एकला चलो रे!

विवेक मराठी    30-Apr-2024
Total Views |
@स्वप्ना विजया अरुण जोशी
 
IndiEats
इंडिइट्सची सुरुवातही अपघातानेच झाली. महाराष्ट्रात कित्येक वेगवेगळे प्रादेशिक पदार्थ आहेत ज्यांना मार्केटच मिळत नाही. या पदार्थांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, म्हणून सुरू झालं इंडिइट्स! आजघडीला इंडिइट्सवर हमाल ते मॅनेजिंग डायरेक्टर ही सगळी पदे इंडिइट्सची संस्थापक स्वप्ना जोशी स्वतःच भूषवते.
मी शिक्षणाने इंजिनीअर आणि अपघाताने एक व्यावसायिक आहे. इंजिनीअरिंग, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पाच वर्षे नोकरी केल्यानंतर ध्यानीमनी नसतानाही नोकरीत गॅप घ्यावा लागला. तो घेणं तितकं अवघड नव्हतं; पण पुनश्च हरिओम करणं मात्र मला पुष्कळ जड गेलं. इतक्या वर्षांत बिंबवलेली नोकरीची मानसिकता! नोकरी न करता पैसा कसा मिळवायचा हेच कळत नव्हतं. दोन लहान मुलांची जबाबदारी असल्यामुळे नोकरी तरी करणं होणार का, हाही प्रश्नच होता. अशा वेळी घरातूनच काही तरी केलेलं बरं. मुलांसाठी पुष्कळ वेळ मिळेल, आपल्या हिशोबाने जमेल तसं काम करायचं वगैरे गैरसमजातून मी व्यवसाय सुरू केला; पण व्यवसाय म्हणजे 24 तासांची बांधिलकी ही गोष्ट तेव्हा माहीतच नव्हती!
 
 
इंडिइट्सची सुरुवातही अपघातानेच झाली. वेळ घालवायचा म्हणून कंटेंट रायटिंग सुरू केलं होतं. मित्राची आंबेविक्रीसाठीची वेबसाइट लिहून द्यायची होती. ती चर्चा सुरू असताना इतकं करतोयस तर फक्त आंबे काय विकतोस? कोकणातले सगळेच पदार्थ विक की आणि मग कोकणच का, महाराष्ट्रात कित्येक वेगवेगळे प्रादेशिक पदार्थ आहेत ज्यांना मार्केटच मिळत नाही. ते विक! असा मुद्दा मी काढला आणि सुरू झालं इंडिइट्स!
 
 
सुरुवातीला कोणतंही ठोस ध्येय समोर नव्हतं. त्यात ज्या दिवशी सुरुवात करू म्हटलं त्याच्या आदल्या रात्री लॉकडाऊन लागला. जरी तेव्हा तो काळ अवघड वाटत असला, तरी दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यातून घडल्या. एक म्हणजे काहीही बंद पडलं तरी खाण्याशी संबंधित व्यवसाय सुरूच राहतात हा साक्षात्कार! आणि दुसरं म्हणजे ऑनलाइन ऑर्डर्स आणि त्यासाठी डिलिव्हरी चार्जेस देण्याची मानसिक तयारी नसलेल्या जनतेचे अचानक मतपरिवर्तन! दोन्ही आमच्या पथ्यावर पडल्या!
 
 
प्रत्यक्ष विक्री करणे शक्य नसल्याने पुढचे दोन-तीन महिने केवळ वेगवेगळ्या घरगुती पदार्थांच्या विक्रेत्यांना संपर्क करून, इंडिइट्सची कल्पना समजावणे आणि आमच्या वेबसाइटवर पदार्थ लिस्ट करा हे सांगण्यात गेले. ते शेकडो कॉल करत असताना इंडिइट्सची इवलीशी अस्पष्ट कल्पना हळूहळू बाळसं धरू लागली.
 

IndiEats 
 
आपण किराणा मालाचे दुकान काढत नाही आहोत. आपल्याकडे जे असेल ते हटके असायला हवं. त्यामागे काही तरी ठोस विचार हवा. म्हणून 100% घरगुती, हातवळणीचे आणि प्रिझर्व्हेटिव्हविरहित पदार्थ हाच आपला USP ह्यावर शिक्कामोर्तब झालं. उत्पादनांची विक्री अर्थातच त्या त्या गृहउद्योगाच्या नावानेच होणार होती.
 
