द डिस्टर्बन्स - एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस

विवेक मराठी    19-Apr-2024
Total Views |
@दामोदर पुजारी  9850194075
 
vivek 
 संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहराला पावसाने झोडपून काढल्याने तेथील सार्वजनिक ठिकाणांवर पाणी साचले आहे. चोवीस तासांत 120 मिमीपेक्षाही - जी तेथील मासिक सरासरीपेक्षाही जास्त आहे - जास्त पाऊस पडल्याने अगदी विमानतळापासून ते नागरी वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. अत्यंत कमी वेळात पावसाने मासिक सरासरी भरून काढण्याच्या घटनांना ‘वेदर एक्सट्रीम्स’ प्रकारात गणले जाते. अशीच काही परिस्थिती एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र आणि एकूणच मध्य भारतात आपल्याला पाहायला मिळाली. रखरखीत हवामानासाठी ओळखले जाणार्‍या विदर्भ आणि मराठवाड्यात एप्रिलच्या कडक उष्णतेने या वर्षी अनपेक्षित पाहुण्यांना वाट करून दिली - अवकाळी पाऊस. काही जण असाहाय्य उष्णतेपासून अचानक मिळालेल्या सुटकेचे स्वागत करत असले तरी, या प्रदेशांतील शेतकर्‍यांसाठी, मुसळधार पाऊस एक विनाशकारी दुधारी तलवार ठरला. दर वर्षी साधारणपणे मान्सूनच्या परतीनंतर आणि उन्हाळ्यात होणार्‍या अवकाळी पावसाने ह्या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ह्या वेळी मात्र विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि मध्य भारतसुद्धा अशा अवकाळी पावसाचा बळी ठरला. हा लेख या एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची कारणे, पिकांचे आणि पशुधनाचे झालेले नुकसान, कृषिमालाच्या किमतींवर होणारा संभाव्य परिणाम आणि या संवेदनशील प्रदेशातील शेतकर्‍यांसाठी हवामान सल्ला अधिक उपायकारक पद्धतीने पोहोचवण्याच्या मार्गांवर ऊहापोह करण्यासाठी लिहिलेला आहे.
 
 
सर्वात प्रथम, ह्या अवकाळी पावसाची मूळ कारणे समजावून घेऊ. हा अवकाळी पाऊस अचानकपणे घडून आलेल्या हवामानातील बदलांच्या घटकांचा एक जटिल मिश्रणाचा परिणाम आहे. ह्यातील मुख्य कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. भूमध्य समुद्रात (मेडिटेरेनियन सी) उगम पावणार्‍या या अतिरिक्त-उष्णकटिबंधीय कमी-दाब प्रणाली (एक्स्ट्रा ट्रॉपिकल लो प्रेशर सिस्टीम्स) काही वेळा त्यांचा प्रभाव पूर्वेकडे वाढवू शकतात, ज्यामुळे मध्य भारताकडे आर्द्रतेने भरलेले वारे येतात. एप्रिल 2024 मध्ये, विशेषत: सक्रिय असलेल्या विक्षोभाने (वेस्टर्न डिस्टर्बन्स) अनपेक्षित पाऊस सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. भारतीय हवामान खात्याने 11 एप्रिल 2024 रोजी प्रसृत केलेल्या 5-10 एप्रिलमधील हवामान स्थितीचे विश्लेषण करणार्‍या बुलेटिनमधील माहिती पाहूयात (खाली दिलेला नकाशा पाहा. सौजन्य: भारतीय हवामान विभाग). वेस्टर्न डिस्टर्बन्सेस नकाशात थऊ ने दर्शविले गेले आहेत. सोबतच भारतीय उपखंडाच्या पूर्व आणि ईशान्य भागांत कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तयार झालेले सायक्लोनिक सर्क्युलेशन उउ ने दर्शविलेले आहेत. सामान्यतः मान्सून पश्चिमेकडून भारतीय उपखंडावर येण्यापूर्वी हेच वारे उलट्या दिशेला म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात ज्यांना ईस्टर्ली विंड्स म्हणतात. अधिक उष्णतेमुळे भारताच्या मध्य आणि पूर्व भागांत कमी दाबाचे पट्टे तयार होऊन सायक्लोन तयार होतात. 5-9 एप्रिलदरम्यान ही परिस्थिती निर्माण झाली होती. सोबतच तमिळनाडूपासून गुजरातपर्यंत आणि राजस्थानपासून उत्तर प्रदेशपर्यंत वार्‍यांचे कमी दाबाचे पट्टेसुद्धा निर्माण झाल्याने आर्द्रता भरलेल्या वार्‍यांनी मध्य भारतावर पाऊस आणला. सप्टेंबर ते जानेवारी आणि एप्रिल ते जूनदरम्यान अशी स्थिती अनेकदा निर्माण होऊन मध्य भारतात आणि विशेषतः विदर्भात अवकाळी पाऊस पडल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. अरबी समुद्रात तयार होणारे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारे ईस्टर्न डिस्टर्बन्सेस मोसमी वार्‍यांच्या वाटचालींवर परिणाम करताना अनेकदा दिसलेले आहेत. अशा अवकाळी पावसासारख्या एस्क्ट्रीम वेदर इव्हेंट्सची वाढती वारंवारता आणि तीव्रता ही हवामानशास्त्रज्ञ आणि धोरणकर्त्यांसाठीही चिंतेचा विषय आहे.
 
