ऊर्जामय ग्रंथ प्रकाशन सोहळा‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’

विवेक मराठी    24-Apr-2024
Total Views |
येत्या संघशताब्दीच्या निमित्ताने संघ कार्यकर्त्यांचे भावविश्व व संघाने घडवलेले सामाजिक परिवर्तन यांचे विविध पैलू घडविणारा ‘सा. विवेक’च्या ‘ हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या ग्रंथात तपशीलवार शब्दबद्ध झाले आहेत. संघविचारांच्या पुण्यभूमीत पू. सरसंघचालकांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे झालेले प्रकाशन हा या वाटचालीतील एक कळसाध्याय ठरला.
 
rss 
राष्ट्रीय विचारप्रवाहाची पुण्यभूमी अर्थात रेशीमबाग, नागपूरच्या डॉ. हेडगेवार स्मारक समिती कार्यालयाच्या महर्षी व्यास सभागृहात झालेला सुंदर सोहळा, नागपूरसह विविध ठिकाणांहून आलेले ’विवेक’चे असंख्य वाचक, हितचिंतक, प्रतिनिधी यांची आवर्जून उपस्थिती, रा. स्व. संघाच्या अनेक अखिल भारतीय स्तरावरील पदाधिकार्‍यांची उपस्थिती व शुभेच्छा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या विचारपरिवाराचे प्रमुख किंबहुना कुटुंबप्रमुख अर्थात, पू. सरसंघचालकांचे मार्गदर्शन व त्यांच्याकडून पाठीवर मिळालेली कौतुकाची, शाबासकीची थाप! ज्या क्षणाची ‘साप्ताहिक विवेक’च्या संपूर्ण परिवाराने आतुरतेने वाट पाहिली, ‘विवेक’च्या सर्व विभागांसह सर्व जिल्हा-तालुका प्रतिनिधींसह प्रत्येक कार्यकर्त्याने ज्याकरिता मागील अनेक महिने परिश्रम केले, त्या परिश्रमांचे, त्या आतुरतेचे जणू चीज झाल्याचे वाटले, असा हा क्षण. निमित्त होते ते ‘साप्ताहिक विवेक’च्या ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा. सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे गुरुवार, दि. 18 एप्रिल रोजी रेशीमबाग कार्यालयाच्या महर्षी व्यास सभागृहात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या वेळी व्यासपीठावर पू. सरसंघचालकांसह हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, या कार्यक्रमास संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, विदर्भ प्रांत सह-संघचालक श्रीधर गाडगे, रवींद्र भुसारी आदींसह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
 
 
हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी निर्माण झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला पुढील वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. संघसंस्थापक पू. डॉ. हेडगेवार यांच्यापासून चालत आलेला संघाचा पुण्यप्रवाह आज डॉ. मोहनजी भागवत यांच्यापर्यंत सशक्तपणे व स्पष्टतेने प्रवाहित झाला आहे. समाजजीवनावर परिणाम करणार्‍या अनेक घटना मागील शंभर वर्षांत घडल्या व त्या घटनांचा समाजाभिमुख अन्वयार्थ लावत संघाने आजवरची वाटचाल केली. काळाच्या ओघात येणारे विषय, समस्या सर्व संघशक्ती लावून मार्गी लावण्याचे काम संघाने सातत्याने चालू ठेवले. आज विविध आयामांच्या व गतिविधींच्या माध्यमांतून संघ सर्वदूर पोहोचला आहे. येत्या संघशताब्दीच्या निमित्ताने संघ कार्यकर्त्यांचे भावविश्व व संघाने घडवलेले सामाजिक परिवर्तन यांचे विविध पैलू ‘सा. विवेक’च्या या ग्रंथात तपशीलवार शब्दबद्ध झाले आहेत. मागील अनेक महिने या ग्रंथाचे लेखन, संपादन इत्यादींचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्याचबरोबर या ग्रंथाची अधिकाधिक नोंदणी व्हावी व या माध्यमातून संघविचारांची व्याप्ती, विस्तार व परिणाम यांचा हा तपशीलवार आढावा सर्वदूर पोहोचावा यासाठी ‘विवेक’चे प्रवासी कार्यकर्ते, तालुका-जिल्हा प्रतिनिधी, पालक, हितचिंतक हेदेखील मोठ्या प्रमाणात संपर्क, प्रवास करत होते. परिणामी ‘साप्ताहिक विवेक’च्या या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या नोंदणीस महाराष्ट्रासह देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला.
 