 
हे ऐकायला छान वाटत असलं तरी गृहउद्योगांचे प्रश्नच वेगळे असतात. पदार्थ छान असले तरी बाकी इतर गोष्टींमध्ये गृहउद्योग मार खातात. अगदी निःसंशय अप्रतिम चव आणि दर्जा ह्या गोष्टी सोडल्या तर पदार्थांचे टेस्टिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग अशा सगळ्याच आघाड्यांवर त्यांना मदत करावी लागते. आम्ही ती उत्साहाने करायचो. अनेक जणांसोबत काम करत असल्यामुळे आमचा डेटाबेस तयार होत होता. स्वस्तात स्टिकर कुठे छापून मिळतात, पॅकिंगच्या पिशव्या कोणत्या दुकानातून आणायच्या, FSSAI साठी कोण मदत करू शकते अशा गोष्टींसाठी आमचे उत्तम नेटवर्क तयार होत होते.
 
 
अनेकदा बायकांना असं वाटत असतं की, माझ्या हाताला चव आहे आणि मला घरातून थोडं काही करायला वेळ आहे, तर मी व्यवसाय सुरू करते; पण प्रत्यक्षात एखादा पदार्थ छान करता येणं आणि त्याचा व्यवसाय करणं ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काळवेळ न बघता तुफान काम करावं लागतं. खास करून अन्नपदार्थांच्या व्यवसायामध्ये सणावाराच्या काळात मागणी जास्त असल्यामुळे, स्वतःच्या घरचे सण बाजूला ठेवून आधी व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतं.
 

IndiEats 
 
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण विक्री करतोय त्याकडे केवळ उत्पादन म्हणून न बघता, एखाद्या लहान मुलापासून ते वयोवृद्धांच्या मुखात जाणारे हे पूर्णब्रह्म आहे हे समजूनच काम करावे लागते. त्यामुळे थोड्या पैशांसाठी दर्जात तडजोड अजिबात चालत नाही!
 
 
आम्हीही नवीन होतो. आमच्यासारखीच नवीन सुरुवात केलेले विक्रेते आले, की पटकन त्यांना सामील करून घ्यायचो; पण लवकरच त्यातले घोळ लक्षात यायला लागले. मग केवळ पदार्थाची चव, दर्जा आणि पॅकिंगच नाही, तर विक्रेत्यांची मानसिक तयारी किती आहे याचीही चाचपणी करायला सुरुवात केली. जशा ऑर्डर वाढत गेल्या, तसं टिकाऊ पदार्थ (मसाले), हंगामी पदार्थ (वाळवण), भरपूर मागणी असल्याने पटकन संपणारे पदार्थ (जॅम, केचप) हे लातूर, नागपूर, छ. संभाजीनगर, परळी, कोकण, खानदेश अशा ठिकाणांहून घेणे सुरू केले. इंडिइट्सवर एखादा गृहउद्योग आल्यानंतर त्याला इंडिइट्सवरच स्पर्धा करावी लागू नये ह्या विचारातून ‘एक पदार्थ - एक विक्रेता’ नियम केला. त्यामुळे प्रत्येक पदार्थासाठी एकच, पण सर्वोत्तम उत्पादक इंडिइट्ससोबत जोडले गेले.
 
 
खरा प्रश्न होता तो ग्राहकसंख्या वाढवण्याचा. पहिल्या दिवसापासून संपूर्ण भिस्त सोशल मीडियावर होती. व्यवसाय कोरोनाकाळात सुरू झालेला असल्यामुळे एखाददुसर्‍या प्रदर्शनामध्ये भाग घेण्याचे प्रयत्न करून बघितले, ते सपशेल फेल गेले. प्रदर्शनामध्ये स्टॉल लावण्याचा खर्च आमच्या उत्पन्नाच्या तुलनेत प्रचंड होता. ते पैसे आपण दुसर्‍या एखाद्या ठिकाणी वापरू म्हणून पुन्हा त्या फंदात कधी पडलो नाही.
 
 
सोशल मीडियावर मी स्वतः लिहीत असल्याचा पुष्कळच फायदा झाला. आधी मी फक्त उत्पादनांची माहिती आणि फोटो इतकंच पोस्ट करायचे; पण हळूहळू त्या पदार्थांमागची गोष्टसुद्धा सांगायला लागले. आमच्या सुगरणींच्या मुलाखती घेऊन पेजवर पोस्ट करायला सुरुवात केली. हा व्यवसाय करताना रोज जे किस्से घडायचे त्याबद्दल लिहायला लागले. केवळ त्या लिखाणासाठी पेजला अनेक फॉलोअर्स मिळाले.
 
 
आमचे पदार्थ लोकांना आवडत होतेच. त्यात सोशल मीडियावरच्या या पोस्ट आणि रिव्ह्यूज बघून अनेक नवीन ग्राहक जोडले गेले. किती तरी ग्राहक तर इंडिइट्स सुरू झाल्याच्या दिवसापासून आजही आमच्या सोबत आहेत!
 
