सुवर्णमयी परंपरा जपणारी सुवर्णकार

विवेक मराठी    30-Apr-2024
Total Views |
@उत्तरा मोने
 
Jagannath Gangaram Pednekar Jewellers
सुवर्णखरेदीच्या बाबतीत एक वैभवशाली परंपरा पुढे नेणार्‍या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आसावरी आनंद पेडणेकर. आज आसावरी पेडणेकर हे नाव सोन्याच्या बाजारात अतिशय विश्वासाने घेतलं जातं. कौटुंबिक व्यवसाय पूर्वीच्याच वैभवाने टिकवून ठेवणं हे खूप मोठं आव्हान होतं. आसावरीताईंनी हे आव्हान आपल्यासाठी संधी आहे असं समजून या संधीचं खर्‍या अर्थाने सोनं केलं.
 सुवर्णखरेदीच्या बाबतीत एक वैभवशाली परंपरा पुढे नेणार्‍या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आसावरी आनंद पेडणेकर. आज सोन्याच्या बाजारात अतिशय विश्वासाने हे नाव घेतलं जातं.
 
 
सोनं, चांदी, हिरे अशा सगळ्याच क्षेत्रांत अत्यंत आकर्षक दागिने, नवनवीन डिझाईन्सचे दागिने आणि पारंपरिक तसंच आधुनिक दागिन्यांसाठी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचं नाव आज आवर्जून घेतलं जातं. सणासुदीच्या दिवसांत तर सोनं खरेदी होतेच; पण एक गुंतवणूक म्हणूनही सोन्याचा विचार नक्कीच केला जातो. या सगळ्याच अनुषंगाने या व्यवसायातल्या विविध आव्हानांविषयी, संधींविषयी आसावरीताईंशी बातचीत झाली.
 
 
 
शिक्षणाने आर्किटेक्ट असलेल्या आसावरीताई, आनंद पेडणेकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायात सहज सामील झाल्या. 60 वर्षांची परंपरा असलेल्या या व्यवसायात गेली 30 वर्षे त्या आहेत. या वर्षांतले सगळे चढउतार त्यांनी पाहिले, अनुभवले. त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्या आणि त्यातूनच त्यांचा व्यवसायही वृद्धिंगत झाला. अगदी सुरुवातीला फक्त दोन दुकानं होती, त्याची आज तब्बल 20 दुकानं झाली आहेत. पैकी चार दुकानं गोव्यातही आहेत. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर JGP च्या शाखा विस्तारत जाण्याचा त्यांचा मानस आहेच.
 
 
 
शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित असणार्‍या कुटुंबात आसावरीताईंचा जन्म झाला. कलेची आवड असणार्‍या आसावरीताईंनी आर्किटेक्चरचं (स्थापत्यकलेचं) शिक्षण घेतलं. महाविद्यालयात असताना अनेक बक्षिसं मिळवली. दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या अनेक कार्यक्रमांतून त्यांचा सक्रिय सहभाग होता. ज्ञातीबांधवांसाठी खूप मोठं काम जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांनी केलं होतं. त्यामुळे ज्ञातीच्या या अनेक कार्यक्रमांतून त्यांनी आपल्या या भावी सुनेचे गुण हेरले होते. त्यामुळे लग्नानंतर सासर्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सूनबाई उत्तम तयार झाल्या. लग्नानंतर अगदी मुलीसारखं, मोठ्या प्रेमाने त्यांनी आसावरीताईंना शिकवलं. आपल्या कौटुंबिक व्यवसायात सुनेचा सहभाग असावा, हा त्यांचा आग्रहही होता.
 

Jagannath Gangaram Pednekar Jewellers 
 
आसावरीताई म्हणतात, सासर्‍यांचा एवढा पाठिंबा, सासूबाईंची आणि नवर्‍याची भक्कम साथ असल्यामुळे मला व्यवसायातल्या सगळ्या आव्हानांवर मात करणं शक्य झालं. मुळात सासर्‍यांची शिकवण खूप मोलाची होती. लग्नानंतर मलाही अगदी घरी बसून राहायचं नव्हतं. मुळात डिझायनिंगची, कलेची आवड मला होतीच. गणित चांगलं असल्यामुळे हिशोब पक्का होता. बरं सासर्‍यांनी मला आमच्या ज्ञातीच्या कार्यक्रमांतून पाहिलं होतं, त्यांच्या हस्ते मला बक्षीसही मिळालं होतं. त्यामुळे त्यांचा माझ्यावर अगदी ठाम विश्वासही होता. त्यांचं काम आम्ही सगळ्यांनीच जवळून पाहिलं होतं. आपल्या व्यवसायावर तुमचं प्रेम असलं पाहिजे. मग त्यासाठी भरपूर मेहनत घ्या तरच तुम्हाला, तोच व्यवसाय मानही मिळवून देतो, हे त्यांचं नेहमी म्हणणं असे. ते नेहमी म्हणायचे की, आपली बैठक पक्की असली पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही कामावर येता तेव्हा तिथल्या कामाचा कंटाळा येऊन चालणार नाही. आपल्या कामाला प्राधान्य द्या. लग्न, मुंज, बारसं, सण, समारंभ इथे थोडा वेळ हजेरी लावून या; पण लगेच तुम्ही कामाच्या ठिकाणी परत आलं पाहिजे.
 
