संघ साधनांवर नाही तर कार्यकर्त्यांच्या जीवनावर चालतो! - सरसंघचालक

विवेक मराठी    20-Apr-2024
Total Views |
rss 
‘साप्ताहिक विवेक’च्या बहुचर्चित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ग्रंथाचे नागपुरात प्रकाशन
‘हिंदू’ ही ओळख आपण गौरवाने सांगितली पाहिजे, सरसंघचालकांचे प्रतिपादन
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा साधनांवर नाही तर कार्यकर्त्यांच्या जीवनावर चालतो, असे स्पष्ट प्रतिपादन करत ‘साप्ताहिक विवेक’च्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती’ या ग्रंथातून संघजीवन कसे जगावे याचा व्यावहारिक बोध मिळतो, अशी प्रशंसा पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केली. ‘साप्ताहिक विवेक’च्या या बहुचर्चित ग्रंथाचे प्रकाशन नागपूर येथे सरसंघचालकांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.
 
 
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास व्यासपीठावर पू. सरसंघचालकांसह हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पू. सरसंघचालकांनी ‘विवेक’च्या या ग्रंथाबाबत कौतुकोद्गार काढताना म्हटले की, प्रथमतः हा ग्रंथ हाती घेतल्यावर प्रतिक्रिया आली, की ग्रंथ खूप मोठा झाला आहे; परंतु संघाचा आजपर्यंतचा प्रवास शब्दबद्ध करायचा झाल्यास लक्षात येते, की ग्रंथ लहान झाला आहे. तथापि, संघाचा अभ्यास व चिंतनासाठी, संघविचार, आजचा विस्तार व संघ-संघ म्हणतात तो नेमका काय आहे हे आपल्याला ज्यांच्याकडे पाहून कळते, त्यांचे वर्णन वाचण्यासाठी हा ग्रंथ पुरेसा असल्याचे मोहनजी भागवत यांनी सांगितले.
 
 
rss
 
आपल्या विस्तृत संबोधनात डॉ. मोहनजी पुढे म्हणाले की, 1925 व 2024 या दोन स्थितींमध्ये खूप मोठे अंतर आहे. चारही बाजूंनी विरोध व विरोधक असताना, कोणत्याही साधनांशिवाय संघ सुरू झाला. सरसंघचालकांसह सर्वच कार्यकर्त्यांना अनेक प्रकारच्या अभावांमध्ये दिवस कंठावे लागले. परिस्थिती कितीही बदलली तरी आपण आपल्या मार्गावरून ढळायचे नाही, याचे भान प्रत्येक यशस्वी होणार्‍याला असते. स्वयंसेवकांना परिस्थितीच्या उतार-चढावांचा चांगला अनुभव आहे. अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांनी संघाचा उतार-चढाव पाहिला, विरोध व आताची अनुकूलताही पाहिली. या सर्व स्थितीतही संघ पुढे नेण्याची लवचीकता पेलण्यासाठी आग्रहपूर्वक जी स्थिरता असावी लागते, त्यासाठीच संघ आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
 
 
‘हिंदू’ ही ओळख गौरवाने सांगण्याची गरज
 
आपल्याकडे अनेक महापुरुष झाले, पराक्रमी झाले; परंतु आपल्यावर शतकानुशतके आक्रमणेही होत राहिली. हूण, मुघलांपासून ब्रिटिशांपर्यंत ही आक्रमणे झाली. प्रत्येकाशी संघर्ष करून, शौर्य-पराक्रम करून आपण त्यांच्या गुलामीतून स्वतंत्र झालो; परंतु पुन्हा वेगवेगळी आक्रमणे होत राहिली. कारण दर वेळी आपल्यात भेद निर्माण झाले, दर वेळी आपण त्याच चुका केल्या. आपल्या आत्मविस्मृतीमुळे आपले कोण, परके कोण याच्या भानाचा अभाव अनेकदा जाणवल्याचे सांगत पू. सरसंघचालक म्हणाले की, याचसाठी आपली ओळख काय आहे हे लक्षात घेऊन ही ओळख आपण स्पष्टपणे मांडण्याची गरज आहे. हिंदू हीच आपली ओळख असून ती प्रत्येकाला आपले मानायला शिकवते. तोच सनातन धर्म आहे, तोच मानवधर्म आहे. त्यामुळे हिंदू ही आपली ओळख आपण गौरवाने, अभिमानाने सांगितली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले.
 
rss 
 
कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्याचे सत्त्व राहिलेच पाहिजे
 
आपण आपली शक्ती, ओळख जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, हे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्याचे सत्त्व राहिलेच पाहिजे, असेही मोहनजी भागवत यांनी सांगितले. संघ साधनांवर नाही तर कार्यकर्त्यांच्या जीवनावर चालतो हे सांगतानाच ‘साप्ताहिक विवेक’च्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती’ या ग्रंथातून संघजीवन कसे जगावे याचा व्यावहारिक बोध मिळतो, अशी प्रशंसाही त्यांनी या वेळी केली.
 
 
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी सांगितले की, परमपूजनीय डॉ. हेडगेवारांनीच सांगितले होते, की संघ आपली पन्नाशी, साठी, शताब्दी वगैरे काहीही साजरे करणार नाही. मग संघाचा शताब्दीनिमित्त निर्माण केलेला हा ग्रंथ म्हणजे नक्की काय आहे? तर दादाराव परमार्थ यांनी म्हणून ठेवल्याप्रमाणे संघ म्हणजे हिंदुराष्ट्राच्या जीवनध्येयाचा क्रमबद्ध विकास आहे. म्हणूनच डॉ. हेडगेवारांनी मांडलेल्या संघविचाराची अभिव्यक्ती कशी होत गेली व त्यातून कालसुसंगत हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती कशी होत गेली, हे ’विवेक’ने या ग्रंथातून शब्दबद्ध केले असल्याचे प्रतिपादन रमेश पतंगे यांनी या वेळी केले.
 
 
या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात हा ग्रंथ सर्वदूर पोहोचवण्यासाठी विशेष योगदान देणार्‍या ‘सा. विवेक’च्या प्रतिनिधींचा पू. सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. दिलीप कुलकर्णी (पुणे), रमेश देवी (पुणे), महेश राव (नागपूर), गुरुराज कुलकर्णी (नवी मुंबई), विलास आराध्ये (लातूर) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सा. विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर यांनी केले.