लडाख आंदोलनामागचे वास्तव

विवेक मराठी    19-Apr-2024
Total Views |
@गौरी डोखळे 9130008371
भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती देणारा लडाख. शांत, प्रसन्न, आल्हादायक असलेला लडाख मात्र गेल्या काही दिवसांपासून तापला आहे. लडाखची जनता आंदोलन करीत आहे. या ‘आंदोलनरूपी तापमानवाढीमागील’ खरी कारणे काय आहेत? भारताच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार्‍या या विषयामागील नेमकी मेख काय आहे हे या लेखाद्वारे जाणून घेऊयात.
ladakh movement
 
हिमाच्छादित पर्वतरांगा, नितळ व शुचित अशा जीवनदायिनी हिमनद्या, निळ्याशार स्वच्छ पाण्याचे तलाव आणि शुष्क बर्फाळ वाळवंट म्हणजे लडाख. भारताच्या उत्तरेकडे वसलेला हा एक केंद्रशासित प्रदेश. अतिशीत हवामान असणारे लडाख गेल्या काही दिवसांपासून मात्र ‘तापले’ आहे. लडाखची जनता आंदोलन करीत आहे. या ‘आंदोलनरूपी तापमानवाढीमागील’ खरी कारणे काय आहेत? चला जाणून घेऊ या सुरक्षेच्या, राजकीय घडामोडींच्या, परराष्ट्रनीतीच्या, पर्यावरण संवर्धनाच्या, आदिवासी जनजातींच्या सांस्कृतिक जतनाच्या आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार्‍या या विषयाला.
 
 
मुळात लडाखचा हा विषय अलीकडे उद्भवलेला नाही. काश्मीर संस्थानचे अखेरचे संस्थानिक राजा हरीसिंग यांनी जेव्हा भारतात समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला तेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही प्रदेश एकाच राज्याचा भाग बनले आणि त्यांना कलम 370 चे संरक्षण मिळाले. लडाखमधील लोकांचे जनजीवन, परंपरा, संस्कृती, भाषा, एवढेच नव्हे तर रंगरूपदेखील जम्मू काश्मीर खोर्‍यातील लोकांपेक्षा फार निराळे आहे. त्यामुळे आपली एक वेगळी ओळख असावी, असे लडाखच्या लोकांना वाटे. शिवाय त्यांना एक भावना कायम सतावत आली होती की, स्वातंत्र्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारने केवळ काश्मीर खोर्‍यालाच नेहमी झुकते माप दिले आणि लडाख क्षेत्र दुर्लक्षित राहिले. त्यामुळे गेली 70 वर्षे ते त्यांचे वेगळे राज्य किंवा वेगळे केंद्रशासित प्रदेश बनावे, ही मागणी करीतच होते.
 
 
भारतीय जनता पार्टीच्या 2014 च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा मुद्दा होता. त्यानुसार 5 ऑगस्ट 2019 ला जेव्हा जम्मू काश्मीर राज्याचे कलम 370 रद्द झाल्यावर जम्मू काश्मीर आणि लडाख यांना वेगळे करून दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनविले गेले. केंद्राच्या या निर्णयाचे लडाखच्या लोकांनी सुरुवातीला जोशात स्वागत केले होते. मात्र 1 ऑक्टोबर 2019 ला जेव्हा अधिकृत रीतीने लडाख केंद्रशासित प्रदेश बनले तेव्हा लडाखला विधानसभारहित केंद्रशासित प्रदेश बनविले गेले अन् लडाखवासी नाराज झाले. मात्र साल 2023 पासून त्यांच्या मागण्यांचे स्वरूप बदलले आणि विशेषतः मागील दोन महिन्यांपासून तर येथील आंदोलनाला आणि घडामोडींना वेग आला. अचानक या आंदोलनाला परत धार का आली? मागील वर्षात असे काय झाले, की या मागण्यांनी पुन्हा जोर धरला? या प्रश्नातच खरी मेख आहे.
 
