विदर्भात उमेदवार बहु, पण सर्वच लढती चुरशीच्या

विवेक मराठी    17-Apr-2024
Total Views |
lok sabha election 2024
 
@ल.त्र्यं. जोशी
विदर्भ हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे; पण गेल्या दहा वर्षांत भाजपाने तो पार खिळखिळा करून टाकला आहे. भाजपाने विदर्भाचा केलेला विकास यामुळे विदर्भात जनतेचाही भाजपावरचा विश्वास वाढला आहे. विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीत उमेदवारांची संख्या दीडशेच्या आसपास असली तरी त्यात खर्‍या लढती भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांतच होणार आहेत. या लढती कोणासोबत होणार आहेत, त्यात कोणाचे पारडे जड आहे, याचेच विश्लेषण करणारा लेख...
विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीत उमेदवारांची संख्या दीडशेच्या आसपास असली तरी त्यात बहुसंख्य लढती मात्र दुरंगी व तिरंगी अशा चुरशीच्याच होणार आहेत असे एकंदरीत वातावरणावरून स्पष्ट दिसत आहे. या दहा मतदारसंघांपैकी नागपूर, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या पाच मतदारसंघांत 19 एप्रिल रोजी, तर अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम यवतमाळ व वर्धा या पाच मतदारसंघांतील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडत असून आता प्रचार चांगलाच जोर धरत आहे. परंपरेनुसार विदर्भ हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गेल्या दहा वर्षांत भाजपाने तो पार खिळखिळा करून टाकला आहे. तरी या क्षेत्रात खर्‍या लढती भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांतच होत आहेत. भाजपाशी युती होती तेव्हा त्याच्या कृपेवर उबाठा रामटेक, बुलडाणा, वाशीम यवतमाळ व अमरावती या मतदारसंघांत विजय मिळवीत होती; पण आता तिला विदर्भात पाय ठेवायलाही जागा मिळेनाशी झाली आहे. काँग्रेसही आपला प्रभाव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे.
 
 
महायुतीतील जागावाटपानुसार नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या पूर्व विदर्भातील पाच जागा भाजपा लढवीत असून रामटेकची एक जागा शिवसेना लढवीत आहे. महाआघाडीच्या वतीने नागपूर, चंद्रपूर, भंडारा, रामटेक व गडचिरोली ह्या पाचही जागी काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. उबाठाला पूर्व विदर्भात एकही जागा मिळाली नसली तरी तो पक्ष पश्चिम विदर्भातील बुलडाणा, वाशीम यवतमाळ, अमरावती ह्या तीन जागा लढवीत आहे, तर अकोला मतदारसंघ काँग्रेसकडे, तर वर्धा मतदारसंघ शरद पवार गट लढवीत आहे. जागावाटप व उमेदवारनिश्चितीसाठी आघाडी व युती यांच्या घटकपक्षांत बरीच ओढाताण झाली असली तरी आता दहाही मतदारसंघांत अमरावती वगळता सर्व मतदारसंघांतील उमेदवारांबद्दल कोणतीही अढी राहिलेली नाही. अमरावतीमध्ये मात्र आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे.
 
 
पूर्व विदर्भाचा विचार करता नागपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विजय आजच निश्चित मानला जात आहे. काँग्रेसने त्यांच्या विरोधात औपचारिकता म्हणून उमेदवार दिला आहे; पण तो नाखुशीनेच ही निवडणूक लढवत आहे. पश्चिम नागपूरचे आमदार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे हे ते उमेदवार असून त्यांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन काँग्रेसने त्यांना धरून-बांधून घोड्यावर बसविले आहे. हल्ली नागपुरातील पूर्व, मध्य, दक्षिण व दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व आमदार भाजपाचे असून पश्चिम व उत्तर नागपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. नागपूर शहर काँग्रेसला गटबाजीने पोखरले असून तिचा फायदाही गडकरींना मिळण्याची शक्यता आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला उत्तर नागपूर हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरीही एक तर दलित समाजात भाजपाचे काम बरेच रुजले आहे. शिवाय रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार सुलेखाताई कुंभारे यांनी गडकरींच्या प्रचारात झोकून दिले आहे. गेल्या दहा वर्षांतील मतदारांशी सततचा संपर्क आणि संवाद, नागपूर शहराचा डोळ्यात भरू शकणारा कायापालट, अजातशत्रू नेतृत्व ह्या गडकरींच्या जमेच्या बाजू त्यांच्या मदतीला आहेतच.
 