 
खास करून परदेशातले अनेक जण दिवाळीच्या काळात हक्काने आमच्याकडून फराळ मागवतात. दिवाळीमध्ये तब्बल 500 ते 700 किलो फराळ हा आम्ही भारताबाहेर पाठवतो. आजवर अमेरिका, कॅनडा, यूके, युरोप, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत इंडिइट्सचे पदार्थ गेले आहेत आणि हा ग्राहकवर्ग दरवर्षी न चुकता ऑर्डर देतोच!
 
 
पहिल्या दोन-अडीच वर्षांमध्ये आपल्या घरात दैनंदिन आयुष्यात आपल्याला जे काही पदार्थ लागतात - खाऊ, पिठे, चटण्या, जॅम, लोणची, भाजण्या, रेडी टू कुक, केमिकल-फ्री गूळ, डंकावरचे मसाले, वाळवण असं सगळं काही इंडिइट्सवर आलेलं होतं; संपूर्ण घरगुती!
 
 
गव्हाचा शिजवलेला चीक, कमी तेलातला उंधियू, गुळपोळी असे खास पदार्थ, डाळींचे शोरबा, सौरऊर्जा वापरून वाळवलेल्या भाज्या आणि कडधान्ये असे नवीनच पदार्थ, ज्वारी सत्त्व, लाह्यांचे लाडू, खारवड्या, कोंडा पापड्या असे दुर्मीळ पदार्थ, भाज्या घातलेल्या रेडी टू कुक थालपीठ भाजण्या अशा हटके पदार्थांमुळे लोक इंडिइट्सला शोधत यायचे.
 
 
याच दरम्यान आमची ओळख जळगावच्या सेंद्रिय हळद घेणार्‍या एका शेतकरीदादांसोबत झाली. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर फार प्रकर्षाने जाणवलं की, ह्या प्रकारचं पर्यावरणपूरक काम करणारे लोक आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडायला हवेतच. म्हणून इंटरनॅशनल मिलेट इअरच्या निमित्ताने सातारा भागातील शेतकर्‍यांसोबत काम सुरू केलं. त्यामुळे इंडिइट्सवर सेंद्रिय कृषी उत्पादनांची घसघशीत भर पडली. मिलेट्स/तृणधान्ये आल्यानंतर स्वतःच्या तब्येतीविषयी जागरूक असणारे किती तरी नवीन ग्राहक आमच्या संपर्कात आले. सेंद्रिय पदार्थांसोबतच लाकडी घाण्याचे तेल हासुद्धा एक जिव्हाळ्याचा विषय झाला होता. त्या संदर्भात अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की, जिथे गोशाळा असते तिथे गाईंना चांगले दूध यावे म्हणून लाकडी घाण्यातून निघालेला पेंडा खाऊ घालतात. म्हणून कित्येक गोशाळांकडे एक लाकडी घाणा असतोच. त्यातूनच धेनू नॅचरल्स गोशाळेच्या लाकडी घाण्यावरचे तेल, देशी गाईचे तूप आणि श्रीखंड ह्या पदार्थांची सुरुवात झाली. ही उत्पादने गोशाळेला मदत व्हावी या हेतूने अत्यल्प नफा घेऊन इंडिइट्सवर विकली जातात.
 
सध्या आमचा नवीन उपक्रम म्हणजे पॉप-अप शॉप! वेगवेगळ्या कंपन्या किंवा सोसायट्यांमध्ये जाऊन आम्ही स्टॉलऐवजी, ग्राहकांना निवांत फिरून सगळे पदार्थ आपल्या हिशोबाने बघता येतील अशा प्रकारचे एक छोटेसे दुकान लावत आहोत. या कल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
 
 
एकाच ठिकाणी विविध गृहउद्योगांचे, विविध प्रदेशांतले अनेक घरगुती पदार्थ, एकाच डिलिव्हरी चार्जमध्ये देणारे इंडिइट्स हे एकमेव असावे.
 
संपर्क
संपर्क : 9356687224 (फक्त व्हॉटसअ‍ॅपवर)
 
वेबसाइट - https://www.indieats.in/
 
 
 
  
बाहेरून पैसे न घेता, अक्षरशः घरातून चालू असणारा हा व्यवसाय एखाद्या छंदासारखाच सुरू होता. त्यामुळे त्यामध्ये कधी फार नफा-तोटा बघितला नाही. इंडिइट्सची उलाढाल किती आहे, यापेक्षा जे विक्रेते जोडले गेलेले आहेत त्यांच्या उत्पादनांचा खप किती वाढतोय यावर इंडिइट्सचं यश जोखलं गेलं पाहिजे असं मला कायम वाटत आलं आहे. सांगायला आनंद वाटतो की, सुरुवातीला अक्षरशः केवळ काहीशे रुपयांचा व्यवसाय ज्यांना इंडिइट्सने दिला, त्यांना आता लाखोंच्या ऑर्डर्स इंडिइट्सवरून मिळतात!
 