 
सोनम वांगचूक यांनी आपण आंदोलनाचे स्वरूप उग्र करणार, असे वक्तव्य 2023 मध्येच केले होते. 4 मार्च 2024 रोजी अ‍ॅपेक्स बॉडी ऑफ लेह (ABL) चे तीन सदस्य आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सचे तीन सदस्य अशा एकूण सहा सदस्यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिल्लीमध्ये एक बैठक केली आणि त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवल्या. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा. तसे शक्य नसल्यास किमान लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या संसद जागा देण्यात याव्यात; लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे आणि लडाख लोकसेवा आयोगाची स्थापना करून लडाखच्या युवकांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, या मागण्या सदस्यांनी केल्या. या भूभागातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक जनजातींच्या सांस्कृतिक जतनासाठी आपण या मागण्या करीत आहोत, असे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या बैठकीमध्ये त्यांना अपेक्षित असा निर्णय होऊ शकला नाही आणि म्हणून 6 मार्च 2024 पासून पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लडाखच्या लोकांनी उपोषण चालू केले.
 
 
ladakh movement
 
आदिवासी जनजातींना स्वायत्तता आणि पर्यावरणाचे संरक्षण असे जे या प्रश्नाचे साधे सोपे रूप बनविले जात आहे तेवढा सरळ हा प्रश्न नाही. हे तर केवळ हिमनगाचे वर दिसणारे टोक आहे. या प्रश्नाची गुंतागुंत, क्लिष्टता आणि गांभीर्य सहज न दिसणारे व खोल रुजलेले आहे. हा संपूर्ण विषय जर साकल्याने जाणून घ्यायचा असेल तर लडाखवासीयांच्या मागण्यांबरोबरच या परिसराची भौगोलिक परिस्थिती, तेथील हवामान व जलवायू, सीमावर्ती सुरक्षेच्या दृष्टीने या भूमीचे महत्त्व आणि या संपूर्ण प्रश्नामागील चीनची भूमिका हे सर्व समजून घेणे अधिक आवश्यक आहे.
 
 
वर जसे नमूद केले की, मागील वर्षापासून या मागणीने जोर का धरला ही मेख समजून घेण्यासाठी सर्वात आधी लडाखची थोडी भौगोलिक पार्श्वभूमी जाणून घेऊ. हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांच्या परिसरात पराहिमालयामध्ये स्थित असलेले लडाख हे एक शुष्क बर्फाळ पठार व शीत वाळवंट आहे. हा भूभाग पाकिस्तान, तिबेट आणि चीन या देशांच्या सीमेलगत असून सीमावर्ती सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि अतिमहत्त्वपूर्ण असा हा प्रदेश आहे. शुष्क पठार असले तरी हिमनद्यांचे स्रोत या परिसरात मुबलक आहेत. या गोड्या पाण्याच्या शुद्ध हिमनद्या म्हणजे जणू नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना आहेत. लडाखला जोडलेले तिबेट हे आर्क्टिक आणि अंटार्क्टिकानंतरचे सर्वात मोठे जलस्रोत मानले जाते. याला थर्ड पोल आणि ‘वॉटर टॉवर ऑफ द वर्ल्ड’ असेही म्हणतात. तिबेटमध्ये अनेक नद्यांचे स्रोत आहेत, त्यापैकी काही लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलच्या आत लडाखमध्ये आहेत.
 
 

vivek
 
गिल्गिट बाल्टिस्तान ज्यावर आज पाकिस्तान आपला हक्क सांगतो आणि अक्साई चीन जे 1962 पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे, हे दोन्ही प्रदेश लडाखमध्येच आहेत. शक्सगम खोरे जे पाकिस्तानने परस्पर चीनला 1963 मध्ये भेट(?) म्हणून देऊन टाकले तेदेखील याच भूमीवर आहे. आजवर स्वतंत्र भारताने जी युद्धे लढली 1947-48 असो वा 65 चे असो वा कारगिल युद्ध असो, या लढाया लडाखच्या भूमीवर लढल्या गेल्या आहेत.
 
