वाचनाला तंत्रज्ञानाची जोड...

विवेक मराठी    23-Apr-2024
Total Views |
जागतिक पुस्तक दिन विशेष
 
vivek 
@ अजिंक्य तरटे 
इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यिक शेक्सपियर याच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा दिन म्हणजे जागतिक पुस्तक दिन. नेहमी राष्ट्रहितांचा विचार करीत, राष्ट्रहिताला साह्यभूत होतील, अशा 50 हून अधिक पुस्तकांची निर्मिती करणार्‍या ‘विवेक प्रकाशन’ आणि ‘साप्ताहिक विवेक’साठी हा दिन तर अत्यंत महत्त्वाचा. समर्थ रामदास स्वामी यांनीदेखील पुस्तकवाचनाचे महत्त्व जाणले होतेच. नुकतीच ज्यांची 133 वी जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पुस्तकांचा मोठा सहभाग होता, हे सर्वश्रुत आहेच.
आजकाल पुस्तकाची परिभाषा अनेकार्थाने बदलली आहे. छापील पुस्तकांप्रमाणेच आज अन्य प्रकारच्या स्वरूपातदेखील पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. कुकू एफ.एम.सारख्या अनेक अ‍ॅॅपमुळे पुस्तकाच्या वाचनाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आता-आतापर्यंत मराठी भाषेत न आढळणारा ऑडिओ बुक हा प्रकार आता मराठीत चांगलाच रुळला आहे. अनेक अ‍ॅप त्यासाठी वापरली जात आहेत. येत्या काही दिवसांत प्रिंट ऑन डिमांडमुळे पारंपरिक पुस्तकांच्या दुकानांचे स्वरूप पूर्णतः बदलून जाईल, मात्र पुस्तकाचे महत्त्व कमी होणे अशक्य. मध्यंतरी समाजमाध्यमांवर बराच रुळलेला, मात्र कायदेशीर नसणारा प्रकार म्हणजे पुस्तकाची पीडीएफ फाइल, हेसुद्धा पुस्तकाचे एक साधनच म्हणता येऊ शकते. माझ्या माहितीत अशी दोन नियतकालिके आहेत, जी मला खुद्द प्रकाशकाकडूनच व्हॉट्सअ‍ॅपमार्फतच येतात. असो.
 
‘किंडल’सारख्या पुस्तकांविषयीच्या गॅझेटमुळे वाचताना आपल्या डोळ्याला सोईस्कर होईल, असा प्रकाश ठेवता येतो, तसेच वाचताना एखाद्या शब्दाचा अर्थ माहिती नसल्यास त्याचा अर्थदेखील समजू शकतो, तसेच कागदी पुस्तकाच्या स्वरूपात साठवल्यास ज्यास खूप जागा लागेल, अशी पुस्तके अत्यंत कमी जागेत राहू शकतात. तसेच त्यांचे पाणी, वाळवी अशा गोष्टींपासून संरक्षण होते. पुस्तकांसाठी ‘बुक गंगा’सारख्या वेबसाइटदेखील उत्तम कार्य करीत आहे.
 
 
खास पुस्तकाची ओळख करून देण्यासाठीच काही नियतकालिके मराठीत प्रसिद्ध होतात. एखाद्या विशिष्ट प्रकाशकाने आपल्या प्रकाशनामार्फत प्रकाशित केलेल्या माहितीपुस्तिकेपेक्षा ही नियतकालिके पूर्णतः वेगळी आहेत. यामध्ये विविध प्रकाशनांमार्फत प्रकाशित एका विशिष्ट कालावधीत प्रकाशित पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला असतो. आज वाचन कमी होत असल्याचे सातत्याने बोलले जाते. मात्र आजदेखील अनेक वर्तमानपत्रांतून पुस्तकांची माहिती प्रकाशित होत असते. मराठीतील एक नामवंत वर्तमानपत्र विविध क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तींना वाचनाची सवय कशी लागली? त्यांना वाचण्याच्या सवयीचा काय फायदा झाला? याविषयी साप्ताहिक सदर चालवते यातच अजूनही पुस्तकांना मरण नाही हेच सिद्ध होते.
 
सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात दिल्लीच्या प्रगती मैदानात ‘विश्व पुस्तक मेळा’ हे पुस्तकांचे भलेेमोठे पुस्तक प्रदर्शन भरते. ‘पुस्तकांचा कुंभमेळा’ अशी ओळख असलेल्या या पुस्तक प्रदर्शनामुळे जगभरातील जवळपास सर्वच देशांतील आणि भाषांतील नामवंत प्रकाशनांची पुस्तके वाचकांना हाताळता येतात.
 
क्रॉसवल्डसारखी मोठी पुस्तकांची अनेक दुकाने पुण्यात आढळतात. आपल्याकडील मराठी साहित्य संमेलनातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पुस्तकविक्री होते, जे एका उत्तम समाजाचे लक्षण म्हणता येईल.
 
 
सध्या आपल्या मराठीचा विचार करता अनेक नवनवीन लेखकांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. पूर्वीपेक्षा वेगळ्या विषयांवरची, मूळची इतर भाषांतील, मात्र मराठीत अनुवादित केलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. मात्र काही प्रकाशक अडचणीतदेखील आहेत. छपाईचा वाढलेला खर्च, वितरकांचे मानधन, पुस्तकवाचनाविषयीचे बोलायचे झाल्यास लोकांचे वाचनाचे बदललेले विषय, लेखात सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे ई-बुक, ऑडिओ बुकसारख्या तंत्रज्ञानस्नेही गोष्टींचा पुस्तकांवर झालेला परिणाम आदी गोष्टी सध्या प्रकाशकांना अडचणीच्या ठरत आहेत. तसेच पुस्तकाचे मानधन, प्रकाशकाकडून लेखकांना देण्यात येणार्‍या प्रती, एका आवृत्तीनंतर पुन्हा प्रकाशित करताना लेखकांना प्रकाशकांकडून देण्यात येणारी वागणूक, प्रकाशकांच्या नफ्यातील लेखकांचा वाटा आदी अनेक विषयांवर वाददेखील आहेत. मात्र ही त्रासदायक परिस्थिती नक्कीच बदलेल, अशी मला आशा आहे.
 
 
पुस्तके आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यात मोठी भूमिका बजावतात. आपण एखाद्या व्यक्तीच्या घरात भेटायला गेलो असता, घराच्या ग्रंथालयात ठेवलेल्या पुस्तकांमुळे घराचे व्यक्तिमत्त्व सहज दिसून येते. सध्याच्या धावपळीच्या काळात प्रवासात आपण कुकु एफ एमसारख्या अ‍ॅपमुळे, तसेच पुण्यातील ‘चपराक’सारख्या काही प्रकाशकांमुळे सहजतेने पुस्तकाचा आस्वाद घेऊ शकतो. ‘बुक गंगा’सारख्या संकेतस्थळामुळे पुस्तकांची मागणी नोंदवणेदेखील सोपे झाले आहे. ई-बुक या नव्या प्रकारामुळे पुस्तकांची साठवणूक करणेदेखील सहज-सोपे झाले आहे.