 
ऑर्डर्सचा पसारा वाढत असताना केवळ बेशिस्तपणामुळे असलेली वेबसाइट वापरायची सोडून एक्सेल शीटमध्ये ऑर्डर्स नोंदवल्या जात होत्या; पण जसे मिलेट्स आणि इतर पदार्थ आले, तसा तो सगळा भार इतका वाढला, की पुन्हा एकदा वेबसाइटवर जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. मागच्या वर्षी नवीन रूपात वेबसाइट परत आणली. त्याने ऑर्डर देणं खूपच सुकर झालेलं असलं, तरीही आजही अघळपघळ गप्पा मारत ऑर्डर्स देणारेच जास्त आहेत. अनेक अर्थांनी इंडिइट्स अजूनही फार घरगुती आहे! वरकरणी हवीहवीशी वाटली तरी व्यवसायासाठी ही मानसिकता फारशी पूरक नाही. कितीही छोटा आणि घरगुती व्यवसाय असला तरीही तो अगदी शिस्तबद्ध पद्धतीनेच केला पाहिजे.
 
 
आजघडीला इंडिइट्सवर हमाल ते मॅनेजिंग डायरेक्टर ही सगळी पदे मीच भूषवते. बहुतांश वेळा ‘सब कुछ स्वप्ना जोशी’ असा नाट्यप्रयोग सुरू असला, तरीही माझ्या सोबतीला वेबसाइटसाठी IT टीम, मदतीला येणार्‍या मावशी आणि हक्काचे कुटुंब आहे. होम डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी सिस्टीम्स मदत करतात. काही ठिकाणी डिलिव्हरीची माणसे तयार केलेली आहेत. जगभरातूनच कुरीअरच्या ऑर्डर्स भरपूर असतात. त्यासाठीसुद्धा दोन-तीन चांगल्या कुरीअर्ससोबत करार केला आहे.
 
 
ह्या पुढचा टप्पा अर्थातच स्वतःची जागा घेऊन एक टीम तयार करणे हा असेल. माझा शिक्षणाने इंजिनीअर आणि स्वभावाने नोकरदार मेंदू त्याच गणितात गुंतलेलाय. सगळं काही स्वतः करण्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर तुमची नजर राहते. त्यामुळे दर्जा राखला जातो; पण असं करून तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची प्रगती रोखता. कितीही प्रतिभावान मनुष्य असला, तरीही तो सगळीकडे पुरेसा पडू शकत नाही. खरे कर्तृत्व हे दर्जा खालावू न देता व्यवसाय मोठा करण्यात, म्हणजेच लोकांना हाताशी घेऊन आपण दैनंदिन कामातून लक्ष काढून घेण्यात आहे.
 
 
लहानपणी माझं गणित आणि विज्ञान चांगलं होतं म्हणून तेव्हाच्या रीतीप्रमाणे मी इंजिनीअर झाले. खरं तर त्याहीपेक्षा माझ्या भाषा, लेखन आणि संभाषण कौशल्य जास्त चांगलं होतं; पण नेमकं या गुणांचं करायचं काय हेच माहिती नसल्यामुळे इंजिनीअरिंगशिवाय दुसरा विचार कधीच मनात आला नाही. तेव्हा कुणी मला म्हटलं असतं की, तुझी लिखाणाची हौस आणि बडबड्या स्वभाव यांचा वापर करून तू आयुष्यात पैसे मिळवशील तर मला खरं वाटलं नसतं; पण अगदी याच गुणांचा वापर करून मी सध्या घरबसल्या काही लाखांची उलाढाल असणारा छोटासा का होईना, पण एक व्यवसाय करते आहे.
 
 
मला घराच्या जबाबदारीमुळे बाहेर पडता येत नव्हतं. तेव्हा मी स्वस्थ न बसता इतर उपक्रमशील महिलांना गोळा केलं आणि आम्ही सर्वांनी मिळून जमेल तसे, जमेल ते प्रयत्न केले. डिग्रीपासून ते हातातल्या मोबाइलपर्यंत सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करून घेतला.
 
 
आम्ही हा जो WFH सारखा BFH (Business From Home!) चालवला आहे, त्यास आपणा सर्वांचे पाठबळ मिळो, हीच इच्छा!