 
lok sabha election 2024
 
पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर हे तीन मतदारसंघ महायुतीच्या योजनेतून भाजपाकडे आले असून तेथे पक्षाकडून विद्यमान खासदार अनुक्रमे सुनील शेंडे व अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली असून रामटेकची जागा शिंदे शिवसेनेकडे गेली आहे. तेथील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही; पण त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य केला आहे. एवढेच नाही तर ते उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारातही सहभागी होत आहेत. रामटेक मतदारसंघातील विधानसभेच्या जागांपैकी रामटेक आणि कामठी ह्या दोन जागा महायुतीकडे असून सावनेर, काटोल ह्या जागा अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादी पवार गट यांच्याकडे आहेत. उमरेडची जागा स्वतः आमदार राजू पारवे यांच्याकडे, तर वरूडची जागा अपक्षाकडे आहे. या मतदारसंघातील गटबाजी काँग्रेसला भोवण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ज्यांना उमेदवारी द्यायची होती त्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या परिवारातीलच श्यामकुमार बर्वे यांना तिकीट देण्यात आले, तर ज्यांना काँग्रेसचे तिकीट नाकारण्यात आले ते किशोर गजभिये हे माजी सनदी अधिकारी वंचितचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत.
 
 
भाजपासाठी नागपूरच्या खालोखाल चंद्रपूरच्या जागेला महत्त्व आहे. तेथे 2019 मध्ये तेव्हाचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा पराभव झाला होता व काँग्रेसला महाराष्ट्रातून एकमेव जागा बाळू धानोरकर यांच्या रूपाने मिळविता आली होती. आता या जागेवर भाजपाने राज्य मंत्रिमंडळातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा मोहरा पणाला लावला आहे, तर काँग्रेसने स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना मैदानात उतरविले आहे.
 
 
महायुती व महाआघाडी यांच्यातील संदर्भात विचार केला तर विदर्भातील लढती मुख्यतः काँग्रेस व भाजपात होत आहेत. येथील दहापैकी प्रत्येकी सात जागा हे दोन पक्ष लढवीत आहेत. यवतमाळ वाशीम आणि बुलडाणा या दोन मतदारसंघांत शिवसेना उबाठा व शिवसेना शिंदे गट यांच्यात लढत होत आहे, तर शरद पवार गटाच्या वाट्याला अवघी एक वर्धेची जागा आली आहे. तेथेही पवारांना अमर काळे नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्याला आयात करावे लागले आहे. या निवडणुकीत सर्वाधिक घोळ आमदार बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघात घातला. तेथील मावळत्या खासदार नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपाचे तिकीट मिळू नये यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. भाजपामधील कथित मतभेदाचे भांडवलही करून पाहिले; पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांना दिनेश बूब नावाच्या कार्यकर्त्याला प्रहारच्या वतीने उभे करावे लागले. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरही विदर्भातील लढतींमध्ये विशेष रुची घेत असतात. ते स्वतः अकोला या सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवीत असतात. या वेळी महाआघाडीच्या आधाराने ही निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न होता; पण शेवटपर्यंत मविआने त्यांना झुलवीत ठेवले. अखेर त्यांना वंचितच्या वतीनेच अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. त्यांना एकीकडे भाजपाचे अनुप धोत्रे, तर दुसरीकडे काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात लढत होत आहे. त्यापैकी बुलडाणा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव व नरेंद्र खेडेकर यांच्यात सामना होणार आहे. याच मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर आपले नशीब अजमावत आहेत. शिंदे आणि ठाकरे गटातील दुसरी चुरशीची लढत वाशीम यवतमाळ मतदारसंघात होत आहे. येथील तिकिटासाठी विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. यवतमाळची लेक असलेल्या हिंगोलीतील राजश्री पाटील यांनी आपल्या पतीच्या हिंगोलीवर दावा करणार्‍या कार्यकर्त्यांच्या बदल्यात वाशीमचे तिकीट मिळविले. त्यांचा सामना उबाठाचे संजय देशमुख यांच्याशी होत आहे.
 
 
विदर्भातील दहा जागांपैकी नागपूर, भंडारा, रामटेक, गडचिरोली व चंद्रपूर या पाच जागांवर 19 एप्रिलला, तर उर्वरित अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा या जागांवर 26 एप्रिलला मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर व नागपूर येथील सभांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे, तर दुसर्‍या टप्प्यातील त्यांच्या सभांच्या तारखा अद्याप घोषित व्हायच्या आहेत. दरम्यान सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक जिवाच्या आकांताने कामाला लागले आहेत.