महाराष्ट्राच्या निरोगी हास्यासाठी कटिबद्ध - देवेंद्र फडणवीस

विवेक मराठी    02-Apr-2024   
Total Views |
मार्च महिन्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणार्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात आले; परंतु मार्च महिन्यात ‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे’ साजरा करण्यात आला. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी विविध योजना, विविध विकास प्रकल्प राबवणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी ओरल हेल्थ संदर्भातही अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र आज ओरल हेल्थ पॉलिसी असणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा हा आढावा.
 
devendra fadnavis
 फोटो सौजन्य : google
 
20 मार्च रोजी जगभर वर्ल्ड ओरल हेल्थ डे साजरा करण्यात आला. मागील काही वर्षे या दिवशी अनेक चर्चासत्रे, कार्यक्रमांमध्ये तोंडाचा कर्करोग, तोंडाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी विचारविनिमय झाला; पण हे झाले केवळ एका दिवसापुरते. परंतु, याची अंमलबजावणी अत्यल्प होताना दिसते. याला कारणं होती सरकारची उदासीनता आणि गांभीर्याचा अभाव.
 
 
पण 2014 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या आधिपत्याखाली आरोग्यविषयक महत्त्वाच्या योजना राबवण्यात येऊ लागल्या. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुलांनी समाजासाठी आपल्या शिक्षणाचा वापर करावा, तसेच प्रशासकीय सेवेत त्यांना कार्य करता यावे, याकरिता मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरू केली. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत संधी देणारी आजवरची ही पहिलीच योजना होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी जवळजवळ 50 विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळत असे. 2017 मध्ये डॉ. मयूर मुंढे या विद्यार्थ्याची मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड झाली. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये काम करत असताना जनतेच्या आरोग्य समस्या त्याने जवळून पाहिल्या. 2017 मध्ये सामाजिक आरोग्य व्यवस्थेसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण करताना मुख्यत: आदिवासी पट्ट्यात, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात असणार्‍या आरोग्य समस्या त्याने मांडल्या. यातील प्रमुख समस्या होती ती तोंडाचा कर्करोग. लोकांमध्ये कर्करोगाविषयी जागृती नसणे, व्यसनाधीनता, तोंडाची स्वच्छता म्हणजे काय, याबद्दल असणारे अज्ञान अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक होते. यातून आपल्या जनतेला वाचवण्यासाठी आणि नागरिकांच्या हास्याला ‘आरोग्यदायी’ बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले.
 
devendra fadnavis 
 
2017 मध्ये मुखस्वास्थ्यासंदर्भातील माहिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आली. एका 25-26 वर्षीय तरुणाने एखादी समस्या सांगितली आणि तिचा गांभीर्याने विचार झाला तो केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या सुशासनाच्या काळातच. याच दरम्यान फडणवीस यांनी डॉ. दर्शन दक्षिणदास यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भामध्ये दंत तपासणीसंदर्भात एक मोहीम राबवली. तेव्हा शालेय मुलांमध्ये आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये ‘प्री कॅन्सर स्टेज’मध्ये कर्करोग होण्याची पूर्वावस्था आढळून आली आणि हे प्रमाण लक्षणीय होते. या मोहिमेमध्ये उपलब्ध झालेल्या माहितीवर विचार करून, ‘स्वच्छ मुख अभियान’ निर्माण करण्यासंदर्भात 2018 मध्ये कार्यवाही करण्यात आली; परंतु त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सत्तांतर झाले. 2019 ते जून 2022 या काळात महाराष्ट्राचा विकास करणार्‍या योजना प्रामुख्याने बंद करण्यात आल्या होत्या. जून 2022 मध्ये पुन्हा सत्तांतर झाले आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले. या सुशासनाच्या काळात मुखस्वास्थ्यासंदर्भातील स्वच्छ मुख योजनेची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. 26 जानेवारी 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली.
 
मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते तरुणांमध्ये कर्करोग होण्याच्या पूर्वस्थितीचे प्रमाण लक्षणीय आहे. याला मुख्य कारण हे व्यसनाधीनता, मावा आणि गुटखा खाणे, मशेरी लावण्याची सवय. केवळ शासनाने योजना राबवून समाज प्रभावित होण्याची शक्यता कमी होती. म्हणून योजनेचा अधिक प्रचार व्हावा, तोंडाच्या आरोग्यासंदर्भात लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. सचिन तेंडुलकर याने कधीही मावा, गुटखा किंवा सुगंधी बडीशेप अशा प्रकारच्या जाहिराती केलेल्या नाहीत, तसेच आबालवृद्ध त्याचे चाहते असल्यामुळे ही योजना अधिक प्रभावशाली ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
 
devendra fadnavis
 
टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरचे ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितल्यानुसार, दरवर्षी तंबाखू सेवनामुळे मुखाचा कर्करोग झाल्याचे नवीन 1 लाख तरी रुग्ण येतात. पुरुषांमध्ये मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुखाच्या कर्करोगाचे निदान झालेल्यांपैकी 50 टक्के लोक 12 महिन्यांच्या आत मृत्युमुखी पडतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी मुखाच्या कर्करोगाचे लवकर निदान होणे आवश्यक असते.
 
 
फडणवीस यांनी सर्व खासगी आणि शासकीय दवाखान्यांमध्ये ही योजना राबवण्याचे आदेश दिले. या योजनेअंतर्गत 20 हजारांहून अधिक दंतवैद्यक कार्य करतील. इंडियन डेन्टल असोसिएशन, महाराष्ट्र डेन्टल असोसिएशन, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, आरोग्य सेवा संचालनालय यांच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात येत आहे. सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात येईल. रुग्ण तपासणीसह नियमित दात घासणे, तोंड स्वच्छ ठेवणे, आरोग्यदायी अन्नाचे सेवन करणे; सिगरेट, तंबाखू आणि तत्सम पदार्थांचे सेवन टाळणे, वर्षातून किमान दोन वेळा दाताच्या डॉक्टरकडे तपासणीसाठी जाणे या गोष्टी ‘स्वच्छ मुख योजने’तून सांगण्यात येत आहेत. शालेय विद्यार्थी आणि सामान्य जनतेसाठी पोस्टर्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून दातांच्या आणि तोंडाच्या स्वच्छतेसंदर्भात जागृती करण्यात येत आहे. तसेच 5 लाखांहून अधिक रुग्णांची तपासणीही करण्यात आली आहे. त्यातील 80 टक्के रुग्णांना तंबाखू आणि सिगरेटचे व्यसन आहे. या योजनेतून तोंडाच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यात येईल.
 
 
या योजनेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ’असं म्हणतात की, आपल्या एका हास्यामुळे जग जिंकता येते; पण ते हास्य प्रसन्न वाटेल असे असावे. यासाठी ओरल हेल्थ महत्त्वाची आहे. ओरल हेल्थ ही ओव्हरऑल हेल्थचा भाग आहे, हे समाजाला समजण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. कर्करोग, तोंडाचे आजार यासाठी ही योजना उपयुक्त ठरेलच; पण कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठीही ही योजना महत्त्वाची ठरेल.’
 
राज्याच्या विकासासोबत नागरिकांचे आरोग्यही निरोगी असावे, याची काळजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यामुळे संपूर्ण जग मुखाच्या कर्करोगाने चिंतेत असताना महाराष्ट्र हे भारतातील असे पहिले राज्य ठरले आहे, हे महत्त्वाचे.

वसुमती करंदीकर

 
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका, तर ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. सध्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात ज्योतिषही शिकत आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत १३ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.