 
त्यांच्या या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवल्या. काऊंटरवर बसल्यानंतर आपलं चौफेर लक्ष कसं असलं पाहिजे, सोनं कसं पारखायचं, सोन्याचा भाव कसा ठरतो, ग्राहकांशी आपण कसं वागलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. सुरुवातीला मला या क्षेत्राची काहीच माहिती नव्हती. त्या वेळी दुकानात थांबून सगळं निरीक्षण करत होते. जी मंडळी दुकानात माझ्या आधीपासून काम करत होती त्यांच्याकडून शिकूनच मला या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या.
 

Jagannath Gangaram Pednekar Jewellers
 
दुकानात काम करणार्‍या प्रत्येकाशी आसावरीताईंचं वागणं हे प्रेमाचं असतं. अगदी कामगारांपासून कारागिरापर्यंत सगळ्यांनाच त्या आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानतात. आज 500हून अधिक लोक JGP च्या या परिवारात सामील आहेत. घर, कुटुंब आणि व्यवसाय या सगळ्यांचा समतोल सांभाळत बायको, आई, सून, यशस्वी उद्योजिका या सगळ्या भूमिका लीलया पार पाडणार्‍या आसावरीताईंना म्हणूनच प्रेमाने आणि सन्मानाने वहिनी असंच संबोधलं जातं.
 
 
त्यांच्या मागणीनुसार उत्तम दागिना रास्त दरात घडवून देण्याचं काम केल्यामुळे आज ग्राहक अत्यंत समाधानी आहेत. दागिन्यांचं वैविध्य त्यांनी नेहमीच जपलं. पारंपरिक दागिन्यांची परंपरा तर त्यांनी जपलीच; पण काळाप्रमाणे अगदी कमी वजनाच्या नाजूक दागिन्यांनासुद्धा त्यांनी घडवलं. आसावरीताई म्हणतात, आता महिला नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर जातात. सोन्याचे दरही वाढले असल्याने प्रत्येक समारंभाला वेगळा दागिना घ्यायचा तर कमी वजनात घ्यावा लागतो. वजनाने हलके, नाजूक दागिने आता लोकांना जास्त आवडतात. आता 3/4 ग्रॅमचा नेकलेस बनतो किंवा 6/7 ग्रॅममध्येे बांगडी बनते. आमचा ‘यु अँड मी’ नावाचा ब्रँड आहे. अगदी वजनाने हलके सुंदर दागिने तुमच्या खिशाला परवडतील असे अगदी 500/1000 रु.पासूनही मिळू शकतात. सोनं, चांदी, हिरे अशा सगळ्या प्रकारांत हे दागिने मिळू शकतात.
 
 
मुळात सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दागिन्यांचं डिझाईन. जर दागिन्यांचं डिझाईन उत्तम असेल तर ग्राहक आपोआपच त्याकडे ओढला जातो. ग्राहकांना काय हवं हे आसावरीताईंना नेमकं कळलेलं आहे. म्हणून त्या नेहमीच वेगवेगळी कलेक्शन्स घेऊन येतात. वेगवेगळ्या खड्यांचं, नवग्रहातल्या खड्यांचं कलेक्शन - ‘रेवती’. लग्नासाठी अगदी हलक्या वजनाचं ‘आम्रपाली’ कलेक्शन किंवा मोराचं डिझाईन असलेलं मिनाकारी काम असलेलं ‘कृत्तिका’ कलेक्शन असेल. आसावरीताईंनी ग्राहकांची आवड ओळखून त्यानुसार हे कलेक्शन लोकांपुढे आणलं. याव्यतिरिक्त व्यवसायाच्या दृष्टीने ग्राहकांना आकर्षित करणारे आणि दागिन्यांची उत्तम माहिती देणारे अनेक कार्यक्रम दुकानात त्या आवर्जून आयोजित करतात.
 
 
डायमंड ज्वेलरी उत्सवात तर प्रत्येक खरेदीवर एखादी पैठणी किंवा काही भेटवस्तू त्या महिलांना देतात. त्यामुळे महिला वर्गाला आसावरीताईंचं विशेष कौतुक वाटतं. शिवाय काळाप्रमाणे काही बदल करून सोशल मीडियावरही दर आठवड्याला वेगवेगळे दागिने लोकांसमोर आणले जातात. आपल्या पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण दागिन्यांची माहिती देणारी ‘ज्वेलेरो’ ही त्यांची डिजिटल मालिका यूट्यूबवर चांगलीच गाजली. दागिन्यांच्या बाबतीत आसावरीताईंची आस्था काही वेगळीच आहे म्हणूनच त्या ‘ राजेशाही संग्रह’ जेव्हा लोकांसमोर आणतात तेव्हा त्या दागिन्यांची कलाकुसर आणि तेज आपले डोळे दिपवतात. आजही अत्यंत चोखंदळ ग्राहकांची पहिली पसंती ‘राजेशाही संग्रहा’ला असतेच.
 