 
लडाखचे हे भौगोलिक वैशिष्ट्य एवढ्या तपशीलवार येथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे माणसाच्या वास्तव्याच्या दृष्टीने फारसे अनुकूल वातावरण नसलेल्या लडाखबाबत चीनच्या ज्या काही उघड आणि छुप्या कुरापती चालू असतात त्याचे मुख्य कारण या नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे हे आहे. आज जगभरात राष्ट्राराष्ट्रांमध्ये होणारी युद्धे आणि तणाव पाहिले तर त्यांच्या मुळाशी नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असलेल्या भूमीसाठी होणारा झगडा हे कारण असते.
 
 
थोडक्यात, नैसर्गिक देणगी लाभलेली ही भूमी भारताच्या विकासाच्या, सुरक्षेच्या, परराष्ट्र व्यवहाराच्या आणि मुख्यतः चीनच्या हालचालींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. चीनला या नद्यांवर ताबा हवा आहे. तिबेटमधील यारलुंग सांगपो म्हणजे आपल्याकडील आसामची जीवनरेखा असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीची दिशा चिंजांगकडे वळवण्याचे चीनचे मनसुबे आहेत. शिवाय, त्यांना सुमारे 135 किमी लांबीचे पँगॉन्ग सरोवर पूर्णपणे काबीज करायचे आहे. या सरोवराचा 40 किमी भाग लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलच्या भारतीय बाजूच्या आत आहे. त्यामुळे पाण्यावर हक्क हवा म्हणून चीनची लडाखवर धूर्त नजर आहे. शक्सगम खोरे जेथे आज 250 पेक्षा जास्त हिमनद्या आहेत, ते पाकिस्तानने चीनला परस्पर दिले. त्याचे कारण येथील हिमनद्या.
 


ladakh movement 
 
हिमनद्यांचे हे शुद्ध पाणी भौतिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज पेसमेकरपासून स्मार्ट फोनपर्यंत अक्षरशः प्रत्येक आधुनिक उपकरणामध्ये जे मायक्रो चिप आणि मायक्रो वेफर्स वापरले जाते ते बनविण्यासाठी शुद्ध पाणी आणि वाळू या दोन गोष्टींची आवश्यकता असते. चीन हे निश्चित जाणते की, चीनमधील नद्या आता प्रदूषित असल्याने त्यांना मायक्रो चिप सुपर पॉवर बनण्यासाठी हिमालय आणि काराकोरम भागातील या हिमनद्यांची नितांत गरज भासणार आहे. त्यादृष्टीने चीनने आधीच चीननियंत्रित लडाखमध्ये काम चालू केले आहे. सियाचीन ग्लेशियर आणि शक्सगम खोर्‍याजवळ, ज्यावर चीनची अनधिकृत सत्ता आहे, तेथील झिंगजियांग भागात जीसीएल पॉली एनर्जी होल्डिंग्स या चीनच्या कंपनीने पॉलिसिलिकॉन उत्पादन करण्यासाठी प्लांट आधीच उभारलेला आहे. त्यामुळे चीनचे हे मनसुबे रोखणे आणि आपली नैसर्गिक साधनसंपत्ती संरक्षित ठेवणे हा केंद्र सरकारसमोर जास्त गंभीर प्रश्न आहे. या नैसर्गिक संपत्तीवर भारताचा ताबा असणे हे अतिशय गरजेचे आहे.
 
