दुसर्‍या स्वातंत्र्यासाठी संघ स्वयंसेवकांचे महत्त्वाचे योगदान- दिलीप क्षीरसागर

विवेक मराठी    02-Apr-2024
Total Views |
 
rss
 
सटाणा : आणीबाणीत मिसा कायद्याखाली कारावास भोगलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे योगदान देशाच्या दुसर्‍या स्वातंत्र्यासाठी ऐतिहासिक असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी येथे बोलताना काढले.
अखिल भारतीय लोकतांत्रिक सेनानी संघाचे वार्षिक एकत्रीकरण नुकतेच सटाणा येथे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक भानुदास येवला यांच्या निवासस्थानी पार पडले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना क्षीरसागर यांनी आणीबाणीतील घटनांना उजाळा दिला. संघशताब्दीनिमित्ताने सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने आगामी संघकामाची विस्ताराने मांडणी केली. तसेच सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आवाहन केल्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहितासाठी शंभर टक्के मतदान यासाठी समाजाचे प्रबोधन करण्याचे आवाहन केले.
आणीबाणीत कारावास भोगलेल्या रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी लोकतांत्रिक सेनानी संघ उभारला आहे. नाशिक जिल्ह्यातील 114 स्वयंसेवक सुमारे 18 महिने मिसा कायद्याखाली कारावासात होते.
 

rss 
वार्षिक बैठकीच्या निमित्ताने नासिक, येवला, मालेगाव, पेठ, वणी येथील मिसाबंदी एकत्र आले होते.
या वेळी जनजाती कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष व मिसाबंदी राहिलेले डॉ. मधुकर आचार्य (वणी) यांनी प्रास्ताविकात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.
भानुदास येवला कुटुंबातील पत्नी शकुंतला, पुत्र अश्विनीकुमार व तारकेश्वर, स्नुषा उज्ज्वला, सुनंदा, नातवंडे कमल, वरद, गुणवंत यांनी सर्वांचे हृद्य स्वागत केले. माजी नाशिक विभाग संघचालक कै. वाल्मीकराव तुसे (नांदगाव) यांच्या कुटुंबीयांच्या वतीने नातू श्रीकांत यांनी उपस्थितांचा सन्मान केला. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
हृदयस्पर्शी स्मरण
आणीबाणीत बंदिवासात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी खूप वाताहत झाली. त्याच्या दोन प्रातिनिधिक आठवणी सांगितल्या गेल्या. भानुदास येवला (सटाणा) यांनी, 5 नोव्हेंबर 1975 रोजी दिवाळीच्या दिवशी स्वतःला अटक झाली व त्याच दिवशी पत्नी शकुंतला या घरातील अपघातात पन्नास टक्के भाजल्याचे सांगितले.
दुसरे स्मरण म्हणजे अण्णा गजभार (पेठ) यांनी, कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीत ही अटक झाल्याचे सांगून त्याच वेळी पत्नी बाळंत होऊन मुलगा दगावल्याचे सांगितले.