कृषी विकासाचा ध्यास

विवेक मराठी    22-Apr-2024
Total Views |
@अ‍ॅड. माधवराव भोसले
9420965095.

krushivivek 
परभणी हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा.. जायकवाडी धरणामुळे मराठवाड्यातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र या जिल्ह्याला लाभले आहे. त्यामुळे हा जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. कृषी विद्यापीठाची जोड मिळाल्याने या जिल्ह्यात कृषी उद्यमशीलता रुजण्यास मदत होत आहे.
प्राचीन काळी परभणीला ’प्रभावती’ नावाने ओळखले जात होते. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. त्यामुळे हा जिल्हा सुपीक व कसदार बनला आहे. रब्बी हंगामातील पांढरीशुभ्र ’ज्वारी’ ही परभणीची खास ओळख. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने ’ज्वारी’वर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यामुळे परभणीतील ओळख देशभर पसरली आहे.
 
 
 
परभणी जिल्ह्यातील लागवडीयोग्य 5 लाख 59 हजार 500 हेक्टर क्षेत्रांपैकी प्रकल्पांचे एकूण लाभक्षेत्र 2 लाख 54 हजार 610 हेक्टर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, आंबा, रेशीम शेती, ऊस या नगदी पिकांबरोबरच सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, हळद, करडई, ज्वारी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात खासगी साखर कारखाने सुरू झाले; पण हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात अद्यापही पिछाडीवर आहे.
 

krushivivek 
जिल्ह्यात कर्परा व मासोळी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यांच्या जलक्षेत्रात राहू, मृगळ आणि कटलासारख्या सुधारित मत्स्यांचे उत्पादन होते. परभणी हा जिल्हा कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. पावसाचे प्रमाण वाढल्यास या ठिकाणी मत्स्य व्यवसायाला चालना मिळू शकते. जिल्ह्यातील अनेक शेतकरी पशुपालन, दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती, कुटीर उद्योग व फळबाग लागवडीतून शाश्वत शेती करत आहेत.
 
 
केंद्र शासन साहाय्यित पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) ‘एक जिल्हा - एक उत्पादन’अंतर्गत ऊस क्षेत्र आणि उत्पादन लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यासाठी ’गूळ’ या उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे जिल्ह्यात 119 गूळ कारखाने उभारले जाणार आहेत. जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय, फळे व भाजीपाला यांची उत्पादन वाढ करण्याकरिता मूलभूत साधनसामग्री आहे. गरज आहे फक्त शासनाच्या पुरेशा निधीची.
 
 
(लेखक परभणी येथील ज्येष्ठ विधिज्ञ व ‘साप्ताहिक विवेक’चे जिल्हा पालक आहेत.)