 
विदर्भ आणि मराठवाडा हे काही कृषिमालांच्या राष्ट्रीय उत्पादनात मोठे योगदान देतात. या क्षेत्रांतील उत्पादनात घट झाल्यामुळे देशभरातील किमतींवर मोठा परिणाम होऊ शकतो. काही भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान केले. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील सुमारे 50,000 हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. कापूस, गहू, तूर पीक नुकसानीचे सविस्तर पंचनामे आणि मोजमाप अजून चालू आहे. पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळेसुद्धा नुकसानीचे प्रमाण वाढवले आहे. या नुकसानीमुळे या भागातील शेतकर्‍यांच्या जीवनमानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यापैकी बरेचसे लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत, जेे आधीच कर्ज आणि कमी नफा यांसारख्या समस्यांना तोंड देत आहेत. अवकाळी पाऊस त्यांना आर्थिक ताणतणावात आणखी खोलवर ढकलू शकतो आणि पुढच्या पेरणीची क्षमता धोक्यात आणू शकतो. मुसळधार पावसापासून वाचलेली पिकेदेखील आर्द्रतेच्या नुकसानीमुळे गुणवत्तेच्या समस्यांना तोंड देऊ शकतात. हे उत्पादनाच्या बाजारमूल्यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे शेतकर्‍यांची कमाई आणि ग्राहक किंमत दोन्ही प्रभावित होऊ शकतात.
 
 
महत्त्वाचे म्हणजे, इतक्या मोठ्या हवामान बदलांची सूचना शेतकरी आणि सामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे कशी पोहोचवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. सध्या भारतीय हवामान विभाग हवामानविषयी बुलेटिन आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर), फेसबुक, यूट्यूबसारख्या समाजमाध्यमांवर वेळोवेळी प्रसृत करते. मात्र हे बुलेटिन इंग्रजी भाषेत असल्यामुळे त्यांची सामान्य नागरिकांसाठी उपलब्धता मर्यादित राहते. अशी बुलेटिन स्थानिक भाषेत भाषांतरित केल्यास शेतकर्‍यांनासुद्धा त्याचा लाभ घेता येईल. दूरदर्शन आणि त्यांच्या स्थानिक वाहिन्या (सह्याद्रीसारख्या) हवामान विभागाने दिलेल्या बुलेटिन आपल्या वृत्तांकनात समाविष्ट करत असतात. सोबतच स्थानिक भाषांमध्ये हवामान वृत्तांत मोबाइलद्वारे प्रसृत केल्यास त्याची मदत थेट गरजू शेतकर्‍यांपर्यंत पोहोचू शकेल.
 
 
हवामान वृत्तांत जरी हवामान विभाग तयार करत असले तरी अनेकदा असे दिसून येते की, तालुका आणि गावपातळीवर असणारे हवामान जिल्ह्यासाठी दिलेल्या हवामान अंदाजापेक्षाही वेगळे किंवा विरुद्ध असू शकते. ही हवामान विभागाची अंदाज वर्तवण्याची चूक म्हणता येणार नाही. हवामान अंदाज हा अधिक सूक्ष्म पातळीवर अचूक ठरण्यासाठी हवामान मोजमाप करणारी स्वयंचलित किंवा अंशतः स्वयंचलित यंत्रणा गावपातळीवर उभी करण्याची आवश्यकता आहे. अशा व्यवस्थेचा सुरुवातीचा खर्च जरी मोठा दिसत असला तरी तो कॉर्पोरेट सी. एस. आर. किंवा समाजसेवी संस्थांच्या भागीदारीने उभा केला जाऊ शकतो. अशा प्रकारे बनवण्यात आलेले सूक्ष्म (ग्रॅन्युलार) हवामान अंदाज गावपातळीवरदेखील अधिक प्रभावी ठरू शकतात.
 
 
एकूणच, अवकाळी पाऊस चिंताजनक असला तरी हवामान बदलांना लक्षात घेता अशा घटना वारंवार येत्या काळात घडणार हे अपेक्षित आहे. कदाचित काही घटनांची तीव्रताही अधिक असू शकते. त्यामुळे पीक विमा वितरण, मोजमाप आणि त्याची अंमलबजावणी अधिक सक्षम करणे अवश्य आहे. मुळातच पीक विमा ही अशी गोष्ट आहे की, ज्यामध्ये इतर कोणत्याही विमा प्रकारात अंतर्भूत नसलेली जोखीम स्वीकारण्यात - म्हणजे हवामानाची अनिश्चितता - आली आहे. त्यासाठी विमा कंपन्यांचा सक्षमीकरणावर धोरणांच्या पातळीवर अधिक व्यापक विचार होणे गरजेचे आहे. सोबतच ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर शेतमाल खरेदी करतात त्यांनाही ह्या विमा वितरकांच्या जाळ्यात समाविष्ट करून घेतल्यास लाभार्थी शेतकर्‍यांची व्याप्ती वाढू शकेल.
 
 
हवामान जसजसे बदलत आहे त्यानुसार होणार्‍या परिणामांना डोळ्यापुढे ठेवून कृषी क्षेत्राला सक्षम करणारे क्लायमेट रेसिलियन्ट अ‍ॅग्रिकल्चरसारखे पथदर्शी प्रयोग राज्य शासनाने अंगीकृत करून शेतकर्‍यांना येऊ घातलेल्या आव्हानांसाठी तयार करणे आवश्यक आहे. असे झाल्यास अवकाळी पावसासारख्या घटना केवळ हवामानातील डिस्टर्बन्सपलीकडे फार मोठ्या प्रमाणावर मानवी जीवनमान बाधित करू शकणार नाहीत.