 
लडाखवर चीनची नजर असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तेथील खनिज साठा. लडाखमध्ये अनेक खनिजांचा खजिना आहे. या भागात युरेनियम, लिथियम, तांबे, जस्त, शिसे अशी जवळपास 94 प्रकारची विविध खनिजे आहेत. चीनचे मुख्य लक्ष या पठारामध्ये दडलेल्या युरेनियममध्ये आहे. युरेनियम अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. 9 फेब्रुवारी 2023 मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भागात लिथियमचा प्रचंड मोठा साठा सापडला. आजच्या आधुनिक जगात औद्योगिकीकरणासाठी आणि देशाच्या विकासासाठी युरेनियम आणि लिथियम ही दोन्ही खनिजे अत्यावश्यक आहेत. स्मार्ट फोन, विद्युत वाहन आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविण्यासाठी लिथियम मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आजवर भारताला लिथियम आयात करावा लागत असे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया अजून या लिथियमचा अभ्यास करीत आहे; पण प्राथमिक अंदाजानुसार सापडलेला हा लिथियमचा साठा भारताला लिथियम उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर नेऊ शकतो. ज्या धातूच्या आयातीवर आज भारत अब्जावधी रुपये खर्च करतो त्याचा साठा आपल्याकडे मिळणे, ही एक मोठी बाब आहे. आज जगात लिथियम बॅटरींची मागणी प्रचंड प्रमाणात आहे. चीन लिथियम बॅटरीच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील एकूण उत्पादनातील 70% लिथियम बॅटरीचे उत्पादन चीनमध्ये होते. आपल्याकडे सापडलेल्या साठ्यामुळे चीनला हादरा बसला आहे. या साठ्यावर ताबा मिळविण्यासाठी चीन साम, दाम, दंड, भेद सर्व काही वापरणार हे निश्चित. चीनच्या या दुष्ट खेळींचा या आंदोलनामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हात तर नाही ना हे तपासावयास हवे.
 

ladakh movement 
 
या तपशीलवार माहितीच्या पार्श्वभूमीवर आता या मागण्यांचा विचार करू. आंदोलनकर्ते आणि त्यांचे समर्थक म्हणत आहेत की, लिथियम बॅटरी निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि खाण उद्योग लडाखच्या पर्यावरणाला हानी पोहोचवू शकते. औद्योगिकीकरण तेथील जलवायूसाठी हानीकारक आहे. पर्यावरणाला वाचविण्यासाठी लडाखमध्ये औद्योगिकीकरण होऊ नये आणि त्यासाठी लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून सुरक्षा द्यावी, जेणेकरून तेथील पर्यावरण सुरक्षित राहील.
 
 
ही सहावी अनुसूची म्हणजे नेमके काय? भारताचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची विविधता. भौगोलिक, भाषिक, सांस्कृतिक, पारंपरिक अनेकविध वैविध्यांनी नटलेला आपला भारतच; परंतु या विविधतेला जपत आपली एकता टिकविण्याचे शिवधनुष्य आपल्या संविधानाला पेलायचे होते. ते लीलया पेलण्यासाठी आपल्या संविधानात अनेक तरतुदी आहेत. त्यापैकी एक म्हणजे संविधानाच्या भाग 10 मधील कलम 244. याचे दोन भाग आहेत, एक पाचवी अनुसूची आणि दुसरा सहावी अनुसूची. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात अशा कित्येक जातीजमाती होत्या ज्या भारताच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या होत्या. अनेक आदिवासी जमातींना आपल्याच प्रदेशात आपल्याच पद्धतींनुसार राहायचे होते. त्यांना सन्मानाने त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जतन करता याव्यात, त्यांना नाराज न करता सामाजिक ऐक्य टिकावे आणि त्यांना मुख्य प्रवाहाशीदेखील जोडता यावे म्हणून हे कलम 244 काही आदिवासी जमातींना स्वायत्तता देण्यासाठी बनविले गेले. संविधानानुसार त्या वेळच्या आसाममधील आणि आजच्या मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाम या चार राज्यांतील काही जमातींना सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले आहे.
 
 
 
त्यानुसार त्यांच्या भूप्रदेशात तेथील स्थानिक लोकांना बरेच निर्णय घेण्याची मुभा मिळते. उर्वरित भारतातील ज्या आदिवासी जमाती मुख्य धारेपासून दूर आहेत त्यांना पाचव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले गेले. लडाखचे म्हणणे आहे की, तेथेही 90 टक्के जनता आदिवासी आहे आणि त्यांची संस्कृती व तेथील हवामान, पर्यावरण आगळेवेगळे आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी लडाखलादेखील सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे. मात्र सहावी अनुसूची ही संविधानाने केवळ ईशान्येकडील राज्यांमधील अशा जमातींसाठी दिली आहे ज्या भारताच्या मुख्य धारेपासून पूर्णतः तुटलेल्या आहेत. लडाख असे पूर्णपणे तुटलेले नाही. पर्यटन व्यवसायामुळे तेथे काही महिने जगभरातून लोक येतात.
 