Jagannath Gangaram Pednekar Jewellers 
 
काही काही प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातात. माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात घडलेल्या दोन प्रसंगांनी मला चांगलीच शिकवण दिली.
 
 
एकदा एक मुलगी आणि आई दुकानात आली. त्या मुलीला तिच्या पहिल्या पगारातनं वडिलांसाठी एक अंगठी बनवायची होती आणि वडिलांना न सांगता सरप्राइज म्हणून तिने ती बनवायला दिली. अंगठी तयार झाली; पण तिच्या हिशोबाने ती नीट झाली नाही, असं तिचं म्हणणं होतं. तर ती आमच्या दुकानातल्या माणसाला सांगायला लागली की, मी सांगितली होती तशी ही अंगठी बनली नाहीये आणि खरं तर तिच्या पहिल्या पगारातून तिला ती वडिलांना भेट द्यायची होती आणि तिला जशी हवी तशी ती बनली नाही. त्यामुळे ती अगदी ढसाढसा रडायला लागली.
 
 
पण काऊंटरवरच्या माणसाने तर तिला सांगितलं की, आता काहीच होणार नाही. आता तुम्हाला जर नव्याने अंगठी बनवायची असेल तर परत नवीन मजुरी द्यावी लागेल आणि अंगठी आम्ही परत बनवून देऊ; पण तिला काही सुचेचना, कारण ती नुकतीच नोकरीला लागली होती. त्यामुळे पुन्हा एकदा मजुरी देणं हा सगळा विचार करून तिला रडू आलं. सासर्‍यांनी ते पाहिलं. सासरे तिथे गेले, त्यांनी सगळं समजून घेतलं आणि त्यांनी तिला आश्वस्त केलं की, मी समजू शकतो तुझ्या भावना. मी तुला नवीन बनवून देतो. तू काही काळजी करू नकोस. सासर्‍यांनी दोन दिवसांत तिला नवीन अंगठी बनवून दिली. हा संबंध जपण्याचा प्रश्न होता किंवा तिचं मन राखण्याचाही प्रश्न होता. अशा वेळेला पदरची पैसे घालूनसुद्धा हे संबंध आपण जपले पाहिजेत, हा विश्वास कसा जपला पाहिजे, हे सासर्‍यांनी खरं तर या उदाहरणावरनं दाखवून दिलं आणि त्यामुळे हे शिकायला मिळालं.
 
 
अशा विविध अनुभवांमुळे आसावरीताईंनी नेहमीच ग्राहकांचा विचार करूनच काम केलं. त्यांच्या मते स्त्री असल्यामुळे अधिक छान पद्धतीने आपण व्यवसाय करू शकतो. घर चालवण्याची कला उपजतच आपल्यात असते. जसं घर आपण निगुतीने सांभाळतो तसाच व्यवसायही सांभाळला पाहिजे किंवा नाती सांभाळताना ज्याप्रमाणे आपण समजून घेतो तसंच ग्राहकांना जर आपण समजून घेतलं तर त्यांनाही बरंच वाटतं.
 
 
समजूतदारपणा आणि एकमेकांवरचा विश्वास या बळावरच आज जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचं संपूर्ण कुटुंब व्यवसायात आहे. आज आसावरीताई आणि आनंद यांच्याबरोबर त्यांची दोन्ही मुलं आणि दोन्ही सुनादेखील आनंदाने या कौटुंबिक व्यवसायाचा भाग झाली आहेत. नवीन पिढी व्यवसायात आल्याने नवी परिमाणं, नव्या संकल्पनाही आता त्यांच्या व्यवसायात साकारल्या जात आहेत. याव्यतिरिक्त सासर्‍यांनी सुरू केलेला सामाजिक जाणिवेचा वारसाही आसावरीताई पुढे नेत आहेत. तळवडे गावात त्यांनी सुरू केलेल्या शाळेतल्या मुलांनीही मोठी स्वप्नं पाहावी यासाठी संपूर्ण पेडणेकर कुटुंब त्या मुलांच्या पाठीशी आहे.
 
 
वर्ल्ड ट्रेड सेंटरचा उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार किंवा ज्वेल ट्रेंडझचा ‘बेस्ट रिटेलर ऑफ द इअर पुरस्कार’ या आणि अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी आसावरीताईंना सन्मानित केलं गेलं आहे.
 
 
कौटुंबिक व्यवसायातही पूर्वीच्याच वैभवाने तो व्यवसाय टिकवून ठेवणं हे खरं तर खूप मोठं आव्हान असतं. JGP च्या प्रवासात दोन दुकानांवरून 20 दुकानांपर्यंतचा प्रवास नक्कीच गौरवशाली आहे आणि यासाठी संपूर्ण कुटुंबाचे प्रयत्न नक्कीच मोलाचे आहेत.
 
 
या संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवत आज आसावरीताई व्यवसायाची धुराही खंबीरपणे सांभाळत आहेत. म्हणूनच ग्राहकांपासून ते कामगारापर्यंत सगळ्यांच्याच त्या लाडक्या वहिनी झाल्या आहेत.