. प्रस्तुत पुस्तकात अनेक त्रुटी असल्या तरी अशा गोष्टींकडे लक्ष जात नाही. यातून एका सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडते. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, असे आहे.
वनवासींच्या वहिनी (सुनंदाताई पटवर्धन)
• लेखिका - प्रा. डॉ. जयश्री कुलकर्णी
• प्रकाशन - अथश्री प्रकाशन, ठाणे
• पृष्ठसंख्या - 111
• मूल्य - रु. 150/-

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.