हार

विवेक मराठी    03-Apr-2024   
Total Views |
चिडू नगंस तायडे.. म्या काय म्हन्तूय त्ये आईक तरी.. आत्ता हार नगं घिऊस.. बुकिंग तर करचीन का न्हाई..!? जसा दाद्या जिकल्यावं हार घालनं तुजा हाक्कं हाये तसाच आयेसारकी व्हयनी जिकल्यावंबी हार घालनं तुजा हाक्कंच ए की.. आन् तुज्या या हाक्कासाटी ह्यो फुलंवाला छग्या प्रान पनाला लावील तायडे.. सस्ती लावंन काळजी करू नगंस.. मंग बुकिंग कन्फर्म करू का..!?”
 satire article
 
डग्गडग्गडग्गडग्ग आवाज करत छग्या मफलरवाल्याणं आपला फुलांचा ट्यांपू सुप्रीच्या घराम्होरं लावला आनि थेट घरात घुसला.. पडवीत सुप्रीचा बाप रामायनाची गानी आयकत बसल्याला.. त्येला रामराम घालूण छग्यानं सुप्रीला हाळी घाटली आनि पडवीत जरासा ट्येकला.. संकष्टी आसल्याणं घरी मटनाचा ब्येत हुता.. मटान साफ करता करता सुप्री तशीच भायेर आली.. समूर छग्या मफलरवाल्याला बगून सुप्री जराशी वयतागलीच.. “तुला यकदा सांगून कळंणा का रं..!? न्हाई घ्याचीत फुलं.. काल सोम्मारच्या बाजारालाबी गळ्यात मारत हुतास आन् आज घरला..” सुप्रीणं त्वांड सोडलं.. “आगं तायडे.. तूच म्हनल्यालीस की दाद्याला यांणी सरपंच क्येला तर पयला हार म्या घालीन म्हनून..!?” छग्याणं मार्कोटिंग स्किल टाकलं.. “इलेक्षनीला टाइम हाय आजून.. चल निग..!” सुप्री फनकारली..
 
तिकडं रश्मिआकाला गिरनीतनं पीठ आनून द्येऊन मटनाचा सैपाक कराया सुप्रीकडं निगालेल्या संज्याला देव्या आनि दाढीणं चौकात गाठलं.. “ओऽऽ य्या.. उसाचा रस पाजतो.. य्या..” दाढीणं हाळी घाटली.. “संज्याभौ, आशे आत या.. तिकडं घुंगराच्या खळखळीणं डोकं आजून बाद हुईन.. या हितं बसा..” संज्या गुमान घाम पुसत आत जाऊण देव्याणं सांगिटलं तितं बसला.. समूरच्या ट्येबलावं दाद्या बसल्याला.. “राम राम संज्याभौ.. मामा संज्याभौंणा जंबो गल्लास पाजा..” दाद्याणं वटहुकूम काहाडला.. मामाणं उसाचं कांडकं मशिनीत घाटलं आनि देव्याणं संज्याला पिळाया घेटलं.. “काय संज्याभौ..!? तायडीचं ठरतंय का न्हाई कुटनं हुबं र्‍हायचं औंदा..!? न्हाई, तुमचा वावार सैपाकघरापत्तूर हाय.. तुम्माला लै आतल्या खबरा आसत्यात म्हनून इच्यारलं..” संज्या कसनुसा हासला.. “न्हाई वो.. या म्होट्ट्या लोकांच्या गोस्टी हैत.. आमाला कशाला काय म्हायती आसंल..!?” दाद्याची करडी नजर टाळंत संज्या मशिनीतनं निगनार्‍या उसाच्या चिप्पाडाकडं बगत बोल्ला.. “तसं न्हवं.. तायडी लै गुनाची हाय नव्हं..!? परवाच्याला बोल्ली की व्हयनी ही आयेसमाण आस्ती.. त्यामुळं आमास्नी वाटलं का व्हयनी जिकडून हुबी र्‍हाईन तिकडं तायडी कशी हुबी र्‍हाईन..!? आन् व्हयनींचं तर ठरलंया.. म्हनून म्हन्लं तायडीचं कस्काय त्ये तुम्मास्नी इच्यारावं..” देव्याणं गुगली टाकला.. “न्हाई जी.. आम्माला तसलं काय म्हायती नस्तं.. आपन पडलो नोकर मानूस.. सायबांच्या भानगडीत आपन पडत न्हाई..!” संज्याणं आऊट तर आऊट म्हनून देव्याचा गुगली सोडला.. भरल्याला गल्लास समूर येताच संज्या गडबडीणं गल्लास उचलूण त्वांडाला लावनार यवड्यात देव्याणं त्येचा हात धरला.. “आवं आवं.. दमानं प्या की.. जरास्सं आमचं मीठ घाला वाईच.. चवीलाबी चांगलं लागतंय आनि बाधत बी न्हाई..!” आसं म्हनून मिठाची डबी फुडं सरकावली.. संज्याणं डबीतनं मीठ घालाया सुर्वात क्येली.. पन डबीच्या भोकांत मीठ आडकल्याणं मीठ पडंनाच.. वयतागून संज्यानं डबी जोरात आपाटली तर झाकन आख्खं निग्लं आनि डबीतलं सगळं मीठ झाकनासकट संज्याच्या गल्लासात पड्लं.. त्संज्या यकदम वशाळला आनि उटून जाया लागला तसा दाढीणं त्येचा हात धरला.. त्ये पाहूण दाद्या बोल्ला, “जाऊं द्या शेठ.. आपलं मीठ न्हाई यांच्या नशिबात..!” दाढीणं हात सोडला तसा संज्या एकशेवीसच्या स्पीडनी सुप्रीच्या घराकं पळाला..
 