 
येथील जवळपास 90% जनता आदिवासी असून चांगपा, बाल्टी बेडा, ब्रोकपा, दार्द अशा वेगवेगळ्या आदिवासी जमाती येथे आहेत. मात्र लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 2011 च्या जनगणनेनुसार, कारगिलची एकूण लोकसंख्या 1,40,802 असून 76.87% लोक धर्मांतरित मुस्लीम (बहुतेक शिया) आहेत. लेहमध्ये एकूण लोकसंख्या 1,33,487 असून त्यातील 66.40% बौद्ध झाले आहेत. येथे तिबेटचा प्रभाव असल्याने बौद्ध धर्म झपाट्याने पसरला आहे. शिवाय मुस्लीम धर्मांतरणदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने तेथे सहावी अनुसूची लागू करणे कितपत योग्य होईल यावर अनेक अभ्यासक शंका व्यक्त करतात. लडाखच्या आदिवासी जनजातींच्या संस्कृतीला जतन करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या मागण्या आहेत, असे सोनम वांगचूक व त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे; पण जर 2011 च्या जनगणनेचा अभ्यास केला तर या भूप्रदेशात धर्मांतरणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. 70 वर्षे कलम 370 ची विशेष स्वायत्तता आणि सुरक्षा मिळूनदेखील सीमेलगतच्या पाकिस्तान, चीन आणि तिबेटच्या प्रभावामुळे येथील स्थानिक आदिवासी लोकांचे मोठ्या प्रमाणात इस्लाम आणि बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर झालेले आहे. म्हणजेच आदिवासींच्या संस्कृतीला विशेष स्वायत्तता फारशी उपयुक्त ठरली नाही असेच दिसते.
 
 
सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झाल्यावर स्थानिक लोकांना अधिक स्वायत्तता मिळते हे खरे. मात्र लडाख हे क्षेत्र चीनपासून वाचवायचे असेल तर केंद्राकडे जास्त अधिकार असायलाच हवे. त्याशिवाय केंद्र सरकार चीनला रोखू शकणार नाही. त्यामुळे या मागणीवर या दृष्टीनेदेखील विचार करायला हवा.
 
 
पर्यावरणाचे संवर्धन हा आज अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहेच. त्यात वादच नाही. मात्र आजच्या आधुनिक युगात ज्या धातूचा सर्वात जास्त वापर होतो, जो धातू देशाला महासत्ता बनवू शकतो, त्यास पूर्णपणे दुर्लक्षित करणे हा पर्याय निश्चितच होऊ शकत नाही. भारताने जर आज या साठ्यांकडे आणि आपल्या हिमनद्यांकडे दुर्लक्ष केले तर चीन त्याचा गैरफायदा घेणार हे निश्चित. चीन आपल्या महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी या भूभागातील पर्यावरण नष्ट करतच आहे. याचे अनेक पुरावे आहेतच. त्यामुळे सहावी अनुसूची हा योग्य पर्याय वाटत नाही.
 
 
भारत सरकारने लडाखच्या विकासाच्या दृष्टीने पावलेदेखील उचलली आहेत. कलम 370 रद्द करण्यामागे जम्मू काश्मीर आणि लडाखमधील शुद्ध पाण्याचे स्रोत, खनिजे व येथील नैसर्गिक साधनसंपत्ती चीनच्या हातात जाऊ नये हेदेखील एक कारण आहे. भारताने दक्षिण कोरिया, जपान आणि तैवान या तीन देशांना या प्रदेशात मायक्रोचिप बनविण्याचे प्लांट उभे करण्यासाठी बोलविले आहे. आपण या तीन देशांच्या साहाय्याने लडाखमधील जलवायूला हानी न पोहोचवता विकास करण्याचे प्रयत्न करीत आहोत. लडाखमध्ये जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्लांट उभारले जात आहे. याच्या मदतीने वीजनिर्मितीसह एक वर्षात जवळपास 12,750 टन एवढे कार्बन उत्सर्जन रोखले जाईल.
 

