गळफांदी कापून, झाडाची उंची कमी ठेवून कापूस उत्पादनवाढीचे तंत्र भारतीय किसान संघाचे दादा लाड यांनी विकसित केले आहे. असे केल्याने एकरी कमीत कमी 15 ते 21 क्विंटल उत्पादन येऊ शकते. या तंत्राला नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद (आय.सी.ए.आर.)ने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या तंत्राचा वापर करून समाधानकारक उत्पादन घेत आहेत.
दादा लाड हे भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे संघटकमंत्री आहेत. त्यांचा नेहमी शेतकर्यांशी संपर्क येतो. मुख्य म्हणजे गावरान कापूस लागवडीपासून ते आजच्या बीटी कॉटनपर्यंत कापूस उत्पादनातील चढउतार त्यांनी पाहिले आहेत. बीटी बियाणे आल्यानंतर कापसाच्या उत्पादनात होत गेलेली घटही त्यांनी अनुभवली आहे. संघटनेच्या कामानिमित्त त्यांचा शेतकर्यांपर्यंत प्रवास व्हायचा. शेतकर्यांच्या कापूस पिकांची स्थिती पाहायला मिळायची. सततच्या निरीक्षणातून त्यांना कापूस उत्पादनवाढीचे गुपित समजले. ते त्यांनी समजून घेऊन शेतकर्यांपर्यंत नेल्याने कापसाच्या एकरी उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे.
काय आहे कापूस तंत्रज्ञान?
31 किंवा 21 कापसाची लावणी करावी, एका जागेवर एकच बी लावावे, लावणीनंतर 40 ते 45 दिवसांनी गळफांदी कापून टाकावी, शेंडा चार ते पाच इंचांचा गुंडाळा.
गळफांदी : कापसाच्या झाडावर दोन प्रकारच्या फांद्या असतात.एक गळफांदी (मोनो पोडीया), दुसरी फळफांदी (सिम्पोडीया). या दोन्ही फांद्यांची लक्षणे भिन्न असतात.
गळफांदी सुरुवातीलाच येते. एका झाडावर त्या तीन किंवा चार असतात. या फांद्या वाढीसाठी मुख्य झाडाला स्पर्धा करतात. झाडाला दिलेले 70 टक्के खत गळफांद्या घेतात. गळफांद्यांनंतर फळफांद्या येतात व त्या जमिनीला समांतर आडव्या वाढतात. या फांद्यांची जाडी वाढत नाही. खोडाकडून आलेला अन्नरस त्या बोंडाला देतात. जेवढा अन्नरस मिळेल तेवढ्या प्रमाणात फळफांद्यांवर बोंडे लागतात व त्यांचे पोषण होऊन बोंडे वजनदार येतात. त्याउलट गळफांदी जोमाने वाढते. मात्र बोंडांची संख्या कमी व वजनही कमी म्हणजे अर्धा ते दीड ग्रॅम भरते.
फळफांदी : ही फांदी खोडापासून निघून जमिनीवर समांतर आडवी वाढते. एका झाडावर या फांद्यांची संख्या झाडाच्या उंचीवर अवलंबून असते. 12 ते 15 फळफांद्या असतात. ही फांदी जास्त जागा व्यापते.
निष्कर्ष : गळफांदी कापल्यावर बोंडाचे वजन 3 ग्रॅमवरून 6 ग्रॅमवर पोहोचलेे. एक ग्रॅमने जरूर बोंडाचे वजन वाढले तरी एकरी तीन क्विंटल कापूस जास्तीचा होतो. गळफांदी काढल्यावर एका बोंडाच्या वजनात सरासरी सात ग्रॅम वाढ होते.
शेतकरी समाधानी : या तंत्राचा मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकरी वापर करून समाधानकारक उत्पादन घेत आहेत. या संदर्भात परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा फायदा झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील मसला गावातील शिवाजी गंगाधर शिंदे हे चार एकर कापूस लागवडीतून एकरी 24 क्विंटल उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहेत, तर परभणी येथील बद्रीनाथ नारायण सोनी हे जनकल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. सोनी यांनी या तंत्राचा प्रचार आणि प्रसार केला आहे. स्वतः शेतात या तंत्राचा अवलंब केला. मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील अशोक देशमाने, सेलू तालुक्यातील डासाळा गावातील विठ्ठल गजमल या शेतकर्यांनी चार एकरांतून कापसाचे किफायतशीर उत्पादन घेतले आहे.
उत्पादन खर्चात बचत ः झाड कमरेएवढेच ठेवल्याने झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. फुले, पात्या, बोंडांना सूर्यप्रकाश मिळाल्याने त्यांची गळ होत नाही. झाडांची उंची कमी राहिल्याने कीडरोग प्रमाण कमी राहते व फवारणीचा खर्चही कमी होतो. या कापसाचे उत्पादन नोव्हेंबरअखेरपर्यंत येऊन शेत रिकामे होते. शेतकर्याकडे सिंचनाची सोय असल्यास तो रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आदी पिके घेऊ शकतो. सध्या शेतकरी एकरी सरासरी 5 क्विंटल उत्पादन घेतात. या तंत्राने ते एकरी 15 ते 21 क्विंटल सहज उत्पादन घेण्यात शेतकर्यांना यश मिळाले आहे. गळफांदी कापून बोंडाचे वजन वाढवून उत्पादनवाढीच्या या तंत्राला आता ‘दादा लाड तंत्र’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी सध्या हे तंत्र वापरून फायदेशीर उत्पादन घेत आहेत.