हिकंड पडवीवं छग्या आजून तग धरूण हुता.. संज्या घाम पुसत सुप्रीसमूर आला आनि येका दमात गुर्‍हाळातला किस्सा सुप्रीफुडं सागूण मोकळा जाला.. संज्याचा किस्सा आयकूण छग्याणं आपलं मार्केटिंगचं फूडचं स्किल सुप्रीवं टाकलं.. “म्हंजी तू व्हयनींला जिंकू देन्यासाटी म्हागार घेनार का तायडे..!?” “आडलंय म्हाजं खेटर..!” सुप्री चवताळली.. “न्हाई व्हयनी आयेसमाण आस्ती म्हनलीस नव्हं..!? मंग तिच्याम्होरं विलेक्षण लढायची म्हंजी उखाळ्यापाखाळ्या काडाव्या लागत्याल.. मंग तुम्मी काडल्या की त्ये बी काहाडनार.. गावाला फुकटात मणोरंजण..!” छग्या स्क्रू टाइट करत बोल्ला.. सुप्रीणं नाकपुड्या फेंदारल्या.. ‘’चिडू नगंस तायडे.. म्या काय म्हन्तूय त्ये आईक तरी.. आत्ता हार नगं घिऊस.. बुकिंग तर करचीन का न्हाई..!? जसा दाद्या जिकल्यावं हार घालनं तुजा हाक्कं हाये तसाच आयेसारकी व्हयनी जिकल्यावंबी हार घालनं तुजा हाक्कंच ए की.. आन् तुज्या या हाक्कासाटी ह्यो फुलंवाला छग्या प्रान पनाला लावील तायडे.. सस्ती लावंन काळजी करू नगंस.. मंग बुकिंग कन्फर्म करू का..!?” छग्याणं यमबीएची डिग्री सुप्रीच्या थोबाडावं हानली.. सुप्री सुण्ण जाली.. सुप्रीच्या कानात छग्याचा ‘हार’ घुमत हुता आन् डोळ्यामेहोरं विलेक्षनीतली ‘हार’ दिसत हुती.. छग्या ग्येलेला बगून सुप्रीच्या बापाणं सुस्कारा सोडला आन् रेडीयूचा आवाज वाडवला.. गीतरामायनातलं गानं लागल्यालं ‘माता न तू वैरीनी..!’

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.