vivek 
 
हे सत्य आहे की, काही देशांमध्ये अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा सापडल्यावर त्यांची भौतिक प्रगती झाली. मात्र पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले व त्याचे अन्य दुष्परिणाम जगाला भोगावे लागले; पण एखादी कृती इतिहासात धोकादायक ठरली म्हणून सोडून देण्याऐवजी त्यातील धोके ओळखून, इतिहासातून शिकून, नवीन उपाययोजना करून, धोके टाळून ती कृती योग्य पद्धतीने करणे हे सुज्ञपणाचे लक्षण असते. औद्योगिकीकरण वाईट नाही. औद्योगिकीकरणाशिवाय आज पर्यायदेखील नाही. योग्य नियम, कायदे आखून, पर्यावरणपूरक पद्धतींनी विकास साधला जावा. खनिजसंपत्ती, खाण उद्योग आणि नैसर्गिक साधनांचा वापर तारतम्य बाळगून सदसद्विवेकबुद्धीने करण्यासाठी सोनम वांगचूक यांच्यासारख्या पर्यावरणवादी अभ्यासकांनी, शास्त्रज्ञांनी, चिंतकांनी आणि आपण सर्व भारतीयांनी सरकारला मदत करावी. आपला भूप्रदेश आणि आपली साधनसंपत्ती चिनी ड्रॅगनच्या घशात न जाऊ देता त्याचा आपल्या देशाच्या विकासासाठी आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोग करून घ्यावा.
 
 
अजून एक बाब म्हणजे, असे नाही की लडाखच्या स्थानिक जनतेचा तेथील निर्णयात मुळीच सहभाग नाही. लडाखला आपले प्रश्न, आपली मते आपल्या स्थानिक लोकांमार्फत मांडता यावेत म्हणून 1995 मध्ये लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद स्थापन करण्यासाठी कायदा करून लेह जिल्ह्यासाठी लेह अ‍ॅपेक्स बॉडी स्थापन केली गेली होती. कारगिल जिल्ह्यासाठी 2003 मध्ये कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स निर्माण केली गेली. या दोन्ही परिषदांमध्ये प्रत्येकी 30 सदस्य असतात. त्यातील 26 निवडून आलेले स्थानिक सदस्य असतात, तर 4 नामित सदस्य असतात. म्हणजेच लडाखच्या प्रश्नांना मांडण्यासाठी निवडून आलेले 52 सदस्य आणि नामित 8 सदस्य आहेत, जे तेथील भूमी, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा मुद्द्यांवर सल्ला देतात, आपले मत मांडतात आणि लोकांचे प्रश्न सरकारसमोर ठेवतात. याशिवाय लेह आणि कारगिल या दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या दोन संसदेच्या जागा द्याव्यात, अशीही लडाखची मागणी आहे. सध्या स्वायत्त परिषदेच्या रूपाने निवडून आलेले सदस्य सल्ला देत असले तरीदेखील विधानसभा आणि संसदेच्या जागा या दोन्ही मागण्यांवर सरकार निश्चित सकारात्मक विचार करू शकते.
थोडक्यात, लडाखच्या मागण्या वरकरणी जरी योग्य वाटत असल्या तरी त्या जशाच्या तशा मान्य केल्यास भारताला दूरगामी नुकसान होऊ शकते. चीनची ताकद कमी करायची असेल, त्यास टक्कर देण्यासाठी भारताला सशक्त व्हायचे असेल, तर लडाखच्या जलवायूवर भारताचे नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे. आज गरज आहे लडाखच्या जनतेच्या भावना जपत त्यांच्या संस्कृतीचे, तेथील जलवायूचे संरक्षण करत भारताचा विकास साधणे. लडाख आपला आहे, तेथील जनतेला आपण दुर्लक्षित नव्हे तर संरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलायला हवीत. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर श्रद्धा असणारा आपला भारत निश्चितच पर्यावरणपूरक पावले उचलत विकास साधू शकतो.