rss 
 
संघविचारांच्या पुण्यभूमीत स्वतः पू. सरसंघचालकांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे झालेले प्रकाशन हा या वाटचालीतील एक कळसाध्याय ठरला. प्रकाशन कार्यक्रमापूर्वी येथील परमपूजनीय डॉ. हेडगेवार स्मृतिस्थळावर डॉक्टरांच्या चरणी पू. सरसंघचालक, रमेश पतंगे व ‘विवेक’च्या अन्य कार्यकर्त्यांनी ग्रंथ अर्पण केला. परमपूजनीय डॉ. हेडगेवारांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या संघाच्या पुण्यप्रवाहावर आधारित हा ग्रंथ सर्वप्रथम डॉ. हेडगेवारांच्याच चरणी अर्पण होणे, हा क्षण सार्‍या ‘विवेक’ परिवारासाठी अर्थातच भावनिक क्षण होता. प्रकाशनाच्या मुख्य सोहळ्यात प्रारंभी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ’पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी प्रास्ताविक करताना ग्रंथाविषयीची भूमिका मांडली. यानंतर अर्थातच सर्व जण ज्यांच्या उद्बोधनाची आतुरतेने वाट पाहत होते त्या पू. सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पू. सरसंघचालकांनी ‘विवेक’च्या या ग्रंथाबाबत कौतुकोद्गार काढताना म्हटले की, प्रथमतः हा ग्रंथ हाती घेतल्यावर प्रतिक्रिया आली की, ग्रंथ खूप मोठा झाला आहे; परंतु संघाचा आजपर्यंतचा प्रवास शब्दबद्ध करायचा झाल्यास लक्षात येते की, ग्रंथ लहान झाला आहे. तथापि, संघाचा अभ्यास व चिंतनासाठी, संघविचार, आजचा विस्तार व संघ-संघ म्हणतात तो नेमका काय आहे हे आपल्याला ज्यांच्याकडे पाहून कळते, त्यांचे वर्णन वाचण्यासाठी हा ग्रंथ पुरेसा असल्याचे मोहनजी भागवत यांनी सांगितले. ‘साप्ताहिक विवेक’च्या ‘ हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या ग्रंथातून संघजीवन कसे जगावे याचा व्यावहारिक बोध मिळतो, अशीही प्रशंसा पू. सरसंघचालकांनी या वेळी केली. आपल्या अर्ध्या तासाच्या उद्बोेधनात पू. सरसंघचालकांनी संघविचारांचा व कार्याचा मूलभूत गाभाच उपस्थितांसमोर उलगडला. हिंदू हीच आपली ओळख असून ती प्रत्येकाला आपले मानायला शिकवते. तोच सनातन धर्म आहे, तोच मानवधर्म आहे. त्यामुळे हिंदू ही आपली ओळख आपण गौरवाने, अभिमानाने सांगितली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले. तसेच, आपण आपली शक्ती, ओळख जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, हे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्याचे सत्त्व राहिलेच पाहिजे, असेही डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सा. विवेक’च्या संपादक कविता (अश्विनी) मयेकर यांनी केले. अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक पद्य सादर केले, तर अवनी रानडे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
 
या कार्यक्रमात पू. सरसंघचालकांनी केलेले मार्गदर्शन व या ग्रंथाची केलेली प्रशंसा ‘विवेक’च्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हुरूप व ऊर्जा वाढवणारी ठरली. तसेच, नागपूरसह अनेक ठिकाणांहून आवर्जून उपस्थित असलेले ‘विवेक’चे वाचक, हितचिंतकांच्या शुभेच्छाही आमच्यासाठी उत्साहवर्धक आहेत. प्रखर राष्ट्रवाद व सामाजिक समरसतेचा विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘साप्ताहिक विवेक’चे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवात अशा या ऐतिहासिक कार्यक्रमातून मिळालेली ऊर्जा व प्रेरणा ‘विवेक’च्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो!
 
- प्रतिनिधी