निर्माल्यातून कंपोस्ट खतनिर्मिती

विवेक मराठी    22-Apr-2024
Total Views |
@दिलीप देशपांडे  9822858679
 
 
krushivivek
परभणी शहरात अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांत रोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. शहरातील सुजाण नागरिक व ‘साप्ताहिक विवेक’चे वाचक शिवाजी वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्याचा पुनर्वापर करून त्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर दहा दिवसांनी दोन क्विंटल निर्माल्य संकलन करून कंपोस्ट खत तयार केले जाते.
परभणी शहरातील लोकमान्य नगर परिसरात 12 मंदिरे आहेत, तर काही मोठ्या वसाहती आहेत. मंदिरात व घरातील देव्हार्‍यात फुले आणि झाडांची पाने देवाला वाहिली जातात. उत्सवकाळातही मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. हे निर्माल्य कचर्‍याच्या डब्यात, तेथून घंटागाडीत, नंतर कचरा डेपोमध्ये जाते. हे निर्माल्य पुन्हा निसर्गामध्ये एकरूप व्हावे यासाठी परभणी शहरातील ज्येष्ठ नागरिक जागृत मंचाचे उपाध्यक्ष तथा ‘साप्ताहिक विवेक’चे नियमित वाचक शिवाजी वांगे यांनी निर्माल्य संकलनाचा विडा उचलला. यासाठी ‘ओम नमः शिवाय’ समूहाची निर्मिती केली. 6 जून 2023 रोजी परभणी महानगर पालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते समूहाचे उद्घाटन होऊन निर्माल्य संकलनास सुरुवात झाली.
 

krushivivek 
शिवाजी वांगे
 
शिवाजी वांगे सांगतात, गेल्या वर्षभरापासून परभणी शहरात निर्माल्य संकलनाचा उपक्रम सातत्याने सुरू आहे. त्यासाठी केलेले नियोजन महत्त्वाचे आहे. शहरातील बारा मंदिरांत व काही सोसायट्यांमध्ये दोनशे लिटरच्या टाक्या कलशाच्या स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दर दहा दिवसांत दोन क्विंटल निर्माल्य संकलित होते. हे निर्माल्य इतरत्र न टाकता आम्ही प्रगतीशील शेतकरी सचिन देशपांडे यांच्या ’अ‍ॅग्रो सर्व्हिस फार्म’ जमिनीत 2020 आकाराचा एक खड्डा तयार केला आहे तेथे जमा करतो. या ठिकाणी निर्माल्य, गोमूत्र आणि शेणखताचे मिश्रण करून नैसर्गिक कंपोस्ट खत तयार केले जाते. हे खत पिकांच्या उत्पादनवाढीसाठी किफायतशीर आहे. सध्या देशपांडे यांच्या शेतात या कंपोस्ट खताचा वापर केला जात आहे.
या कार्यात भाजपा शहर उपाध्यक्ष रितेश जैन झांबड, जागृत रामेश्वर मंदिराचे विश्वस्त विश्वनाथ गव्हाणे, श्री साई मंदिराचे विश्वस्त प्रदीप बडवे, शनी मंदिराचे नितीन पारवेकर, दुर्गा देवीचे राम जोशी, पार्वती व गणपती मंदिराचे इबतवार, आनंद देशमुख, किशोर डावरे, महेश बासटवार, विवेक डावरे, श्रीहरिपाल मिश्रा, दीपक अग्रवाल, अर्जुन राऊत यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.