चला ‘जांभूळबेट’ बघायला...

विवेक मराठी    20-Apr-2024
Total Views |
@बाळासाहेब काळे  9665140780
 
जांभूळबेट हे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्राच्या मध्यभागी वसलेले दुर्लक्षित स्थळ आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हे बेट महत्त्वपूर्ण आहे. चारी बाजूंनी पाणी, नदीपात्रात मुक्त विहार करणारे पक्षी, वृक्षवेली, नागमोडी रस्ते आणि त्यांच्या मधोमध उभे असलेले जांभूळबेट हे परभणी जिल्ह्यातील पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र आहे.
 
jambhul bet parbhani
 
गोदावरी ही भारतातील मुख्य नदी. महाराष्ट्रातून (त्र्यंबकेश्वर) वाहणारी ही नदी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांतून वाहत पुढे तेलंगणा राज्यास मिळते. धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या गोदामाईंचे विशेष स्थान आहे. ही नदी तिच्या काठावरील गावांचे, शहरांचे सौंदर्य खुलवत जाते. परभणी जिल्ह्यातील पालम आणि पूर्णा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या मध्यभागी अद्भुत आणि नयनरम्य असे ‘जांभूळबेट’ आहे. या बेटाचा शोध कसा लागला, कधी लागला याची माहिती कोणाकडे नाही. कधीकाळी या बेटावर जांभळाची भरपूर प्रमाणात झाडे होती. म्हणून या बेटाला ‘जांभूळबेट’ असे नाव पडले. अतिशय विलोभनीय असे सुंदर बेट उन्हाळ्यात परभणीवासीयांचे हे एक मुख्य निसर्ग पर्यटनस्थळ बनले आहे.
 
निसर्गाने वेढलेले हे जांभूळबेट एके काळी 27 एकरांवर वसले होते. बदलत्या परिस्थितीत या ठिकाणी 20 एकर जमिनीचा भाग शिल्लक आहे. बेटाच्या मध्यभागी पुरातन मारुती मंदिराचे स्थान आजही अबाधित आहे. चारी बाजूंनी पाणी, नदीपात्रात मुक्त विहार करणारे पक्षी, वृक्षवेली, नागमोडी रस्ते आणि त्यांच्या मधोमध उभे असलेले जांभूळबेट हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. बेटावर जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. निसर्गाने बहरलेल्या बेटावर दुर्मीळ औषधी वनस्पती, फळ-फुलांची झाडे आहेत. हंगामातील तिन्ही ऋतूंत पर्यटक या बेटाला भेट देत असतात. विशेषतः पावसाळ्यात जांभूळबेटाचा नजारा डोळ्यांत साठवण्यासारखा असतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र बेटाचा र्‍हास होत असल्याचे पर्यटक आणि निसर्गप्रेमींच्या लक्षात आले. यातूनच बेटाचे संवर्धन केले जात आहे.
 

jambhul bet parbhani 
 
जांभूळबेट संवर्धन मोहीम
 
या बेटाचे संवर्धन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि आणि पर्यावरणप्रेमी आता एकत्र आले आहेत. परभणी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींसह नांदेडच्या वृक्षमित्र फाऊंडेशनने यासाठी जांभूळबेट संवर्धन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून जांभूळबेटास पुनरुज्जीवित करून जांभूळबेटाचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी कृषिभूषण कांतराव झरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरखेड, सोमेश्वर, देऊळगाव दुधाटे, गोळेगाव येथील तरुणवर्ग आणि नांदेड येथील वृक्षमित्र फाऊंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येऊन काम सुरू केले आहे.
 
 
विविध वृक्षवेलींची लागवड
 
गेल्या पाच वर्षांपासून जांभूळबेट संवर्धन मोहिमेच्या कामाला सुरुवात झाली आहे. बेटावर तीन जांभूळ वृक्षांसह बांबू, मोहगणी, सीताफळ, तुती आदी वृक्षांची लागवड, बेट स्वच्छता, मारुती मंदिर परिसरासमोर निवारा उभारणी असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. विशेषतः 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त बेटावर प्रथमच राष्ट्रगीताचे सूर निनादले.
 
 
jambhul bet parbhani
 
पर्यटनस्थळाचा विकास
 
कांतराव झरीकर सांगतात, “बेटावर दोन हजार जांभळाची झाडे लावण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यातील एक हजार झाडे आतापर्यंत लावली आहेत. जांभूळबेटास भेट देणार्‍या व्यक्तीस तिथे जास्त काळ रमता यावे याकरिता संपूर्ण बेट फिरण्यासाठी पायवाटा बनवण्यात येत आहेत. तसेच बेटावर 7 ते 8 मोठे पॉइंट्स निर्माण करून त्यात एका जागी फुलपाखरे व इतर जीवजंतूंसाठी 2000 फूट घनवन पद्धतीने फुलांच्या झाडांची लागवड करून संरक्षित तारेचे कुंपण असलेले उद्यान बनवण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी फळझाडांचे उद्यान उभारणीचीही मनीषा आहे. बेटावरील श्री मारुती मंदिराचा परिसर सुशोभित करणे व मंदिराजवळ लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळाचे साहित्य व मैदान तयार करणे. बेटावर शांत ठिकाणी एका ध्यानमंदिराची निर्मिती करणे, फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट, रॉक गार्डन तयार करणे, अशी कामे आता सुरू झाली आहेत.”
 
 
या बेटावर जाण्यासाठी नियमित बोट लागणार होती. त्यामुळे जांभूळबेट संवर्धन समितीने लोकसहभागातून एक बोट आणि 10 लाइफ जॅकेट्स खरेदी करून 5 डिसेंबर 2021 रोजी त्याचे लोकार्पण केले. त्यामुळे अतिशय माफक दरात बेटावर जाण्यासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध झाली आहे.
 
महाराष्ट्रात नैसर्गिक साधनसंपत्ती अमाप आहे. प्रादेशिक विकासामध्ये साधनसंपत्तीची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. यामधून त्या प्रदेशाचा विकास होत असतो. अशा प्रकारे नैसर्गिक जांभूळबेटाचा विकास झाला तर स्थानिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यास वाव आहे.